Showing posts with label माहिती. Show all posts
Showing posts with label माहिती. Show all posts

2/21/19

शब्द दिला!

"तिने बाळाला जन्म दिला!" असं म्हणतात. दिला? जन्म ही कुणी कोणाला देण्यासारखी गोष्ट तर नक्कीच नाही. तो कशाचा 'दाखला' होता, कि तिने दिला? कि तिला तो द्यावा लागला?
जेव्हा जन्म दिला, तेव्हा ज्यांना दिला, त्यांना तो घेण्या किंवा न घेण्याचा अधिकार असतो का?
जाऊदे. ह्या शब्दच्छलात पडण्यापेक्षा- डॉक्टरांनी 'डिलिव्हरी केली' असं म्हणावं, तर डॉक्टर काय पोस्टमन झाली, कि तिने केवळ जिथलं पार्सल तिथे पोचवण्याचं काम केलं?
आपल्या अवघ्या अनुभवविश्वाची मर्यादा, अशी शब्दांनी ठरवली जाते. जन्म देण्याचा अनुभव कसा असतो? त्याचं वर्णन करणारे शब्द एका लेखिकेला सापडू शकतील का?

Margaret Atwood ही कदाचित सध्याची सर्वात मान्यवर इंग्रजी लेखिका आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये, इतकी पारितोषिकं आणि सन्मान तिच्या नावावर आहेत. मार्गरेटचं घट्ट वास्तवाला धरूनच उत्तुंग भराऱ्या मरणारं साहित्य खरंच स्त्री जीवनाच्या खूप खूप जवळ जातं. The Handmaid's Tale लिहिताना म्हणे, तिने स्वतःवर बंधन घालून घेतलं होतं, कि जगात आजवर न घडलेल्या गोष्टी आपल्या कथेत मुद्दाम दुःख-विषाद निर्माण करण्यासाठी घालायच्या नाहीत. तरीही, ह्या डिस्टोपिअन कथेतली भीषणता सर्वांपर्यंत पोचली. तिच्या कथा, कविता मी जास्त वाचल्या - २५ एक कादंबऱ्या, ७-८ कथा संग्रह, कविता संग्रह, शिवाय, समीक्षा, ब्लॉगच नव्हे, तर 'ग्राफिक नॉव्हेल' सारख्या अतिशय नवीन प्रांतातही पाऊल ठेवलेलं. इतकं विपुल लेखन करणारी स्त्री लेखिका, आणि तरीही जे जे लिहिलं ते उत्तम, म्हणून मी अधिकाधिक भारावत गेले!

Dancing Girls मधली तिची कथा, "Giving Birth" च्या सुरुवातिचा थोडासा स्वैर अनुवाद/गोषवारा वर दिलाय. मानव"जन्मा" च्या लिखित इतिहासात, अनुभवकथनात, स्त्रियांच्या अनुभवांचं स्थान दुय्यमच नव्हे, तर केवळ अंशमात्र ठरलं. पृथ्वीच्या उत्क्रांतीपासून विश्वयुद्धापर्यंत अनेक 'महत्वाच्या' घडामोडीमध्ये स्त्रीजीवनाचा विचार फार कमी वेळा पुढे मांडला गेला. १०० प्रसिद्ध लेखकांची नावं घ्या म्हंटल, तर सहज तोंडावर येतील- शेक्सपियर/मिल्टन/चॉसर  पासून कीट्स, वर्डस्वर्थ, हार्डी, येट्स, आणि इकडे अमेरिकेत व्हिटमन, हॉथॉर्न, फिट्सजेराल्ड,आर्थर मिलर, रॉबर्ट फ्रॉस्टच नव्हे, तर लोकप्रिय लेखकात जेफ्री आर्चर, आर्थर हेली वगैरे सर्वांना माहित असतात. आता १०० इंग्रजी लेखिकांची, किंवा स्त्रीविषयक लेखनाची नावं आठवून पाहू बरं?

कठीण च होतं ते! इंग्रजीपेक्षा मग मराठी लेखिकाच लवकर आठवतील. अभिजात साहित्य लिहायला वेळ, पैसा, आणि 'स्थान', ह्या तीन गोष्टींचं गणित स्त्रियांसाठी जुळून येईपर्यंत २०वं शतक उजाडलं. व्हर्जिनिया वूल्फ म्हणाली, तसं, कादंबऱ्यांनी स्त्रियांच्या विश्वाला साहित्यात स्थान मिळवून दिलं. आणि तरीही, साहित्याच्या पुरुषप्रधान निकषांवर ते उतरायला अजून कितीतरी काळ लोटावा लागला. जेन ऑस्टेन, ब्रॉन्टे भगिनी फक्त प्रेम-घर-लग्न-कुटुंब ह्याच परिघात फिरत राहिल्या, कारण त्या पलीकडचं विश्व त्यांच्या परिचयाचंच नव्हतं...

