2/18/18

भाग 3: वृक्षवल्ली आम्हा सोयरी

आमचा पहिला आठवडा फक्त प्लॉट स्वच्छ करण्यात गेला, तर आमचे अनुभवी शेजाऱ्यांची बाग दृष्ट लागण्यासारखी नटून सजून तयार झाली. ससे/पाखरांनी भाजी खाऊ नये म्हणून चोहीकडे कुंपण, कुंपणाला मधोमध छोटंसं सुबक दार दोन्हीकडे भाज्यांचे वाफे, आणि मधून विटांची पायवाट वगैरे सुंदर रचना होती. बरं, उन्हात काम करून दमायला झालं, तर खुर्च्या, छत्री, बर्फाच्या डब्यात थंड पेय वगैरे घेऊन दोघे दादा-वाहिनी सकाळपासून उन्हं माथ्यावर येईतोवर राब-राब राबत!

दुसरीकडे मात्र, एक मावशी एकटीच, एकदाच बिया लावून गेली. नंतर कधी दिसली नाही.. पण तीन चार आठवड्यात तिच्या प्लॉटभर पुरुषभर उंचीची सूर्यफ़ुलंच सूर्यफुलं झुलू लागली आणि आमचा कोपरा गजबजून गेला. मग उरल्या सुरल्या जागेत तिने मुळे लावले. कधी कधी तण वाढू नये म्हणून मोकळी जागा ठेवत नाहीत, त्यापैकी. एरवी तिच्या मनात 'मुळ्या' ला फारसं 'मोल' नसावं. झाडं वाढत वाढत त्याला 'ढिंगऱ्या' लागल्या तरी त्या काढायचं तिच्या मनात नसावं. एकदा मी सहज म्हंटलं,"ह्या शेंगांची आम्ही भाजी करतो." तर लगेच म्हणाली, "मग घेऊन जा न सगळ्या!"

माझ्या पोराला त्या दिवशी शेंगा तोडायला इतकी मजा आली, की आमच्या प्लॉटचं भाडं तेव्हाच वसूल झालं! "माझे हात छोटे आहेत, म्हणून मी कोपऱ्यातल्या शेंगा पण तोडू शकतो!" वगैरे 'डिंगऱ्या' तोडतांना 'डिंग' मारून पण झाली :) तण उपटतांना एक गांडूळ दिसलं, आणि हा कार्टा हर्षवायूने जे किंचाळला, की सगळे शेतकरी आपल्या आपल्या पेरणी/कापणीतून माना वर करून बघू लागले :)

पण आमच्या प्लॉटला सांभाळायला आमचे तीन हात कमी पडू लागले. तरी बरं, इथे शेतात 'नांगरणी' करायची गरजच नव्हती. पहिल्याच 'माहितीसत्रात' सांगितलं गेलं, की गेल्या मोसमातल्या झाडाच्या मुळाचंच ह्या मोसमात सडून खत झालेलं असतं. शिवाय शेतकरीमित्र गांडुळं वगैरे मातीत राहत असल्यामुळे, नांगरणी करू नका. पुष्कळ फळभाज्यांच्या बियांना एक पेरभर खोल खड्डा सुद्धा पुरतो.

तरीही, तांबडं फुटल्यावर जितके लवकर बागेत पोचू तितकं ऊन व्हायच्या आत परतता येईल, हे कळायलाही थोडे दिवस गेले. सहसा विकेंडला सकाळी उठायचेच वांधे होते, म्हणून शेवटी 'कलत्या उन्हात' दुपारी संध्याकाळी जाऊ लागलो. तण उपटण्याचे कामच मोठे होते. कारण दुर्लक्षित बाग झाली, तर आपला प्लॉट रद्द होण्याची भीती...

असे काही आठवडे गेले. डाव्या कोपऱ्यात मुळे, मध्ये भेंडी आणि झुकिनी, उजवीकडे पालक/लेट्युस आणि पायवाटेकडे झेंडूची फुलं यायला लागली. एकाच वेळी सगळं उगवू लागल्यावर तर तण कुठलं आणि पानं कुठली तेही कळेनासं झालं :) मटारचे वेल चढवायला जाळी लागते, किंवा टोमॅटोची/भोपळी मिरचीची झाडं वाढायला वेळ लागतो हे आम्हाला माहिती नव्हते.

