Showing posts with label आजी. Show all posts
Showing posts with label आजी. Show all posts

2/27/22

ऊन न लागलेल्या आठवणी



मागच्या अंगणातल्या पायरीवर
दुधाची वाटी आणि कापूस घेऊन
आजी वाती वळत बसायची
मऊसूत वालयांच्या माझ्या कुरळ्या केसांसारख्या
पांढऱ्याशुभ्र वाती...
त्या वातीतली शेवटची वात 
ह्यावर्षीच्या गणपतीत तेवली...
आता आठवणींत मी तेवते आहे...

आजीकडून वाती वळायला शिकायचं 
ते राहूनच गेलं!

कधीकधी ती माझे शाळेचे झगे उसवून द्यायची 
वाढत्या मापाचे, जास्त उंचीचे घेतलेले, 
आतून शिवण मारलेले झगे 
बाहेरून विटले तरी उसवले 
की दिसायचा आतला गडदच राहून गेलेला रंग...

आजीच्या ऊन न लागलेल्या आठवणी 
आता मी उसवते आहे 
कारण कदाचित 
मी मोठी होते आहे!


3/11/14

हसत हसत!

काल स्वप्नात आजी आली.
कोरडेच डोळे पुसल्यासारखे करीत,
म्हणाली,
"बाई गं श्वास धरून बस...
ही आयुष्याची छोटी छोटी ओझी...
पेलायची तुझी तुलाच.
मोठ्या दु:खांना मिळतील अश्रू
मिळतील सांत्वना, मिळतील आधारस्तंभ.

पण रोजचे हे जीवघेणे मन:स्ताप-
गोड आमरसाचे कडवट पिवळे डाग,
पंख्यावर चिकटलेली जळमटे
खडखड दारावरचे आडमुठे कुलूप.
हेच ठरतात बघ जन्माचे वैरी."

आजीला मी म्हटले,
"एवढा विचार कोण करतंय?"
तर ती न बोलताच हसली होती फक्त.
"त्याहून मोठा विचार,
येईल तुला करता?"
तिचा प्रश्नच मला कळला नव्हता,
अनेक वर्ष!

आता ती स्वप्नात येते,
तेव्हा हसत असते.
कारण मला माहितीये- तिने कशी पेलली ओझी
खूप मोठी, खूप जीवघेणी...
हसत हसत.






10/7/11

अन्वयार्थ

बाल्कनीतल्या उन्हात अगदी लवकर सकाळी कॉफी पीतांनाची आजी बघून मला का कोणजाणे, भरून आलं. तिची नजर दूर झाडांकडे लागलेली, पण मन मात्र आशेने स्वयंपाकघराकडे वळलेलं होतं, कि कोणी आपल्याशी बोलायला येतंय का? मी माझाही कॉफीचा मग सांभाळत दार उघडून म्हटलं, "गूड मॉर्निंग". तर हसून म्हणाली, "खूप पूर्वी आमच्या शेजारी बेबीताई रहायची, ती म्हणायची तसं, आज तुझं लवकर उजाडलेलं दिसतंय!"

तिच्या मनाने एका क्षणात त्या बेबीताई असणाऱ्या आठवणींचा पट, पुन्हा एकदा जगून मागे टाकला होता! हल्ली तिच्या दर ५ वाक्यांमागे, "खूप पूर्वी आमका......खूप पूर्वी गेलो होतो ते गाव.........खूप पूर्वी खाल्ली होती ती कचोरी.........." अशी उदाहरणं येत असतात. किशोरवय भविष्यात, तारूण्य नि प्रौढत्व वर्तमानात, तर वृद्धत्व भूतकाळात रमतं- ऐकलं होतं. पण आजीचं ते पूर्वीच्या गोष्टींत रमणं मला आजवर कधीच इतकं कासावीस करून गेलं नव्हतं. त्या रमण्यात आनंद असेलही तर अगदी थोडा होता. मनाला आता केवळ भूतकाळाचाच तर आधार उरलाय, अशी अपरिहार्य शरणागती माझ्या आजीने घ्यावी, हे अजिबातच सहन होईना.

"आपली प्रेमाची माणसं आता म्हातारी होत चालली!" हे स्वीकारायला हवं- मी मनाला समजावलं. ऐंशीच्या घरात पोचल्यावरही काळे केस, नि खणखणीत आवाजाची आजी, आता मात्र स्वत:च्याच आवर्तांमधे फिरतेय. नवीन चित्रं बघतांनाही जुन्याच चौकटींमधून त्यांचे अन्वयार्थ लावायला लागलीये. गंमतीत का होईना, मरण्याची गोष्ट काढून, "त्या क्षणाला" एकटीने सामोरं जायचं धैर्य गोळा करायला लागलीये.
एवढं आयुष्य जगून मागे टाकलं- त्याचा गोषवारा काय निघतो का ते शोधायला लागलीये.

