माझं बालपण गेलं, ते घर एका परीने अमेरिकनच म्हणायला हवं. तिथे “दिसतं तसं नसतं” चे अमेरिकन नियम अगदी १००% लागू होते. अमेरिकेत कसं, driveway मध्ये park करतात, नि parkway वरती गाडी चालवतात. हायवेवरून Exit करतांना तुम्ही खरं म्हणजे कुठल्यातरी गावात enter करत असता, तुमच्या “cousin” ची मुलं सुद्धा तुमची “cousins” च असतात.....
माझ्या लहानपणी, आमच्या घरातही अगदी तसलाच प्रकार होता.
बैठकीच्या, “मधल्या खोलीत” रात्री सोफे बाजूला करून आम्ही गाद्या घालायचो, आणि
कोपऱ्यातल्या एका बेडरूमला मात्र “classroom” बनवून तिथे माझे आजोबा इंग्रजीची शिकवणी करत असत. दुसऱ्या बेडरूमला आम्ही चक्क
dressing room म्हणायचो, कारण तिथे आंघोळ झाल्यावर तयार
व्हायचे असायचे हे एक, आणि गणेशोत्सव, शारदोत्सव, महिला मंडळ, नागरिक मंडळाच्या
अनेक कार्यक्रमांची green room सुद्धा तीच होती.
करता काय? “टिळकनगर” मैदानाच्या काठावरच आमचं घर पडायचं, त्यामुळे भोज्यासारखं
तिथे डोकावूनच शेजारी-पाजारी पुढे जात.
दारं नि खिडक्या तर त्या घराला इतक्या होत्या, की “सातशे
खिडक्या नऊशे दारं” हे गाणं आपल्याच घरावरून तयार केलंय, असं मला नेहमी वाटायचं.
पुढच्या अंगणातून आत गेल्यावर नावाला सुद्धा “दार” म्हणून नव्हतं. फक्त एक जाळीचा
वऱ्हांडा, नि त्याला जोडून जो पॅसेज होता, त्यातून थेट स्वयंपाकघरातल्या
ओट्यापर्यंत नजर जाई. म्हणजे नको तिथे दारं, नि हवी तिथे ठेंगा!
पण त्या घरातली माणसं तरी कुठे कुणाच्या “व्याख्येत” बसणारी
होती? मी ज्यांना “आजी-आजोबा” म्हणते, ते खरं म्हणजे माझे आत्या-आतोबा होते. माझी
खरी आजी फार लवकर वारल्यावर तिनेच बाबांना मोठे केले, म्हणून मग तीच “आजी” झाली.
अहो, आमचा कुत्रा “लालू” हा सुद्धा खरं म्हणजे आमचा कुत्रा नसून वाट चुकून आला, नि
घरचाच झाला. तर मग त्याच नियमाने, “माझ्यासारख्या “शाण्या” मुलीचा एवढा खोडसाळ
छोटा भाऊ नक्कीच नसेल, नक्कीच आई-बाबांनी हॉस्पिटलातून चुकून दुसराच उचलून आणलाय,
असंही माझं पक्कं मत झालेलं होतं J
कोण-कुठल्या-देश-वेष-रंगरूप-भाषांच्या विविध लोकांना
सामावून घेणाऱ्या अमेरिकेसारखंच ते घर, देशस्थ असो वा कोकणस्थ, मराठे असोत वा
मारवाडी, सगळ्यांचंच घर झालं. रक्ताची “खरी” नाती फारशी उरलीच नसतांना, ह्या
“मानलेल्या” भाऊ-काका-बहीण-मुलीच्या नात्यांत मात्र अजूनही ओलावा आहे, हक्काची
माया आहे. अशी वर्ष सरली, नि पाखरं बाहेर पडली, तसं मला अजून एक सत्य समजत-उमजत
गेलं.......
की आपण हे जे “आपलं” म्हणतो, ते घरच खरं म्हणजे “आपलं”
नाहिये.
