Showing posts with label युद्ध. Show all posts
Showing posts with label युद्ध. Show all posts

3/31/18

The Reader: वाचाल तर वाचवाल


Kate Winslet म्हटली, कि Titanic मधली उच्चभ्रू, सुसंस्कृत तरुणी आठवते. तिच्यातली उत्स्फूर्त, प्रखर अस्मिता असलेली प्रेयसी जॅक च्या सान्निध्यात समोर येते. त्या व्यक्तिरेखेचा इतका पगडा मनावर होता, की पुढची अनेक वर्ष अभिनेत्री आणि व्यक्तिरेखेतली सीमारेषाच धूसर होती.

पण The Reader मधली केट, बघताक्षणीच वेगळी व्यक्ती असते. हॅना श्मिट्झ. जर्मनीतली, दुसऱ्या महायुद्धातली साधी ट्राम कंडक्टर असलेली ही एकसूरी जगणारी मध्यमवयीन बाई. पण तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या एका मुलाची तिच्याकडे चोरून बघणारी नजर ती ओळखते. आधी निरुपद्रवी विरंगुळा म्हणून त्यांचं 'प्रेमप्रकरण' सुरु होतं. पण कोवळ्या वयाचा हा मुलगा तिच्यात गुंतत जातो, ते त्याचं त्यालाही कळत नाही. ती मात्र कायम रोकठोक अंतर राखूनच वागते. प्रत्येक भेटीत त्याला विचारते, "तुझ्या शाळेत कोणतं पुस्तक चाललंय सध्या? वाचून दाखव बरं!" तो वाचतो:
"Sing to me, Muse, of the man of twists and turns........"
ती म्हणते, "किती सुंदर हे शब्द! छान वाचतोस...." तो तिला बरेचदा पुस्तकं देऊ करतो, पण ती म्हणते, "नको, मला तू वाचून दाखवलेलंच आवडतं!"

The Reader हा चित्रपट मूळ कादंबरी Der Vorleser वर आधारित आहे, आणि Der Vorleser चा अनुवाद "वाचणारा" असा नसून "वाचून दाखवणारा/पाठक" असा होतो. हा मुलगा उन्हाळी सुट्टीतला 'पाठक' होतो. हॅना श्मिट्झवरच्या प्रेमापोटी, आपण वाचून दाखवताना बदलणारे, तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचा प्रयत्न करतो. पण एके दिवशी ती अचानक दुसऱ्या गावी बदली होऊन निघून जाते.

मुलगा पहिल्या प्रेमभंगातून सावरतो, मोठा होतो, आणि नामांकित 'न्यायशाळेत' वकीली शिकू लागतो. दुसरं महायुद्ध संपलेलं असतं. आउश्वित्झचे खटले (The Auschwitz Trials) सुरु असतात, तिथे सगळे न्यायशास्त्राचे विद्यार्थी उपस्थित असतात, त्यात हा मुलगाही असतो. आणि तिथे त्याला पुन्हा दिसते- हॅना श्मिट्झ. ह्यापुढे रहस्यभंग करू इच्छित नाही. बरेचदा हिन्दी चित्रपटात (रहस्यकथा असो किंवा थरार) प्रत्येक प्रतीक, प्रत्येक घटना, प्रेक्षक ४ वर्षाचे असल्याचे गृहित धरून अती स्पष्टीकरण केले जाते. "द रीडर" तसे स्पष्टीकरण देत बसत नाही, आणि ह्यामुळेच तो विचारप्रवर्तक होतो, हे आवडलं!

ह्यापुढील चित्रपट नायकाच्या अस्वस्थतेचं चित्रण करतो. एकेकाळी आपली प्रेमस्वरूप असलेली "मायभू" जर्मनी (जरी जर्मनीला पितृभूमी म्हणतात, तरी, इथे मायभू म्हणणे समर्पक ठरेल). युद्धानंतर देशप्रेमाचं परिवर्तन लज्जा आणि संभ्रमात झालेल्या पिढीचं प्रतीक आपला नायक आहे. ह्या पिढीला आपल्या इतिहासाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग हवाय, म्हणूनच, आपला तरुण नायक स्वतःलाच प्रश्न विचारून आत्मपरीक्षण करतो आहे, की "ज्यू लोकांचं शिरकाण करणाऱ्या माझ्या देशावर मी प्रेम कसे करू???" माझ्या देशाने हे अघोरी कृत्य केलंच कसं? का केलं?