आयुष्याच्या संध्यासमयी, हे असं आपसूक वैराग्य येऊनही रोजच्या जगण्यातला आनंद कणाकणाने साठवणारी ही माझ्या आधारवडांची पिढी, कदाचित मला सांगू पहातेय, "आता तुला मोठं व्हायला लागेल. आमच्या करता हॉस्पिटलच्या वाऱ्या, बेडपॅन देणं नि केस विंचरून आंघोळ घालणं तुला करावं लागू नये अशी खरंच कळकळीची शेवटची इच्छा आहे!
पण ही सेवा करण्यानेच का केवळ मोठेपण येतं?
बाल्कनीत कॉफी पीत बसलेल्या आजीशी जाऊन चार धीराचे, आशेचे, आनंदाचे शब्द बोलतांनाही मला ते नकळत आलंच होतं.

10/2/09

सवयीची...

शेजारी एक जोडपं.
निर्मनुष्य रस्त्यात बेडकाच्या पिलांनी डोळे वटारून जो येईल त्याच्या कडे टक लावून बघत बसावं, तसं.
त्यांना नोकरी-धंदा-काम नाही.
बाई चाळीशीची, बुवा पन्नाशीचा.
वय लपवण्यासाठी मुद्दाम भडक रंगाचे कपडे घालायची त्यांची चढाओढ.
हौस ही दांडगी.
Yankee Game ची जर्सी, Memorial Day ची हाफ-चड्डी, असे अनेक त्या त्या दिवसाचे ठेवणीतले कपडे घालणार.
दारावर कायम दिव्यांच्या माळा- हॉलोवीनला केशरी भोपळे, क्रिसमसला लाल-हिरवे चेंडू, आणि ४ जुलै ला अमेरिकेच्या ध्वजातले निळे-पांढरे-लाल तारे.
ते ही न लुकलुकता स्तब्ध प्रकाश फेकत थांबलेले.
बाकी त्यांच्या दारासमोर कधी पोस्टाची सुद्धा गाडी थांबत नाही.
शेजारी कधी बोलणं काढून रेंगाळत नाहीत, की संध्याकाळी फिरतांना गप्पा रंगत नाहीत.
त्यांच्या घरून कधी पाहुण्यांचा गलका, मुलांचे रडे, आपापसातली भांडणं- कधीही ऐकू येत नाहीत.
हं, त्यांना एक मुलगा आहे. गतीमंद असावा. गोड गुलाबी गालांचा, थोडा गुबगुबीत, गोल डोळ्यांचा. तो फारसा बाहेर दिसत नसला, तरी त्याच्या निमित्ताने त्याच्या आईवडिलांनीच स्वत:भोवती कोष विणलाय, आणि त्यात अडकलाय मात्र तो- असं वाटायला लावणारा.....

पण परवा माझ्या लक्षात आलं- मी गाडी पार्क केली, की आत्याबाई दार उघडून कचरा टाकायला बाहेर निघतात.
जुजबी, हवापाण्याचं सुद्धा खूप कौतुक करत बोलतात.
बुवा तर आत्याबाई कधी दम खायला थांबते, आणि माझी बोलायची पाळी येते, ह्यासाठी टपलेले.
"तुम्ही heating किती ठेवता? ६९ ठेवत जा बरं- त्याने बिल कमी येतं!"
असे सल्ले देतांना त्यांचे डोळे चमकतात.
इकडे भाजीच्या ४ पिशव्या, डबा, ऑफिसबॅग धरून माझ्या हाताला कळ लागलेली असते, पण त्यांच्या धबधब्यापुढे माझं काही चालत नाही.

मात्र गेले ४ दिवस त्यांचं घर बंद दिसलं. दिव्यांच्या माळा नुस्त्या धूळ खात लटकल्या. कचरा टाकायला कोणी बाहेर येईनासं झालं. तेंव्हा ऑक्टोबरच्या पानगळीत मला जरा जास्तच उदासवाणं वाटायला लागलं.

पण आज दुपारी झोपले होते, तोच बेल वाजली. जिवावर आलं तरी माहिती होतं- हे नक्की खालचे शेजारी असणार. दार उघडल्या उघडल्या बुवांनी पुराण चालू केलं. कुणाच्याशा funeral ला गेले, ते सहकुटुंब जरा सहल करून आले होते ते. पण मी जेमतेमच ऐकलं... आणि मनातून मला अखेर सवयीची, त्रासयुक्त जांभई आली.