Atwood च्या "Giving Birth" ची लेखिका/निवेदिका स्वतः आई आहे. तिची २ वर्षाची पिल्लूडी मधेच झोपेतून उठल्यावर तिला खाऊ घालणे, न्हाऊ घालणे, हे करता करता ती लिहितेय, विचार करतेय.
तिच्या मुलीला कोणीतरी दिलेली बार्बी बाहुली, त्या बाहुलीचे सगळे कपडे गायब, आणि कशी कोणजाणे, बाहुलीच्या पोटातून मधे अखंड चीर गेलीये! आणि आज बघते, तो चिमुकलीने तोंडात घालून घालून बाहुलीचे पाय पण तोडलेयत! मग लगेच मुलीचं डायपर उघडून तपासणी करावी लागते, कि पाय खाल्ले असतील, तर शी तुन बाहेर पडले का?
आता ती बीभत्स बाहुली बघवत नाही, म्हणून कचऱ्यातच टाकावी लागते!  

हे सोपस्कार पार पडून, शेवटी आपण गोष्टीतल्या नायिकेकडे वळतो- जेनेट. जेनेट सुशिक्षित, बहुधा नोकरदार, सजग स्त्री असल्यामुळे तिने प्रसूतीविषयी पुस्तकं वाचलीयेत, श्वासावर लक्ष केंद्रित करायचे, दहा आकडे म्हणायचे - असे पर्याय ती प्रसूती-कार्यशाळेतून शिकून आलीये. ह्या क्लासमध्ये सांगतात, "थोडा त्रास होणारच, पण तो आपण कसा घेतो, त्यावर आहे!" पण तिथली एक अनुभवी बाई म्हणते- "इंजेकशन घेऊन टाका- नरकयातनांपेक्षा काहीही बरं! त्रास- प्रसूती वेदनांना 'त्रास' म्हणणं म्हणजे!" पण पाहिलटकरीणी तिच्याकडे आक्रसून बघतायत - किती नकारात्मक विचार करावा उगीच!

जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र जेनेटला वाटतं- क्लासमध्ये शिकलेल्या वाचलेल्या ऐकलेल्या कितीही गोष्टी असोत, 'ह्या' अनुभवासाठी त्या पूर्णपणे निरुपयोगी आहेत!
कळांच्या वेदनेतून जाताना ती सगळ्या जगापासून तुटल्यासारखी होते. तिच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी संथ होतात, आणि शेवटी श्वासोच्छवास, दहा आकडे, शब्द, सगळ्यांच्या पलीकडे ती पोचते. बाळ बाहेर येतं, तेव्हा नवरा म्हणतो, "बघ,वाटलं तितकं कठीण नव्हतं, ना?"

तिचा चष्मा नवऱ्याने आणलेला नसतो, त्यामुळे "काय झालंय" ते तिला दिसू शकत नाही! स्वतःच्याच इतक्या व्यक्तिगत अनुभवाकडेही शेवटी तिला कुणा परक्याच्याच नजरेतून, त्यांनी वर्णन केलेल्या भाषेतूनच बघावं लागणार असतं. थोड्यावेळाने जाग आल्यावर मात्र, खिडकीतून बाहेर बघताना, आजवर ज्या इमारती खंबीर आणि स्थिर दिसत होत्या, त्या अचानक विरघळून जाऊ लागल्या. एक अशक्य अशी कोवळी क्षणिकता जेनेटला दिसली, तेव्हा तिला वाटलं - ती स्वतःच आता एक वेगळी व्यक्ती झाली आहे!















6/8/18

Say, could that lass, be I?



Sing me a song of a lass that is gone
Say, could that lass, be I?
Merry of soul she sailed on a day
Over the sea to sky

ह्या जुन्या स्कॉटिश गाण्याच्या अनेक आवृत्ती आहेत,  पण Outlander या मालिकेच्या सुरुवातीला ह्या गाण्यामुळे जे गूढरम्य वातावरण निर्माण झालं, त्याने मला खिळवून ठेवलं. एका हरवलेल्या मुलीचं हे गाणं - ती हरवून गेलेली Lass (मुलगी) मीच असेन/असू शकेन का?
Say, could that lass, be I? या ओळीतला 'could' ह्या एका शब्दाने अर्थाची छटा बदलली, आणि तिथे प्रश्न तर निर्माण झालाच, पण एक अध्याह्रत असं स्वप्नरंजन, किंवा कदाचित एखादी अबोल, सुप्त इच्छा पण व्यक्त झाली!

कधी कधी आपल्याला पण वाटतंच नं- स्वतःच्याच आयुष्यातून पळून जावंसं? पण असं, एकाएकी स्वतःला 'हरवून', एकाच जन्मात नवीन आयुष्य जगायला मिळणं, हे केवळ स्वप्नात, किंवा कादंबऱ्यांतच होऊ शकतं! म्हणून तर ह्या मालिका लोकप्रिय होतात, आणि जोरात खपतातही.

१७४५च्या जेकॉबईट क्रांतीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा "क्लेअर" नावाच्या नर्सच्या दृष्टिकोनातून उलगडते. 
१९४५ मध्ये ब्रिटिश नर्स असलेली क्लेअर युद्धानंतर आपल्या नवऱ्याबरोबर स्कॉटलंडमध्ये येते, तिथे काही गूढ घटनांमुळे काल-पटल भेदून ती चक्क २०० वर्ष मागे भूतकाळात येऊन पडते (अक्षरशः) आणि परत आपल्या 'काळात' जाण्याची धडपड करता करता तिथल्याच घटनांमध्ये अडकून जाते!

