Showing posts with label आठवणींचे हजारो काजवे. Show all posts
Showing posts with label आठवणींचे हजारो काजवे. Show all posts

2/27/22

ऊन न लागलेल्या आठवणी



मागच्या अंगणातल्या पायरीवर
दुधाची वाटी आणि कापूस घेऊन
आजी वाती वळत बसायची
मऊसूत वालयांच्या माझ्या कुरळ्या केसांसारख्या
पांढऱ्याशुभ्र वाती...
त्या वातीतली शेवटची वात 
ह्यावर्षीच्या गणपतीत तेवली...
आता आठवणींत मी तेवते आहे...

आजीकडून वाती वळायला शिकायचं 
ते राहूनच गेलं!

कधीकधी ती माझे शाळेचे झगे उसवून द्यायची 
वाढत्या मापाचे, जास्त उंचीचे घेतलेले, 
आतून शिवण मारलेले झगे 
बाहेरून विटले तरी उसवले 
की दिसायचा आतला गडदच राहून गेलेला रंग...

आजीच्या ऊन न लागलेल्या आठवणी 
आता मी उसवते आहे 
कारण कदाचित 
मी मोठी होते आहे!


1/18/19

रिक्षावाला

"ए बेबी, तुझा चक्का उलटा फिरते नं!" मागून जोरात आवाज आला.

एक सेकंद दचकून मी खाली वाकून चाकाकडे पाहिलंच, पण तेवढ्यात गंगारामच्या रिक्षाच्या टपावर बसलेल्या पोरांनी खाली उतरून त्याला जोरात धक्का मारला, आणि मला मागे टाकून हुल्लड करत रिक्षा पुढे निघून गेला! मी पण जोरजोरात सायकल हाणत ओरडले, "ए गंगाराम, काहीSSS काय सांगतो? मी आता पडले असते म्हणजे!" पण गंगाराम हसत हसत "कशी घाबरली!" करत पुढे निघून गेला.

मी तोल सावरला. जुलैच्या पावसात निसरड्या रस्त्यावर नुकतीच लांबच्या मोठ्या शाळेत मी आपली आपली सायकल घेऊन जायला लागले होते. जाऊदे, तो गंगाराम आहेच आगाऊ! असं मनातल्या मनात म्हटलं, आणि पेडल मारलं. माझी सायकल पुढेच जात होती, पण बाजूनी रिक्षा जास्त वेगाने गेल्यामुळे मला खरंच पुन्हा एकदा वाटलं, "आपली चाकं उलटी फिरतायत का?" :) :) चाकं नाही, पण मन उलटं फिरून प्राथमिक शाळेत गेलं.

पहिली ते चवथीची शाळा, मोठ्या रस्त्यावर तीन चौक टाकून होती, म्हणून आम्ही ७-८ वर्षाचे ५-६ फटाके आणि टिकल्या (मुलंमुली) गंगारामच्या सायकलरिक्षातुन शाळेत जायचो. गंगारामच्या मस्कऱ्या स्वभावाने आमची फारच करमणूक व्हायची, पण दप्तर लटकावताना मधेच जर त्याने एका मुलीची वेणी ओढली, दुसरीचा रुमाल पळवला, तर आम्हा मुलींची अस्मिता दुखावली जायची आणि आम्ही जोरात ओरडायचो. आता मी मोठी झाले, असं मला वाटलं होतं, पण मागून येऊन गंगारामने खोडी करायची ती केलीच! मला हसू आलं.

माझ्या तिप्पट चौपट वयाच्या गंगारामला आम्ही ७-८ वर्षापासूनच "ए गंगाराम" च म्हणायचो, कारण माणूस हा असा विनोदी. "अहो गंगाराम काका" वगैरे म्हणायचं, हे पण कधी सुचलं नाही, आणि कोणी शिकवलंही नाही. सगळा बेभरवशाचा कारभार, आणि रोज वेगवेगळ्या वेळी अवतारायचा नेम! :)

सकाळी सकाळी ७:०० वाजता तयार होऊन अंगणात दप्तर घेऊन उभं राहायचं, तरी सव्वासात पर्यंत ह्याचा पत्ता नाही. कि मग समोरच्या अंगणातून चित्रकाकूचा मुलगा ओरडायचा "आज गंगाराम येत नाही वाटतं!" मग धावत धावत टॉयलेटचं दार वाजवायचं, "बाबा, गंगाराम येत नाही, लौकर करा, शाळेत सोडायचं आहे." आणि नेमकी तेवढ्यात बाहेर घंटी वाजणार. कळकट शर्ट, तारवटलेले डोळे, दाढीचे खुंट वाढलेले, नाकातून सूं सूं पाणी येतंय, अशा अवतारात गंगाराम उभा. "बेबी, पायलीवाली खांडेकरनी लेट केला नं!" असं म्हणायचा, पण आजी हळूच नंतर सांगायची, "रात्री दारू पिऊन पडला असेल. तू जास्त बोलत जाऊ नको, शाळेत जायचं- यायचं.  ह्या लोकांशी कशाला जास्त वाढवा?"

पण ते काही असो, घरच्यांचा, आणि आम्हा पोरांचापण त्याच्यावर विश्वास होता, कारण बाकी तो मनाने मुलांत मूलच होता. रिक्षात बसून आम्ही धांगडधिंगा करायला लागलो, कि "ते बेबी रिक्षातून पडली नं, डॉक्टरकडे जाऊन टाकेबी पडले..." वगैरे नुसत्या कहाण्या सांगायचा, पण आम्हाला शिस्त लावणं त्याला जमणं शक्यच नव्हतं, कारण चौकात रिक्षा थांबला, कि खाली उतरून मागे "टपावर" बसायला आम्ही "टपलेले" असायचो.

मला वाटतं गंगाराम टपावरच्या दोन सीट धरूनच मुलांची भरती करत असावा, कारण त्याला झेपतील, आणि मावतील त्यापेक्षा जास्तच पोरं रिक्षात असायची. (रोज कोणीतरी आजारी, कोणी उशीरा उठलेला, कोणी गावाला गेला - म्हणजे शाळेला बुट्टी, म्हणून उरलेली रिक्षात मावूनच जातील असाहि त्याचा अंदाज असावा :-) :-) शिवाय दुसऱ्या कोणा रिक्षावाल्याची बुट्टी असेल, तर तिथलं पण एखादं चिरकूट "दयाळूपणे" आणून बसवायचा (एक्स्ट्रा कमाई नं!)

