Showing posts with label धर्म. Show all posts
Showing posts with label धर्म. Show all posts

3/15/15

पाए आणि वाघ: Happy Pi Day

एक होता पाए. (मराठीत "पाय" आणि "पाए" च्या उच्चारात फारसा फरक नाही, पण आशयदृष्ट्या पाय म्हटला की आपला पायच डोक्यात प्रथम येतो, म्हणून "पाए" असा वापर करते आहे.) त्याचं नाव खरंतर "पिसीन मॉलिटोर पटेल" (Piscine Molitor Patel) होतं, पण शाळेतलं चिडवणं थांबावं, म्हणून त्याने "पाए" धारण केलं, ते कायमचं. नावात काय असतं? असं शेक्स्पियर ने लाख म्हणून ठेवलं असलं, तरी "पाए" (Pi) इतकं "भारी" (भारी= मस्त असा पुणेरी अर्थ अभिप्रेत नसून भारी= loaded/आशयघन असा आहे) नाव शोधूनही सापडलं नसतं!

ह्या पाए चे वडील एक प्राणीसंग्रहालय चालवत असतात. तिथे "रिचर्ड पार्कर" नावाचा एक वाघ दाखल होतो. त्या वाघाचं नाव रिचर्ड पार्कर कसं पडलं, ह्याची पण पाएच्या नावाइतकीच मजेदार कहाणी आहे, 
Yann Martel लिखित, Life of Pi.  'कहाणी' वरून आठवलं, पुराणातल्या कथा/कहाण्यांप्रमाणेच ही कादंबरी खऱ्या-खोट्याच्या सीमारेषेवर सहज प्रवास करते. म्हटले तर अकल्पनीय/अतर्क्य अशा घटनांना पाएच्या अतिशय वस्तुनिष्ठ वर्णनामुळे वास्तवाची किनार येते, म्हणूनच वाचकांनाही ती कहाणी multidimensional (बहुआयामी) आणि विचारप्रवर्तक वाटू लागते.


तर रिचर्ड पार्कर आल्यावर छोट्या पाएला त्याचे आकर्षण वाटले, आणि तो पिंजऱ्याजवळ जाऊन आला, हे कळल्यावर त्याच्या वडिलांनी, काहीशा अघोरी पद्धतीनेच, पाएला श्वापदांचा हिंस्त्रपणा दाखवून कायमचा "धडा" दिला. पण दुसरीकडे, पॉण्डिचेरीच्या बहुढंगी वातावरणात पाए वेगवेगळ्या धर्मांचेही धडे घेत होता, आणि सगळ्याच धर्मांमधे भरपूर साम्यस्थळं असूनही लोक आपापल्या जन्मजात धर्माला चिकटून का बसतात, हे कोडं उलगडायच्या आतच, वडिलांनी बोटीवरून कॅनडाला प्रयाण करायचं ठरवलं, अगदी पोरं-बाळं-प्राणी-पक्षी ह्या सगळ्या गोतावळ्यासकट. त्या जहाजाचं, रिचर्ड पार्करचं, नि पाएचं पुढे काय झालं, हीच कथावास्तू आहे.


बोटीवरचे प्राणी म्हटल्यावर नोआहच्या गोष्टीची आठवण झाली? पाएला त्याच्या मामाने उत्तम पोहणे शिकवले, आणि त्याचे नावही एका तरणतलावावरून ठेवले, पुढे पोहता येत होते, म्हणूनच तो वाचला, त्यावरून, "भवसागर तरण्याची" आठवण झाली? अशी एक दोनच नव्हे, तर शेकडो उदाहरणं पुस्तकात सापडतील, कि परस्परसंबंधांच्या उभ्या-आडव्या जाळ्यातून, वरकरणी साध्या उदाहरणातून लेखकाने जीवनाचे तत्वज्ञानच सांगितले आहे.

