12/4/17

शिक्षकी पेशाने मला काय दिलं?

लहानपणापासून मला शिकवायची खूपच हौस होती :) एक प्लास्टिकचं  गुंडाळलेलं काळं फळकूट आणि खडूच्या डब्यात उरलेला किंवा क्वचित शाळेतून खिशात टाकून आणलेला खडूचा तुकडा, ह्यावर मी आणि एक मैत्रीण तासंतास शाळा-शाळा खेळायचो! हजेरीतली सगळी नावं रोज ऐकून पाठच होती, त्यामुळे अगदी हजेरीपासून, बाहुल्यांना पुढे बसवून पट्टीने (हळूहळूच) रट्टे देण्यापर्यंत सगळे सोपस्कार करून मग शेवटी शिकवायची पाळी आली, की एकदम डबा खायची सुट्टीच व्हायची :)

ती मैत्रीण शाळा शिकून हुशार झाली, आणि सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे झाली. आणि मी मात्र मोठी झाले, तरी मला शिक्षिकाच व्हायचं होतं. घरच्या दारच्यांनी समजावलं- शिक्षण क्षेत्रात बाजार आहे, खूप कष्ट आहेत पण त्याचं चीज होत नाही... तू हुशार आहेस, तुला सहज दुसरीकडे प्रवेश मिळेल. पण तेव्हाही एक (वेडा म्हणा) आदर्शवाद डोक्यात होता, आणि तो आजही आहे.

कारण- मी बरेचदा विचार करते- शिक्षकी पेशाने मला काय दिलं? तेव्हा मला कळतं की मी ह्या क्षेत्रात खरं काय कमावलं आहे.
आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्राचे आपल्या मनावर नकळत जे संस्कार होतात, ते बरेचदा लक्षात येत नाहीत, जोवर इतर क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा किंवा त्यांच्या बरोबर काम करायची संधी येत नाही. पण विचार केला, तर जाणवतं, की वर्षानुवर्षे आपण जे काम करतो, त्यानेच आपलं "व्यक्तिमत्व" तयार होत असतं, विचार करण्याची पद्धत पडून जाते.


  • PLAN B: एकदा कोणी पाहुणे आमच्याकडे आले, तेंव्हा त्यांना नवल वाटलं- मी दोन भाज्या, शिवाय फ्रीजमध्ये पराठ्याचं सारण, दुसरीकडे चीज सॅन्डविच साठी ब्रेड,अशी निदान ४ पदार्थांची तयारी ठेवली होती. लहान मुलांना काय आवडेल सांगता येत नाही. दिवसभर बाहेर फिरून आल्यावर पाहुण्यांना गरम सूप आवडेल, का पिठलं? दुसऱ्या दिवशी लवकर बाहेर पडण्या साठी पटकन सँडविच घेऊन निघतील, का पराठे? 
  • "भूक नसावी पण शिदोरी असावी" हे आजी म्हणाली तसं, नाही लागलं, तरी प्रत्येक तासाचं 'overplanning' केलेलं असतं, ते कामी येतं. 

  • हे अवधान मला शिक्षिका झाल्यावर आलं कारण, कधी एखादे वेळी वर्गात प्रोजेक्टर वापरायचा असतो, पण चालू होत नाही. मुलांनी गृहपाठात जे वाचलं असेल, त्याची चर्चा करायचं आपण ठरवतो, तर नेमकं त्या दिवशी बऱ्याच पोरांनी तो धडा वाचलेलाच नसतो! सतत कुठल्याही प्रश्नालाच नव्हे, तर झोपाळलेल्या मख्ख-शांत वर्गालाही सामोरं जावं लागतं - मग लगेच दिशा बदलून पोतडीतून काहीतरी मौजमजेचा धडा, थोडं सोपं वाचन काढायला लागतं!
    सतत, रोज, हरघडी 'तयारीत' राहण्याची इतकी सवय शिक्षकांसारखी खेळाडूंना असते. प्रश्नांवर 'बॅटिंग' करायची सवय होते. आणि कधी बाउन्सर आला च, तरी हसून 'वेल लेफ्ट' पण खेळता येतो की!

    त्यातही, मोठ्या सहकाऱ्यांपुढे एकवेळ वेळ मारून नेता येईल, पण विद्यार्थ्यां कडून १० मिनिटातच पावती मिळते... तिथे आपल्या "खरेपणाखेरीज" कुठलाही आवेश टिकू शकत नाही. कधी कधी चक्क "आज सगळ्यांनी स्वाध्याय करा" असे म्हणून हातही टेकावे लागतात. तरी पण, 
    सकारात्मकता: नवऱ्याच्या चुका काढायची सवय सहज आपल्या 'प्रोफेशनल मॅलडी' मध्ये टाकता येते :) हे खरं, तरी एकूण शिक्षकांचा सतत सकारात्मक दृष्टिकोन असतो- कारण सुधारणा घडवून आणण्याचा तो पाया आहे. बरेचदा धर्म,लोकशाही, ह्या बाबतीत आपण निराशावादी असतो. पण प्रत्येक शिक्षकाला बघा, "आजचा दिवस माझा" म्हणत रोज नव्याने आव्हानांना सामोरे जात असतात. काल जो मुलगा तासभर वर्गात उद्धट वागत होता, त्याला आज पुन्हा संधी देता येण्याइतकी "कोरी पाटी" घेऊन च वर्गात प्रवेश करतात.