अनेक वर्षांपूर्वी मी पण इथे, अमेरिकेत येऊन 'पडले', आणि काळ जरी तोच असला, तरी बाकी ह्या जगाचं त्या जगाशी नातं विसविशीत तंतूंनीच कसंबसं जोडून धरलेलं होतं. घरी ईमेल ने चॅट ची वेळ ठरवून घ्यायची, आणि पलीकडून मिनिटाला एक शब्द, ह्या वेगाने आई-वडील टाईप करत असले, तरी जीव गोळा करून ते वाचायचं! कारण आंतरदेशीय फोन दोन -तीन आठवड्यातून एकदा लावणेच परवडायचे! पुढे वेब कॅमेरा वगैरे आले, आता तर मिनिटा-मिनिटाला मेसेज येतात, पण तेव्हा तशी सोय नव्हती. म्हणजे अगदी देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करूनसुद्धा, देशातल्या लोकांसाठी आपण 'मेलो' च की काय? अशी शंका मनात यायची.

क्लेअर जशी आधीच्या आयुष्यात नर्स असते, पण भूतकाळात तिच्या सवयीची वैद्यकीय सामग्री नसते, त्यामुळे मिळेल त्या वनस्पती, कापडी लक्तरं वापरून मलमपट्टी करायची तिच्यावर वेळ येते, तसं मला पण माझ्या व्यवसायाची इथे नव्यानेच ओळख करून घ्यावी लागली.

क्लेअरने शाळेत १७४५ च्या बंडाचा इतिहास वाचलेला असतो, पण त्याचा खरा अर्थ कदाचित तिला त्या ऐतिहासिक घटनांच्या वादळात शिरल्यावरच कळायला लागतो, किंवा, त्या माहितीचा उपयोग करण्याची वेळही तिच्यावर येते. तसे 'युरेका' क्षण मी पण कितीतरी वेळा अनुभवले! Robert Frost च्या कवितेतले Birches, आणि Wordsworth चे Daffodils प्रत्यक्षात कसे दिसतात, ते इथे आल्यावरच कळलं!

या जगातली नवीन जीवनपद्धती बघतांना, आधी नाक उडवून शेरे मारले, पण लख्ख, निरभ्र आकाशाखाली बोचणाऱ्या, न संपणाऱ्या थंडीचा अनुभव हळूहळू रक्तात उतरल्यावर मात्र, मी पण बदलू लागले. अनेक वर्ष भारतात 'कोरडी' साहित्यसाधना केल्यावर अचानक एखाद्या कवितेशी अनुभव जोडला गेला, तेव्हा मी पण क्लेअर सारखी पुन्हा प्रेमात पडले - माझ्या आवडत्या लेखकांच्या प्रेमात!

जर्मन भाषेत 'Ausländer' किंवा इंग्रजीतील Outlander म्हणजे शब्दशः 'बाहेरगावची' व्यक्ती. स्कॉटिश लोकांच्या लेखी इंग्रज बाहेरचे होते. स्कॉटिश प्रथा, लोककथा, लोकसंगीताशी ब्रिटिशांनी नातं सांगितलं नाही, उलट ती 'highland' संस्कृती 'मागासलेली' म्हणून मोडून काढायचे प्रयत्न केले. क्लेअर ह्या सगळ्यांपेक्षा वेगळी होती, तिने काळाचा भेद ओलांडूनही स्कॉटिश लोकांवर, तिथल्या जीवनावर प्रेम केलं, तरी ती 'बाहेरची' च राहिली का? ते मालिका/पुस्तकं वाचल्यानंतरच कळेल कदाचित.

पण माझ्या स्वानुभवाशी क्लेअरचं विश्व ह्या एका अनुभवानं जोडलं गेलं. अमेरिकेचं अनिवासी लोकांशी नातं सध्या बदलू लागलं आहे. आजवर सगळ्यांना सामावून घेणाऱ्या अमेरिकेने आता थोडं कट्टर धोरण स्वीकारल्यावर, मला, इतकी वर्ष इथे राहूनही, पुन्हा परकेपणाची जाणीव झाली का? की इतक्या वर्षाची नवलाई संपली, म्हणून जुन्या आठवणी उफाळून आल्या, आणि मलाच हे जग परकं वाटायला लागलं आहे का? Outlander मालिका पाहून हे विचार मनात आले!


2/11/18

The Tiny Seed

पहिला भाग: Pancakes, pancakes!  इथे पहा.

आम्ही जमिनीचा तुकडा भाड्याने घ्यायचा ठरवला तर खरं, पण सुखासुखी कोण शेती करायला घेणार? अशा विचारात गाफील राहिल्यामुळे पहिल्या वर्षी तर मला प्लॉट मिळालाच नाही! पण तिथेच पहिला धडा मात्र मिळाला, की आपल्यापेक्षाही कितीतरी वेडी लोकं आधीपासूनच ह्या 'शेतकी उद्योगात' शिरलेली आहेत.