माणूस आणि पशूत काय फरक असतो? (हल्ली फारसा जाणवत नसला तरी) प्राण्यांना केवळ एक शरीर"धर्म"च ठाऊक असतो. जगण्यासाठी मारणे, खाणे, प्रजोत्पादन आणि संगोपन, एवढंच जीवनाचं श्रेय प्राण्यांना पुरतं. पण माणसाला त्याहून अधिक कशाचीतरी तहान असते. मारणे अथवा मरणे, ह्यापलिकडचा जीवनाचा मतितार्थ शोधायची ओढच माणसाला धर्माकडे, आणि संस्कृतीकडे घेऊन गेली. धर्माच्या प्रयोजनाची चर्चा करतांना Life of Pi  सारखी पुस्तकं नक्कीच समाविष्ट करायला हवीत, कारण पाए, आणि रिचर्ड पार्करमधील नात्याचा प्रवास हा माणसातल्या पशुत्वाचा, आणि त्याविरोधात उभ्या ठाकलेल्या माणूसपणाचा प्रवास आहे, असं मला वाटतं.

म्हटलं तर पाए म्हणजे केवळ ३.१४, असे माझ्या वर्षानुवर्षे गणिताचा गंज लागलेल्या बुद्धीला आठवलं. पण विकिपिडीया वर शोधायला गेलात, तर पाए ह्या अंकाचं असाधारण महत्त्व लक्षात येतं. पाए नावाची संकल्पना माणसाने जन्माला घातली, तीच मुळी एक "नातं" स्पष्ट करून सांगण्यासाठी. जीवनातल्या अनेक चढ-उतारांत पाए मात्र "constant" आहे, आणि तरीही, त्याचं खरं मूल्य कळण्याला कितीतरी शतके जावी लागली, किंबहुना त्याचं खरं मूल्य हे अप्राप्यच आहे. Life of Pi हे शीर्षक त्या अर्थाने, "पाए ह्या संकल्पनेचा जीवनपट/विकास" म्हणूनही समर्पकच असेल. 
पशूंप्रमाणे निरूद्देश जगण्याला कंटाळलेल्या माणसाला आस होती, नव्हे, त्याचा तो विश्वास होता, कि जगाची निर्मिती, त्यात मानवाची उत्क्रांती हा निव्व्ळ योगायोग नसावाच. म्हणूनच तो भवतालच्या सगळ्या घटनांमधले, वस्तूंमधले परस्परसंबंध शोधू लागतो. हा परस्परसंबंध सांगणाऱ्या दोन गोष्टी: पाए, आणि धर्म. माणसाला जीवनात पशूत्वाच्या पुढे जाणे जो शिकवतो, तो धर्म. 

आज धर्माचा व्यापार, त्याची भ्रष्टता, मूळ उद्दिष्टे हरवलेलं स्वरूपच आपल्याला दिसतं, पण त्याचा विकास माणसाच्या जीवनातली एक पोकळी भरून काढण्यासाठी झाला. Karen Armstrong नावाच्या विदुषीचे धर्माच्या विकास, आणि उद्दिष्टांवरचे भाष्य फार आवडले. (तिच्या लेखाचा अनुवाद करायची जबरदस्त इच्छा आहे. ते असो.) 

पाएच्या आणि वाघाच्या "कहाणीत" माणसाची आदिकालापासूनची कहाणी कुणाला सापडेल, तर कुणाला "आपण सारे अर्जुन" प्रमाणे जगण्याचे तत्वज्ञान सापडेल. मुळात पाएचा वाघ कुणालाही दिसला नाही. पण तसा तर, देव तरी कुणाला दिसलाय? तरीही, प्रत्येकाच्या अंतर्मनातल्या देवाने (अथवा वाघाने) त्याला/तिला जगण्याचं बळ, जगण्याची उमेद, जगण्याची दिशाच नव्हे, तर जिगीषाही दिलीये, हे मात्र खरं. म्हणूनच  ही पाएची कहाणी पण त्या गणिती Pi च्या कहाणी इतकीच महत्वाची आहे. 













1/14/15

Not one, not two.

"आता मी प्रमुख पाहुण्यांना चार शब्द बोलायची विनंती करते!" असं निवेदिकेने म्हटलं, की प्रेक्षक आळोखेपिळोखे द्यायला लागतात. पाहुण्यांचे "चार शब्द" मात्र चांगले दोन तास चालतात!
मात्र झेन कोअनचे चार शब्द? "Not one, not two."

माझं मन आणि मी. आम्ही एकच आहोत, की दोन? ह्या प्रश्नानेच द्विधा झालेलं मन: ते एकच आहे कि दोन? माझं मन नसेल, तर मी असेन का? Descartes नावाच्या तत्वज्ञाने म्हटलंय, "I think, therefore I am." पण हा विचार करणाऱ्या, "स्व" ची जाणीव असलेल्या मनापलिकडे माझं अस्त्तित्व आहे की नाही, हेच कळत नसतांना तेच चार शब्द समर्पक वाटतात: ना एक, ना दोन......

