8/22/10

विराग

दारासमोर माझ्या फुलणार बाग होता
का व्यर्थ पावसाचा मग पाठलाग होता?

राशी किती सुखाच्या मी ओंजळीत पेलू?
जगण्यावरील माझा इतकाच राग होता!

कळली जगा न माझी व्याख्याच वेदनेची
काव्यात्म अनुभवाचा तो एक भाग होता!

भिजवून ओठ माझे दिधली तहान ऐसी
जीवना सखया तुझा तो अनूराग होता.

हिरवी बघून पाने फुलल्या कळ्या नव्याने
एका क्षणाचपुरता माझा विराग होता!




8/19/10

मोल

दोन कवी, दोन्ही ही अलौकिक प्रतिभा घेऊन आलेले. आणि तरीही दोघांनाही सारखेच प्रश्न पडावे!

"एकदा भेटून जा रे, दिव्यतेच्या पांडुरंगा,
हुरहुरे प्राणांत माझ्या वेदनेची चंद्रभागा
तूच ये घेऊन दिंडी, होऊदे माझीच वारी,
ताणली ताणापुढे मी जीवनाची एकतारी."


ह्या काही ओळींची मला सारखी प्रचीति येते. रोज करोडो लेख, रोज नवे पुस्तक, रोज नवा ब्लॉग, रोज नवे लेख, रोज नवी नावे, आणि सगळेच अप्रतीम, अलौकिक लिहिणारे! त्यांना दुरून बघायचं, आणि एकदा तरी त्या दिव्यतेचा स्पर्श आपल्याला व्हावा म्हणून झटायचं!

ह्यांना कुठून धाडस येतं अक्षरश: "झंझावाता" सारखं लिहत सुटायचं? कुठुन शब्द येतात? कुठून कल्पना? कशी जमते इतक्या पारदर्शीतेने भावना मांडतांनाही त्यांचं सौंदर्य टिपण्याची कसरत?

मग कधीकधी वाटतं आपलं लिहणं तर काय? खूप सोप्पं आहे- शब्दांचे बुडबुडेच काय ते. दोन क्षण आनंद देऊन गेले तरी पुरेत. लाखो लोक आपापल्या मती/गतीनुसार लिहितच असतात की. "राजहंसाचे चालणे/जगी झालेया शहाणे/म्हणोनी काय कवणे/चालोची नये काय?" - बघा, हे सुद्धा पु. लंनी आणि त्या ही आधी कोणी तुकारामांनी लिहूनच ठेवलंय की महाराजा, आणि ते ही ओवीबद्ध.

हेच ते कधीकधी अशक्य श्वास कोंडल्यासारखं होणं, जेव्हा मीसुरेश भट वाचते, कुसुमाग्रज वाचते.

"असेच काही दुरूनि पाहणे, वा वा म्हणणे,
पिटात जागा अपुली राखुन
अलौकिकाच्या दिव्यात दुसरे, अपुले व्हावे
प्रेक्षागारी व्यतीत जीवन.

तेच सुरक्षित तेच समंजस ते सालसपण
बिकट वाट वहिवाट नसावी
अतर्क्य नियती! अशी मुलाखत आकाशाशी
पंखावाचुन भाळी असावी!"

कुसुमाग्रजांच्या "अतर्क्य" कवितेतल्या ह्या ओळीपण किती सुरेश भटांच्या कवितेशी जुळतात! खरे तर हे दोन्ही कवी अलौकिकाच्या प्रकाशात आकंठ न्हायले, आणि प्रेक्षागारी बसलो आपण. आणि तरीही त्यांच्याच शब्दातून आपल्याच भावनांना इतके सुंदर रूप मिळावे, हाच तर खरा विरोधाभास आहे.

बोलणे सारेच आता फोल जाहले
त्यांचेच आज माझे हे बोल जाहले.

ती लाट अर्णवाची, क्षितिजास हात टेके-
डबक्यात पोहुनीही मी "खोल" जाहले!

काहीतरी लिहावे, सुचते तसे परंतू
शब्दांपुढे कशाचे, ना मोल जाहले.