Showing posts with label आध्यात्म. Show all posts
Showing posts with label आध्यात्म. Show all posts

5/14/20

एक Wild वारी

काही प्रवास आपण करतो हवाबदल म्हणून. काहीवेळा सगे-सोयऱ्यांना भेटायला. पण काही प्रवास करायचे असतात स्वतःचा शोध घ्यायला. इतक्यात माझ्या ओळखीच्या काही लोकांनी नर्मदा-परिक्रमा केली, त्याचे अनुभव वाचतांना मला मात्र एका सर्वस्वी वेगळ्या प्रातांतली एक मुलगी आठवली - शेरील स्ट्रेड. एकटीच, आपल्या नावाप्रमाणे 'भरकटलेली', हरवलेली, वाट चुकलेली. 

तारुण्यात प्रवेश करण्याआधीच तिने आयुष्य खूप जवळून पाहिलं होतं, पण तिची आई जिवंत असेपर्यंत तिला उन्हातही सावली मिळाली होती. आईने सूज्ञपणे नाकर्त्या, मारकुट्या बापापासून स्वतःचा मार्ग वेगळा करून घेतला, आणि मुलांच्या आयुष्यावर त्या वाईट काळाची सावली पडू दिली नाही. पुढे त्यांना आधार देणारा, माया करणारा नवीन 'बाबा' मिळाला होता. कधी एक खोलीच्या घरात, तर कधी माळरानावर खोपटं बांधून सुद्धा ह्या कुटुंबाने आनंदाने दिवस काढले. छोटी शेरील आणि पाठची दोन भावंडं जीवनाशी दोन हात करायला शिकली, पण तगली, कारण त्यांची आई त्यांच्यासाठी जीवाचा कोट करून उभी राहिली होती. 

पण चांगले दिवस आता येणार, ही आशा पालवू लागते न लागते, तोच दैवाने फार मोठा घाव घातला- आईला कॅन्सर झालाय, हे पचनी पडायच्या आतच आईला काळाने हिरावून नेले. "बोलावू तुज आता, मी कोणत्या उपायी? आई!" असा आक्रोश करणारी शेरील दैवाशी भांडून वेडी झाली, पण गेलेली आई परत थोडीच येणार होती? आईने जोडून ठेवलेलं ते कुटुंब बघता बघता विखुरलं. सुकाणू विना हिंदकळणारी जीवननौका सांभाळू बघता शेरील व्यसनांच्या आहारी गेली, दुःख बुडवायला दैवावरचा राग स्वतःवर काढू लागली, जिवलगांपासून दूर गेली, आणि स्वतःवरचा विश्वासच गमावून बसली. 

पण एक दिवस अचानक तिला Pacific Crest Trail वरचं पुस्तक सापडलं. सापडलं, कि तिच्या डोक्यात अनेक दिवसांपासून घोळत असलेलं स्वप्न मूर्त स्वरूपात पुढे आलं कोणजाणे? "माझ्या आईच्या डोळ्यात जशी मी मला दिसत होते, तशी पुन्हा होण्यासाठी मी हा प्रवास करणार!" तिच्या डोक्याने घेतलं. काडीचा अनुभव नसताना, गाठीशी असलेले जेमतेम पुरतील इतके पैसे सगळे पणाला लावून ती एकटी, हा प्रवास करायला निघाली. 

पहिल्या दिवशी तर बॅकपॅक उचलता सुद्धा येईना, इतकी दारुण अवस्था असताना, फक्त वेड्या ध्यासापायी एक एक पाय पुढे टाकत, ही बारकीशी पोर, दक्षिणेला मोहावे च्या वाळवंटातून उत्तरेच्या 'Bridge of Gods'  पर्यंत मजल मारते, त्याची थरारक कहाणी तिने आपल्या Wild: From Lost to Found on the Pacific Crest Trail या पुस्तकांत लिहिली आहे. कथानकात येणारे चढ-उतार आणि वेगवेगळ्या हवामानातले, परिसरातले चढउतार, ह्यांचा सुरेख मेळ घालत शेरिलची लेखन-शैली आपल्यालाही त्या थरारक अनुभवातून घेऊन जाते. भावनिक सत्य सांगणं एकवेळ सोपं असेल, पण त्यातल्या सूक्ष्म छटा पकडत वाचकाला त्या सत्याचा अनुभव करवून देणं कितीक लेखकांना जमतं? शेरिलच्या तीव्र जाणिवांनी ते साध्य केलंय हे या पुस्तकाचं मोठं यश आहे!