"एक ना दोन, भाराभर चिंध्या!" माझे वडिल नेहमी सांगतात. माळेत एक-एक हव्यासाचा मणी जोडत गेले, आणि आता हे आयुष्यच तसं झालंय का? एकाने समाधान होत नाही, मग एकामागे दोन, दोनामागे तीन, ह्या हव्यासाला अंत नाही, असं असेल काय? 

काही दिवसांपासून बौद्ध धर्माबद्द्ल वाचन चाललं होतं, आणि त्यातल्या मूलतत्त्वांनी भारावून जाऊन एकदोन झेन मासिकंही जवळच्या लायब्ररीतून उचलून आणली होती. मग थोडंफार दु:खांना सामोरं जाण्याचा मार्ग, वगैरे वाचतांना, "हे आपल्याला लागू पडतंय, आणि ह्यातलं थोडं थोडं जरी रोजच्या जीवनात उतरवता आलं तर चांगलं होईल..." इतपत माझी प्रगती झाली होती.

त्यातला मला खूप आवडलेला एक प्रकार म्हणजे zen koan. थोडक्यात, ध्यान करतांना मन भटकू नये, म्हणून एक छोटसं कोडं घ्यायचं. ह्या कोड्याच्या माध्यमातून आध्यात्मिक, किंवा आत्मिक, किंवा अंतिम सत्यावर चिंतन करावं, आणि ते करतांना आपल्याला नवीन काहीतरी उमजत जावं, अशी अपेक्षा असते. ह्या कोड्याला ठरलेलं असं काही उत्तर नसतं. आपल्याला अभिप्रेत असलेल्या, किंवा जाणवलेल्या अर्थावर आपण गुरूशी चर्चा करावी, आणि त्यांच्याकडून नवीन दिशा/उपदेश घ्यावा अशी पद्धत.

तर असे चारदोन koan इकडच्या तिकडच्या वाचनात आले, पण मनात घर केलं, ते ह्या साध्या शब्दांनी:
Not one, not two. शरीर आणि मनाच्या द्वैत/अद्वैताबद्दल इथे सांगितलंय, की ब्रह्म आणि आत्म्याच्या? अद्वैतवादी म्हणतात की आत्मा आणि परमात्मा हे एकरूपच आहेत. मग आत्म्याला परमात्म्याचा शोध घ्यायला इतके कष्ट का पडतात? स्वत:चं खरं रूप ओळखू न शकलेला आत्माच द्वैत निर्माण करतो, असं असेल काय? 

 एकदा वाटतं, लग्न केल्यावर दोन व्यक्ती असल्या, तरी त्यांचं जीवन एक होतं. ते हे असेल काय? 
बरेचदा भांडण दोघांचंच असलं, तरी त्यात बरेच इतर लोक होरपळतात, गोवले जातात. मग भांडण सुरू कोणी केलं, ह्याला अर्थ नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. क्रीया-प्रतिक्रीया, ह्या दोन दिशांमधेच आपल्या मनाचा लंबक येरझाऱ्या घालत राहतो. असणं-नसणं/पॉझिटिव-निगेटिव हे बायनरीज (binaries) पण असेच, कारण त्यांची व्याख्याच मुळात परस्परावलंबी आहे. संकल्पना एकच असली तरी ती व्यक्त द्वैतातून होते, हे किती अतर्क्य!

कबीराचं एक "अद्वितीय" सुंदर भजन, लताच्या आवाजातलं, "तेरा मेरा मनवा कैसे एक होई रे?" आठवलं. ते इथे ऐकता येईल.
मै कहता तू जागत रहियो, तू जाता है सोई रे ।
जुगन जुगन समझावत हारा, कही न मानत मोई रे ॥
(मनाच्या विकारांवर विजय मिळवणं फार कठीण!  नवीन वर्षाच्या सुरवातीला कितीतरी प्रतिज्ञा स्वत:शीच करणारं हे मन. दोन दिवस झाले, की लगेच घसरू लागतं. त्याला समजवावे तरी समजत नाही, कळले, तरी वळत नाही.)