ह्या वेडाची सुरुवात डोरिस ड्यूक पासून झाली, कारण ती केवळ नावाचीच ड्यूक नव्हती, तर खरोखर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला न्यू जर्सीत जन्मलेली, घरंदाज कोट्याधीश 'जेम्स ड्यूक' ची एकमेव वारस होती. वडिलांनी तंबाखू-कारखान्यातून मिळवलेली अमाप संपत्ती तिने उत्तम राज्यकर्ती प्रमाणे कला, संस्कृती आणि निसर्गाच्या संगोपनार्थ दान केली. पूर्वी जिथे ड्यूक मंडळींचा 'वाडा' होता, त्या परिसरातील सगळी जमीन तिच्या मृत्यूनंतर 'ड्यूक फार्म्स' च्या नावाने जनतेला खुली केली गेली, आणि तिथेच न्यू जर्सीतली जैविक विविधता (biodiversity), प्राणिजीवनाचे संगोपन करणारे अनेक उपक्रम तिच्या संस्थेतर्फे राबवले जातात, त्यापैकी एक म्हणजेच हा 'नैसर्गिक, सामाजिक बागकाम प्रकल्प' (Duke Farms Organic Community Garden).

लोकांना नैसर्गिक शेतीच्या पद्धती कळाव्या म्हणून अगदी माफक दरात प्लॉट भाड्याने देऊन, तिथे ऑरगॅनिक बागकामप्रेमी लोकांचा मेळावा तयार व्हावा, अशी ह्या उपक्रमाची रचना आहे. स्वस्त आणि मस्त कुठल्याही गोष्टीपुढे रांगा लागणारच, तशा त्या इथेही लागल्या तर नवल नव्हतंच, पण ह्यावेळी मी चंग बांधलाच होता. नरकचतुर्दशीला भल्या पहाटे अंघोळ करून देवळात जायचो, तसे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, आदल्या रात्री पार्टीचे जागरण घडूनही सुद्धा, मी मन घट्ट करून उठलेच, आणि खरोखर पोराच्या शाळेसाठी ऍडमिशनच्या रांगेत लागावे (जे अमेरिकेत मला कधी करावे लागले नव्हते), तशी मी ह्या शेताच्या ऑनलाईन रांगेत लागले. काहीजण दरवर्षी प्लॉट रिन्यू करतात, तर अशा 'जुन्या जाणत्या' सभासदांना आधी प्लॉट खुले केले जातात, आणि उरलेले काहीच फक्त नवीन लोकांसाठी उरतात, त्यामुळे ह्या सकाळच्या साधनेचं फळ मिळालं, तेव्हा मी हाती लागेल तो प्लॉट घेऊन टाकला! खरंतर सगळ्यात छोट्या आकाराचा घ्यायचा होता, पण मिळाला नाही.

ही तर केवळ सुरुवात होती. मी नवऱ्याला तेव्हाच सांगून टाकलं, की बाबा रे, इथे अमेरिकेत इतरत्र दिसतो, तसा 'ग्राहक देवो भव' दिसत नाही. हा शेतीचा वसा एकदा घेतला, की सहा महिने तरी टाकता येणार नाही. तुमच्या प्लॉटची निगा राखण्याचे, तिथून तण उपटण्याचे काम तुमचे. प्लॉट दुर्लक्षित दिसला, तर सभासदत्व रद्द. बाजारात मिळणारे रासायनिक खत, किंवा किडे मारण्याचे औषध वापरले, तर रद्द. वर्षातून ४ तास श्रमदान केले नाही, तर रद्द. नवीन बागकामींना एक 'ऑरगॅनिक बागकामाचा' कोर्स घेणे पण आवश्यक होते. शिवाय 'स्वागत-परिचय (orientation) कार्यक्रमातही 'उपस्थिती अनिवार्य' होती!!! मला जमणार नव्हते, म्हणून आयोजकांना इमेल केली, तर 'प्लिज प्लिज जमवा', कारण अनुपस्थित सभासदांचे प्लॉट रद्द केले जातात, अशी प्रेमळ धमकावणी मिळाली, मग नवऱ्याला एक दिवस ऑफिसमधून लवकर ये, असं पाचारण केलं, आणि होता होता प्रवेशाचे सगळे सोपस्कार तर पार पडले.

माहिती सत्रात तण वाढू नये म्हणून रसायनापेक्षा प्रतिबंधावर भर, किंवा उभारलेल्या 'चौकटीत' बाग लावणे (Squarefoot Gardening) वर भर होता. कीड लागल्यास, जैविक औषधांची नावं सांगितली. तसेच, ऑरगॅनिक खताची नावं, वगैरे टिप्पणी काढायला मला तासभर लक्ष देऊन ऐकावे लागले.

भारतामध्ये जुगाड करून असेल त्यात भागवण्याची आपली सवय, तर इथे अमेरिकेत नालीसाठी घोडा घेण्याची पद्धत! एखाद्या सामाजिक, विना-नफा कामाचंही आयोजन इतकं उत्तम होतं की त्यात अथपासून इतीपर्यंतचा विचार केलेला होता. नवशिक्या बागकामींना मदत म्हणून 'Mentor' शी गाठ घालून दिली. शेताचे भाग करून ६-६ च्या गटांमध्ये प्लॉटचा 'शेजार' तयार केला, आणि शेजाऱ्यांची ओळखीचा कार्यक्रम झाला. शिवाय, आपल्या शेतातलं पीक अति झालं, वापरता येत नसेल, तर ते 'Food Bank' मध्ये दान करायचीही सोय होती.