ह्या प्रवासात डोक्यात कसले कसले विभ्रम निर्माण होतात! मनुष्यवस्तीपासून दूर, सर्व गोष्टींची आबाळ असतांना साधा गरम चहा सुद्धा स्वर्गसुखासारखा वाटू शकतो! कित्येक वर्ष न आठवलेली बडबडगीतं डोक्यात रुंजी घालायला लागतात, आणि त्यांच्या अर्धवटच येणाऱ्या शब्दांनी वेड लागतं. पाठीवर घट्टे पडतात, पण मन मात्र जास्त जास्त हळवं होऊन तिथे दोन क्षणांसाठी भेटलेल्या मुसाफ़िरांवर फिदा होऊन जातं. तर कधी असंही होतं, की रोजच्या 'जगण्याच्या' आदिम स्फूर्तीपुढे डोंगराएवढी दुःख पण छोटी वाटू लागतात. 

जेव्हा बुटात पाय मावत नसतो- तेव्हा प्रत्येक पावलागणिक यातना होतात. आत्म्याचं कवचही तसंच जुनं झालेलं असतं, म्हणून तेही तसंच असह्य होतं, पण नखं गळून पडली तरी या प्रवासात थांबायचं नसतं हेच खरं. सोबतीला खारुताईपासून अजस्त्र अस्वलापर्यंत काहीही, आणि कोणीही भेटू शकतं, पण शेवटी वाट एकटीचीच असते. निसर्गाच्या सानिध्यात, इतक्या नीरव एकांतात, दुःखावर फुंकर घालायची प्रचंड ताकद असते. कदाचित त्या खडतर वाटेवरची फुलं, जवळ भासणारी पण डोळ्यात न मावणारी बर्फाच्छादित शिखरं,किंवा पुरुषभर उंचीचं झेपावणारं गवत होऊन तिच्या आईनेच तिची पाठराखण केलेली असते! 
ऐहिक स्वरूपात हरवलेली आई आता झाडं, पानं नितळ डोहातच नव्हे, तर तिच्याच अंतर्मनात सामावलेली असते, आणि तिला सांगत असते, "स्वतःच्याच डोळ्यांत बघ- तुला मी ही दिसेन, आणि माझ्या डोळ्यातली तू ही." 

अशी ही शेरिलची कहाणी वाचून वाटलं- परिक्रमा, वारी, यात्रा करणं, ह्या धार्मिक गोष्टींमागे आत्म्याला शुद्ध करण्याचाच हेतू असावा, आणि "धर्माच्या राजकारणा" पलीकडे पाहता आलं, तर तो सहज दिसतोही, पटतोही. आज जगभर पसरलेल्या करोनामुळे दोन महिने घरबसल्या मी हीच वारी केली. त्यातून मला पण काय काय शोध लागले! पण ते सांगेन, नंतर कधीतरी.  

1/14/15

Not one, not two.

"आता मी प्रमुख पाहुण्यांना चार शब्द बोलायची विनंती करते!" असं निवेदिकेने म्हटलं, की प्रेक्षक आळोखेपिळोखे द्यायला लागतात. पाहुण्यांचे "चार शब्द" मात्र चांगले दोन तास चालतात!
मात्र झेन कोअनचे चार शब्द? "Not one, not two."

माझं मन आणि मी. आम्ही एकच आहोत, की दोन? ह्या प्रश्नानेच द्विधा झालेलं मन: ते एकच आहे कि दोन? माझं मन नसेल, तर मी असेन का? Descartes नावाच्या तत्वज्ञाने म्हटलंय, "I think, therefore I am." पण हा विचार करणाऱ्या, "स्व" ची जाणीव असलेल्या मनापलिकडे माझं अस्त्तित्व आहे की नाही, हेच कळत नसतांना तेच चार शब्द समर्पक वाटतात: ना एक, ना दोन......