9/16/09

पैठणी- शांता शेळके

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, तोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.

ही कविता मी प्रथम वाचली, तेव्हा "फडताळ", "नारळी पदर" असले शब्द कळतही नव्हते. आईबाबांची कागद-पत्रे ज्या कपाटात होती, तिथे त्यांची काही पुस्तकं अगोचरपणे वाचायला गेले, तर शांताबाई शेळक्यांचं "गोंदण" हाती आलं. एक कविता वाचली, कळेना. पान पुढे. दुसरी. त्यात "आवर्त" असले शब्द म्हणता म्हणता बोबडी वळते म्हणून पुस्तक ठेवून द्यावं, तोच "पैठणी" वर नजर गेली. ह्म्म्म ही कळू शकेल बुवा! बघू तरी...

माझी आजी लग्नामधे ही पैठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची...अनोळखीची...जाणीव गूढ आहे त्यास.

(काय बरं ह्या वाक्यात अर्थ प्रतीत होतो? तेव्हा कळण्याचं वय नव्हतं, पण अजूनही ते गूढ मनात रेंगाळलंय.)

धूप-कापूर-उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले एक तन...एक मन...
खस-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
(ह्या वाक्याशी मी दरवेळी थांबते. खस-हिन्याचा एकत्रित दरवळ! नुसतं खस-हिना म्हटलं तरी अंगावरून झुळूक गेल्यासारखी वाटली.)
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली.

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला.
(माझ्या आजीची साडी इतकी मऊ कशी लागते? ह्याचं उत्तर मिळाल्यासारखं वाटलं.)
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले.
(त्यावेळी आजीच्या मरणाच्या कल्पनेनेही रडू आलं होतं!)

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा.


देवाच्या कृपेने माझ्या दोन्ही आज्या अजून खुशाल आहेत, तरीपण, अमेरिकेतल्या माझ्याशी, भारतातल्या आज्यांचा, कालपटाचा धागा जुळतो, तेव्हा गहिवरून येतं. ह्या कवितेबद्द्ल लिहितांना, "कवयित्रीने सर्व संवेदना- स्पर्श, गंध, दृष्टीला खुणावणारं काव्य केलंय" असं काहीबाही लिहायला गेलेही असते कदाचित

पण एवढंच म्हणते- शांताबाई! तुमच्या कवितेने जागवलेल्या माझ्यातल्या निर्मळ मनाला, मनातल्या निरागस आठवणींना, आणि त्या आठवणींनी वाहणाऱ्या झऱ्यांना सलाम!!!

8/25/08

केनीकुर्डू आणि कोल्स्लॉ

Prelude: मित्रमैत्रिणींनो, मी जन्मात कधी ब्लॉगोस्फियरमधे खो खो खेळले नव्हते, त्यामुळे माझा जरा गोंधळ झालाय खरा, पण मी यशोधरा आणि नंदन ला खो दिलाय...
===================================================================
परवा एका सत्यनारायणाच्या पूजेला गेलो होतो- यजमान फारच भाविक. अगदी केळीचे खांब लावून सजवलेला चौरंग, विष्णूसहस्त्रनामाचे प्रिंट-आऊट्स, टोपलीभरून फुलांच्या पाकळ्या, अशी जय्यत तयारी होती. सौ. नी पैठणी, श्रींनी धोतर, जानवं घालून अगदी साग्रसंगीत दाक्षिणात्य गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा केली. त्या भारलेल्या वातावरणात, एरवी फारसे भाविक नसलेले लोकही खिळून बसतात नं, तसं माझं झालं होतं. लहान मुलांना बाकी काही कळत नसेल, तरी रंगीबेरंगी आरास आवडते, तसं ते visual च इतकं सुंदर होतं, की कोणीही आकर्षित व्हावं... मनातले गोंधळ तात्पुरते संपून केवळ गुरूजींचा भारदस्त स्वर कानात भरून रहावा, इतपत माझी समाधी लागली होती.