पण घरी येऊन मग स्वयंपाक कोण करणार! खाली बसून पाठ आणि पाय दुखले आणि नखातली माती अंघोळ करूनही जाता जाईना झाली! शेतात उगवली भाजी, पण आम्ही खातोय टेक-आऊट! हा दैवदुर्विलास शेवटी आई-बाबा आल्यावर संपला. बाप्यांनी शेतावर जावं, इकडे मी आणि आईने भरली वांगी वगैरे रांधवी- असं माती-मुळांशी जवळ जाणारं कामकरी जीवन सुरु झालं- असं मी म्हणणार होते, पण......... खरं तर 'पास्ता विथ बेसिल अँड रोस्टेड गार्डन व्हेजीस' सुद्धा शेतात घाम गाळून आल्यावर इतकं रुचकर लागायचं, की आम्हालाच आम्ही 'साधी माणसं' आहोत असं वाटायला लागलं :)

पहिल्या झाडाची पहिली मिरची!
पहिल्या लेट्युसचं पाहिलंच पान!
ह्याचं आपल्याला जितकं कौतुक असतं, तितकं फोटोत ते काही वेगळं दिसत नाही, असा साक्षात्कार झाला :)
तरीही, कुठलीही अतिशयोक्ती न करता सांगते, जो आनंद 'घरच्या', 'स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडावरून तोडलेले मटार तिथल्या तिथे फस्त करण्यात आहे, तो विकत घेता येत नसतो. सुपरमार्केट मध्ये येणाऱ्या 'मॅडम तुसाद' च्या मेणाच्या भाज्या खाऊन खाऊन, शेतात ह्यापेक्षा चांगलं काय लागणारे? असा भ्रम होता, तो दूर करण्याची ताकद त्या मटारच्या पहिल्या दाण्यातच जाणवली.

'भारतात भाज्या छान लागतात' वगैरे टिपिकल अमेरिकन अनुभव पूर्वी घेतलेले असले तरी, जंतुनाशके न मारलेल्या टोणग्या भेंड्यासुद्धा इतक्या कोवळ्या, इतक्या गोड, आणि त्यांची तार नसलेली भाजी होते,हा अनुभव माझ्यासारख्या 'झाडंमारी' साठी इतका आश्वासक होता, की दिवसभर काम करूनही आठवड्यातून दोन तीनदा "शेतावर काय लागलं असेल?" म्हणून चक्कर टाकायची सवय झाली.

ह्याच सुमारास मी एक 'लोखंडी पॅन' घेतलं होतं, त्यात शेतातल्या ताज्या भाज्या परतून खरोखर इतक्या सुंदर लागत होत्या, की डिंगऱ्या, भेंड्याच नव्हे, तर summer squash, चपटे मटार, कांदे, बटाटे, बेसिल असे घालून Frittata सुद्धा चटकन आणि चविष्ट झाला. झुकिनी तर इतक्या भरभर आणि भरपूर आल्या, की त्या आजूबाजूला वाटूनही संपेनात! मग झुकिनीची थालिपीठं, झुकिनीचे वडे, झुकिनीची भाजी, झुकिनीचे पराठे, असा झुकिनी-सप्ताह संपन्न झाला!

पण शेती म्हणजे फक्त उगवणे, खाणे, इतकंच नव्हतं...... तर दिवसभर लॅपटॉप, टीव्ही बघून दमलेल्या डोळ्यांना विसावा देणारा खऱ्या, वेड्यावाकड्या, पण तजेलदार भोपळी मिरच्यांचा हिरवा रंग होता.., मुलाला मातीत हात घालण्याची सूटच नव्हे, तर पानांची हिरवी लव मातीत उगवल्यावर हलकेच पाणी घालायची जबाबदारी होती........ ऍमेझॉनचं खोकं घरी यायची वाट पाहण्या ऐवजी भेंडी मोठी होण्याची वाट पाहणे होते, बागेत येणाऱ्या पक्ष्यांचे किलबिल स्वर ऐकणे होते. आणि वृक्षवल्लींशी नाते सांगणे होते.

कदाचित अमेरिकेत राहिल्यामुळे माझ्या मुलाला काका, मामा ही नाती कळणार नाहीत, पण त्याचं मातीशी असलेलं नातं तरी मी त्याला देऊ शकले, हे समाधान होतं.
म्हणूनच, बाहेरच्या बर्फातही, माझ्या हिरव्या स्वप्नांमध्ये 'लाल माठ', रेषांचा 'दोडका', मोहरी वगैरे पेरणी कधीच सुरु झाली आहे.