"वाचाल तर वाचाल" हे आपण ऐकलेलं आहे, पण "वाचाल तर वाचवाल" हे द रीडर बघून कळलं. हे वाक्य केवळ नायकालाच लागू होत नाही, तर नायिकेलाही एका नकारात्मक पद्धतीने लागू होतं, म्हणून चित्रपटाचं आणि कादंबरीचं नाव सार्थक आहे.

आपण वाचतो, वाचन खूप महत्वाचं आहे वगैरे सर्वांना माहिती आहे, पण वाचनाचा खरा अर्थ म्हणजे केवळ माहिती मिळवणे नसून, पुस्तकातील व्यक्तींशी, घटनांशी एकरूप होणे. पुस्तकांच्या स्थल-कालाबाधित अस्तित्वातून जेव्हा आपण समग्र मानवी जीवनाशी जोडलेजातो, तेव्हा 'सहानुभूती' चा खरा अर्थ वाचनातून जाणवतो. एखाद्या सर्वस्वी वेगळ्या संस्कृती/काळातल्या व्यक्तिरेखेच्या भावानुभवाशी जोडल्या गेल्यावर 'नीती' 'दया', ह्या 'मानवी मूल्यांची' किंमत कळते.

आजकाल चमचमीत, झटपट फास्टफूडप्रमाणे वाचनसुद्धा पोषक उरलेलं नाही, कारण दृक्श्राव्य माध्यमांपुढे वाचनाची गोडी लागणे कठीण आहे. पण त्याच दृक्श्राव्यतेचा वापर जर 'द रीडर' सारख्या पोषक, विचारप्रवर्तक चित्रपटांसाठी होत असेल, तर ते हि नसे थोडके.

कथा इतकी सशक्त असल्यावर अभिनय त्या तोडीचा नसेल तर अतिशय त्रासदायक अनुभव येतो, पण इथे केवळ २-३ प्रमुख व्यक्तिरेखा असूनही त्या कलाकारांनी आपल्या अभिनयातून कथा फार ताकदीने पेलली आहे. तरुण नायकाचा (डेव्हिड क्रॉस) अभिनय नंतरच्या राल्फ फिनेसपेक्षाही फार भावला- पण आधीची निरागसता आणि नंतरची प्रौढ निराशा यातील विरोधाभासामुळेही असेल. युरोपचं सुंदर चित्रण, शिवाय हॅनाच्या खोपटेवजा घरातून अप्रतीम वातावरणनिर्मिती होते कारण ते घर, तिच्या रुक्ष जीवनाचा आरसा असतं. पार्श्वसंगीताचं अस्तित्व जाणवू नये, पण त्याने भावनिक उंची नेमकी टिपावी हा ही तोल समर्थपणे सांभाळला गेला आहे. ह्या सर्वांतून दिग्दर्शक स्टीफन डालड्री ची पकड जाणवते.


पुढील वाक्यांतून रहस्यभेद होऊ शकेल, त्यामुळे चित्रपट पाहिला नसल्यास वाचू नये:
हॅनासाठी अधिक लज्जास्पद काय होतं? निरक्षरता? की निर्दयता? जी व्यक्ती आपल्या कर्माचा 'अर्थ' समजून घेऊ शकत नाही, तिला त्यातली निर्दयताही दिसली नाही, त्यात नवल ते काय? पापणीसुद्धा न मिटता तीजन्मठेपेचा स्वीकार करते, पण शिक्षा भोगतांनाही तिच्या मनात खरा पश्चात्ताप निर्माण होत नाही. त्या अर्थी तिचा आत्मा कधीच त्या कृत्यातून मोकळा होऊ शकत नाही.

हॅना ला 'वाचवण्यासाठी', तिला 'वाचता' यावं लागणं अपरिहार्य असतं. अनेक वर्ष हा मुलगा, हॅनावरील प्रेमापोटी, पुस्तकांचा खजिना स्वतः 'वाचून', ध्वनिमुद्रित करून तिला पाठवत राहतो. तिला वाचनाची गोडी लागावी म्हणून धडपडतो. आणि एक दिवस तिचा 'आत्मा' जागृत करण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये असतं. त्या अर्थी दुःखांतसुद्धा अतिशय समर्पक वाटतो. नायक आपल्या मुलीला ही गोष्ट सांगतांना स्वतः त्या अनुभवाचा स्वीकार करतो, आणि तीच पुढे जाण्याची एकमेव वाट असते...


