Showing posts with label अनुवाद. Show all posts
Showing posts with label अनुवाद. Show all posts

2/21/19

शब्द दिला!

"तिने बाळाला जन्म दिला!" असं म्हणतात. दिला? जन्म ही कुणी कोणाला देण्यासारखी गोष्ट तर नक्कीच नाही. तो कशाचा 'दाखला' होता, कि तिने दिला? कि तिला तो द्यावा लागला?
जेव्हा जन्म दिला, तेव्हा ज्यांना दिला, त्यांना तो घेण्या किंवा न घेण्याचा अधिकार असतो का?
जाऊदे. ह्या शब्दच्छलात पडण्यापेक्षा- डॉक्टरांनी 'डिलिव्हरी केली' असं म्हणावं, तर डॉक्टर काय पोस्टमन झाली, कि तिने केवळ जिथलं पार्सल तिथे पोचवण्याचं काम केलं?
आपल्या अवघ्या अनुभवविश्वाची मर्यादा, अशी शब्दांनी ठरवली जाते. जन्म देण्याचा अनुभव कसा असतो? त्याचं वर्णन करणारे शब्द एका लेखिकेला सापडू शकतील का?

Margaret Atwood ही कदाचित सध्याची सर्वात मान्यवर इंग्रजी लेखिका आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये, इतकी पारितोषिकं आणि सन्मान तिच्या नावावर आहेत. मार्गरेटचं घट्ट वास्तवाला धरूनच उत्तुंग भराऱ्या मरणारं साहित्य खरंच स्त्री जीवनाच्या खूप खूप जवळ जातं. The Handmaid's Tale लिहिताना म्हणे, तिने स्वतःवर बंधन घालून घेतलं होतं, कि जगात आजवर न घडलेल्या गोष्टी आपल्या कथेत मुद्दाम दुःख-विषाद निर्माण करण्यासाठी घालायच्या नाहीत. तरीही, ह्या डिस्टोपिअन कथेतली भीषणता सर्वांपर्यंत पोचली. तिच्या कथा, कविता मी जास्त वाचल्या - २५ एक कादंबऱ्या, ७-८ कथा संग्रह, कविता संग्रह, शिवाय, समीक्षा, ब्लॉगच नव्हे, तर 'ग्राफिक नॉव्हेल' सारख्या अतिशय नवीन प्रांतातही पाऊल ठेवलेलं. इतकं विपुल लेखन करणारी स्त्री लेखिका, आणि तरीही जे जे लिहिलं ते उत्तम, म्हणून मी अधिकाधिक भारावत गेले!

Dancing Girls मधली तिची कथा, "Giving Birth" च्या सुरुवातिचा थोडासा स्वैर अनुवाद/गोषवारा वर दिलाय. मानव"जन्मा" च्या लिखित इतिहासात, अनुभवकथनात, स्त्रियांच्या अनुभवांचं स्थान दुय्यमच नव्हे, तर केवळ अंशमात्र ठरलं. पृथ्वीच्या उत्क्रांतीपासून विश्वयुद्धापर्यंत अनेक 'महत्वाच्या' घडामोडीमध्ये स्त्रीजीवनाचा विचार फार कमी वेळा पुढे मांडला गेला. १०० प्रसिद्ध लेखकांची नावं घ्या म्हंटल, तर सहज तोंडावर येतील- शेक्सपियर/मिल्टन/चॉसर  पासून कीट्स, वर्डस्वर्थ, हार्डी, येट्स, आणि इकडे अमेरिकेत व्हिटमन, हॉथॉर्न, फिट्सजेराल्ड,आर्थर मिलर, रॉबर्ट फ्रॉस्टच नव्हे, तर लोकप्रिय लेखकात जेफ्री आर्चर, आर्थर हेली वगैरे सर्वांना माहित असतात. आता १०० इंग्रजी लेखिकांची, किंवा स्त्रीविषयक लेखनाची नावं आठवून पाहू बरं?

