1/18/19

रिक्षावाला

"ए बेबी, तुझा चक्का उलटा फिरते नं!" मागून जोरात आवाज आला.

एक सेकंद दचकून मी खाली वाकून चाकाकडे पाहिलंच, पण तेवढ्यात गंगारामच्या रिक्षाच्या टपावर बसलेल्या पोरांनी खाली उतरून त्याला जोरात धक्का मारला, आणि मला मागे टाकून हुल्लड करत रिक्षा पुढे निघून गेला! मी पण जोरजोरात सायकल हाणत ओरडले, "ए गंगाराम, काहीSSS काय सांगतो? मी आता पडले असते म्हणजे!" पण गंगाराम हसत हसत "कशी घाबरली!" करत पुढे निघून गेला.

मी तोल सावरला. जुलैच्या पावसात निसरड्या रस्त्यावर नुकतीच लांबच्या मोठ्या शाळेत मी आपली आपली सायकल घेऊन जायला लागले होते. जाऊदे, तो गंगाराम आहेच आगाऊ! असं मनातल्या मनात म्हटलं, आणि पेडल मारलं. माझी सायकल पुढेच जात होती, पण बाजूनी रिक्षा जास्त वेगाने गेल्यामुळे मला खरंच पुन्हा एकदा वाटलं, "आपली चाकं उलटी फिरतायत का?" :) :) चाकं नाही, पण मन उलटं फिरून प्राथमिक शाळेत गेलं.

पहिली ते चवथीची शाळा, मोठ्या रस्त्यावर तीन चौक टाकून होती, म्हणून आम्ही ७-८ वर्षाचे ५-६ फटाके आणि टिकल्या (मुलंमुली) गंगारामच्या सायकलरिक्षातुन शाळेत जायचो. गंगारामच्या मस्कऱ्या स्वभावाने आमची फारच करमणूक व्हायची, पण दप्तर लटकावताना मधेच जर त्याने एका मुलीची वेणी ओढली, दुसरीचा रुमाल पळवला, तर आम्हा मुलींची अस्मिता दुखावली जायची आणि आम्ही जोरात ओरडायचो. आता मी मोठी झाले, असं मला वाटलं होतं, पण मागून येऊन गंगारामने खोडी करायची ती केलीच! मला हसू आलं.

माझ्या तिप्पट चौपट वयाच्या गंगारामला आम्ही ७-८ वर्षापासूनच "ए गंगाराम" च म्हणायचो, कारण माणूस हा असा विनोदी. "अहो गंगाराम काका" वगैरे म्हणायचं, हे पण कधी सुचलं नाही, आणि कोणी शिकवलंही नाही. सगळा बेभरवशाचा कारभार, आणि रोज वेगवेगळ्या वेळी अवतारायचा नेम! :)

सकाळी सकाळी ७:०० वाजता तयार होऊन अंगणात दप्तर घेऊन उभं राहायचं, तरी सव्वासात पर्यंत ह्याचा पत्ता नाही. कि मग समोरच्या अंगणातून चित्रकाकूचा मुलगा ओरडायचा "आज गंगाराम येत नाही वाटतं!" मग धावत धावत टॉयलेटचं दार वाजवायचं, "बाबा, गंगाराम येत नाही, लौकर करा, शाळेत सोडायचं आहे." आणि नेमकी तेवढ्यात बाहेर घंटी वाजणार. कळकट शर्ट, तारवटलेले डोळे, दाढीचे खुंट वाढलेले, नाकातून सूं सूं पाणी येतंय, अशा अवतारात गंगाराम उभा. "बेबी, पायलीवाली खांडेकरनी लेट केला नं!" असं म्हणायचा, पण आजी हळूच नंतर सांगायची, "रात्री दारू पिऊन पडला असेल. तू जास्त बोलत जाऊ नको, शाळेत जायचं- यायचं.  ह्या लोकांशी कशाला जास्त वाढवा?"

पण ते काही असो, घरच्यांचा, आणि आम्हा पोरांचापण त्याच्यावर विश्वास होता, कारण बाकी तो मनाने मुलांत मूलच होता. रिक्षात बसून आम्ही धांगडधिंगा करायला लागलो, कि "ते बेबी रिक्षातून पडली नं, डॉक्टरकडे जाऊन टाकेबी पडले..." वगैरे नुसत्या कहाण्या सांगायचा, पण आम्हाला शिस्त लावणं त्याला जमणं शक्यच नव्हतं, कारण चौकात रिक्षा थांबला, कि खाली उतरून मागे "टपावर" बसायला आम्ही "टपलेले" असायचो.

मला वाटतं गंगाराम टपावरच्या दोन सीट धरूनच मुलांची भरती करत असावा, कारण त्याला झेपतील, आणि मावतील त्यापेक्षा जास्तच पोरं रिक्षात असायची. (रोज कोणीतरी आजारी, कोणी उशीरा उठलेला, कोणी गावाला गेला - म्हणजे शाळेला बुट्टी, म्हणून उरलेली रिक्षात मावूनच जातील असाहि त्याचा अंदाज असावा :-) :-) शिवाय दुसऱ्या कोणा रिक्षावाल्याची बुट्टी असेल, तर तिथलं पण एखादं चिरकूट "दयाळूपणे" आणून बसवायचा (एक्स्ट्रा कमाई नं!)