मै कहता आँखी न देखी, तू कहता कागज की लेखी ।
मै कहता सुरझावन हारी, तू राख्यो उरझाई रे ॥
(जे डोळ्यांनी बघितले नाही, ते केवळ कागदावर लिहले म्हणून, किंवा फक्त एक संकल्पना म्हणून, त्यावर विश्वास ठेवावा का? देवाच्या अस्तित्त्वाबद्दलच हा चरण असू शकेल, की देवाला कोणी बघितले नाही तरी त्यावर विश्वास कसा ठेवावा? हे कोडं मी उलगडू पाहतो, पण "तू" (देवाला/ईश्वराला संबोधिले असावे) त्यातला गोंधळ माझ्यासाठी अधिकच का वाढवून ठेवलायस? जो विश्वास ठेवतो, त्यालाच देव भेटतो म्हणतात, पण जोवर पुरावा नाही, तोवर मी विश्वास ठेवणार नाही, हा हट्ट मनाला सोडायला सांगताहेत का? 

ते गाणं, ते विचार अनेक दिवस मनात घोळत राहिले, आणि एके दिवशी, एका डोहाळेजेवणाला गेलो, तेव्हा त्या "दोन जीवांच्या" "आई" ला बघून एकदम प्रकाश पडला, कि ही दोन जीवांची असूनही, डोळ्यांना एकच दिसते! त्याला भूक लागली, तर तिच्या पोटात कालवाकालव होते. त्याने उड्या मारल्या, तर तिला गुदगुल्या! नऊ महिन्यातिल तिच्या आचार-विचारांचा बाळावर नकळत परिणाम होत असतो. 
म्हणावे तर तो छोटा जीव तिच्यापासून वेगळा नाही, तिचाच अंश आहे, तरी थोड्या दिवसांनी त्याचं स्वत:चं असं वेगळं अस्तित्त्व निर्माण होईल. तरीही, आपलं मूल कितीही, अगदी कितीही मोठं झालं, तरी आईची माया त्यावर अशीच असते, जणू काही ते अजूनही तिच्याच नाळेशी जोडलेलं आहे. ह्यालाच म्हणत असतील, "Not one, not two." एक स्त्री म्हणून, माझं आत्मज्ञान शेवटी इथे येऊन थांबलं, की स्त्री ही अनंतकाळची माता! 
तुम्हाला काय वाटतं? Not one, not two मधून तुम्हाला कुठले अर्थ प्रतीत होतात? 







6/25/09

रंग जांभळा

गेले काही दिवस मी Celie ची पत्र वाचत होते. The Color Purple मधली.
तिने देवाला लिहिलेली. "त्या" च्या पर्यंत कधी न पोचलेली...
सेली चं बालपण उमलायच्या आधीच कोमेजलं. आई मरणाच्या दारात असतांना सख्ख्य़ा बापाने अत्याचार केले, तर सांगेल कुणाला? एक देवच तर होता, त्याच्यावर भरोसा, की तो माझा पाठीराखा...
पण तो नाही आला धावून, द्रौपदीच्या कृष्णासारखा... बापाच्या पापाची पोरं बापाने बाहेर विकली, तेंव्हा नाही. त्याने सेली ला एका प्रौढ माणसाला बायको म्हणून उजवली, तेव्हा ही नाही. त्या माणसाने तिला गुरापेक्षा वाईट वागवली, वापरली, तरी ही नाही.

सेलीची पाठची बहिणच एक होती, तिचा कैवार घेणारी. ती म्हणाली, "तू तरी का सोसतेस अशी मुक्याने?"
"I don't know how to fight. All I know how to do is to stay alive!" सेली चं उत्तर आज समजून घेणं अवघड आहे. सेली सारख्या ऍफ्रिकन अमेरिकन बायकांना अगदी विसाव्या शतकातही जे सोसावं लागलं- त्याने पार मोडलेला कणा घेऊन जगतांना, पर्यायांचा नुसता विचार करता येण्याइतकंही बळ नसणं!
देवावरच्या आपल्या भाबड्या विश्वासाने का होईना, सेली त्या मरणाहून वाईट जगण्यातून चिवटपणे तगली. तिच्या बहिणीला मात्र शिक्षणाने नवी वाट दाखवली. आफ्रिकेत मिशनरी म्हणून गेली ती, पण आपल्याच संस्कृतीच्या ह्या "मूळापासून" आपण किती दूर फेकले गेलो, ह्याचं भान तिला आलं, आणि तिच्या "मिशन" ला एक वेगळंच परिमाण प्राप्त झालं.