  • प्रयोगशीलता: त्याच्याही पुढे जाऊन, आपला खोटा 'ईगो' मध्ये न आणता, त्या उद्धट विद्यार्थ्यासाठी तोच धडा पुन्हा वेगळ्या पद्धतीने मांडता येईल का, ह्याचा विचार सुरु होतो. 

  • कमी साधनांमधून जास्तीत जास्त परिणाम कसा साधता येईल, म्हणजेच OPTIMIZATION हे शिक्षकांच्या रक्तातच असतं, कारण साधनं कमी, विद्यार्थी जास्ती, हे कायमचं व्यस्त प्रमाण! :) हाताशी कीबोर्ड, तोंडाशी स्क्रीन असणाऱ्या कुठल्याही कॉर्पोरेट जगातल्या व्यक्तीला ऑप्टीमायझेशन ह्याहून जास्त करता येत नसेल. 

  • निरपेक्षता: फक्त थोर आणि नशीबवान शिक्षकांच्याच नशिबी 'जुने विद्यार्थी' भेटण्याचा योग असतो. बहुदा माझ्या जाचाला कंटाळलेले बिचारे पोरं पोरी, नंतर मॉल मध्ये वगैरे दिसले तरी नजरच चुकवतात, आणि मी पण खरं म्हणजे त्यांना भेटायला उत्सुक नसतेच, कारण आपल्या शिकवण्यावर काही 'बरी' टिप्पणी त्यांच्याकडून ऐकायला मिळेल, याची अजिबात खात्री नसते! :) त्यामुळे निष्काम कर्मयोग आपल्या रक्तातच भिनवून घ्यावा लागतो, शिक्षक झाल्यावर, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी शिक्षिका म्हणून फारशी यशस्वी नाहीच, आणि तरीही 'हे एक मला करता येतं, तर मी ते आपल्या परीने करत राहीन' इतका 'कमलपत्रेSव' अलिप्तपणा आजकाल व्यावसायिक जगात कुठे बघायला मिळतो? 


  • अर्थात, सुदैवाने पोटापाण्याची चिंता देवाने करायला लावली नाही, आणि हा शिक्षकी पेशा 'हौशी'खातर सुद्धा मी करत असेन तरी काळजी नाही, तर म्हटलं, 'शिकवतांना हे जे काय शिकायला मिळतंय त्याचा तरी लाभ घ्यावा!'
    • शिक्षकांना सदैव विद्यार्थीपण होऊन राहता येतं, ते त्यांनी राहावं सुद्धा, कारण त्यात फार गम्मत आहे! " मोबाईल नेमका बिघडलाय!" हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत, विद्यार्थ्यांकडूनच लगेच सर्वात नवीन मॉडेल्सची फुकट आणि अतिशय रास्त माहिती धो धो वाहत येते! इतकं 'INSTANT CROWD-SOURCING' शिक्षक सोडून कोणाला जमलंय का सांगा? आणि केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर इतर अनेक बाबतीतही नवीन पिढी हुशारच आहे! तेंव्हा त्यांना शिकवताना त्यांच्या एक पाऊल पुढे चालता यावे, यासाठी सतत नवीन शिकत राहते, त्यामुळे स्वतःबद्दल अवास्तव अपेक्षा पण नसतात. प्रत्येक गोष्ट जमायला अवधी लागतो, हा संयम स्वतःबद्दल सुद्धा पाळता येतो. 
    • PEOPLE SKILLS: अर्धवट वयाची ही ६०-७० पोरं रोज भेटणार, त्यांचे राग लोभ सांभाळून घेतांना एकीकडे मी मनाने तरुण तर राहतेच, तरी दुसरीकडे स्वतःला त्यांच्या पासून वेगळं काढून त्यांच्या क्षणिक आवेशाने विचलित न होता, कामाकडे स्वतःचं , आणि त्यांचंही लक्ष केंद्रित करून घेऊ शकते. मुलं/त्यांचे पालक ह्या दोन्ही बाजूंशी संवाद साधून असते. ह्यालाच एम.बी.ए करणारे "पीपल स्किल्स" म्हणत असावेत. 
    • LIMELIGHT: शाहरुख खानला सुद्धा जोवर खऱ्या स्टेजवर उभे राहून 'हशा आणि टाळ्या' घेता येत नाहीत, तोवर मी स्वतःला त्याच्यापेक्षा मोठी 'शो-वूमन' समजते, कारण मी रोज नवीन 'प्रयोग' वर्गात सादर करते, आणि रोज १०० डोळ्यांमधले (क्षणिक का होईना,) आदर/कौतुक अनुभवते. "तमसोSमा ज्योतिर्गमय" प्रमाणे अंधाराला भेदून ज्ञानाचा एक क्षण जिथे जन्मतो, त्या अद्भुत क्षणाची साक्षी होण्यासाठी रोज धडपडते. 
    एकूण काय, शिक्षकीला 'पेशा' म्हणू नये, कारण ती रोजची साधना आहे. तुमच्याकडून इतकं मागणारी, पण तुमच्या झोळीत तितकंच भरभरून 'देणारी' एक शिक्षकी, आणि दुसरी 'वैद्यकी'. "तमसोSमा ज्योतिर्गमय" _/\_