कठीण च होतं ते! इंग्रजीपेक्षा मग मराठी लेखिकाच लवकर आठवतील. अभिजात साहित्य लिहायला वेळ, पैसा, आणि 'स्थान', ह्या तीन गोष्टींचं गणित स्त्रियांसाठी जुळून येईपर्यंत २०वं शतक उजाडलं. व्हर्जिनिया वूल्फ म्हणाली, तसं, कादंबऱ्यांनी स्त्रियांच्या विश्वाला साहित्यात स्थान मिळवून दिलं. आणि तरीही, साहित्याच्या पुरुषप्रधान निकषांवर ते उतरायला अजून कितीतरी काळ लोटावा लागला. जेन ऑस्टेन, ब्रॉन्टे भगिनी फक्त प्रेम-घर-लग्न-कुटुंब ह्याच परिघात फिरत राहिल्या, कारण त्या पलीकडचं विश्व त्यांच्या परिचयाचंच नव्हतं...

Atwood च्या "Giving Birth" ची लेखिका/निवेदिका स्वतः आई आहे. तिची २ वर्षाची पिल्लूडी मधेच झोपेतून उठल्यावर तिला खाऊ घालणे, न्हाऊ घालणे, हे करता करता ती लिहितेय, विचार करतेय.
तिच्या मुलीला कोणीतरी दिलेली बार्बी बाहुली, त्या बाहुलीचे सगळे कपडे गायब, आणि कशी कोणजाणे, बाहुलीच्या पोटातून मधे अखंड चीर गेलीये! आणि आज बघते, तो चिमुकलीने तोंडात घालून घालून बाहुलीचे पाय पण तोडलेयत! मग लगेच मुलीचं डायपर उघडून तपासणी करावी लागते, कि पाय खाल्ले असतील, तर शी तुन बाहेर पडले का?
आता ती बीभत्स बाहुली बघवत नाही, म्हणून कचऱ्यातच टाकावी लागते!  

हे सोपस्कार पार पडून, शेवटी आपण गोष्टीतल्या नायिकेकडे वळतो- जेनेट. जेनेट सुशिक्षित, बहुधा नोकरदार, सजग स्त्री असल्यामुळे तिने प्रसूतीविषयी पुस्तकं वाचलीयेत, श्वासावर लक्ष केंद्रित करायचे, दहा आकडे म्हणायचे - असे पर्याय ती प्रसूती-कार्यशाळेतून शिकून आलीये. ह्या क्लासमध्ये सांगतात, "थोडा त्रास होणारच, पण तो आपण कसा घेतो, त्यावर आहे!" पण तिथली एक अनुभवी बाई म्हणते- "इंजेकशन घेऊन टाका- नरकयातनांपेक्षा काहीही बरं! त्रास- प्रसूती वेदनांना 'त्रास' म्हणणं म्हणजे!" पण पाहिलटकरीणी तिच्याकडे आक्रसून बघतायत - किती नकारात्मक विचार करावा उगीच!

जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र जेनेटला वाटतं- क्लासमध्ये शिकलेल्या वाचलेल्या ऐकलेल्या कितीही गोष्टी असोत, 'ह्या' अनुभवासाठी त्या पूर्णपणे निरुपयोगी आहेत!
कळांच्या वेदनेतून जाताना ती सगळ्या जगापासून तुटल्यासारखी होते. तिच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी संथ होतात, आणि शेवटी श्वासोच्छवास, दहा आकडे, शब्द, सगळ्यांच्या पलीकडे ती पोचते. बाळ बाहेर येतं, तेव्हा नवरा म्हणतो, "बघ,वाटलं तितकं कठीण नव्हतं, ना?"