सेली च्या नव़याने मात्र तिची पत्र सेली पर्यंत कधी पोचू दिली नाहीत.
आशेच्या एका किरणाला पारखी झाली होती सेली, तेव्हा तिला भेटली Shug Avery. प्रसिद्ध गायिका, सौंदर्याची पुतळी, पण आजारी पडल्यावर समाजाने टाकलेली. सेलीच्या शुश्रुषेने ती बरी झाली, आणि सेलीचं आयुष्यच तिने उजळून टाकलं.

"माझ्या देवाने आजवर माझ्यासाठी काय केलं?" सेली ने शेवटी हताश होऊन विचारलं, तर शग म्हणाली,
" तुझ्या डोक्यातला देव, एकतर तो पुरूष आहे, आणि त्याहून गोरा! तर त्याच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? तो तुझी निरपेक्ष सेवा मागणार, आणि त्याने वाटलेलं दु:खही तू प्रसाद समजून कपाळी लावावंस असं धर्मग्रंथात लिहून ठेवणार."

"मला वाटतं देव ना स्त्री आहे ना पुरूष. ते एक तत्त्व आहे- आपल्या बरोबरीने जगणारं, सुखात हसणारं, वेदनेने कळवळणारं! भावना ही देवानेच निर्माण केल्या ना? मग त्या सतत दाबून टाकल्याने देव प्रसन्न होईल असं कसं वाटतं तुला? अगं आपल्या सुखातही देवाचं सुख असेल, असा विचार का नाही करत आपण?
आपण देवाला प्रसन्न करायला निघतो, पण देवाने आपल्याला प्रसन्न करण्यासाठी काय काय लीला मांडून ठेवल्यात त्या कधीच का डोळे उघडून बघत नाही आपण?


"I think it pisses God off if you walk by the color purple in a field somewhere and don't notice it.” शग म्हणाली.
सेलीला मग एकदम काहीतरी उमगल्यासारखं झालं... जांभळ्या रंगाने हळूहळू तिचं रंगहीन जीवन उत्फुल्ल होत गेलं...

8/25/08

केनीकुर्डू आणि कोल्स्लॉ

Prelude: मित्रमैत्रिणींनो, मी जन्मात कधी ब्लॉगोस्फियरमधे खो खो खेळले नव्हते, त्यामुळे माझा जरा गोंधळ झालाय खरा, पण मी यशोधरा आणि नंदन ला खो दिलाय...
===================================================================
परवा एका सत्यनारायणाच्या पूजेला गेलो होतो- यजमान फारच भाविक. अगदी केळीचे खांब लावून सजवलेला चौरंग, विष्णूसहस्त्रनामाचे प्रिंट-आऊट्स, टोपलीभरून फुलांच्या पाकळ्या, अशी जय्यत तयारी होती. सौ. नी पैठणी, श्रींनी धोतर, जानवं घालून अगदी साग्रसंगीत दाक्षिणात्य गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा केली. त्या भारलेल्या वातावरणात, एरवी फारसे भाविक नसलेले लोकही खिळून बसतात नं, तसं माझं झालं होतं. लहान मुलांना बाकी काही कळत नसेल, तरी रंगीबेरंगी आरास आवडते, तसं ते visual च इतकं सुंदर होतं, की कोणीही आकर्षित व्हावं... मनातले गोंधळ तात्पुरते संपून केवळ गुरूजींचा भारदस्त स्वर कानात भरून रहावा, इतपत माझी समाधी लागली होती.

कधीतरी शिकलेल्या संस्कृतामुळे, आणि आजी पौरोहित्य करते, त्यामुळे गुरूजी खरंच त्या त्या वेळी समर्पक मंत्र म्हणतायेत, की तोंडातल्या तोंडात जे श्लोक आठवतील ते पुटपुटताहेत, ते ही कळत होतं, आणि त्यामुळे गुरूजींबद्दल थोडा आदर निर्माण झाला होता. काही गुरूजी, पुजा सांगता सांगता, कोण आलं, कोण गेलं, कोणती मुलगी दिसायला चांगली आहे, अशा अनेक गोष्टी इकडे तिकडे बघत, टिपत असतात! त्यातले हे नव्हते- असं प्रथमदर्शनीच जाणवलं. लोकांना ५ ची वेळ दिली, त्यानंतर लोक हळूहळू येत होते, थोडं बसून, पुन्हा दुसरीकडे जात होते. लहान बाळं असलेल्या बायका त्यांना घेऊन शक्यतोवर पूजेपासून दूर बसल्या होत्या- म्हणजे रडणं-पडण्याचा व्यत्यय नको- अशा विविधतेने नटलेल्या त्या जागी, गुरूजींचं सगळं लक्ष मात्र फक्त पूजेवर केंद्रित होतं.