"एक ना दोन, भाराभर चिंध्या!" माझे वडिल नेहमी सांगतात. माळेत एक-एक हव्यासाचा मणी जोडत गेले, आणि आता हे आयुष्यच तसं झालंय का? एकाने समाधान होत नाही, मग एकामागे दोन, दोनामागे तीन, ह्या हव्यासाला अंत नाही, असं असेल काय? 

काही दिवसांपासून बौद्ध धर्माबद्द्ल वाचन चाललं होतं, आणि त्यातल्या मूलतत्त्वांनी भारावून जाऊन एकदोन झेन मासिकंही जवळच्या लायब्ररीतून उचलून आणली होती. मग थोडंफार दु:खांना सामोरं जाण्याचा मार्ग, वगैरे वाचतांना, "हे आपल्याला लागू पडतंय, आणि ह्यातलं थोडं थोडं जरी रोजच्या जीवनात उतरवता आलं तर चांगलं होईल..." इतपत माझी प्रगती झाली होती.

त्यातला मला खूप आवडलेला एक प्रकार म्हणजे zen koan. थोडक्यात, ध्यान करतांना मन भटकू नये, म्हणून एक छोटसं कोडं घ्यायचं. ह्या कोड्याच्या माध्यमातून आध्यात्मिक, किंवा आत्मिक, किंवा अंतिम सत्यावर चिंतन करावं, आणि ते करतांना आपल्याला नवीन काहीतरी उमजत जावं, अशी अपेक्षा असते. ह्या कोड्याला ठरलेलं असं काही उत्तर नसतं. आपल्याला अभिप्रेत असलेल्या, किंवा जाणवलेल्या अर्थावर आपण गुरूशी चर्चा करावी, आणि त्यांच्याकडून नवीन दिशा/उपदेश घ्यावा अशी पद्धत.

तर असे चारदोन koan इकडच्या तिकडच्या वाचनात आले, पण मनात घर केलं, ते ह्या साध्या शब्दांनी:
Not one, not two. शरीर आणि मनाच्या द्वैत/अद्वैताबद्दल इथे सांगितलंय, की ब्रह्म आणि आत्म्याच्या? अद्वैतवादी म्हणतात की आत्मा आणि परमात्मा हे एकरूपच आहेत. मग आत्म्याला परमात्म्याचा शोध घ्यायला इतके कष्ट का पडतात? स्वत:चं खरं रूप ओळखू न शकलेला आत्माच द्वैत निर्माण करतो, असं असेल काय? 

 एकदा वाटतं, लग्न केल्यावर दोन व्यक्ती असल्या, तरी त्यांचं जीवन एक होतं. ते हे असेल काय? 
बरेचदा भांडण दोघांचंच असलं, तरी त्यात बरेच इतर लोक होरपळतात, गोवले जातात. मग भांडण सुरू कोणी केलं, ह्याला अर्थ नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. क्रीया-प्रतिक्रीया, ह्या दोन दिशांमधेच आपल्या मनाचा लंबक येरझाऱ्या घालत राहतो. असणं-नसणं/पॉझिटिव-निगेटिव हे बायनरीज (binaries) पण असेच, कारण त्यांची व्याख्याच मुळात परस्परावलंबी आहे. संकल्पना एकच असली तरी ती व्यक्त द्वैतातून होते, हे किती अतर्क्य!

कबीराचं एक "अद्वितीय" सुंदर भजन, लताच्या आवाजातलं, "तेरा मेरा मनवा कैसे एक होई रे?" आठवलं. ते इथे ऐकता येईल.
मै कहता तू जागत रहियो, तू जाता है सोई रे ।
जुगन जुगन समझावत हारा, कही न मानत मोई रे ॥
(मनाच्या विकारांवर विजय मिळवणं फार कठीण!  नवीन वर्षाच्या सुरवातीला कितीतरी प्रतिज्ञा स्वत:शीच करणारं हे मन. दोन दिवस झाले, की लगेच घसरू लागतं. त्याला समजवावे तरी समजत नाही, कळले, तरी वळत नाही.)