तिचा चष्मा नवऱ्याने आणलेला नसतो, त्यामुळे "काय झालंय" ते तिला दिसू शकत नाही! स्वतःच्याच इतक्या व्यक्तिगत अनुभवाकडेही शेवटी तिला कुणा परक्याच्याच नजरेतून, त्यांनी वर्णन केलेल्या भाषेतूनच बघावं लागणार असतं. थोड्यावेळाने जाग आल्यावर मात्र, खिडकीतून बाहेर बघताना, आजवर ज्या इमारती खंबीर आणि स्थिर दिसत होत्या, त्या अचानक विरघळून जाऊ लागल्या. एक अशक्य अशी कोवळी क्षणिकता जेनेटला दिसली, तेव्हा तिला वाटलं - ती स्वतःच आता एक वेगळी व्यक्ती झाली आहे!















3/1/18

चाँदनी रातमें कुछ फीके सितारोंकी तरह

काही दिवसांपासुन फ़ातिमा हसन यांची एक सुरेख गझल मनामध्ये घोळत होती. इतक्या सोप्या शब्दांमधून इतका धारदारपणे मांडलेला विषाद खरोखर मनाला भिडला. मराठीत तो विषाद आणणं मला जमलं नाही, पण निदान अर्थाचा तरी स्वैर अनुवाद केलाय.

चाँदनी रातमें कुछ फीके सितारोंकी तरह
याद मेरी है वहां, गुजरी बहारोंकी तरह

बात बस इतनी है इक मोड़पे रस्ता बदला
दो क़दम साथ चला वो भी हजारों की तरह

कोई ताबीर नही कोई कहानी भी नही
हमने तो ख़्वाब भी देखें हैं नजारों की तरह

बादबाँ खोले जो मैने तो हवाएँ पलटी
दूर होता गया एक शक्स किनारों की तरह

'फ़ातिमा' तेरी ख़ामोशी को भी समझा है कभी
वो जो कहता रहा हर बात इशारों की तरह
=०=०=०=

गत जुन्या वसंताचे मावळले वारे जसे
नक्षत्रांत स्मृती माझ्या फिकटले तारे जसे

इतकेच, थोडे चालुनी साथ त्याने सोडली
शेकडो परकेच होते सोबती सारे जसे

अन्वयाचे काय सांगू? गोष्टही नव्हती कधी
स्वप्नसुद्धा पहिले मी - चित्र की न्यारे जसे

प्रवाही सोडली नौका, शीड माझे फडकले
दूर जाऊ लागला 'तो', गाव किनारे जसे

'फातिमा' तुझा अबोला कसा त्याला ना कळे?
आडुनी संदिग्ध ज्याचे बोल, उखाणे जसे! 

11/20/16

ग्रफेलो: 2


घुबडाच्या हातावर देऊन तुरी, पुढे निघाली उंदराची स्वारी
नागोबा तेवढ्यात सळसळत आला, फणा काढून गोड तो बोलला
"उंदीरमामा, तुला इतकी कसली घाई?
माझ्या घरी चल, करतो मस्त सरबराई!"

                                   "तुझ्या घरी, त्या ओंडक्यांच्या खाली
                  नागोबा, असेलच ना गाSS सावली
                  (मलाच कशाला ही अवदसा आठवली?)
                                     पण आज नको, मी आहे फारच घाईत
                  ग्रफेलोला भेटलो नाही, तर होईल पंचाईत!"
"ग्रफेलो, ग्रफेलो? तो कोण असतो?"
                                    "नागोबा तुला माहित कसं नाही?
                                     ग्रफेलोसमोर तुझं काही खरं नाही!
                                     डोळ्यात त्याच्या पेटल्याहेत केशरी ज्वाळा
                  जीभेचा रंग तर रात्रीहून काळा
                  पाठीवर फुटलेत जांभळे काटे
                  दुरून दिसला, तरी फार भीती वाटे!"
"बापरे! उंदीरमामा, इतकंच बोला
कुठे भेटणार तुम्ही ह्या ग्रफेलोला?"
                                   "इथे, ह्याच तळ्यापाशी येईन, तो म्हणाला
                                    सापांच्या शेवया खाईन, तो म्हणाला!"
“"बरं बरं उंदीरमामा! टाटा बाय बाय,
मला फक्त फणाच, पण का नाहीत पाय?"
नागोबाने जाताजाता केली सळसळ, आणि गवताच्या वाटेने काढला पळ!
                                    "वेडा रे नागोबा! त्याला कळलंच नाही
                   ग्रफेलो असं मुळी नसतंच काही!"