इतकी पोरं सीटवर कोंबून बसायला तयार नसायची, उलट टपावर बसायलाच भांडाभांडी व्हायची! म्हणजे आम्ही मुलं पण ह्या कटात भागीदार होतो. टपावर 'बसणं' कसलं, ते रिक्षाच्या मागे लोम्बकाळणंच होतं, पण त्यात काय थ्रिल होतं, ते अनुभवल्याशिवाय कळूच शकत नाही...सायकलरिक्षाच्या दोन चाकांना जोडणाऱ्या पट्टीवर पाय, आणि सीटच्या काठाला हाताने धरलेलं, अशी सवारी करणारी एक दोन तरी पोरं प्रत्येक रिक्षात असायचीच. जरा उंची पुरली, की सीटच्या काठावर मागून चढून उलटं बसता पण यायचं, आणि उतारावर जास्त वारं खायला मिळायचं! शिवाय, दोन रिक्षातल्या शर्यतीत पुढे जायला टपावरची पोरं मधेच उतरून रिक्षाला धक्का पण मारू शकायची. काय पण labor of love होतं आमचं!!!

पुढे पाचवी ते सातवी मात्र "भाऊ" भेटले. खरं म्हणजे भाऊ वयाने गंगारामपेक्षा पुष्कळच तरुण, पण त्यांचा आपसूक आदरच वाटायचा, कारण नियमितपणा आणि शिस्तीचं हे दुसरं टोक! रिक्षा चालवण्यातपण किती शिस्त आणि निष्ठा असावी! रिक्षा अतिशय टापटीप ठेवायचे. त्यांनी रिक्षाला गिअर्स बसवून घेतले होते, आणि दप्तरं लटकवायलाही शिस्तीत दोन्ही बाजूला हुक्स, बाजूने ऊन-पाऊस लागू नये म्हणून वेगळे पडदे! स्वतः ही अगदी कडक कपडे घालायचे! उन्हाळ्यात काळ्याशार रंगाचे भाऊ, जवळजवळ तेजस्वीच दिसायचे इतका त्यांचा रंग तुकतुकीत होता! बेसबॉल कॅप घातलीकी तर आम्ही त्यांना सांगायचो, "भाऊ, आज काय स्मार्ट दिसून राहिले!"

सायकल रिक्षात वास्तविक गादीची सीट एकच असते, त्याच्या विरुद्ध बाजूला लाकडी फळकुटच असतं. तर गंगारामच्या रिक्षात उंच सीट पकडायला आम्ही शाळा सुटल्यावर सुसाट धाव घ्यायचो, नाहीतर भांडाभांडी ठरलेली. भाऊंनी मात्र एक दिवसाआडचा नियमच करून टाकला, म्हणजे काल गादीवर बसलेल्यांनी आज खाली बसायचं! गंगारामच्या रिक्षात गादी-फळकुटात फारसा फरकही नव्हता म्हणा, कारण गादी ठिकठिकाणी फाटली होती, आणि भोकातून नारळाच्या का जूटच्या झावळ्या पार्श्वभागाला टोचायच्या :) त्या पुढे भाऊंचा रिक्षा म्हणजे आमच्यासाठी limousine पेक्षा कमी नव्हता!

रिक्षात गाण्याच्या भेंड्यापासून शाळेतलं गॉसिप आणि होमवर्कपर्यंत सगळं घडायचं, कारण रस्ते अगदी लोण्यासारखे गुळगुळीत होते. नागपूरसारखे भव्य, सरळ, रिकामे रस्ते दुसऱ्या कुठेच पहिले नव्हते. ते रस्ते, आणि सायकल-रिक्षा. दोन्ही आता कालातीत झाले.

गंगारामला "उद्या वेळेवर ये" सांगून थकलो होतो, ते भाऊंना "भाऊ उद्या येऊ नका नं, म्हणजे आई शाळेत सायकलने जाऊ देईल..." असं सांगायला लागलो... आधी रहदारीच्या रस्त्यावर डावी-डावीकडून हळू सायकल चालवत होतो, ते नंतर १०वी त शर्यती लावायला लागलो. तेव्हा कधी गंगाराम, कधी भाऊ, छोट्या मुलांना घेऊन जातांना दिसत. कधी मी त्यांना हसून हात हलवला असेल, कधी दुर्लक्षही केलं असेल, कारण तेव्हा मी मोठी झाले होते नं! टागोरांच्या काबुलीवाल्याप्रमाणे आमच्या आयुष्यात रिक्षावाला, दूधवाला, ही मंडळी होती. १०वी च्या परीक्षेचा निकाल लागल्यावर भाऊ घरी येऊन मला १०० रुपये देऊन गेले! त्यांचं मात्र मला संपूर्ण नावही कधी माहिती झालं नाही.

माझी मात्र गरज सरली, की बालपण? त्यांच्याशी बोलण्यासारखं अचानक माझ्याकडे काहीच उरलं नाही...!


 






