3/11/14

हसत हसत!

काल स्वप्नात आजी आली.
कोरडेच डोळे पुसल्यासारखे करीत,
म्हणाली,
"बाई गं श्वास धरून बस...
ही आयुष्याची छोटी छोटी ओझी...
पेलायची तुझी तुलाच.
मोठ्या दु:खांना मिळतील अश्रू
मिळतील सांत्वना, मिळतील आधारस्तंभ.

पण रोजचे हे जीवघेणे मन:स्ताप-
गोड आमरसाचे कडवट पिवळे डाग,
पंख्यावर चिकटलेली जळमटे
खडखड दारावरचे आडमुठे कुलूप.
हेच ठरतात बघ जन्माचे वैरी."

आजीला मी म्हटले,
"एवढा विचार कोण करतंय?"
तर ती न बोलताच हसली होती फक्त.
"त्याहून मोठा विचार,
येईल तुला करता?"
तिचा प्रश्नच मला कळला नव्हता,
अनेक वर्ष!

आता ती स्वप्नात येते,
तेव्हा हसत असते.
कारण मला माहितीये- तिने कशी पेलली ओझी
खूप मोठी, खूप जीवघेणी...
हसत हसत.