== 0==0==0==0
शेफारल्या उंदराला स्फुरणच चढलं
कोल्हा, घुबड, सापाला त्याने वेड्यातच काढलं
तितक्यात हादरले डोंगराचे कडे
मोठा एक पंजा पडला डोळ्यापुढे
अजस्त्र जबड्यात, दात, जसे खिळे!
डोकावत होते बाजूने दोन मोठे सुळे!                                              
झाडाच्या खोडासारखे खडबडीत त्याचे पाय
उंदराला झालं दे माय धरणी ठाय
नाकावर दिसली विषारी पुटकुळी,
आणि धारदार नखं बघून बसली दातखिळी
डोळ्यात त्याच्या पेटल्या केशरी ज्वाळा
जीभेचा रंग तर रात्रीहून काळा
पाठीवर त्याच्या जांभळे काटे फुटलेले
उंदराला आता कापरेच भरलेले
"देवा मला वाचव, आता मात्र मी मेलो!

हाच तो, हाच तो, हाच तो ग्रफेलो!" (तिसरा, शेवटचा भाग लवकरच टाकते!)


4/8/15

ग्रफेलो? तो कोण असतो?

काही दिवसांपूर्वी नेटफ़्लिक्सवर ग्रफेलो (Gruffalo)नावाची छोटी कथा बघायला मिळाली. इतकं अप्रतीम लेखन, ॲनिमेशन, डबींग आणि पार्श्वसंगीत छोटयांनाच काय, पण मोठ्यांनाही खिळवून ठेवेल असं आहे. आधी कल्पना नव्हती, पण शोधल्यावर कळलं, की जूलिया डोनाल्डसन ही लेखिका तिच्या "ग्रफेलो" साठी जगप्रसिद्ध आहे, आणि Children's Laureate सन्मानार्थीही. चित्रकार ॲक्सेल शेफ्लरने इतकी उत्तम कामगिरी बजावलिये, की पुस्तक उघडल्याक्षणीच तुम्ही  क्षणात एका घनदाट जंगलात जाऊन पोचता. इतक्या बोलक्या चित्रांना, ॲनिमेशनने अर्थात् संजीवनीच मिळते असं म्हणायला हरकत नाही, आणि मधूर, तरीही गूढ-भयावह अशा पार्श्वसंगीताने तर ह्या गोष्टीला चार चाँदच लावलेत. ह्या पुस्तकाचा अनुवाद करायचा इथे प्रयत्न करतेय. सुरूवातीला पोराला जेवता-झोपता-उठता-बसता सारखी ग्रफेलोची गोष्ट लागायची. ती इंग्रजीत पाठ होईतोवर मी मराठीतच सांगत असे. पण मूळ इंग्रजीतली लय त्यात यायची नाही. म्हणून हा प्रयत्न.

पिटुकल्या उंदराला वाटलं कधीतरी
जंगलातून मारावी छोटीशी फेरी.
कोल्होबाने उंदराला वेळीच हेरलं
एका उडीत त्याला पंजात धरलं.

"उंदीरमामा चला माझ्या बिळातल्या घरास,
केलिये मेजवानीची तयारी खास !"              
(कोल्हा लबाड, करणार वाटतं माझाच घास!)

                "नको नको कोल्होबा," उंदराने विनवलं,
                 तो तिकडे ग्रफेलो, माझी वाट पाहतोय म्हटलं!

"ग्रफेलो? ग्रफेलो?
हा कोण असतो?"