9/12/16

चौघीजणी समुद्रकिनाऱ्यावर

अनिता: मूळच्या अत्यंत समंजसपणामुळे साधारणतः सदैव कशा ना कशावर किंवा कोणा ना कोणावर चिडलेलीवनिता: घरचा विरोध मोडून मुंबईला, अक्षरशः हातावर पोट घेऊन नोकरी करताना उदंड उत्साह्याला ओहोटी लागली तरी मनाचे पीळ ना सुटलेलीसुनीता: हिची प्रचंड पुस्तकी बुद्धिमत्ता तिच्या एकूण भावनिक विकासाच्या आड येत असल्यामुळे सतत भेटलेल्या यशातही स्वतःच्या क्षमतांबद्दल साशंक प्रणिता: आपली, कृपाभिलाषी. अर्थात, घरच्या 'फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स' मध्ये फारशा भावना न अनुभवता आल्यामुळे इतरांच्या स्पंदानांचे हेलकावे शोधत, साहित्योपासनेत रमलेली. आनंदी-दुःखी निरीक्षिका"आपण बियर पिऊ!" अनिता तिच्या भावांकडून आणि नुक्त्या पटलेल्या 'सख्या' कडून हे बाळ'कडू' पिऊन आल्यामुळे प्रस्ताव मांडते. प्रणिताला प्रथम-जगातील सवयी माहिती असून, बियर पिण्यात अनैतिक काही नसतं, हे नक्की पटलेलं आहे. शिवाय अनेक लेखकांनी अशा गोष्टींना 'अनुभव-विश्व् विस्तारणे' असं म्हंटलेलं आहे. मुळात, इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये, एक पेक्षा अधिक व्यक्तींबरोबर झोपणे (मादाम बोव्हारी), स्वतःच्या आईबद्दल आकर्षण वाटणे (इडिपस), इथपासून... बायकोचा खून करणे (मॅकबेथ) इथपर्यंत घटनांना सामोरे गेल्यावर बियर पिणं तर अगदीच क्षुल्लक सीमोल्लंघन म्हणता येईल, म्हणून बऱ्यापैकी विचारस्वातंत्र्य अनुभवत असतांना, प्रथमच आयुष्यात 'मोकळे सुटल्याचा' वारा लागलेली आहे. सुनीताची मेडिकल इंटर्नशिप त्या आडगावात- समुद्रकिनारी!!! तेवीस वर्षात प्रथमच त्या आपल्या आपल्या पिकनिकला आल्या आहेत, कारण तिथे सुनीताच्या खोलीत त्या मोजून एक रात्र जागून, पोटभर गप्पा, आणि केवढीतरी भावनांची देवाणघेवाण करू शकणार आहेत. इतका सुवर्णयोग पुन्हा जमून येणे, आणि जमवणेही......... ह्या जन्मी शक्य होईल का? नाहीच. अशक्यच! नुकतीच डिलिव्हरी वार्डमधून येऊन, बायकांचे रडणे ओरडण पाहून थोडी विस्कटलीये सुनीता, पण ते विसरण्यासाठी थोडी घेतली, तर खूप बरं वाटेल यार! शिवाय, बियरचे शारीरिक परिणाम फारसे गंभीर नसतात इतकं व्यावहारिक ज्ञान तरी डॉक्टरीच्या अभ्यासात मिळालेलं आहेच की. वनिता स्वतः पुढाकार घेणारी नाही, तरी वेडगळ साहस तिच्या रोमँटिक रक्तातच आहे. घर सोडून आल्यावर ती खूप एकटी पडलीये, पण ही मैत्री तिचा आधार आहे. पाहिलं प्रेम, पहिली आठवण, पहिल्या मानाचं, पाहिलंच अंगण! तशी पहिली बियर... धिस बियर इज बॉण्डिंग!
एका दारूच्या दुकानापाशी जाऊन त्यांनी शेवटी अत्यंत प्रयत्नपूर्वक कोरा चेहेरा ठेवत, एक बियरची बाटली मागितली. "किती?" त्याने चौघीजणी बघून विचारलं. "एकच." अनिता निग्रहाने म्हणाली. जवळजवळ पळतच त्या खोलीत परतल्या. "निदान रात्री बारा पर्यंत तरी थांबू!" वनिता नेहेमीच रोमँटिक, आणि "नको. इतका काही हा मोठा इव्हेन्ट नाहीये!" प्रणिता चा कठोर अँटी-क्लायमॅक्स. थेट चेकोव्ह सारखा!त्यांनी सुनीताच्या खोलीतले उभे स्टीलचे पेले काढले. गोमुत्रासारखी ती कुणकुणी गढूळ बियर, एक, दोन, तीन! असा जल्लोष करून घोट घेतला. घाण कडू लागली. अनिताची ही दुसरी का तिसरी वेळ, त्यामुळे तिला जरा जरा चव घेता येऊ लागली होती. सुनीता मात्र एका घोटापुढे जाईना. "मला सकाळी राउंड आहे." "हो तू आदर्शवादी डॉक्टर आहेस बाई!""हो तू उगीच रिस्क घेऊ नको""तू पिणार नव्हतीस तर कशाला आणली आपण ही एवढी मोठी बाटली!"इत्यादी संवाद झाल्यावर त्यांना थोडं हलकं हलकं वाटायला लागलं. (त्यामागे त्या बियरचा शून्य हात होता!) "आपण हे नमिता ला सांगितलं तर ती वेडी होईल!" "आपण हे सरिता ला सांगितलं तर ती एकदम आपल्याशी मैत्रीच तोडून टाकेल!""तू घरी सांगशील?" "हो, त्यात काय?" (हे फर्स्ट वर्ल्ड सुनीताच बोलू जाणे!)मग रात्रभर चेकाळल्यासारख्या गप्पांवर गप्पा झोडून त्या सकाळी सकाळी समुद्रावर गेल्या. टिक्करबिल्ला खेळून, तासंतास सायकल पदडुन, दिवसेंदिवस पत्ते, नाच गाणी, कॅरम खेळून कसंबसं बालपण मागे टाकलं. ते-वीस भली थोरली वर्ष निघून गेली,तरी आयुष्य पुढे सरकतच नाहीये. प्रेम? कि लग्न?आधी प्रेम?कि आधी लग्न?"कोण? कुठे? कधी? कसा?" सगळंच अनुत्तरित. "ए तुला आशिष आवडायचा ना?""हो पण त्याचं आहे ऑलरेडी.""मला प्रेमात पडणं अशक्य आहे. केलाही होता एकदा प्रयत्न" "म्हणजे तुला म्हणायचंय की तुला कोणाला स्वतःच्या प्रेमात पाडता येत नाहीये.""हाहाहाहाहा........ हो तसं समज.""चांगली नोकरी पाहिजे यार आधी!""घरी सांगितलं नाहीये अनिताने अजूनही""मग पुढे काय?"बोंबलायला तेवीस वर्षांच्या चढ उत्तरांच्या शेकडो रात्री गेल्या तरी आयुष्याचा निक्काल काय तो लागत नाहीये.  हे असं अजून किती दिवस चालणारे? किती वर्ष चालणारे??? ही इथे लाट पायापर्यंत येते पण डोक्यावरून चिम्ब भिजवून जात नाही. आपल्याला तर खोलात जाणं होतच नाही, पण बोंबलायला ती लाटही मिळमिळीतच निघाली..... बियरसारखी!"हाहाहाहाहाहा........ " दहा वर्षांनी पुन्हा इथेच भेटायला पाहिजे गं... नक्की भेटूया. जमवूयाच कसंही करून. तेहत्तीस वर्षांच्या त्या चौघीजणी आज पुन्हा कदाचित समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असतील.  