उन्हाळ्याचे जेमतेम चार महिने शेतीला मिळतात, पण मुलांच्या सुट्ट्यांमध्ये लोक फिरायला जातात. तेव्हा शेजारी एकमेकांच्या बागेला पाणी घालू शकतात. 'बिया' च नव्हे, तर मदतीची, अवजारांची पण देवाणघेवाण होते... पण त्याही पेक्षा, बागेत राबून तण उपटतांना, गप्पांची भरपूर देवाणघेवाण होते! सुदैवाने आमचे शेजारी खूपच अनुभवी, पण मदतीलाही पुढे होते. "बागेत काय चूक-बरोबर, असा विचार करून घाबरू नका!" त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं. "अनुभवानेच शहाणपण येईल... हे लेट्यूस जमले नाही, तर ते पालक लावून बघा!" ओळख जुनी झाल्यावर खरंतर 'पाककृतींची', नाहीतर डब्याची देवाणघेवाण पण करूया, असे वायदे झाले, पण माझ्या मनात आता धाकधूक व्हायला लागली.
इतक्या भगीरथ प्रयत्नानंतरही, खरं बागकाम आपल्याला कितपत जमतंय, हे अजून माहितीच नव्हतं. आजवर (कुंडी-साईज संस्कृतीच्या नावाने, अमेरिकेतल्या पहिल्या वर्षी, हौशीने) घरात लावलेली तुळस :), कधी एकदम हुक्की येऊन स्प्रिंगच्या सुरुवातीला आणलेली सूर्यफूलं वगैरे ;), पाण्यात उगवणारा बेसिल (basil), इतकंच काय, तर भेट मिळालेला लकी बाम्बूसुद्धा आमच्या हातून मेलेलाच आहे, त्यामुळे आपण कुंडीत झाडं मारून दमलो, तर शेतात आणखी झाडं मारूया! असले अघोरी पाप तर करत नाही ना, असा विचार करून माझी मलाच कीव यायला लागली. अगदी एरीक कार्लच्या 'Tiny Seed' सारखी आमची सुरुवात जमेल का?,होईल का? असं मागे पुढे पाहतच झाली. सुरुवात छोटी होती, पण बी प्रमाणे तीत कुठल्या कुठल्या अनुभवांच्या शक्यता दडल्या होत्या? पहा पुढील भागात.

10/27/17

भाग १: Pancakes, Pancakes!


एरीक कार्लच्या ह्या पुस्तकातला जॅक बाळा, सकाळी सकाळी आपल्या आईला लाडीगोडी लावून म्हणतो, "आई, आज मला पॅनकेक हवे! आज मला पॅनकेक हवे!!" त्यानंतर मला वाटलं, की फार तर फार आई त्याला सांगेल,"मी पॅनकेक करते, तोवर तू ताटं मांड." मग घरची मंडळी मिळून कसा छान ब्रेकफास्ट करतात, जॅक अगदी अमेरिकेतल्या टिपिकल शाण्या-बाळा प्रमाणे आपले आपले पॅनकेक गट्टम करतो, वगैरे वर्णन असेल...

पण झालं उलटंच! बिचाऱ्या जॅकची आई आपल्या भारतीय सासवांपेक्षाही खडूस निघाली बरं का!!!साळसूदपणे पणे त्याला म्हणाली, "अरे जॅक, पॅनकेकसाठी मला बरंच साहित्य लागेल, ते देशील का आणून?" मग तिने जॅकला सरळ शेतात पाठवलं. गहू तोडणी, मळणीपासून गिरणीतून पीठ दळेपर्यंतचा प्रवास फास्ट फॉरवर्ड मध्ये झाल्यावर म्हटलं आता तरी बिचाऱ्या जॅकच्या पोटात पॅनकेक पडतील........तर नाSSSSSही.

"कारल्याचा वेल लाव गं सुनबाई, मग जा आपल्या माहेरा!"
स्ट्रॉबेरीचा जॅम च फक्त वगळता, आईने जॅकला भरपूर दमवलं, पळवलं, पण का?

"वेलाला फुलं येऊदे सुनबाई, मग जा आपल्या माहेरा माहेरा."
कोंबडीचं अंड आण रे बाळा, मगच करूया पॅनकेक तुला, पॅनकेक तुला.
गायीचं दूध आण रे बाळा मगच करूया पॅनकेक तुला, पॅनकेक तुला.

"जॅक, माझा मुलगा शहरी-दीडशाणा व्हावा, लोकांनी त्याला नावं ठेवावी, असं का मला वाटेल? आपलं अन्न कुठून येतं, ते उगवायला, त्यावर प्रक्रिया करून ते खाण्यायोग्य बनवायला किती परिश्रम घ्यावे लागतात, ते माझ्या मुलाला माहिती असू नये..., असं का मला वाटेल? जॅक, मी तुला पीठ, मीठ आणायला पाठवलं, ते तुझा छळ करायला नव्हे रे बाळा, तुला वळण लावायला!"

असं हे मस्त पुस्तक आमचा चिटुक फक्त दोन-अडीच वर्षांचा असतांना, लायब्ररीत हाती लागलं, आणि एकदम मेंदूत नवीन पेशी तयार झाल्यासारख्या झिणझिण्या आल्या की!