                "कोल्होबा, तुम्हाला ठाऊक कसं नाही?
                 ग्रफेलोचा पंजा बघूनच घाबराल तुम्ही.
                 अजस्त्र जबड्यात त्याच्या, दात, जसे खिळे!
                 डोकावतात बाजूने दोन मोठे सुळे!"

"बरं बरं उंदिरमामा, इतकंच बोला,
कुठे भेटणार तुम्ही, ह्या ग्रफेलोला?"

                 "इथेच तो येणारे, ह्याच खडकावरी,
                  त्याला खायला आवडतं, कोल्ह्याचं-तंदूरी"

"ठीकठीक" कोल्हा म्हणाला घाबरून,
शेपूट घातली पायात, नि ठोकली तिथून धूम.
               
                   "वेडा रे कोल्हा, त्याला कळलंच नाही,
                   ग्रफेलो, असं कुठे नसतंच काही!"
=0=0=0=0=0=
कोल्ह्याच्या हातावर देऊन तुरी
पुढे निघाली उंदराची स्वारी
नेमकी घुबडाच्या नजरेस पडली
घुबड झेपावला वेगाने खाली.
“कसं काय उंदिरमामा, निघालात कुठे?
माझ्या घरट्यात या, खाऊ चहा बिस्किटे!”

                                            “घुबडदादा तुझा आग्रह एरवी कसा मोडवेल?
                                             पण ग्रफेलो फुका माझी वाट बघत रडेल.”
                                             (घुबडाघरचा चहा, मला महागात पडेल.)
“ग्रफेलो? ग्रफेलो? हा कोण बुवा?”
                                             “घुबडदादा तुला माहित असायलाच हवा.
                                              झाडाच्या खोडासारखे खडबडीत त्याचे पाय”
“बापरे उंदीरमामा, खरंच की काय”.
                                              नाकावर त्याच्या विषारी पुटकुळी,
                                              आणि धारदार नखं बघून बसेल दातखिळी.”
“बरं बरं उंदीरमामा, येवढंच बोला,
कुठे भेटताय तुम्ही ह्या, ग्रफेलोला?”
                                              “ठरलं होतं इथेच नदीपाशी भेटायचं.
                                               कारण त्याला फार आवडतं आईस्क्रीम घुबडाचं.”
“ठीक ठीक” अशी घुबडाने केली चिवचिव,
आणि गेला उडून, मुठीत धरून जीव.
                                               “वेडा रे घुबड, त्याला कळलंच नाही,
                                                ग्रफेलो, असं कुठे नसतंच काही!"


आवडली का गोष्ट? पुढील भाग लवकरच येतोय. तोवर इथे जरूर बघा.






                 




3/12/09

ते मी असावं

खूप दिवसांपासून ह्या कवितेतलं एक वाक्य डोक्यात घोळत होतं-
Let the more loving one be me!
W. H. Auden च्या एका सुंदर कवितेचा भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय.

ताऱ्यांकडे बघतांना मी उमजून आहे
माझ्या अस्तित्त्वाशी, त्यांना कर्तव्य नाही
जिवाच्या भीतीशी झुंजणाऱ्या मला
त्यांच्या निर्लेपपणाची पर्वा ही नाही.

ताऱ्यांनी प्रेमाने माझ्यासाठी पेटून उठावं
असल्या अफाट प्रेमाचं ओझं नको व्हावं
अशक्य परतफेडीच्या बरोबरीपेक्षा
अधिक प्रेम करणारं- ते मी असावं

नाहीच पण मला जमलं-
असं तुटून प्रेम करणं
कौतुक असेल किती, पण एका ताऱ्याच्या
आठवणीत झुरणं.
प्रत्येक ताऱ्याचा होवो अस्त
आभाळाची काळोखी अंगवळणी पडेल
हळूहळू का होईना त्यातली
गर्द उदात्तताही मिळेल.

- W. H. Auden