त्यांना आता वाईनही सवयीची झालेली असेल. 

8/6/16

तुझी आठवण

तुझी आठवण क्षणाक्षणाला 
बरसत गेली पानांवरती 
पागोळ्यांतून रेषेवरती 
शब्द सावळे अविरत झरती 

मेघाच्याही मनात तेव्हा 
दाटून आला एक हुंदका 
सागराच्या मनातल्या 
हिंदोळ्यांना आली भरती 

कुंद गारवा लेऊन बसले 
तरी विसावा नाही क्षणभर 
गर्द काजळी आभाळासम 
तुझी आठवण माथ्यावरती. 


3/13/15

बाल्कनी


पोर्तोरीकोच्या आमच्या घराला एक मस्त मोठ्ठी बाल्कनी होती. "बाल्कनीतून काय काय दिसतं?" म्हटलं, की झालीच पोराची लिस्ट सुरू..."बाल्कनीतून समुद्र दिसतो, नारळाची झाडं दिसतात, बिल्डिंग दिसतात, मोठ्ठी क्रूज शिप दिसते, दिवे दिसतात, रस्ता दिसतो, आणि रस्त्याच्या पलिकडे Luis Munoz Rivera पार्कपण दिसतो! खरंच तो फ्लॅट इतका समुद्राकाठी होता, की सॅन हुआनला क्रूजशिप आलेली दिसायची. मग आम्ही ठरवायचो, "आज गावात गर्दी असणार. आज डिनरला दुसरीकडे जाऊया!" रस्त्यापलिकडचा पार्क इतका ***पाशी होता, तरी बाहेर पडायची आमची अर्धी भूक त्या बाल्कनीतच भागायची, इतके आम्ही तिथे पडीक असायचो. तिला दारं होती, पण रात्रीशिवाय, ६ महिन्यात ६ वेळाही कधी ती कधी बंद राहिली नाहीत. असह्य उन्हातही बेडरूम किंवा टीव्हीच्या खोलीत ए.सी लावला, तरी बाल्कनीला रजा नसे.



पारदर्शी काचांच्या भिंती असलेल्या बाल्कन्या फक्त अब्जाधींशांच्या, जुहूच्या फ्लॅटच्या असतात, असंच ऐकलं होतं. पाहिल्यावर तर वेडेच झालो. एक महिनाभर मस्त वाटलं, पण भर रस्त्याच्या रहदारीमुळे, समुद्रावरच्या वाऱ्यामुळे, बाल्कनीत फार घाण व्हायची, नि तिथली धूळ माती सगळ्या घरभर पसरायची. म्हणून एकदा सरळ बादलीत पाणी घेऊन, पाईप लावून ती धुवायला घेतली, तर आमच्या पिटक्याला काय चेव आलाय विचारता! तो दिवसभर "little helper" होऊन बाल्कनी धूत बसला, आणि शेवटी "किती पाणी वाया घालवलंस बघ, नळातलं सगळं पाणीच संपून गेलं" असं सांगून त्याला उचलून बाथरूममधे न्यायला लागलं. खोटं कशाला सांगू, बाहेरही पडता येत नाही इतकं ऊन झालं, की "बाल्कनी धुणे" हा आमचा आवडता प्रोग्रॅम झाला :)

उन्हाळी प्रदेशात रहायचे सुख त्या बाल्कनीत बसलं, की जाणवे. वीकेंडला सकाळी उठल्याउठल्या नवरा शास्त्रीय संगीत लावतो, ते भरदार, भारलेले, भारावणारे सूर, आणि संगतीला पूर्वेकडून उगवणारा "दिनमणी व्योमराज"! मग दिवस चढत जातो तशी रहदारी वाढायची. सकाळी मी कानोसा घेतच असायचे, की  "कचरू" कधी येेतो, कारण माझ्या छोट्याच्या जीवनातला तो एक मोठ्ठा आनंददायी प्रसंग होऊन बसला होता! (म्हणजे, कचऱ्याची गाडी. माझ्या भाच्याचा शब्दच मी माझ्या मुलाला शिकवला, पण कचरूचं वेड मात्र शिकवावं लागलंच नाही, कारण ते दोघांत अनुवांशिकच असावं :).  न्यू जर्सीत बंगलेवजा घरांच्या कचरागाडीतून दोन कामकरी उतरतात, आणि एकेका घरासमोरची कचराकुंडी गाडीत ओतत पुढे जातात. हा "कचरू" मात्र वेगळा होता.

आम्ही आमचे कचरे खालच्या मोठ्या डंपस्टरात जाऊन टाकायचो, तो डंपस्टर उचलायला ह्या कचरूला दोन यांत्रिक हात होते. एवढा भला थोरला डंपस्टर कचरूच्या वर उचलून त्यात उलटा होतो, आणि कचरा आत पडतो, हा चमत्कार माझ्या पोराने प्रथमच पाहिला. ते ही ६ व्या मजल्याच्या बाल्कनीतून बघतांना अगदी नीट दिसतं. मग कचरूचं खेळणं घरी आलं. त्याच्यावर Tonka हे नाव छापलेलं होतं म्हणून कचरूचं पुन्हा बारसं होऊन "टोंका" झालं. जेवतांना टोंकाची गोष्ट. टोंकाच्या गोष्टीला डिस्ने कार्स ची फोडणी. हे सSSSगळं त्या एका बाल्कनी पासून सुरू झालं.

पोर्तोरीकोत भाषेच्या प्रश्नामुळे, आणि ६च महिने रहायचे असल्यामुळे, आमचा फारसा गोतावळा नव्हता, तरीही, त्या बाल्कनीने आमचे दिवस अळणी जाऊ दिले नाहीत. कधी त्यावरून सायकल मॅरॅथॉनची गडबड, तर कधी PREPA विरोधी रॅली, सर्कशीचे ट्रक गाणी बजावणी करत, तर पोलिसगाड्या किंवा ॲम्ब्युलन्स सायरनने बोंबलत जातांना बघणे, हे उद्योग मी आणि माझ्या मुलाने सारख्याच हिरीरीने केले.