कधीतरी शिकलेल्या संस्कृतामुळे, आणि आजी पौरोहित्य करते, त्यामुळे गुरूजी खरंच त्या त्या वेळी समर्पक मंत्र म्हणतायेत, की तोंडातल्या तोंडात जे श्लोक आठवतील ते पुटपुटताहेत, ते ही कळत होतं, आणि त्यामुळे गुरूजींबद्दल थोडा आदर निर्माण झाला होता. काही गुरूजी, पुजा सांगता सांगता, कोण आलं, कोण गेलं, कोणती मुलगी दिसायला चांगली आहे, अशा अनेक गोष्टी इकडे तिकडे बघत, टिपत असतात! त्यातले हे नव्हते- असं प्रथमदर्शनीच जाणवलं. लोकांना ५ ची वेळ दिली, त्यानंतर लोक हळूहळू येत होते, थोडं बसून, पुन्हा दुसरीकडे जात होते. लहान बाळं असलेल्या बायका त्यांना घेऊन शक्यतोवर पूजेपासून दूर बसल्या होत्या- म्हणजे रडणं-पडण्याचा व्यत्यय नको- अशा विविधतेने नटलेल्या त्या जागी, गुरूजींचं सगळं लक्ष मात्र फक्त पूजेवर केंद्रित होतं.

पूजा झाल्यावर, “आता कथावाचन..” असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबर यजमानांनी एक टिपिकल प्लॅस्टीक कव्हर लावलेलं जुनंपुराणं पुस्तक बाहेर काढून, “The Satyanarayana Katha: Chapter 1” अशी सुरूवात केली. “One day the holy sage Narada was roaming in the heavens, and while roaming, he came to Vaikuntha, the dwelling of almighty Shri Satyanarayana.” मी नवऱ्याकडे हळूच एक नजर टाकली. ती टाकायला नको होती, असं नंतर वाटलं, कारण तोही, माझ्याप्रमाणेच, हसू दाबण्याच्या कठोर प्रयत्नात!!! इकडे कथा सुरूच, “There was once a Merchant by the name of Sadhu, who had a wife called Leelavati. He was unhappy, because he did not have children.” आता पूजेत व्यत्यय नको, म्हणून आपणच तिथून उठून जावं का काय, इतपर्यंत माझी परिस्थिती झाली होती.

लहानपणी, “पुराणकथा,” नावाच्या १० पानी पुस्तकात कित्ती कहाण्या वाचल्या होत्या, त्यांचा ह्या Lord Satyanarayana शी काही संबध आहे असं वाटेना! मनातल्या मनात, “हे लोक केनीकुर्डूच्या भाजीचं इंग्रजीत काय भाषांतर करतील?” असा विचार येऊन जास्तच हसायला आलं. “एकदा एका कुष्ठरोग्याच्या रूपात श्री विष्णू कलावतीच्या घरी आले असता, तिने त्याला प्रेमाने घरात घेऊन, तेल-उटण्याने न्हाऊ माखू घातलं.” अशा आशयाची एक गोष्ट आठवली, आणि नागपंचमी, पोळा, श्रावण, सोळा-सोमवार अशा किती कहाण्या आपण विसरलो, ते ही आठवलं! एवढी पूजा साग्रसंगीत केलीये, तर ह्यांनी कहाणीपण मराठीत वाचायला काय होतंय? असंही एकदा वाटून गेलं.

पण मग पुन्हा शांताबाई शेळकेंचं, “चौघीजणी.” डोळ्यापुढे आलं. त्यातल्या एका गोष्टीत, हॅनाने थॅंक्सगिव्हिंगच्या सणाला बनवलेलं उत्कृष्ट जेवण, शांताबाईंच्या उत्कृष्ट अनुवादामुळे मला चाखायला मिळालं होतं. मेग (Meg) च्या फसलेल्या मुरांब्याचे प्रयोग जवळचे वाटले होते, आणि सर्वात अधिक लक्षात राहिलं, ते एक Christian Hymn,
“लीनपणे जो जगे तयाला
पतनाचे भय कधीच नाही.
कुणी न ज्याचे, देव तयाचा
सदैव सहचर होऊन राही.”
शांताबाईंनी ती भाषाच नव्हे, तर त्या संस्कृतीचा अनुवाद केल्यामुळे जे अनुबंध माझ्यात आणि Little Women मधे निर्माण झाले, तेच अनुबंध इथल्या मुलांसाठी इंग्रजी सत्यनारायणाच्या कथेने नाही का निर्माण केले? एकदा वाटतं, आपल्या संस्कृतीचं जतन व्हायला हवं. पुराण-कथेच्या पुस्तकांना अक्षरश: म्युझियममधे जागा करून द्यावी. आणि दुसरीकडे वाटतं- म्युझियममधे सडण्यापेक्षा, त्यांचा प्रसार व्हायला हवा. मग केनीकुर्डूच्या भाजीला कोल्स्लॉ का म्हणेनात!!!

===================================================================
तळटीप: आनंद सरोळकरांनी, “खो.” दिल्यामुळे माझापण हा, “शब्दखेळ.” पटकन पूर्ण झाला, त्याबद्द्ल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!