8/22/16

Syriaतले घर थकलेले संन्यासी

"घर थकलेले... संन्यासी" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं! इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर "टांगणीला" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे!

Syria देशातून गेली अनेक वर्ष ते चालताहेत. त्यांच्या मागे बॉम्बने विदीर्ण झालेल्या त्यांच्या गावांचा आक्रोश कानापर्यंत येऊ नये म्हणून कान आवळून बंद करून. त्यांची घरं जणू "थकलेली". कुणाची "थकबाकी" असते, कर्ज थकलेलं असतं तसं, घरासाठी वाट पाहणं त्यांच्या नशीबी आलेलं. आणि जीवाच्या भीतीने पायपीट करून करून ते ही थकलेले.  त्यांना "गृहस्थ" कसं म्हणावं? जे घरदाराच्या पाशांमधून निकराने स्वतःला सोडवून निघालेले- ते संन्यासीच म्हंटले पाहिजेत.

आडोशाची "भिंतही खचते" तेव्हा आईच्या डोळ्यातलं नक्षत्र त्यांना आठवतं आहे.
५ वर्षांच्या ओमरान च्या शून्य नजरेमध्ये असेल का तेच नक्षत्र?
आई, जिच्या उबदार पंखांमागे निर्धास्त डोळे मिटून लपून जावं, आणि सगळी चिंता आपोआप विरून जावी, त्या आईचं घरटं, हे प्रत्येकाच्या मनात खोल रुतून बसलेलं एक सुरक्षित स्थान असतं. पाय कितीही भरकटले, तरी तिच्या डोळ्यातल्या नक्षत्राने वाट दाखवावी, आणि फिरून आपण आयुष्याच्या शेवटी का होईना, तिच्या कुशीत निजावं, अशी उर्मी दाटून येते.
पिलं चालू लागतात, पण त्यांची आईसुद्धा देशोधडीलाच लागलेली असते! सिरियन निर्वासितांबरोबर प्रवास करणार्‍या पत्रकरांनी त्याबद्द्ल कितीहि भरभरुन लिहिलं, तरी कमीच...

जवळजवळ २५०,००० नागरिकांचं घर हिरावून घेणारं हे कसलं जीवघेणं युद्ध? गेली ५ वर्ष सतत जाळणारं हे कुठलं "रखरखते ऊन"!
"पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळीमागे असतेच झऱ्याचे पाणी"
आयुष्य पाण्यासारखं पुढेपुढे वाहत जाताना, आपण ओंजळीत त्यातले दोन क्षणही सुखाने धरून ठेवू शकत नाही. प्रेमाची माणसं कालाधीन, तर कधी दुरावलेली... हातातून निसटून जातात. प्रत्येकवेळी ओंजळ भरून घेतांना त्यांना त्यातून निसटलेला झराच आठवत असेल का?
उलट प्रवाहाविरुद्ध पोहणारे जिगीषू निर्वासित, त्यांच्यातले किती पल्याड पोचू शकतात? एका बापाला मृत पोरासाठी अश्रू ढाळत न बसता, तसंच पुढेपुढे प्रवाहपतीत होऊन जावं लागतं. एक पिलू वाहून गेलेलं, त्याला आठवलीच असेल ना आपली आई, त्या अंतिम क्षणांमध्ये?

"मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई" जर कधीकाळी ह्या वाटसरूंना आश्रय मिळाला, तरी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला "अंधार", ते अत्याचार, रक्तपात, बलात्कार, चिंधड्या - त्यांना विसरता येतील का कधी? घरासाठी रानोमाळ फिरणाऱ्या भटक्यांना जर घर कधीकाळी मिळालंच, तर ते हि पुन्हा नव्याने तिथे रुजतील. घरातल्या "अडगळीत" त्यांना सुरक्षित वाटूही लागेल. तो सवयीचा पसारा, "माझ्या" असणाऱ्या वस्तू, हौशीने जमवलेली भांडीकुंडी....... रोज रोज डोळ्यांना दिसल्या, कि जीवनाच्या सुरळितपणाचा क्षणिक दिलासाही मिळेल.