इतकी पोरं सीटवर कोंबून बसायला तयार नसायची, उलट टपावर बसायलाच भांडाभांडी व्हायची! म्हणजे आम्ही मुलं पण ह्या कटात भागीदार होतो. टपावर 'बसणं' कसलं, ते रिक्षाच्या मागे लोम्बकाळणंच होतं, पण त्यात काय थ्रिल होतं, ते अनुभवल्याशिवाय कळूच शकत नाही...सायकलरिक्षाच्या दोन चाकांना जोडणाऱ्या पट्टीवर पाय, आणि सीटच्या काठाला हाताने धरलेलं, अशी सवारी करणारी एक दोन तरी पोरं प्रत्येक रिक्षात असायचीच. जरा उंची पुरली, की सीटच्या काठावर मागून चढून उलटं बसता पण यायचं, आणि उतारावर जास्त वारं खायला मिळायचं! शिवाय, दोन रिक्षातल्या शर्यतीत पुढे जायला टपावरची पोरं मधेच उतरून रिक्षाला धक्का पण मारू शकायची. काय पण labor of love होतं आमचं!!!

पुढे पाचवी ते सातवी मात्र "भाऊ" भेटले. खरं म्हणजे भाऊ वयाने गंगारामपेक्षा पुष्कळच तरुण, पण त्यांचा आपसूक आदरच वाटायचा, कारण नियमितपणा आणि शिस्तीचं हे दुसरं टोक! रिक्षा चालवण्यातपण किती शिस्त आणि निष्ठा असावी! रिक्षा अतिशय टापटीप ठेवायचे. त्यांनी रिक्षाला गिअर्स बसवून घेतले होते, आणि दप्तरं लटकवायलाही शिस्तीत दोन्ही बाजूला हुक्स, बाजूने ऊन-पाऊस लागू नये म्हणून वेगळे पडदे! स्वतः ही अगदी कडक कपडे घालायचे! उन्हाळ्यात काळ्याशार रंगाचे भाऊ, जवळजवळ तेजस्वीच दिसायचे इतका त्यांचा रंग तुकतुकीत होता! बेसबॉल कॅप घातलीकी तर आम्ही त्यांना सांगायचो, "भाऊ, आज काय स्मार्ट दिसून राहिले!"

सायकल रिक्षात वास्तविक गादीची सीट एकच असते, त्याच्या विरुद्ध बाजूला लाकडी फळकुटच असतं. तर गंगारामच्या रिक्षात उंच सीट पकडायला आम्ही शाळा सुटल्यावर सुसाट धाव घ्यायचो, नाहीतर भांडाभांडी ठरलेली. भाऊंनी मात्र एक दिवसाआडचा नियमच करून टाकला, म्हणजे काल गादीवर बसलेल्यांनी आज खाली बसायचं! गंगारामच्या रिक्षात गादी-फळकुटात फारसा फरकही नव्हता म्हणा, कारण गादी ठिकठिकाणी फाटली होती, आणि भोकातून नारळाच्या का जूटच्या झावळ्या पार्श्वभागाला टोचायच्या :) त्या पुढे भाऊंचा रिक्षा म्हणजे आमच्यासाठी limousine पेक्षा कमी नव्हता!

रिक्षात गाण्याच्या भेंड्यापासून शाळेतलं गॉसिप आणि होमवर्कपर्यंत सगळं घडायचं, कारण रस्ते अगदी लोण्यासारखे गुळगुळीत होते. नागपूरसारखे भव्य, सरळ, रिकामे रस्ते दुसऱ्या कुठेच पहिले नव्हते. ते रस्ते, आणि सायकल-रिक्षा. दोन्ही आता कालातीत झाले.

गंगारामला "उद्या वेळेवर ये" सांगून थकलो होतो, ते भाऊंना "भाऊ उद्या येऊ नका नं, म्हणजे आई शाळेत सायकलने जाऊ देईल..." असं सांगायला लागलो... आधी रहदारीच्या रस्त्यावर डावी-डावीकडून हळू सायकल चालवत होतो, ते नंतर १०वी त शर्यती लावायला लागलो. तेव्हा कधी गंगाराम, कधी भाऊ, छोट्या मुलांना घेऊन जातांना दिसत. कधी मी त्यांना हसून हात हलवला असेल, कधी दुर्लक्षही केलं असेल, कारण तेव्हा मी मोठी झाले होते नं! टागोरांच्या काबुलीवाल्याप्रमाणे आमच्या आयुष्यात रिक्षावाला, दूधवाला, ही मंडळी होती. १०वी च्या परीक्षेचा निकाल लागल्यावर भाऊ घरी येऊन मला १०० रुपये देऊन गेले! त्यांचं मात्र मला संपूर्ण नावही कधी माहिती झालं नाही.

माझी मात्र गरज सरली, की बालपण? त्यांच्याशी बोलण्यासारखं अचानक माझ्याकडे काहीच उरलं नाही...!