2/11/18

The Tiny Seed

पहिला भाग: Pancakes, pancakes!  इथे पहा.

आम्ही जमिनीचा तुकडा भाड्याने घ्यायचा ठरवला तर खरं, पण सुखासुखी कोण शेती करायला घेणार? अशा विचारात गाफील राहिल्यामुळे पहिल्या वर्षी तर मला प्लॉट मिळालाच नाही! पण तिथेच पहिला धडा मात्र मिळाला, की आपल्यापेक्षाही कितीतरी वेडी लोकं आधीपासूनच ह्या 'शेतकी उद्योगात' शिरलेली आहेत.

ह्या वेडाची सुरुवात डोरिस ड्यूक पासून झाली, कारण ती केवळ नावाचीच ड्यूक नव्हती, तर खरोखर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला न्यू जर्सीत जन्मलेली, घरंदाज कोट्याधीश 'जेम्स ड्यूक' ची एकमेव वारस होती. वडिलांनी तंबाखू-कारखान्यातून मिळवलेली अमाप संपत्ती तिने उत्तम राज्यकर्ती प्रमाणे कला, संस्कृती आणि निसर्गाच्या संगोपनार्थ दान केली. पूर्वी जिथे ड्यूक मंडळींचा 'वाडा' होता, त्या परिसरातील सगळी जमीन तिच्या मृत्यूनंतर 'ड्यूक फार्म्स' च्या नावाने जनतेला खुली केली गेली, आणि तिथेच न्यू जर्सीतली जैविक विविधता (biodiversity), प्राणिजीवनाचे संगोपन करणारे अनेक उपक्रम तिच्या संस्थेतर्फे राबवले जातात, त्यापैकी एक म्हणजेच हा 'नैसर्गिक, सामाजिक बागकाम प्रकल्प' (Duke Farms Organic Community Garden).

लोकांना नैसर्गिक शेतीच्या पद्धती कळाव्या म्हणून अगदी माफक दरात प्लॉट भाड्याने देऊन, तिथे ऑरगॅनिक बागकामप्रेमी लोकांचा मेळावा तयार व्हावा, अशी ह्या उपक्रमाची रचना आहे. स्वस्त आणि मस्त कुठल्याही गोष्टीपुढे रांगा लागणारच, तशा त्या इथेही लागल्या तर नवल नव्हतंच, पण ह्यावेळी मी चंग बांधलाच होता. नरकचतुर्दशीला भल्या पहाटे अंघोळ करून देवळात जायचो, तसे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, आदल्या रात्री पार्टीचे जागरण घडूनही सुद्धा, मी मन घट्ट करून उठलेच, आणि खरोखर पोराच्या शाळेसाठी ऍडमिशनच्या रांगेत लागावे (जे अमेरिकेत मला कधी करावे लागले नव्हते), तशी मी ह्या शेताच्या ऑनलाईन रांगेत लागले. काहीजण दरवर्षी प्लॉट रिन्यू करतात, तर अशा 'जुन्या जाणत्या' सभासदांना आधी प्लॉट खुले केले जातात, आणि उरलेले काहीच फक्त नवीन लोकांसाठी उरतात, त्यामुळे ह्या सकाळच्या साधनेचं फळ मिळालं, तेव्हा मी हाती लागेल तो प्लॉट घेऊन टाकला! खरंतर सगळ्यात छोट्या आकाराचा घ्यायचा होता, पण मिळाला नाही.

ही तर केवळ सुरुवात होती. मी नवऱ्याला तेव्हाच सांगून टाकलं, की बाबा रे, इथे अमेरिकेत इतरत्र दिसतो, तसा 'ग्राहक देवो भव' दिसत नाही. हा शेतीचा वसा एकदा घेतला, की सहा महिने तरी टाकता येणार नाही. तुमच्या प्लॉटची निगा राखण्याचे, तिथून तण उपटण्याचे काम तुमचे. प्लॉट दुर्लक्षित दिसला, तर सभासदत्व रद्द. बाजारात मिळणारे रासायनिक खत, किंवा किडे मारण्याचे औषध वापरले, तर रद्द. वर्षातून ४ तास श्रमदान केले नाही, तर रद्द. नवीन बागकामींना एक 'ऑरगॅनिक बागकामाचा' कोर्स घेणे पण आवश्यक होते. शिवाय 'स्वागत-परिचय (orientation) कार्यक्रमातही 'उपस्थिती अनिवार्य' होती!!! मला जमणार नव्हते, म्हणून आयोजकांना इमेल केली, तर 'प्लिज प्लिज जमवा', कारण अनुपस्थित सभासदांचे प्लॉट रद्द केले जातात, अशी प्रेमळ धमकावणी मिळाली, मग नवऱ्याला एक दिवस ऑफिसमधून लवकर ये, असं पाचारण केलं, आणि होता होता प्रवेशाचे सगळे सोपस्कार तर पार पडले.