पण एकदा ज्यांनी आपलं घर उद्ध्वस्त होणं अनुभवलं आहे, त्यांना कायमच त्या "दरीतल्या वनराईचा" धसका लागून राहणार. ती भयाण वनराई, ते भटकेपण, कधी येऊन पुन्हा घर गिळंकृत करील? करील का? सगळीकडून ती आपल्या घरावर "हलके हलके" पुन्हा अतिक्रमणकरू लागलं आहे हा भास.... त्यातून त्यांची सुटका नाही.

तोवर घरात राहूनसुद्धा "घरपण" मात्र थकलेलं च राहील!

8/23/14

A Woman in Berlin

कुठल्याही युद्धात, आणि त्यातही दुसऱ्या महायुद्धासारख्या निर्घ्रुण युद्धात स्त्रीयांवर झालेल्या अत्याचारांबद्दल वाचायचे, धाडस मी केले नव्हते. चित्रपटातून बघतांना तर असे विषय इतके क्लेशकारक होतात, की  बरेचदा त्यांच्या कडू जहर सत्यापासून आपण लांबच राहणे पसंत करतो. पण A Woman in Berlin ने त्याच सत्याचे इतके पैलू दर्शविले आहेत, की हादरून जातांनाही कुठेतरी, एक उत्तम कलाकृती बघितल्याचा आनंद मिळाला, म्हणून लिहावेसे वाटले. चित्रपटाची कथाच इतकी प्रभावी आहे, की दिग्दर्शकाचे श्रेय जाणवू नये, पण तरीही, छोट्या दृश्यातूनच नव्हे, तर प्रत्येक शॉट मधून, नजरेतिल प्रत्येक भावातून त्याने ती कथा अधिक फुलवली आहे. काही दृश्यांसाठी मनाची तयारी करूनच बघावा, पण बघावा जरूर, असा हा चित्रपट, Netflix वर उपलब्ध आहे.

मूळ कादंबरी युद्धानंतर प्रसिद्ध झाल्यावर इतके वादळ उठले, की लेखिकेने आजन्मच नव्हे, तर मृत्यूनंतरही "Anonyma" बनून राहणे पसंत केले. लेखिका नाझी जर्मनीतली पत्रकार, आणि देशोदेशी फिरलेली, अनेक भाषा अवगत असलेली, बर्लिनच्या उच्चभ्रू स्तरातली सुसंस्कृत स्त्री आहे. तिचा नवरा जर्मन सैन्यात मोठ्या पदावर असल्याने युद्धासाठी निघून जातो, आणि त्यानंतर तो परत येईपर्यंतची वाताहात तिच्या नजरेतून आपल्याला पडद्यावर दिसते.

बर्लिन काबीज करायला आलेले रशियन सैनिक तिथे उरलेल्या, नि:शस्त्र, निरपराध स्त्रीयांचे शोषण करत असतांना, ही अनामिका-नायिका धैर्याने त्यांच्या कमांडर समोर उभी राहून जाब विचारते, तेव्हा मुळात सभ्य असूनही तो तिला, "थोडावेळ सहन करा, येवढं काय त्यात?" असं उत्तर देतो! जर्मनीने युद्ध सुरू केले, जर्मन सैनिकांनी जेवढे हाल आमचे केले, तेवढे आम्ही तुमचे केले असते, तर तुम्ही अजून जिवंतच राहिला नसता, असे अनेक ताशेरे, अनेक सबबी पुढे करत, हे "जेते" पुरूष निराधार स्त्रियांना जगणं नकोसं करून सोडतात, तेव्हा, अनामिका मात्र आपल्या स्त्रीत्वाचा स्वाभिमान राखत, आपल्या स्त्रीत्वाचेच शस्त्र घेऊन ठाम उभी राहते, आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्यालाच कुठेतरी तिचा गुलाम बनायला लावते, ही जया-पराजयाची लढाई  दिग्दर्शकाने अतिशय सूक्ष्म रितीने दाखवली आहे. शेवटी कमांडर तिच्यापाशी येतो, तेव्हाही, ती त्याचे हुकूम न मानता, त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देते. 

