10/19/08

देणाऱ्याने...

तुझ्या प्रेमात सगळे पडले, कारण तूच स्वत:च्या प्रेमात पडलेला!
तू कृष्ण!
गोपींसाठी रास रचला म्हणतांना शतरूपांनी त्यांच्या बरोबर पायांचा ताल धरणारा, "रमण"-
स्वत:तच रमलेला.
मी वेडी राधा. मला कळलं कसं नाही हे?

देण्याचा धर्म माझ्यासाठीच होता, आहे.
घेण्यासाठी तू सगळ्या आसमंतात भरून राहिला आहेस.
ज्या दिवशी फिरून तुझ्या प्रेमात पडणार नाही मी, त्या दिवशी माझ्या जीवनाला अर्थ उरणार नाही-
हे माझ्या कपाळी लिहूनच गेलायस ना तू?

देणाऱ्यानं आनंदानं द्यावं. कारण त्यांना देण्याचं "भाग्य" लाभलं!
मी खूप दिवस गृहितच धरून चालले होते- माझं भाग्य!

पण मग मला राग आला एकेदिवशी.
मी ही केला हट्ट! का म्हणून मी द्यावं दरवेळी? तू का नाही देऊ शकत कधी?
तु मनधरणी करशील म्हटलं, तर वर तूच रूसून बसलास!
स्वत:हून देण्याचं सोड- निदान परत तरी कर म्हटलं.

तर ते ही नाही?

दिवस गेले, महिने, वर्ष गेली. मी रागावलेली, तू रूसलेला.
मग मला उमगलं-
देणाऱ्यानं "द्यावं लागलं" असं सांगण्यापेक्षा, "देण्याचं भाग्य मिरवावं", त्यातच देवाचं देवपण, आणि माणसाची माणूसकी.

गोकूळ सोडल्यावरही वेगवेगळ्या रूपात तू राधेला शोधतोयस, त्यातच नाही का मला माझं उत्तर मिळालं?