मधमाशी, मुंगळे किंवा भुंगे जर बाल्कनीत आले, तर मग पुढचे दोन तास पिटक्याला ते पुरत. मुंगळा कुठे चढतो, तो पडेल ना! किंवा "बधमाशी" उडाली, कि ती फुलातून मध आणायला गेलीये" अशी वर्णनं ऐकायला मिळत. पक्ष्यांसाठी खरं दाणे ठेवू शकलो असतो, पण मला ज ब र द स्त पक्षी-फोबिया आहे म्हणून ते राहिलं. (नाही, हिचकॉकचा पिक्चर पाहिल्यामुळे तो झालेला नाही, कारण मी तो पिक्चर पाहिलाच नाहिये आणि कधी पाहणारही नाही.)

पाऊस पडू लागला, की तर  माझ्या पोरापेक्षा मलाच जास्त भरतं यायचं, की "चला बाल्कनीत जाऊन पाऊस पाहू. पावसात भिजू!" पाऊस बघतांना झाडांचे इतके वेगवेगळे हिरवे रंग दिसायचे, की हरखून जायला व्हायचं. एरवी एवढ्या उकाड्यात गरम पेक्षा गार लिंबू सरबतच बरे वाटत असले, तरी केवळ त्या बाल्कनीला न्याय द्यायला कित्येकदा पावसात, किंवा संध्याकाळी मी चहा घेऊन तासंतास तिथे काढायचे." पुस्तकं वाचायला फारसा वेळ मला मिळत नसे, पण नवऱ्याने ४-५ ग्रंथ तिथे सहज संपवले.

आमच्या टिपिकल अमेरिकन घरची बाल्कनी म्हणजे, इमारतीला बाहेरून सजावट करावी तशी, आणि तीही privacy च्या दृष्टीने, घराच्या "उलट्या" बाजूला. गावगप्पा आणि चांभारचौकशा करण्यासाठी अगदीच बिनकामाची. सेक्स ॲण्ड द सिटी मधल्या कॅरी ब्रॅडशॉ "घरायेवढं कपडे-बुटांचं कपाट" असं स्वप्नरंजन करत असते, तशी मी, फक्त एका छोट्या खोलीएवढ्या बाल्कनीचे.
"खुर्चीवरी बसावे, रस्त्याकडे पहावे, चा-बिस्किटे चरावे, त्या बाल्कनीत माझ्या." असं संत तुकडोजी महाराजांनी म्हणूनच ठेवलंय ना :) :)




2/26/14

ती मुलगी...

प्रिय, 

कुणालातरी कडकडून पत्र लिहावंसं वाटत होतं, म्हणून तुला लिहिते. तू टोटली नालायक आहेस, आणि मला गेल्या १० वर्षात एकदाही पत्र तर सोड, इमेलसुद्धा केलेली नाहीस, तरी लिहितेय, कारण... देवाणी-घेवाणीची मला आता पर्वा उरली नाही म्हण, किंवा, तुला पत्र लिहितांना मलाच काहीतरी मिळतंय असं म्हण! तसंही, पडके २-३ दात, किडक्या हातां-खांद्यांवर टांगलेला फ्रॉक आणि नाकात लोंबलेला शेंबूड ह्या वयात झालेल्या मैत्रित देवाण-घेवाणी करण्यासाठी आपल्याकडे होतंच असं काय?

तुझी चित्रकला: १. जास्वंदीचं फूल २. गुलाबाचं फूल (शेडिंग वगैरे उत्तम असलं तरी हे दोनच नमूने), आणि माझी हस्तकला: १. पेन्सिलींना टोक करतांना, टोक तुटो, साल राहो अशा आकांताने जमवलेल्या सालांची चिकटवलेली फुलं २.ओरिगामी कठीण म्हणून कातरकाम चिकटवलेली ग्रीटिंगं.

मग आपण स्वत:लाच पुढे केलं मैत्रीकरिता, आणि केलं असलं तरी घेतलं नाहीच काही एकमेकींचं. घेणार तरी कसं? स्वप्ना- म्हणजे- शिष्ठ, मनीषा- एकलकोंडी, कविता- भोळीभाबडी, प्रणीता- नीटनेटकी, तू- आळशी, नि मी.....मी सगळंच थोडं धर-थोडं सोड करणारी - अशा ठळक/ढोबळ रेषांनी आपण रंगवत राहिलो एकमेकिंच्या मनाचे आकार.

अजूनही मनीषा कसं म्हणायची, "हं, पुरे आता." किंवा तू कसं म्हणायचीस, "क...शाSSSला काय करायचंय?" ते आठवून आपण किती हसतो, भेटलो की. आणि नाही भेटलो की, अगदी २ महिने उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला गेलो, तरी एकमेकिंना पत्रं पाठवायचो. 

पण नाही भेटलो गेल्या १० वर्षात. सगळ्या बायकांचं होतं तेच आपलंही झालं. तेंव्हा, जागरण कर-करून तात्विक चर्चांचा कोळ करून प्यालो,  पण आता संसारात, नि व्यवहारात, अडकलोच. 

पण परवा तू फेसबूकवर काय एक कॉमेंट केलीस माझ्या फोटोवर, आणि मला आपले फुलपंखी दिवस लख्ख आठवले गं पुन्हा! पुन्हा लहान झाल्यासारखं नाही वाटलं, पण "लहान असतांना आपण असे होतो का?" असं वाटलं. मला १०वीला कोणत्या विषयात किती मार्कं होते, ते तुझ्या बरोब्बर लक्षात! मी चाट. पेपर लिहून झाला, की कोणत्या प्रश्नाला काय उत्तर लिहिलं ते स्वत:चंच स्वत:ला न आठवणारी मी, आणि २० वर्षांपूर्वीच्या माझ्या मार्कांचा नकाशा डोळ्यापुढे आणून फेसबूकवर माझ्याशी बोलू पाहणारी तू. 

पुला खालून किती पाणी वाहून गेलं, पण थोडंसंतरी ओंजळीत उरलं, ते तुझ्यामुळे. आपण कोण होतो, शाळा-कॉलेजात समोर हजारो रस्ते, आणि हजारो शक्यता, पण मनावर अर्धवट उमललेल्या स्वप्नांचं ओझं! मी सांभाळलं (तू ही असशील, असं वाटतं), ते आपल्या मैत्रीमुळे. मी तुझ्यासारखी नव्हे, पण तू ही माझ्यासारखी नाहीसच, हे जाणून मला, स्वत:ला स्वीकारण्याचं बळ आलं असावं. 