हिंसा, प्रेम, राष्ट्राभिमानाचे अनेक अर्थ इथे प्रतीत होतात, तसेच स्त्री-पुरूषांमधल्या नात्याचेही. कारण ज्या पुरूषाने जग जिंकायला पाऊल पुढे टाकले, त्याच्या घरी मागे राहिलेल्या आया-बहिणी मात्र तो या जुगारात केव्हाच हरलेला आहे! ज्या मूल्यांसाठी तो प्राणपणाने लढला, त्याच मूल्यांची होळी तो स्वहस्ते पेटवतो आहे, केवळ आता होळी पेटलेले घर शत्रूचे आहे, येवढाच फरक! हा विरोधाभास चित्रपटामधे दर क्षणी जाणवतो, आणि तोच ह्या स्त्रीच्या कथेचा कणाही आहे. 

देशाला, सैनिकांना प्रेरित करायला हिटलरसारख्या नेत्यांनी नीतिमूल्यांचे शब्द वापरले. नायिकासुद्धा त्या शब्दांनी वहावत जाऊन श्रद्धेने जर्मनीच्या विजयाची, आपल्या नवऱ्यच्या विजयाची आस धरून बसलेली असतांनाच, शत्रूच्या नजरेतून तिला वेगळंच दृश्य दिसतं. आपल्या राष्ट्रीय-व्यक्तित्वाचा कुठला अर्थ आपले देशबांधव त्यांच्या क्रूर-कर्तृत्वाने सिद्ध करताहेत, हे लक्षात आल्यावर, ती मनातून पराभूत होते.

जर्मनीला "पितृभूमी" मानत असले, तरी, बर्लिनचे स्त्री रूपक स्पष्ट आहे. ज्या पुरूषावर प्रेमाने, विश्वासाने विसंबलो, संरक्षक म्हणून त्याची "पूजा" बांधली, तोच आता नजरेतून उतरल्यावर, शत्रूपक्षाच्या कमांडरबरोबर नवीन मांड मांडण्यावाचून नायिकेला गत्यंतर उरत नाही. कमांडरही शेवटी पुरूष असला, तरी इतरांपेक्षा जास्त सभ्य, सुसंस्कृत, आणि पर्यायाने स्त्रियांचा आदर करणारा आहे, म्हणून त्याचे मित्र, हाताखालचे सैनिकही हळूहळू त्या स्त्रियांना सहानुभूतीने वागवू लागतात. त्या स्त्रियांनी आश्रय घेतलेले घर, कुठेतरी त्या सैनिकांचे आश्रयस्थान होते, जिथे आपल्या घराच्या, बायका-मुलांच्या आठवणीत ते रमतात, गातात, नाचतात, रशियाच्या विजयाचा एकत्र जल्लोश करतात, आणि युरोपियन एकतेची स्वप्न बघतात. 

चित्रपटात लक्षात राहणारी एक गोष्ट म्हणजे उत्तम संवाद आणि लेखन. मूळ जर्मन भाषेच्या अनुवादित तळटीपा बघूनही सहज समजणारे, आणि अर्थवाही. शेवटच्या प्रसंगात अनामिका जेव्हा कमांडरला विचारते, "आम्ही तुझ्याविना कसे जगावे?" तेव्हा तो प्रश्न त्याला व्यक्तिश: तर आहेच, पण तो ज्या आदर्शांचा प्रतिनिधी आहे, त्यांनाही आहे. महायुद्धामुळे दिशा, आणि जुनी जीवनपद्धती हरवलेल्या एका संपूर्ण पिढीचा तो प्रश्न आहे!

शेवटी घरी परत आलेल्या नवऱ्याला अनामिका जेव्हा आपले अनुभवकथन वाचायला देते, तेव्हा तो ही पूर्णपुरूष श्रीरामा प्रमाणे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन निघून जातो. पुरूषांच्या युद्धोन्मादाचे घाव दाखवणारी अनामिका, आणि बर्लिन-नगरी, एकवार पुन्हा स्त्रीस्वभावानुसार जगात सौंदर्य, सृजनता, सुजनता निर्माण करायला सिद्ध होते. पण ह्यावेळी ती केवळ स्वयंसिद्धा आहे, हेच काय ते थोडके समाधान.


12/9/09

ध्येय, प्रेम आशा यांची...

युद्धात माणसांचं काय हरवतं? असं विचारण्यापेक्षा, युद्धात मरण बघितल्यावर माणसांना जगून बघायचं काय उरतं? ह्याचा शोध घ्यायला गेलो, तर कदाचित हेमिंग्वेच्या (Hemingway) The Sun Also Rises चं उत्तर सापडेल.