माहिती सत्रात तण वाढू नये म्हणून रसायनापेक्षा प्रतिबंधावर भर, किंवा उभारलेल्या 'चौकटीत' बाग लावणे (Squarefoot Gardening) वर भर होता. कीड लागल्यास, जैविक औषधांची नावं सांगितली. तसेच, ऑरगॅनिक खताची नावं, वगैरे टिप्पणी काढायला मला तासभर लक्ष देऊन ऐकावे लागले.

भारतामध्ये जुगाड करून असेल त्यात भागवण्याची आपली सवय, तर इथे अमेरिकेत नालीसाठी घोडा घेण्याची पद्धत! एखाद्या सामाजिक, विना-नफा कामाचंही आयोजन इतकं उत्तम होतं की त्यात अथपासून इतीपर्यंतचा विचार केलेला होता. नवशिक्या बागकामींना मदत म्हणून 'Mentor' शी गाठ घालून दिली. शेताचे भाग करून ६-६ च्या गटांमध्ये प्लॉटचा 'शेजार' तयार केला, आणि शेजाऱ्यांची ओळखीचा कार्यक्रम झाला. शिवाय, आपल्या शेतातलं पीक अति झालं, वापरता येत नसेल, तर ते 'Food Bank' मध्ये दान करायचीही सोय होती.

उन्हाळ्याचे जेमतेम चार महिने शेतीला मिळतात, पण मुलांच्या सुट्ट्यांमध्ये लोक फिरायला जातात. तेव्हा शेजारी एकमेकांच्या बागेला पाणी घालू शकतात. 'बिया' च नव्हे, तर मदतीची, अवजारांची पण देवाणघेवाण होते... पण त्याही पेक्षा, बागेत राबून तण उपटतांना, गप्पांची भरपूर देवाणघेवाण होते! सुदैवाने आमचे शेजारी खूपच अनुभवी, पण मदतीलाही पुढे होते. "बागेत काय चूक-बरोबर, असा विचार करून घाबरू नका!" त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं. "अनुभवानेच शहाणपण येईल... हे लेट्यूस जमले नाही, तर ते पालक लावून बघा!" ओळख जुनी झाल्यावर खरंतर 'पाककृतींची', नाहीतर डब्याची देवाणघेवाण पण करूया, असे वायदे झाले, पण माझ्या मनात आता धाकधूक व्हायला लागली.
इतक्या भगीरथ प्रयत्नानंतरही, खरं बागकाम आपल्याला कितपत जमतंय, हे अजून माहितीच नव्हतं. आजवर (कुंडी-साईज संस्कृतीच्या नावाने, अमेरिकेतल्या पहिल्या वर्षी, हौशीने) घरात लावलेली तुळस :), कधी एकदम हुक्की येऊन स्प्रिंगच्या सुरुवातीला आणलेली सूर्यफूलं वगैरे ;), पाण्यात उगवणारा बेसिल (basil), इतकंच काय, तर भेट मिळालेला लकी बाम्बूसुद्धा आमच्या हातून मेलेलाच आहे, त्यामुळे आपण कुंडीत झाडं मारून दमलो, तर शेतात आणखी झाडं मारूया! असले अघोरी पाप तर करत नाही ना, असा विचार करून माझी मलाच कीव यायला लागली. अगदी एरीक कार्लच्या 'Tiny Seed' सारखी आमची सुरुवात जमेल का?,होईल का? असं मागे पुढे पाहतच झाली. सुरुवात छोटी होती, पण बी प्रमाणे तीत कुठल्या कुठल्या अनुभवांच्या शक्यता दडल्या होत्या? पहा पुढील भागात.