मै कहता आँखी न देखी, तू कहता कागज की लेखी ।
मै कहता सुरझावन हारी, तू राख्यो उरझाई रे ॥
(जे डोळ्यांनी बघितले नाही, ते केवळ कागदावर लिहले म्हणून, किंवा फक्त एक संकल्पना म्हणून, त्यावर विश्वास ठेवावा का? देवाच्या अस्तित्त्वाबद्दलच हा चरण असू शकेल, की देवाला कोणी बघितले नाही तरी त्यावर विश्वास कसा ठेवावा? हे कोडं मी उलगडू पाहतो, पण "तू" (देवाला/ईश्वराला संबोधिले असावे) त्यातला गोंधळ माझ्यासाठी अधिकच का वाढवून ठेवलायस? जो विश्वास ठेवतो, त्यालाच देव भेटतो म्हणतात, पण जोवर पुरावा नाही, तोवर मी विश्वास ठेवणार नाही, हा हट्ट मनाला सोडायला सांगताहेत का? 

ते गाणं, ते विचार अनेक दिवस मनात घोळत राहिले, आणि एके दिवशी, एका डोहाळेजेवणाला गेलो, तेव्हा त्या "दोन जीवांच्या" "आई" ला बघून एकदम प्रकाश पडला, कि ही दोन जीवांची असूनही, डोळ्यांना एकच दिसते! त्याला भूक लागली, तर तिच्या पोटात कालवाकालव होते. त्याने उड्या मारल्या, तर तिला गुदगुल्या! नऊ महिन्यातिल तिच्या आचार-विचारांचा बाळावर नकळत परिणाम होत असतो. 
म्हणावे तर तो छोटा जीव तिच्यापासून वेगळा नाही, तिचाच अंश आहे, तरी थोड्या दिवसांनी त्याचं स्वत:चं असं वेगळं अस्तित्त्व निर्माण होईल. तरीही, आपलं मूल कितीही, अगदी कितीही मोठं झालं, तरी आईची माया त्यावर अशीच असते, जणू काही ते अजूनही तिच्याच नाळेशी जोडलेलं आहे. ह्यालाच म्हणत असतील, "Not one, not two." एक स्त्री म्हणून, माझं आत्मज्ञान शेवटी इथे येऊन थांबलं, की स्त्री ही अनंतकाळची माता! 
तुम्हाला काय वाटतं? Not one, not two मधून तुम्हाला कुठले अर्थ प्रतीत होतात? 







10/27/10

ओळख


एकदा ना, एक साधूबाबा होते. ते रोज सकाळी गावातल्या रस्त्यावरून नदीकडे स्नानाला जायचे. आणि रोज एक दुष्ट माणूस आपल्या घराच्या गच्चीवरून त्यांच्यावर कचरा फेकायचा, त्यांना शिव्यांची लाखोली वहायचा. एक दिवस तरी हे साधूबाबा चिडतील, वैतागतील, आणि मग आपण त्यांची मजा पाहू अशी लालसा त्याच्या मनात होती. पण साधूबाबांची मन:शांती एकदाही ढळली नाही. ह्याने कचरा फेकला, की ते शांतपणे जाऊन पुन्हा स्नान करून येत. ह्याने शिव्याशाप दिले, तरी त्याच्याकडे बघून सदैव स्मित करीत.
आपण काहीही केले, तरी साधूबाबांवर परिणाम होत नाही, असे बघून मग एक दिवस ह्याला उपरती झाली. त्यांच्या पायावर लोळण घेऊन ह्याने विचारले- "बाबा, मी तुम्हाला एवढा त्रास दिला, तरी तुम्ही कधीही माझ्यावर संतापला नाहीत. हे एवढं चांगलं वागणं तुम्हाला कसं जमतं?" तर बाबा म्हणाले, "अरे सोप्पंय ते. तू मला शिव्या दिल्यास, त्रास दिलास, पण तो मी घेतला कुठे! त्यामुळे तो मला झालाच नाही."

