"घर थकलेले... संन्यासी" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं! इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर "टांगणीला" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे!
Syria देशातून गेली अनेक वर्ष ते चालताहेत. त्यांच्या मागे बॉम्बने विदीर्ण झालेल्या त्यांच्या गावांचा आक्रोश कानापर्यंत येऊ नये म्हणून कान आवळून बंद करून. त्यांची घरं जणू "थकलेली". कुणाची "थकबाकी" असते, कर्ज थकलेलं असतं तसं, घरासाठी वाट पाहणं त्यांच्या नशीबी आलेलं. आणि जीवाच्या भीतीने पायपीट करून करून ते ही थकलेले. त्यांना "गृहस्थ" कसं म्हणावं? जे घरदाराच्या पाशांमधून निकराने स्वतःला सोडवून निघालेले- ते संन्यासीच म्हंटले पाहिजेत.
आडोशाची "भिंतही खचते" तेव्हा आईच्या डोळ्यातलं नक्षत्र त्यांना आठवतं आहे.
५ वर्षांच्या ओमरान च्या शून्य नजरेमध्ये असेल का तेच नक्षत्र?
आई, जिच्या उबदार पंखांमागे निर्धास्त डोळे मिटून लपून जावं, आणि सगळी चिंता आपोआप विरून जावी, त्या आईचं घरटं, हे प्रत्येकाच्या मनात खोल रुतून बसलेलं एक सुरक्षित स्थान असतं. पाय कितीही भरकटले, तरी तिच्या डोळ्यातल्या नक्षत्राने वाट दाखवावी, आणि फिरून आपण आयुष्याच्या शेवटी का होईना, तिच्या कुशीत निजावं, अशी उर्मी दाटून येते.
पिलं चालू लागतात, पण त्यांची आईसुद्धा देशोधडीलाच लागलेली असते! सिरियन निर्वासितांबरोबर प्रवास करणार्या पत्रकरांनी त्याबद्द्ल कितीहि भरभरुन लिहिलं, तरी कमीच...
जवळजवळ २५०,००० नागरिकांचं घर हिरावून घेणारं हे कसलं जीवघेणं युद्ध? गेली ५ वर्ष सतत जाळणारं हे कुठलं "रखरखते ऊन"!
"पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळीमागे असतेच झऱ्याचे पाणी"
आयुष्य पाण्यासारखं पुढेपुढे वाहत जाताना, आपण ओंजळीत त्यातले दोन क्षणही सुखाने धरून ठेवू शकत नाही. प्रेमाची माणसं कालाधीन, तर कधी दुरावलेली... हातातून निसटून जातात. प्रत्येकवेळी ओंजळ भरून घेतांना त्यांना त्यातून निसटलेला झराच आठवत असेल का?
उलट प्रवाहाविरुद्ध पोहणारे जिगीषू निर्वासित, त्यांच्यातले किती पल्याड पोचू शकतात? एका बापाला मृत पोरासाठी अश्रू ढाळत न बसता, तसंच पुढेपुढे प्रवाहपतीत होऊन जावं लागतं. एक पिलू वाहून गेलेलं, त्याला आठवलीच असेल ना आपली आई, त्या अंतिम क्षणांमध्ये?
"मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई" जर कधीकाळी ह्या वाटसरूंना आश्रय मिळाला, तरी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला "अंधार", ते अत्याचार, रक्तपात, बलात्कार, चिंधड्या - त्यांना विसरता येतील का कधी? घरासाठी रानोमाळ फिरणाऱ्या भटक्यांना जर घर कधीकाळी मिळालंच, तर ते हि पुन्हा नव्याने तिथे रुजतील. घरातल्या "अडगळीत" त्यांना सुरक्षित वाटूही लागेल. तो सवयीचा पसारा, "माझ्या" असणाऱ्या वस्तू, हौशीने जमवलेली भांडीकुंडी....... रोज रोज डोळ्यांना दिसल्या, कि जीवनाच्या सुरळितपणाचा क्षणिक दिलासाही मिळेल.
पण एकदा ज्यांनी आपलं घर उद्ध्वस्त होणं अनुभवलं आहे, त्यांना कायमच त्या "दरीतल्या वनराईचा" धसका लागून राहणार. ती भयाण वनराई, ते भटकेपण, कधी येऊन पुन्हा घर गिळंकृत करील? करील का? सगळीकडून ती आपल्या घरावर "हलके हलके" पुन्हा अतिक्रमणकरू लागलं आहे हा भास.... त्यातून त्यांची सुटका नाही.
तोवर घरात राहूनसुद्धा "घरपण" मात्र थकलेलं च राहील!