भारतात, आमच्या खानदानात तीन पिढ्यांपासून कोणाचीच शेतीवाडी नव्हती. बागेत आजी गुलाब, क्रोटन लावायची, तितकाच आमचा मुळं-मातीशी संबंध. तरीसुद्धा, अधूनमधून शाळेची सहल म्हणून, किंवा बाबांच्या मित्राच्या शेतावर चिकन-पार्टी असेल तर, जायचा योग यायचा, आणि खूप आवडायचा देखील. तिथे गोठ्यातल्या गाई, तेव्हा तरी मला खूषच दिसायच्या. शेणाचा वास नाकपुड्यात भरला, तरी तो सुद्धा त्या अनुभवाचा भाग म्हणून त्याचं अप्रूपच वाटायचं. दिवसभर तिथला भन्नाट वारा प्यायचा, आणि संध्याकाळी हुरडा पार्टी- म्हणजे आहाहा!!!

शेतात काय करतात, पिकं कशी उगवतात, किती कष्टाचं काम, वगैरे सामान्य ज्ञान फारसं न शिकवताच समजलं होतं. पण ह्या स्वच्छ सुंदर अमेरिकेत माझ्या पोराला हे सगळं कसं कळायचं? नुसती जॅक न पॅनकेकच्या पुस्तकांना खऱ्या अनुभवाची सर कधी येईल का? आणि ही विचारांची आगगाडी शेवटी, "अमेरिकेत येऊन काय कमावलं, काय गमावलं!" ह्या नेहेमीच्या प्रश्नावर येऊन थांबणार. 

मुलांच्या बाबतीत कितीही केलं तरी प्रत्येक आईबापाला कुठलीतरी खंत राहूनच जाते, त्यात आम्ही इथे येऊन त्याचे आजीआजोबा, चुलत-मामे भावंडं, त्याच्यापासून हिरावूनच घेतली वगैरे आधीच्या हजार चिंतांमध्ये आता ह्या एक हजार एक व्या चिंतेची भर पडली.

म्हणावं तर अमेरिकन सुपरमार्केट मध्ये भाज्या फळं दृष्ट लागण्यासारखी दिसतात! इतकी, की जगातल्या सात आश्चर्यांमध्ये आठवं म्हणून, हे अजस्त्र, पण एकसारखे दिसणारे शुभ्रवर्णी, एकही डाग नसलेले फ्लॉवरचे गड्डे, किंवा तजेलदार कांतीचा भोपळी मिरच्या पण ठेवाव्या! पण खाऊन बघावं तर- "दुरून भाज्या साजऱ्या".

चिकन किंवा दूध कसं बनवतात, त्या प्रक्रियेबद्दल (मुद्दाम) अतिशय गोपनीयता पाळली जाते, कारण यांत्रिक पद्धतीने प्राण्यांचे 'अन्न' बनवणे - हा कारभार बघणाऱ्याला अतिशय निर्दय, निर्घृणच वाटतो, आणि त्यावरून प्राणीहिंसा विरोधकांना वगैरे पुष्कळ 'खाद्य' मिळतं.

ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा शेजारणीने विचारलं, "तुम्हाला भाड्याने शेत घ्यायचं आहे का?" तेव्हा माझे डोळे च विस्फारले :) आमच्या जॅकला "पॅनकेक काय झाडावर उगवतात का?" ते कळू शकेल तर! माझं हे म्हटलं तर छोटं, म्हंटल तर मोठं अमेरिकन ड्रीम पूर्ण होईल का?

वाचा पुढील भागात.

4/20/17

13 Reasons Why

१३ कारणे न आवडल्याची १३ कारणे आहेत, पण त्या आधी शीर्षकावरून आठवलेली ही कविता सांगते: 
"१३ प्रकारे कोकिळेकडे बघतांना" - वॅलेस स्टीव्हन्स यांची ही कविता म्हणजे "व्यक्त होणं" काय असतं त्याचा परिपूर्ण अभ्यास आहे! कवीची नजरच कवितेचा विषय 'वेगळा', काढत असते, त्यानुसार बघणाऱ्याची नजरेच्या चौकटीतूनच कुठलंही 'सत्य' व्यक्त होत असतं.... असं काहीसं स्टीव्हन्स यांच्या कवितेत प्रतीत होतं. कुठल्याही विषयाची चौकट बदलली की त्याच विषयाचे रंग आपल्याला बदलतांना दिसू लागतात. हे सगळं त्या शीर्षकातून सुचवण्याचा प्रयत्न असेल, तर निदान शीर्षक तरी आपल्याला आवडलेलं आहे :)

तर 13 Reasons Why ही नेटफ्लिक्सवरची नवी मालिका उत्साहाने सुरु केली, कारण, अमेरिकन शाळेत काही वर्ष शिकवल्यामुळे तिथलं वातावरण परिचित आहे. सगळ्या पोरांनी अभिनयपण छान केलेला पहिला भाग आवडला होता... पण... 

१. शालेय जीवनाबद्दल 'स्पीक' ही लॉरी हाल्स अँडरसन यांची कादंबरी, तसेच टॉम पेरोटा यांची 'इलेक्शन' कादंबरी प्रसिद्ध आहेत.त्या दोन्ही ह्यापेक्षा खूपच जास्त वास्तवदर्शी आहेत. (१३ कारणे ही मूळ कादंबरी मी वाचलेली नाही, पण मालिका पहिल्या नंतर वाचायची इच्छा नाही!)

