खूप वर्षांनी कॉलेजच्या मैत्रिणी जर भेटल्या, तर त्यांना कसं तोंड द्यायचं, हा प्रश्न भेडसावू लागला असेल, तर, पारतंत्र्यातील भारत सोने की चिडिया "था", तसं आपलं झालंय हे समजावं. साधारणपणे तीसाच्या जरासं वर वय झालं, की अनेक लोकांना हा सोने-की-चिडिया सिंड्रोम होऊ लागतो, आणि
मागे वळून, भूतकाळ घुसळत घुसळत काही कार्यकारणभावाचे नवनीत निघते का, ते बघण्याच्या छंद जडतो.
परीक्षेत पहिला नंबर,
दिसण्यात "प्राप्ते तु शोडषे"चा असर,
गळ्यात गोड स्वर,
डोळ्यात सतत तेवणारे ’अक्षर’.
पुढे शंभर पर्याय होते, कष्टाची तयारी नि धमकही होती, शिवाय काहीतरी "वेगळं" करण्याचा निश्चय होता. असं सगळं असलं, की तिथून पुढे प्रगती किती कठीण असते, ते कुणी मला विचारा.
प्रगती झाली, नाही असे नाही, पण "दाखवण्याजोगं" यश हाती लागलं नाही, तर मग ज्या मैत्रिणींना आपला एकेकाळी हेवा वाटत असेल, त्यांच्या समोर हे स्वत:चं बदललेलं रूप घेऊन प्रांजळपणे उभं राहण्याचं धैर्य गोळा करायला हवंय, असं मी स्वत:ला समजावलं.
पारतंत्र्यात पडण्यापूर्वी भारतात छोट्या जहागिरी, राजघराणी, ह्यांची बैठक खिळखिळी होऊ लागली, एकी तुटू लागली, तशा तिशीत आल्यावर दातातल्या फटी जास्त जाणवू लागतात. (धिस इज अ टोटली डिमेंटेड थॉट, प्लीज इग्नोर.) मला खरं म्हणजे असं म्हणायचं होतं, की सोळाव्या वर्षी सतरा उद्योगांमधे वेळ वाटला जात नाही, आणि ध्येयं पण समोर उंच शिखरांसारखी स्पष्ट असतात. तिशीत मात्र, आज कुठल्या "टेकडीला" प्राधान्य द्यावं, हेच कळेनासं होतं. शिवाय, जसे जवळ जातो, तसे शिखरावर पोचूनही पायाला मातीच लागणारे, सोनं नव्हे, हे ही आकळू लागतं. पण असल्या फॉल्स जस्टिफिकेशन्सने तू कुणाला भुलवू पाहतोस, रे मना? तुझं तुलाच माहितिये, आपण खोटी साक्ष काढून पळणाऱ्यातलेही नाही.
आजच्या घडीला दोन लठ्ठ-घट्ट चिकटलेल्या नोकऱ्या, दोन गुबगुबीत पोरं, एक चौकोनी घर, ह्या रोजच्या टेकड्यांवर तुझी नजर, तिला पुन्हा शिखरांकडे वळवायचं कसं? तेव्हा शिखरांकडच्या रस्त्यावर तू चालायला लागलीस, पण आता टेकड्यांनाच डोळे भरून बघता बघता तुझी नजर हरवतेय?
पारतंत्र्यातल्या भारतातल्या अनेकांप्रमाणे, जे जे पाश्चात्य, ते ते उत्तम, असले सोयिस्कर निष्कर्ष काढलेस, पण "स्वत:ची प्रगती, ती स्वत्वातूनच होईल, बाह्यानुकरणाने नव्हे" हे विसरलीस? कुठल्या गोष्टींना प्राधान्य आहे, हे नेहमीच प्रत्येकाच्या मनात स्पष्टच असतं, फक्त कळपाचं प्राधान्य तेच खरं, असं मानून चालू नकोस. तडजोडींनी आयुष्य सोपं होईल, पण म्हणून तडजोडींनाच आयुष्य मानून चालू नकोस.
पारतंत्र्यातून बाहेर पडल्यावरही भारताला किती दशके लागली, आपल्या क्षमता, आपल्या विशेषत्वाची जाणीव व्हायला! तू तर केवळ दातात फटी पडू लागलेली, केसांत रूपेरी डोकावू लागलेली, पण कणीक मळता मळताही लिहण्या-वाचण्याचे विचार करणारी, एक तिशीची सामान्य स्त्री आहेस.