आता नवरा, मुलं, सासू-सासरे, अगदी आई-बाबा-भावालाही जी मुलगी कधीच माहिती नव्हती, ती फक्त तुझ्याकडे थोडीशी उरली आहे. ती मुलगी, निदान थोडे क्षण तरी, मला भेटायला हवीये. तिच्याकडून मला पुन्हा थोडी स्वप्नं विणून घ्यायची आहेत. तिला तुझ्या पत्रातून पाठवतेस का? 
मी बदलले, ते काही वाईट नाही, तरीही, 
कुणीतरी लागतं असं- जमेल/न जमेल, झेपेल/न झेपेल असल्या फालतू विचारांना, निखळ प्रेमाने बगल देऊन, तुम्हाला पुढे ढकलणारं. 
कुणीतरी लागतंच असं- तुम्हाला तुमच्या फुलपंखी दिवसांतल्या नावाने ओळखणारं. 

इतकंSSS सेंटी पत्र लिहिलंय मी, तर मठ्ठ मुली, आतातरी पेन उचल. किंवा, नकोच उचलू. फ़ेसबूकवर कॉमेंटी कर फक्त- उचलला माऊस, केलं क्लिक. आळशे, "बूडही हलवायला" लागत नाही पत्र लिहायला. म्हणून लिही. 

तुझी...


10/21/13

तयाचा वेलू...

माझं बालपण गेलं, ते घर एका परीने अमेरिकनच म्हणायला हवं. तिथे “दिसतं तसं नसतं” चे अमेरिकन नियम अगदी १००% लागू होते. अमेरिकेत कसं, driveway मध्ये park करतात, नि parkway वरती गाडी चालवतात. हायवेवरून Exit करतांना तुम्ही खरं म्हणजे कुठल्यातरी गावात enter करत असता, तुमच्या “cousin” ची मुलं सुद्धा तुमची “cousins” च असतात.....

माझ्या लहानपणी, आमच्या घरातही अगदी तसलाच प्रकार होता. बैठकीच्या, “मधल्या खोलीत” रात्री सोफे बाजूला करून आम्ही गाद्या घालायचो, आणि कोपऱ्यातल्या एका बेडरूमला मात्र “classroom” बनवून तिथे माझे आजोबा इंग्रजीची शिकवणी करत असत. दुसऱ्या बेडरूमला आम्ही चक्क dressing room म्हणायचो, कारण तिथे आंघोळ झाल्यावर तयार व्हायचे असायचे हे एक, आणि गणेशोत्सव, शारदोत्सव, महिला मंडळ, नागरिक मंडळाच्या अनेक कार्यक्रमांची green room सुद्धा तीच होती. करता काय? “टिळकनगर” मैदानाच्या काठावरच आमचं घर पडायचं, त्यामुळे भोज्यासारखं तिथे डोकावूनच शेजारी-पाजारी पुढे जात.

दारं नि खिडक्या तर त्या घराला इतक्या होत्या, की “सातशे खिडक्या नऊशे दारं” हे गाणं आपल्याच घरावरून तयार केलंय, असं मला नेहमी वाटायचं. पुढच्या अंगणातून आत गेल्यावर नावाला सुद्धा “दार” म्हणून नव्हतं. फक्त एक जाळीचा वऱ्हांडा, नि त्याला जोडून जो पॅसेज होता, त्यातून थेट स्वयंपाकघरातल्या ओट्यापर्यंत नजर जाई. म्हणजे नको तिथे दारं, नि हवी तिथे ठेंगा!

पण त्या घरातली माणसं तरी कुठे कुणाच्या “व्याख्येत” बसणारी होती? मी ज्यांना “आजी-आजोबा” म्हणते, ते खरं म्हणजे माझे आत्या-आतोबा होते. माझी खरी आजी फार लवकर वारल्यावर तिनेच बाबांना मोठे केले, म्हणून मग तीच “आजी” झाली. अहो, आमचा कुत्रा “लालू” हा सुद्धा खरं म्हणजे आमचा कुत्रा नसून वाट चुकून आला, नि घरचाच झाला. तर मग त्याच नियमाने, “माझ्यासारख्या “शाण्या” मुलीचा एवढा खोडसाळ छोटा भाऊ नक्कीच नसेल, नक्कीच आई-बाबांनी हॉस्पिटलातून चुकून दुसराच उचलून आणलाय, असंही माझं पक्कं मत झालेलं होतं J

कोण-कुठल्या-देश-वेष-रंगरूप-भाषांच्या विविध लोकांना सामावून घेणाऱ्या अमेरिकेसारखंच ते घर, देशस्थ असो वा कोकणस्थ, मराठे असोत वा मारवाडी, सगळ्यांचंच घर झालं. रक्ताची “खरी” नाती फारशी उरलीच नसतांना, ह्या “मानलेल्या” भाऊ-काका-बहीण-मुलीच्या नात्यांत मात्र अजूनही ओलावा आहे, हक्काची माया आहे. अशी वर्ष सरली, नि पाखरं बाहेर पडली, तसं मला अजून एक सत्य समजत-उमजत गेलं.......
की आपण हे जे “आपलं” म्हणतो, ते घरच खरं म्हणजे “आपलं” नाहिये.
मोगऱ्याच्या सुवासाचं घर
आंब्याच्या रसाचं घर
टिक्करबिल्ला खेळण्याचं घर
लिंबोण्या वेचण्याचं घर
अंगण, ऊन, जाळीच्या कोनाड्यांचं,
गच्ची, पाऊस, वाऱ्याचं घर
कपाटं, माळे, कोठीही भरून
उरलेल्या पसाऱ्यांचं घर...
ते घर आमच्यासाठीच बनलं असावं, कारण गेल्या ३५ वर्षात त्याचे खरे मालक कधीच तिथे राहिलेही नव्हते. आमचं झालं, नि ते हळूहळू भरलं, आमच्यासाठी ते बदललं. त्यातल्या खोल्यांनी आपले रंगच नव्हे, तर रूपही पालटले. आजोबा गेल्यावर त्यांच्या खोलीतल्या भिंतीवर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाजूला चक्क मायकल जॅकसन येऊन बसला. पण आम्ही पाखरे उडालो, त्याच सुमारास आमच्या कुटुंबावर ते घरही सोडायची वेळ आली. घरमालकांनी तिथे फ्लॅट बांधायचे ठरवले होते!