2. इथे पौगंडावस्थेतल्या मुलांना 'यंग ऍडल्ट' म्हणण्याची पद्धत आहे, पण ही मुलं आपण आधी 'यंग' आहोत आणि अजून 'ऍडल्ट' झालेलो नाहीये, हे सहज विसरतात. अमेरिकन पालक त्यांना 'फुलण्याची' खुली सूट देतात, मात्र दुष्परिणामांकडे बघायला त्यांना वेळ नसतो, असं वातावरण या मालिकेत दिसतं. भावनेच्या आहारी जाऊन तिरीमिरीत निर्णय घेणाऱ्या या मुलांना 'healthy dose of reality' द्यायला मात्र कुणीच पुढे येत नाही- आपलं सामाजिक वातावरण खरोखर इतकं एककल्ली आहे का?

3. प्रमुख पात्र 'हॅना' ही अक्षरशः 'बेकर' असते (आडनाव), तर तिच्या हिरोचं नाव 'क्ले' (माती) असतं. म्हणजे ती त्याला घडवते - पण घडवते कसली 'बि'घडवते, आणि त्याचा दगड करायचाच बाकी ठेवते! 

4. 'हॅना' ही अति-संवेदनशील, पण प्रचंड आत्ममग्न आहे. १०विच्या वर्गात, नवीन शहरात आल्या आल्या ह्या बयेला आधी मित्र मिळवण्याची, त्याला किस करायची  घाई झाल्यासारखी वाटते- पण अभ्यासाचं काय? हिला ना माणसं ओळखता येतात, ना स्वतःचं भलं कळतं. बरं नसेल कळत, तरी चांगल्या मित्रमैत्रिणींच्या संगतीत राहायचं सोडून ही खो-खो खेळल्यासारखे वेगवेगळ्या मुला-मुलींशी मैत्री जोडू पाहते, आणि प्रयत्न फसले, किंवा कुणी गैरफायदा घेतला, की ना तिला सहन करता येतं, ना आवाज उठवता येतो. पुन्हा पुन्हा त्याच चुका करणाऱ्यांना मूर्ख नाही तर काय म्हणायचं?

5. बरं, ह्या १०००-२००० मुलं असलेल्या मोठ्या उच्चमहाविद्यालयात, एक क्ले सोडून एकही सुसंस्कारित मुलगा नसतो! सगळे आपले एका माळेचे मणी. कोणी मुलींच्या रंगरूपावरून त्यांची वर्गवारी करणारे, तर कुणी अश्लील फोटो काढून मोबाईलने शाळा-भर पसरवणारे. आणि ह्या गदारोळात, एकच 'देसी' मुलाचा उल्लेख येतो, तो काय करतो? व्हॅलेंटाईन डे साठी 'सॉफ्टवेअर' बनवतो :) :) :) इट इज नॉट कूल टू बी अ नर्ड! 

6. चमचमीत गोष्ट लिहायची म्हणजे त्यात शाळेतली मुलं दारूपासून ड्रग्सपर्यंत काय काय करतात त्याचा रसभरीत आढावा यायलाच पाहिजे. ही मालीका बघून प्रौढांनाही हँगओव्हर यावा इतकी दारू ही पोरं पीत असतात, आणि विषय 'यंग ऍडल्ट' असला तरी मालिका 'ऍडल्ट' असावी इतका प्रणय करत असतात! 

7.  इतकं करून दुखऱ्या मनाचं खापर फोडायला शिक्षक, आई-बाप, समाज, व्यवस्था सगळे आहेतच. आईबाप कष्ट करून पैसे जोडतात, ते ह्यांना प्रॉम डे ला नवीन गाडी घेऊन द्यायला! हेच आईवडील, आत्महत्या प्रकरणी 'आपल्या मुलाला/मुलीला पाठीशी घालून त्यांच्यावर शाळेत कोणी दादागिरी केली, त्यांच्यावर कसला मानसिक ताण होता, ह्या 'सत्याचा' शोध घेऊ पाहतात. 

8. शिक्षक तिथे घसाफोड करतात तेव्हा पोरांना चिट्ठ्या फेकण्यात जास्त रस असतो, पण, इतकं करून जर यांचा तोल ढळला, आणि यांनी जीवाचं बरंवाईट करून घेतलं, तर खापर आधी शिक्षकांवर फोडायलाही 'क्ले'चं पात्र कमी करत नाही. "तुम्हाला माहिती होतं का, ही कविता कोणी लिहिली?" तो शिक्षिकेलाच विचारतो!
झालंच तर शाळेतील मानसोपचार तज्ञालाही खलनायक बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न ही हॅना करते. कारण काय, तर ती स्पष्ट बोलायला तयार नसतांना, त्याने तिला थांबवून खोदून खोदून विचारायला हवे होते, पण त्याचा फोन खणखणत होता!

9. "सायबर बुलीइंग" ह्या नवीन पिढीच्या राक्षसाशी दोन हात करायला अनेक शाळांमध्ये मुद्दाम वेगळा वेळ दिला जातो. सायबर बुलीइंग मुळे अनेक विध्यार्थानी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत, पण, ह्या मालिकेत केवळ तेच एक कारण दाखवले नाहीये.

10. ह्या मुलांच्या खऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा एकही प्रयत्न ही मालीका करत नाही. एका मुलाची आई सतत वेगळे पुरुष घरात आणते, आणि मुलापुढे मित्राला कायम प्राधान्य देते. फाटके बूट घालूनही हा मुलगा शाळेच्या खेळ-संघाचा स्टार असतो -पण ही गोष्ट त्याच्या वर ही 'संधीसाधू' 'चारित्र्यहीन'तेचं लेबल लावून मोकळी होते. 