मोगऱ्याच्या सुवासाचं घर
आंब्याच्या रसाचं घर
टिक्करबिल्ला खेळण्याचं घर
लिंबोण्या वेचण्याचं घर
अंगण, ऊन, जाळीच्या कोनाड्यांचं,
गच्ची, पाऊस, वाऱ्याचं घर
कपाटं, माळे, कोठीही भरून
उरलेल्या पसाऱ्यांचं घर...
ते घर आमच्यासाठीच बनलं असावं, कारण गेल्या ३५ वर्षात
त्याचे खरे मालक कधीच तिथे राहिलेही नव्हते. आमचं झालं, नि ते हळूहळू भरलं,
आमच्यासाठी ते बदललं. त्यातल्या खोल्यांनी आपले रंगच नव्हे, तर रूपही पालटले.
आजोबा गेल्यावर त्यांच्या खोलीतल्या भिंतीवर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाजूला चक्क
मायकल जॅकसन येऊन बसला. पण आम्ही पाखरे उडालो, त्याच सुमारास आमच्या कुटुंबावर ते
घरही सोडायची वेळ आली. घरमालकांनी तिथे फ्लॅट बांधायचे ठरवले होते!
ऐकून डोळे भरून आले, आणि “माहेर” म्हटल्यावर आता दुसरी
कुठली वास्तू डोळ्यासमोर आणू म्हटली तरी आणता येईना. पण नाईलाजाने बाहेर पडलो.
माळे, गाळे रिकामे झाले, पण आमच्या आठवणींचे हजारो काजवे अजून त्याच अंधाऱ्या
खोल्यांमधून चमचम करत असतील असं मला वाटत राहिलं... काही दिवसांपूर्वी आई म्हणाली,
“जुन्या घरच्या शेजारच्या काकूंकडे हळदीकुंकू होतं गं. गेलो, तर घर आपलं बंजर
भूतबंगल्यासारखं दिसतंय. तण वाढलं, मोगऱ्याचे वेल पार जळून गेलेत...” आईचा आवाज
हळवा झाला.
समोरच्या जाळीवर दोन्हीकडे नक्षीची कमान काढल्यासारखे ते
भरघोस वेल डोळ्यांपुढे आले. त्यांचा सुवास मनात दरवळला. आणि त्याच सुमारास, इथे
न्यू जर्सीतले आमचे मावशी-काका, त्यांचे अनेक वर्षांचे घर विकून एल. ए. ला स्थायिक
व्हायला निघाले. पॅकिंग, नि टाकून द्यायच्या सामानाची आवराआवरी करायला आम्ही
त्यांच्याकडे गेलो होतो. पुन्हा माझ्या मनाने, मागच्याच दु:खावरची खपली काढली.
पुन्हा रिकाम्या भिंतींना सामोरं जावं लागणार होतं.
आणि तेवढ्यातच, काकांनी माझ्या हातात मोगऱ्याची छोटी कुंडी
ठेवली. “ह्याच उन्हाळ्यात आणलाय हा! त्याला दोन-चार फुलंही आली... मोठ्या कुंडीत
लावून बघ, टिकतोय का.” मी अवाक्! त्या घरचा मोगरा, ह्या रूपात इथे आला माझ्यासाठी?
तिथल्या आठवणींचा दरवळ आता मी इथे जपावा म्हणून, त्याला पाणी घालायचा वसा मी इथे
घ्यावा म्हणून! त्या घराने, त्यातल्या माणसांनी दिलेल्या मायेचा सडा इथे पडावा, नि
वाढावा म्हणून!
बघता बघता मीच मग मोगरा झाले. टपटप करीत मोत्यांच्या
सड्यातून अंगणात उतरले, हरवलेला सुगंध अंतरात गवसल्यावर घमघमले. कुणी रूजविला,
कुणी शिंपिला, तयाचा वेलू, गगनावरी गेला!