पूजा झाल्यावर, “आता कथावाचन..” असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबर यजमानांनी एक टिपिकल प्लॅस्टीक कव्हर लावलेलं जुनंपुराणं पुस्तक बाहेर काढून, “The Satyanarayana Katha: Chapter 1” अशी सुरूवात केली. “One day the holy sage Narada was roaming in the heavens, and while roaming, he came to Vaikuntha, the dwelling of almighty Shri Satyanarayana.” मी नवऱ्याकडे हळूच एक नजर टाकली. ती टाकायला नको होती, असं नंतर वाटलं, कारण तोही, माझ्याप्रमाणेच, हसू दाबण्याच्या कठोर प्रयत्नात!!! इकडे कथा सुरूच, “There was once a Merchant by the name of Sadhu, who had a wife called Leelavati. He was unhappy, because he did not have children.” आता पूजेत व्यत्यय नको, म्हणून आपणच तिथून उठून जावं का काय, इतपर्यंत माझी परिस्थिती झाली होती.

लहानपणी, “पुराणकथा,” नावाच्या १० पानी पुस्तकात कित्ती कहाण्या वाचल्या होत्या, त्यांचा ह्या Lord Satyanarayana शी काही संबध आहे असं वाटेना! मनातल्या मनात, “हे लोक केनीकुर्डूच्या भाजीचं इंग्रजीत काय भाषांतर करतील?” असा विचार येऊन जास्तच हसायला आलं. “एकदा एका कुष्ठरोग्याच्या रूपात श्री विष्णू कलावतीच्या घरी आले असता, तिने त्याला प्रेमाने घरात घेऊन, तेल-उटण्याने न्हाऊ माखू घातलं.” अशा आशयाची एक गोष्ट आठवली, आणि नागपंचमी, पोळा, श्रावण, सोळा-सोमवार अशा किती कहाण्या आपण विसरलो, ते ही आठवलं! एवढी पूजा साग्रसंगीत केलीये, तर ह्यांनी कहाणीपण मराठीत वाचायला काय होतंय? असंही एकदा वाटून गेलं.

पण मग पुन्हा शांताबाई शेळकेंचं, “चौघीजणी.” डोळ्यापुढे आलं. त्यातल्या एका गोष्टीत, हॅनाने थॅंक्सगिव्हिंगच्या सणाला बनवलेलं उत्कृष्ट जेवण, शांताबाईंच्या उत्कृष्ट अनुवादामुळे मला चाखायला मिळालं होतं. मेग (Meg) च्या फसलेल्या मुरांब्याचे प्रयोग जवळचे वाटले होते, आणि सर्वात अधिक लक्षात राहिलं, ते एक Christian Hymn,
“लीनपणे जो जगे तयाला
पतनाचे भय कधीच नाही.
कुणी न ज्याचे, देव तयाचा
सदैव सहचर होऊन राही.”
शांताबाईंनी ती भाषाच नव्हे, तर त्या संस्कृतीचा अनुवाद केल्यामुळे जे अनुबंध माझ्यात आणि Little Women मधे निर्माण झाले, तेच अनुबंध इथल्या मुलांसाठी इंग्रजी सत्यनारायणाच्या कथेने नाही का निर्माण केले? एकदा वाटतं, आपल्या संस्कृतीचं जतन व्हायला हवं. पुराण-कथेच्या पुस्तकांना अक्षरश: म्युझियममधे जागा करून द्यावी. आणि दुसरीकडे वाटतं- म्युझियममधे सडण्यापेक्षा, त्यांचा प्रसार व्हायला हवा. मग केनीकुर्डूच्या भाजीला कोल्स्लॉ का म्हणेनात!!!

===================================================================
तळटीप: आनंद सरोळकरांनी, “खो.” दिल्यामुळे माझापण हा, “शब्दखेळ.” पटकन पूर्ण झाला, त्याबद्द्ल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!