ऐकून डोळे भरून आले, आणि “माहेर” म्हटल्यावर आता दुसरी कुठली वास्तू डोळ्यासमोर आणू म्हटली तरी आणता येईना. पण नाईलाजाने बाहेर पडलो. माळे, गाळे रिकामे झाले, पण आमच्या आठवणींचे हजारो काजवे अजून त्याच अंधाऱ्या खोल्यांमधून चमचम करत असतील असं मला वाटत राहिलं... काही दिवसांपूर्वी आई म्हणाली, “जुन्या घरच्या शेजारच्या काकूंकडे हळदीकुंकू होतं गं. गेलो, तर घर आपलं बंजर भूतबंगल्यासारखं दिसतंय. तण वाढलं, मोगऱ्याचे वेल पार जळून गेलेत...” आईचा आवाज हळवा झाला.

समोरच्या जाळीवर दोन्हीकडे नक्षीची कमान काढल्यासारखे ते भरघोस वेल डोळ्यांपुढे आले. त्यांचा सुवास मनात दरवळला. आणि त्याच सुमारास, इथे न्यू जर्सीतले आमचे मावशी-काका, त्यांचे अनेक वर्षांचे घर विकून एल. ए. ला स्थायिक व्हायला निघाले. पॅकिंग, नि टाकून द्यायच्या सामानाची आवराआवरी करायला आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. पुन्हा माझ्या मनाने, मागच्याच दु:खावरची खपली काढली. पुन्हा रिकाम्या भिंतींना सामोरं जावं लागणार होतं.

आणि तेवढ्यातच, काकांनी माझ्या हातात मोगऱ्याची छोटी कुंडी ठेवली. “ह्याच उन्हाळ्यात आणलाय हा! त्याला दोन-चार फुलंही आली... मोठ्या कुंडीत लावून बघ, टिकतोय का.” मी अवाक्! त्या घरचा मोगरा, ह्या रूपात इथे आला माझ्यासाठी? तिथल्या आठवणींचा दरवळ आता मी इथे जपावा म्हणून, त्याला पाणी घालायचा वसा मी इथे घ्यावा म्हणून! त्या घराने, त्यातल्या माणसांनी दिलेल्या मायेचा सडा इथे पडावा, नि वाढावा म्हणून!

बघता बघता मीच मग मोगरा झाले. टपटप करीत मोत्यांच्या सड्यातून अंगणात उतरले, हरवलेला सुगंध अंतरात गवसल्यावर घमघमले. कुणी रूजविला, कुणी शिंपिला, तयाचा वेलू, गगनावरी गेला!


8/29/11

चित्तरकथा!

जेमतेम एक-चतुर्थांश वर्षे वयाच्या माझ्या पोराला केवळ मी जन्मच दिलाय म्हणून- अन्यथा सासरची सोडाच, पण माहेरची मंडळीसुद्धा, "अगदी त्याचा बाSSबा दिसतोय" म्हणायला लागली, तेव्हा मी जरा हिरिरीने माझा बाळपणीचा फोटो अ‍ॅल्बम पुस्तकांच्या कपाटातून शोधून काढला. नाक तर निर्विवाद आपलं नाही, पण थोडीशी हनुवटी, किंवा गालांचा भास तरी? माझ्याच फोटोंमधे मी माझंच बाळ कुठे दिसतंय का बघत बसले!

वितभर उंचीच्या मला, फूटभर उंचीचा हलव्याचा मुकुट घातलेला फोटो.
मग मोठ्ठा काळा गॉगल घातलेला, कुरळ्या केसांची नारळाची शेंडी घातलेला फोटो.
मग फ्रिलच्या फ्रॉकवर सोनेरी चांदण्या लावून शाळेच्या गॅदरिंगला नाच करतांनाचा फोटो...

एका फोटोपाशी मन जरा जास्त रेंगाळलं. जवळजवळ माझ्या खांद्यापर्यंत येणाऱ्या मोठ्या बादलीत, माझ्या आबांनी मला आंघोळ घालायला उभं धरलंय! काळ्या-पांढऱ्या मण्यांच्या मनगट्या घातलेल्या इवल्याशा हातांनी मी बादलीची कड धरून ठेवलीये, आणि बोळकं दाखवत हसतेय. माझ्याही आईने केवळ मला जन्म दिला म्हणून. अन्यथा मी सदासर्वदा आजी-आबांना चिकटलेली असायचे, आणि आईजवळ झोपल्यावरही, अगदी मध्यरात्री तिला उठवून "आबांकडे जायचंSSSS" असं भोकाड पसरायचे- ही गोष्ट मला वेगवेगळ्या प्रसंगी आई-मावशी-आजी-बाबांनी सांगून सांगून अगदी पाठ झालीच होती.

शिवाय ह्या बादलीतला फोटोचीपण एक गंमत गोष्ट खुद्द आबांनीच सांगितली, "हा फोटो बघ- मी तुला लहानपणी आंघोळ घातलीये त्याचं प्रूफ, नाहीतर तुला वाटेल आपल्या आबांनी आपल्यासाठी काही केलं की नाही? " "अहो मला असं कसं वाटेल?" हे म्हणण्याइतकी मी मोठी होईपर्यंत, तो फोटोही त्यांनी खास त्यांच्या कपाटाच्या दारावर चिकटवून ठेवला होता. जाता येता मला विचारायचे- "सांग बरं लहानपणी तुला आंघोळ कोण घालत होतं???"

आज तो फोटो बघतांना त्यांची आठवण तर आलीच, पण माझ्या स्वत:च्या पोट्ट्यालाही त्याची आजीच (माझी आईच) अजून आंघोळ घालते, म्हणून जरा कानकोंडंही झालं. मग आईला म्हटलं, "अगं उद्यापासून माझं ट्रेनिंग. मी पायावर नाही तर टबात, पण पिटक्याला आंघोळ घालायची सवय केली पाहिजे. नाहीतर आंबांबरोबर माझा होता, तसा ह्याच्या बरोबर तुझाच- बादलीतला फोटो काढावा लागेल!"
आई एकदम तापलीच, "तुला काय वाटतं- आबा तुला आंघोळ घालत होते? अगं मीच रोज घालत होते... त्यांनी तर चुकुनसुद्धा, एकदाही तुला आंघोळ घातली नव्हती!"