ही गोष्ट मला परवा आठवली, आणि आरशात स्वत:चाच चेहरा बघून दचकायला झालं. लहानपणचा निरागस चांगुलपणा, परीकथांवर विश्वास, मनाचे श्लोक पाठ करणेच नव्हे, तर त्यातले "संस्कार" मनापासून पाळणारं ते माझं भारतीयत्व होतं, की फक्त कोवळं वय? बालपणातला तो देवत्त्वाचा अंश होता, की एका सुरक्षित, स्वप्नाळू बालपणाची झापडं?

आता संसारात, सासूरवासात ऐकून घ्यायला लागणारे निरर्थक टोमणे, न पटणाऱ्या अपेक्षा, रोजचे अनाहूत सल्ले ह्यांना तोंड देतांना का आठवत नव्हती मला त्या साधूबाबाची गोष्ट?
"तुम्हा आजकालच्या मुलींना संसाराची आवडच नाही!"
" नवऱ्याला अरेतुरे करता, तिथेच सगळं बिघडतं"
" सकाळी लवकर उठून कशी झटझट कामं झाली पाहिजेत."
" हे झिपरे केस, डोक्याला ना टिकली, ना गळ्यात मंगळसूत्र! ह्या आमच्या मुली-सुना म्हणायची लाज वाटते."
" देवाजवळ रोज दिवा तरी लावत जा- बाकी काही नसेल."
" एवढ्या सुखात रहाता, तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम असतात? ३-४ च महिन्यांसाठी काय तो सासुरवास. अमेरिकन सून ही चालली असती की मग आम्हाला."
" दोघांपैकी एकाने (म्हणजे बायकोने) ऐकून घ्यायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही रात्र अशीच भांडणात घालवणार!"

मी साधूबाबा असते तर माझ्याही अंगावरून ओघळून गेल्या असत्या ह्या गोष्टी. पण मग मीच एक का म्हणून भगवे घालून चांगुलपणाच्या वाटेवर कुचुकुचु काटे टोचून घेत चालायचं?" रांगोळ्या घालण्यापासून पुरणपोळी असो, की स्तोत्र असोत, सगळ्या सो कॉल्ड संस्कारांचं बाळकडू माझ्या सुदैवाने मला मिळालं, आणि ते मनापासून आवडत ही होतं.
फरक फक्त येवढा, की माझ्या संस्कारांचा उगम शिक्षणात होता, विश्वासात आणि समर्पणात नव्हे. मोठ्यांनी "हे कर" सांगितलं, की ते करायचं, इतक्या सरधोपट आणि विचारहीन पद्धतीने मी ह्या गोष्टी आत्मसात केल्या नव्हत्या.

चांगलं वागणं नेहमीच जास्त कठीण असतं. लहानपणी तसेही फारसे कलह आपल्या आयुष्यात नसतात, म्हणून ते सोप्पं वाटत असतं. पण आता तेच सालस विचारही "कर्तव्याचा" काटेरी मुकुट घालून पुढे येतात, तेव्हा मनावर ओरखडे उठणारच!

पण मग भारतीयत्त्व, साधूबाबा, चांगुलपणा, हे सगळे आदर्शवाद मी गुंडाळून माळ्यावर टाकले, आणि आधुनिकतेच्या धर्मातला पहिला धडा उघडला- प्रॅक्टिकली विचार करायला लागले. पण खरं म्हणजे आपण साधूबाबांसारखं व्हायचं, ते आपल्या मन:शांती साठी, हे सोप्पं लॉजिक लावलं, आणि प्रश्न सुटला. बोलणं सोप्पंय, वागणं अवघड, पण आता ते तसं का वागायचं, हे तरी कळलंय. आरशातल्या चेहऱ्याची, त्यातल्या बदलांसकट ओळख पटलीये.