11. शाळा म्हणजे समाजाचा आरसा असतो, त्यात आवडते-नावडते, समंजस, असमंजस अशी सगळ्या प्रकारची मुलं असतात पण, ह्या मालिकेत एकही 'सकारात्मक' आदर्श व्यक्तिरेखा दिसत नाही. क्ले ची एकमेव 'चांगली' व्यक्तिरेखा आहे, पण तो सुरुवातीला अतिशय शामळू दाखवला आहे. सामाजिक विकृतींवर इतका झोत टाकतांना अनावधानाने इथे त्यांचा पुरस्कारच एका दृष्टीने केला जातो!

कथानकातील काही छुप्या गोष्टींची चर्चा वाचायची नसेल, त्यांनी इथे थांबावे.


12. एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची नैतिक जबाबदारी सगळ्या शाळेवर आहे, हे दाखवायचा प्रयत्न सपशेल फसलेला आहे, कारण चक्क हॅनावर प्रेम करणाऱ्या क्लेला सुद्धा तिच्या मृत्यूसाठी आपण जबाबदार असल्याचं वाटतं! तो सगळ्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो, ते ही आधी सरळ त्यांना दोषी ठरवून. मात्र हॅना स्वतः कधीच क्ले जवळ मोकळी होत नाही, की त्याला आपल्या लढाईत सामील करून घेत नाही. 

13. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आत्महत्या, असा सोयीस्कर अर्थ हॅना काढते! तिच्या बरोबर झालेल्या गोष्टी तिच्यासाठी असह्य होत्या, ह्यात वादच नाही, पण म्हणून काही दिवस त्या व्यक्तींपासून स्वतःला वेगळं काढून, आईवडिलांशी बोलून, मार्ग काढायचं सोडून हॅना सरळ 'passive agressive' पद्धतीने स्वतःचं 'म्हणणं' अक्षरशः खरं करते- सर्वांना स्वतःचं म्हणणं ऐकायला लावून, आणि त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता. 
तसेच जेसिकाचा मित्र तिच्यावर होणाऱ्या बलात्काराचं समर्थन करतो, त्याचा बदला घेण्याकरता ती ज्याने बलात्कार केला, त्याचा बरोबरच पुन्हा झोपते! हे पाहून हसावं की रडावं मला कळेना.

जाता जाता......... 'क्ले' चं पात्र साकारणारा मुलगा छोट्या कियानो रिव्हीज सारखा गोड गोड दिसतो, म्हणून च मी ही मालिका संपूर्ण पाहू शकले! :) 







1/31/17

शॅम्पू ने डोक्यात गळू होईल!

शॅम्पू ने डोक्यात गळू होईल!
आकलनाच्याही आधी एक निमिष होता
मी तिथेच थांबायला हवे होते
पण तोवर डोळ्यात घुसून
संवेदना मेंदू पर्यंत पोचली होती.

षट्कोनी भोकांमधून
आळ्यांचे डोळे
केसांच्या खाली, सपाट गोऱ्या मानेवरून
माझ्याकडे बघत होते.

मी गप्पकन डोळे मिटून घेतले
तरी पटलावर कोरलेली ती भोकं
त्यातून वळवळणारे लक्ष डोळे
तोंडात अचानक दाटून आलेले दर्प
हातापायांना सुटलेला कंप

एक असहाय चीड उठून मग जुळवली बोटं
एक एक चौकोनावर आघात करत,
"शोधा" त लिहिलं: "शॅम्पूचं गळू खरं आहे काय?"
कमळ- कंदाच्या षट्कोनी पोवळ्यातून
गुलाबी पाकळ्या फुटतांना पहिल्या
त्याच डोळ्यांनी.

"खरं आहे काय?" काय खरं आहे?
'माझ्या' शोधाच्या 'चौकटीतून' कापून
त्याला शंबर ठिकाणी चिकटवलं
सीमेवर परत पाठवलं
आणि सांगितलं, "आता कर आक्रोश!"
निवायला हवे आहेत मला माझे डोळे - स्वच्छ प्रकाशाने.

डोळ्यांवर अत्याचार केला होता
ती मैत्रीण आता मला फुलं पाठवते
रोज सकाळी - गुड मॉर्निंग!
कळवळा आहे तिला माझा
आणि मी पण रोज डोळे मिटून 
कमळ-कंदातुन उमलणाऱ्या पाकळ्या आठवते. 



टीप: खोटी प्रतिमा इथे देऊ इच्छित नाही, त्यामुळे कुतूहल असल्यास Shampoo Hoax शोधावे. कमळाच्या बिया बाहेर पडत असतांनाचा फोटो मानेवर चिकटवून भयानक रोग भासवला गेला आहे.

सध्या अमेरिकन निवडणुकी संदर्भात जालावर फिरणाऱ्या बातम्या (बहुतांशी खोट्या) असूनही जनमत बदलून गेल्या. निवडून आल्यावर राष्ट्राध्यक्षानी केलेली विधाने, दोन्ही बाजूंची वृत्तपत्रे, यांनी नि:पक्षपाती पत्रकारितेचा परिहास केला आहे! त्या पार्श्वभूमी वर माझा एक व्यक्तिगत अनुभव म्हणून वरील कविता लिहिली आहे.