तेव्हा हसायला आलं, पण नंतर उगीच हरवल्यासारखं वाटत राहिलं... गमतीत झालं म्हणून काय, त्यांनी आपल्याला खोटं का सांगितलं? अगदी प्रूफ-प्रूफ म्हणून फोटो दाखवून पाठ करून घेतलं, आणि आपणही त्या फोटोभोवतीच आठवणी विणत बसलो? आधी न दिसलेल्या गोष्टी मग एकएक करून दिसायला लागल्या- बादली कोरडी ठण्ण आहे. ती त्यांच्या खोलीत का ठेवलीये? आंघोळच घालायची तर ती बाथरूम मधे नको का? आणि मुळात बादलीत पाणी असायला हवं- बाळ नव्हे! भारतात असं टब सारखं कोणी पाण्यात बुडवून आंघोळ घालत नाहीत.......

पुन्हा अ‍ॅल्बम चाळला- माझं केवढंतरी आयुष्य केवळ त्या फोटोंमधे उरलंय आता... न आठवणारं बालपण तर सोडाच, पण आठवणारंही बरंच काही आता थोडं धूसर व्हायला लागलं- तर त्या फोटोंमधूनच पुन्हा ठसठशीत अधोरेखित करून घ्यायचं. कॅलिडोस्कोपच्या रंगीत तुकड्यांसारख्या आठवणी- दरवेळी नवीन आकार घेऊन येतात. ते आकार आठवणींचे असतात, की मनाचे? कधी उदास असतांना आठवणीतलं आभाळही भरून आलेलं असावं, नि आठवणीतल्या सख्ख्या मैत्रिणीशी प्रत्यक्षात भेटल्यावर मात्र काय बोलावं ते कळेनासं व्हावं...

जितके फोटो- तितक्या गोष्टी.

एका वाढदिवसाला आम्ही अंगणात "व्हॉट कलर" खेळतोय. नेमकं माझ्यावर राज्य आलेलं, आणि २-३ रंग सांगितले तरी ते जाईना. तेव्हा रश्मीताईने मला बोलावलं. ती माझी आतेबहीण. माझ्याहून ५-६ वर्षांनी मोठी होती, त्यामुळे आम्हा बच्चेकंपनी बरोबर खेळण्यात तिला रस नव्हता. ती कानात म्हणाली, "क्रीम कलर सांग". क्रीम कलर म्हणजे कुठला, हे सुद्धा मला माहिती नव्हतं! तर ती म्हणाली, "तुझ्या फ्रॉकवर जी फुलं आहेत नां, तोच क्रीम कलर आहे." आता माझी चंगळच झाली. क्रीम कलर ला हात लावायचा, म्हणजे सगळ्यांना माझाच फ्रॉक धरायला यावं लागलं असतं, त्यामुळे मी कोणालाही आऊट करावं!

आत्ता क्रीम रंगाची फुलं असलेल्या त्या निळ्या ड्रेसमधला फोटो दिसला, नि ही गोष्ट आठवली. अजून किती क्षणांचा बनलेला होता तो दिवस! आईने केक केला असणार-सकाळी ओवाळलं असणार-मैत्रिणींनी कायकाय भेटवस्तू दिल्या असणार. पण ते आता आठवत नाही. फक्त ही क्रीम कलरची गोष्ट तेवढी ह्या एका क्षणात बंदिस्त झालिये!आता नादच लागलाय- ह्या फोटोंच्या कोलाजमधून आयुष्याची कहाणी सलग लावता येतेय का ते बघण्याचा. लाखो करोडो घटना, पात्र आणि स्थलकालाच्या गर्दीतून हे क्षण तेवढे हाती उरले- आबा म्हणाले तसे- प्रूफ म्हणून!

अजून शेकडो दिवस जातील, माझं बाळ मोठं होईल तेव्हा त्याला, आताच्या पद्धतीप्रमाणे अक्षरश: करोडो फोटोंचं वाण आयतं मिळेल. केवळ त्याचीच नव्हे, तर माझ्या जीवनाची चित्तरकथाही मला शेवटी त्यांच्याकडूनच ऐकायची आहे हेच खरं.



9/16/09

पैठणी- शांता शेळके

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, तोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.

ही कविता मी प्रथम वाचली, तेव्हा "फडताळ", "नारळी पदर" असले शब्द कळतही नव्हते. आईबाबांची कागद-पत्रे ज्या कपाटात होती, तिथे त्यांची काही पुस्तकं अगोचरपणे वाचायला गेले, तर शांताबाई शेळक्यांचं "गोंदण" हाती आलं. एक कविता वाचली, कळेना. पान पुढे. दुसरी. त्यात "आवर्त" असले शब्द म्हणता म्हणता बोबडी वळते म्हणून पुस्तक ठेवून द्यावं, तोच "पैठणी" वर नजर गेली. ह्म्म्म ही कळू शकेल बुवा! बघू तरी...

माझी आजी लग्नामधे ही पैठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची...अनोळखीची...जाणीव गूढ आहे त्यास.

(काय बरं ह्या वाक्यात अर्थ प्रतीत होतो? तेव्हा कळण्याचं वय नव्हतं, पण अजूनही ते गूढ मनात रेंगाळलंय.)

धूप-कापूर-उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले एक तन...एक मन...
खस-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
(ह्या वाक्याशी मी दरवेळी थांबते. खस-हिन्याचा एकत्रित दरवळ! नुसतं खस-हिना म्हटलं तरी अंगावरून झुळूक गेल्यासारखी वाटली.)
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली.

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला.
(माझ्या आजीची साडी इतकी मऊ कशी लागते? ह्याचं उत्तर मिळाल्यासारखं वाटलं.)
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले.
(त्यावेळी आजीच्या मरणाच्या कल्पनेनेही रडू आलं होतं!)

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा.


देवाच्या कृपेने माझ्या दोन्ही आज्या अजून खुशाल आहेत, तरीपण, अमेरिकेतल्या माझ्याशी, भारतातल्या आज्यांचा, कालपटाचा धागा जुळतो, तेव्हा गहिवरून येतं. ह्या कवितेबद्द्ल लिहितांना, "कवयित्रीने सर्व संवेदना- स्पर्श, गंध, दृष्टीला खुणावणारं काव्य केलंय" असं काहीबाही लिहायला गेलेही असते कदाचित

पण एवढंच म्हणते- शांताबाई! तुमच्या कवितेने जागवलेल्या माझ्यातल्या निर्मळ मनाला, मनातल्या निरागस आठवणींना, आणि त्या आठवणींनी वाहणाऱ्या झऱ्यांना सलाम!!!