6/25/09

रंग जांभळा

गेले काही दिवस मी Celie ची पत्र वाचत होते. The Color Purple मधली.
तिने देवाला लिहिलेली. "त्या" च्या पर्यंत कधी न पोचलेली...
सेली चं बालपण उमलायच्या आधीच कोमेजलं. आई मरणाच्या दारात असतांना सख्ख्य़ा बापाने अत्याचार केले, तर सांगेल कुणाला? एक देवच तर होता, त्याच्यावर भरोसा, की तो माझा पाठीराखा...
पण तो नाही आला धावून, द्रौपदीच्या कृष्णासारखा... बापाच्या पापाची पोरं बापाने बाहेर विकली, तेंव्हा नाही. त्याने सेली ला एका प्रौढ माणसाला बायको म्हणून उजवली, तेव्हा ही नाही. त्या माणसाने तिला गुरापेक्षा वाईट वागवली, वापरली, तरी ही नाही.

सेलीची पाठची बहिणच एक होती, तिचा कैवार घेणारी. ती म्हणाली, "तू तरी का सोसतेस अशी मुक्याने?"
"I don't know how to fight. All I know how to do is to stay alive!" सेली चं उत्तर आज समजून घेणं अवघड आहे. सेली सारख्या ऍफ्रिकन अमेरिकन बायकांना अगदी विसाव्या शतकातही जे सोसावं लागलं- त्याने पार मोडलेला कणा घेऊन जगतांना, पर्यायांचा नुसता विचार करता येण्याइतकंही बळ नसणं!
देवावरच्या आपल्या भाबड्या विश्वासाने का होईना, सेली त्या मरणाहून वाईट जगण्यातून चिवटपणे तगली. तिच्या बहिणीला मात्र शिक्षणाने नवी वाट दाखवली. आफ्रिकेत मिशनरी म्हणून गेली ती, पण आपल्याच संस्कृतीच्या ह्या "मूळापासून" आपण किती दूर फेकले गेलो, ह्याचं भान तिला आलं, आणि तिच्या "मिशन" ला एक वेगळंच परिमाण प्राप्त झालं.

सेली च्या नव़याने मात्र तिची पत्र सेली पर्यंत कधी पोचू दिली नाहीत.
आशेच्या एका किरणाला पारखी झाली होती सेली, तेव्हा तिला भेटली Shug Avery. प्रसिद्ध गायिका, सौंदर्याची पुतळी, पण आजारी पडल्यावर समाजाने टाकलेली. सेलीच्या शुश्रुषेने ती बरी झाली, आणि सेलीचं आयुष्यच तिने उजळून टाकलं.

"माझ्या देवाने आजवर माझ्यासाठी काय केलं?" सेली ने शेवटी हताश होऊन विचारलं, तर शग म्हणाली,
" तुझ्या डोक्यातला देव, एकतर तो पुरूष आहे, आणि त्याहून गोरा! तर त्याच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? तो तुझी निरपेक्ष सेवा मागणार, आणि त्याने वाटलेलं दु:खही तू प्रसाद समजून कपाळी लावावंस असं धर्मग्रंथात लिहून ठेवणार."

"मला वाटतं देव ना स्त्री आहे ना पुरूष. ते एक तत्त्व आहे- आपल्या बरोबरीने जगणारं, सुखात हसणारं, वेदनेने कळवळणारं! भावना ही देवानेच निर्माण केल्या ना? मग त्या सतत दाबून टाकल्याने देव प्रसन्न होईल असं कसं वाटतं तुला? अगं आपल्या सुखातही देवाचं सुख असेल, असा विचार का नाही करत आपण?
आपण देवाला प्रसन्न करायला निघतो, पण देवाने आपल्याला प्रसन्न करण्यासाठी काय काय लीला मांडून ठेवल्यात त्या कधीच का डोळे उघडून बघत नाही आपण?


"I think it pisses God off if you walk by the color purple in a field somewhere and don't notice it.” शग म्हणाली.
सेलीला मग एकदम काहीतरी उमगल्यासारखं झालं... जांभळ्या रंगाने हळूहळू तिचं रंगहीन जीवन उत्फुल्ल होत गेलं...