"कोहम" प्रेरणेने.......
केवळ गाडी चालवतांना झालेला कंप्यूटरचा विरह सहन न होऊन, घरी आल्या आल्या चहातल्या बिस्किटाबरोबर कंप्यूटर चघळत, तिच्यासाठी हिऱ्याच्या कुड्या आणल्याच्या आवेशात
तो: ए लवकर इकडे ये- मी तुला एक गंमत दाखवतो!
ती: मागच्या वेळी तुझी गमतीची व्याख्या म्हणजे बिकिनीतली सूपरमॉडेल होती. त्यामुळे सध्या मी पोळ्यांवर चित्त एकाग्र करतेय, तेच बरं.
तो: अगं नाही, ही खरंच एकदम सूपर गंमत आहे- आणि बघ मी तुला करून देतो... हे गूगलचं "रीडर" म्हणजे काय कमाल आहे- तुला रोज वाचायच्या असलेल्या, जगभरातल्या, अख्ख्या मायाजालावरच्या सगळ्याच्या सगळ्या वेबसाईट इथे ह्या गूगलच्या एकाच पानावर मिळतील...हा शोध मला आधीच लागला असता तर!
ती: (बुद्धाने ज्या निर्विकारपणे राग-द्वेष-मोह-दु:खाचा स्वीकार केला, त्या निर्विकारपणे): ह्म्म्म्म्म्म्म.
तो (तिच्या निर्विकारपणाने अधिकच चिरडीला येऊन): अगं हे मायाजाल म्हणजे अलिबाबाची गुहा आहे- ह्यात काय काय रत्न दडलियेत... (मग पुन्हा, हुकमी एक्का चालवल्याच्या आवेशात) आता मला सांग- मागच्या महिन्यात आपला किराण्याचा खर्च काय झाला?
ती (ते माझं काम नव्हे - असं मनात घोळवत): ह्म्म्म
तो: हा माझा ऑनलाईन हिशोब सांगतोय की आपण चक्क ४०० डॉलर किराण्यात घालवले. No offense, पण आपल्या घरी काय पंचपक्वान्नांचं साग्रसंगीत जेवण रोज असतं असंही नाही!
ती (आता कधी तो सीमारेषा ओलांडतो, आणि कधी आपण क्षेपणास्त्र चालवतो, ह्या ईर्शेने): अच्छा- म्हणजे तुला आज वरणभाता ऐवजी पुरणपोळी चालणारे का?
तो (जे लोणच्याने जमत नाही, ते लोण्याने होतंय का अशा विचारात): अगं असं नाही. पण हेच बघ. तो अक्षयकुमारचा नवीन पिक्चर निघाला- त्याची तिकिटं ऑनलाईन अर्ध्या किमतीत मिळतायत. जायचं का मग?
ती (त्याचाच डाव त्याच्यावरच उलटवत): त्यापेक्षा YouTube वर येईलच ना फुकटात- तेच बघूया!
तो: तेच तर म्हणतोय मी- की आपल्याला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, त्यांची माहिती मिळायला नको का? तू तुझ्या सगळ्या साळकाया-माळकायांना Twitter वर बोलाव- म्हणजे पिक्चरपासून रोटी-मेकरच्या नवीन मॉडेलबद्दल तुला लगेच बातम्या कळतील......
ती( ८वीत असतांना फ्रीज, टीव्ही, मिक्सरपासून फोन, गाडी, कंप्यूटर, वॉशिंगमशीन- ह्या गरजा की सोयी? अशा अर्थाचा निबंध लिहिला होता, त्याचा पुनर्विचार करत): अरे उत्क्रांतीवादात माणसाची शेपूट गळाली, ती गरज होती की सोय, की चक्क एक hobby? !!
तो(नेमकं तिचं म्हणणं काय आहे, हे कधीच कळत नसल्यामुळे वैतागून): पण वॉशिंगमशीनमधून धुण्याचं सायकल संपलं, की तुला ट्विटरवर अपडेट येईल बघ!
ती (आडून आडून वार करण्याचा कंटाळा येऊन, सरळ हल्याच्या पवित्र्यात): अरे पण ते कपडे आपोआप जाऊन पडत नसतात ना तिथे! बा पामरा- नुसतं कंप्यूटरवर बसून आयुष्य चालत नसतं. काल पुढच्या दाराची कडी बिनसलिये. त्याचं काय करणारेस कंप्यूटरवर?
तो (पटकन उत्तर सुचल्याचा जल्लोष करत): आपल्या Maintenance वाल्याची वेबसाईट असेलच ना- तिथे ऑनलाईन कम्प्लेंट नोंदवतो आत्ताच्या आत्ता- बोल- काय म्हणणं आहे तुझं ह्यावर?
ती (निकराने): पण स्वत: उठून तु कधी साधा बल्बही बदलू नकोस- त्यासाठी, किंवा चहा, पोळ्या, कपड्यांच्या घड्या घालायला ऑनलाईन काही सॉफ्टवेअर मिळतंय का बघ.
तो (निर्वाणाची दीक्षा नुकतीच मिळाल्याप्रमाणे, थोड्या सात्त्विक, थोड्या विस्मयचकित स्वरात): ह्म्म्म. मी झालोय खरा कंप्यूटर-ऍडिक्ट.
आणि मग.....................................................
तो लगेच संगणकपेटी बंद करून, तत्परतेने उठून, टीव्हीपुढे समाधी लावून बसतो.....................