Bullfighting च्या रिंगणातही एक वेगळंच युद्ध माजलेलं असतं. मॅटॅडोर (Matador) आणि पिकॅडोर (Picador) यांचा माजलेल्या सांडाभोवती झिम्मा. निसर्गातल्या सगळ्याच घटकांप्रमाणे सांडाची प्रवृती सरळधोट, निर्भिड आणि पवित्र असते. माणूसपणातून जन्माला आलेल्या क्षुद्रतेचा त्यात लवलेशही नसतो. शिंगांना रक्ताची चटक लागलेले हे सांड, अंगावरच्या असंख्य जखमांनी रक्तबंबाळ होऊनही आपला माज न सोडता, मृत्यूला धडका देतात, ती केवळ त्यांची क्षमताच नव्हे, तर एकप्रकारे त्यांच्या जन्माची पूर्तता असते. त्यांचा जन्मच मुळी मरणाशी झुंज द्यायला झालेला असतो!

तर जातिवंत मॅटॅडोर मात्र, सांडापुढे, त्याच्याच येवढा "माज" घेऊन उभे ठाकतात. त्यांच्याकडे तलवारी, सुरे असतात, आणि सांडाला चिथवण्यासाठी लाल कापडी पंखा. ही लढाई एकतर्फी असते, कारण सांड एकटा, आणि हे टोळकं. पण विजयाची खात्री असतांनाही, अंगावर धावून येणाऱ्या सांडापुढे स्वत:ला स्वच्छ प्रकट करण्यात मॅटॅडोरची खरी "माणुसकी" दिसते. आपला मर्मभेद करू शकेल, अशी आशा त्याला दाखवून, हुलकावण्या देत देत त्याला मारतांनाही त्याचा मान राखणं ज्या मॅटॅडोरला जमतं, त्याला खरा "मर्द" समजतात.

पाठीचा ताठ कणा घेऊन, आपलं पौरूष दाखवत ते लाखो लोकांसमोर मृत्यूचं हे महानाट्य उभं करतात, तेव्हा त्यांना लाखो लोकांची टाळी मिळते.

हेमिंग्वेचा जेक बार्न्स (Jake Barnes) हा bullfighting चा रसिक श्रोता आणि चाहता आहे. त्याने युद्धात स्वत:च्या प्राणांहूनही मूल्यवान असं काहीतरी - त्याचं पौरूष- गमावलंय. आता युद्धानंतर ब्रेट (Brett) च्या प्रेमात पडल्यावर तिला जे हवं ते तो देऊ शकत नाही. त्याच्यावर आतोनात प्रेम असूनही, मनासारख्या पुरूषाच्या शोधात अनेकांबरोबर संग करणारी ब्रेट सुद्धा स्वत:ला माफ करू शकत नाही. त्या दोघांच्या मित्रांचं टोळक्यातला प्रत्येक जण Brett कडे आकर्षित होतो, पण त्यांना जेकची सर येत नाही.

जेकचं दु:खच असं अपरिहार्य- त्याचं ओझं जातिवंत सहजतेने वागवत, आणि ब्रेटला तशातही आधार देत तो उभा आहे- Bullfighting च्या रिंगणात. युद्धात अनेकांनी गमावलेली माणुसकी आणि सौजन्य अजूनही त्याच्यात शिल्ल्क आहेत.

पण युद्धा आधीचा तो भोळा विश्वास? ती ध्येयासक्ती, ते राष्ट्रप्रेम - जगातल्या कुठल्याही दोघांनी एकमेकांवर करायचं असतं, तसं निस्वार्थ प्रेम- जेकचं हे हरवलेलं धन त्याला कुठून परत मिळणार?
ध्येय, प्रेम आशा यांची/ होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजितो या/ आम्ही भंगणाऱ्या मूर्ती!
काढ सखे गळ्यातील/ चांदण्याचे तुझे हात
क्षितिजाच्या पलिकडे उभे/दिवसाचे दूत.
-कुसुमाग्रज

हेमिंग्वेच्या पुस्तकातली सगळीच पात्र - कधी जीवावर उदार होऊन रिंगणात उभे राहणारे मॅटॅडोर असतात, तर कधी जीवनाच्या निरर्थकतेने रक्तबंबाळ झालेले, तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची आत्मवृत्ती असणारे सांड.

गर्ट्र्ड श्टाईन (Gertrud Stein), ह्या हेमिंग्वेच्या मैत्रिणीने त्यांना दिलेले नाव--------- The Lost Generation.