Showing posts with label प्रवास. Show all posts
Showing posts with label प्रवास. Show all posts

5/14/20

एक Wild वारी

काही प्रवास आपण करतो हवाबदल म्हणून. काहीवेळा सगे-सोयऱ्यांना भेटायला. पण काही प्रवास करायचे असतात स्वतःचा शोध घ्यायला. इतक्यात माझ्या ओळखीच्या काही लोकांनी नर्मदा-परिक्रमा केली, त्याचे अनुभव वाचतांना मला मात्र एका सर्वस्वी वेगळ्या प्रातांतली एक मुलगी आठवली - शेरील स्ट्रेड. एकटीच, आपल्या नावाप्रमाणे 'भरकटलेली', हरवलेली, वाट चुकलेली. 

तारुण्यात प्रवेश करण्याआधीच तिने आयुष्य खूप जवळून पाहिलं होतं, पण तिची आई जिवंत असेपर्यंत तिला उन्हातही सावली मिळाली होती. आईने सूज्ञपणे नाकर्त्या, मारकुट्या बापापासून स्वतःचा मार्ग वेगळा करून घेतला, आणि मुलांच्या आयुष्यावर त्या वाईट काळाची सावली पडू दिली नाही. पुढे त्यांना आधार देणारा, माया करणारा नवीन 'बाबा' मिळाला होता. कधी एक खोलीच्या घरात, तर कधी माळरानावर खोपटं बांधून सुद्धा ह्या कुटुंबाने आनंदाने दिवस काढले. छोटी शेरील आणि पाठची दोन भावंडं जीवनाशी दोन हात करायला शिकली, पण तगली, कारण त्यांची आई त्यांच्यासाठी जीवाचा कोट करून उभी राहिली होती. 

पण चांगले दिवस आता येणार, ही आशा पालवू लागते न लागते, तोच दैवाने फार मोठा घाव घातला- आईला कॅन्सर झालाय, हे पचनी पडायच्या आतच आईला काळाने हिरावून नेले. "बोलावू तुज आता, मी कोणत्या उपायी? आई!" असा आक्रोश करणारी शेरील दैवाशी भांडून वेडी झाली, पण गेलेली आई परत थोडीच येणार होती? आईने जोडून ठेवलेलं ते कुटुंब बघता बघता विखुरलं. सुकाणू विना हिंदकळणारी जीवननौका सांभाळू बघता शेरील व्यसनांच्या आहारी गेली, दुःख बुडवायला दैवावरचा राग स्वतःवर काढू लागली, जिवलगांपासून दूर गेली, आणि स्वतःवरचा विश्वासच गमावून बसली. 

पण एक दिवस अचानक तिला Pacific Crest Trail वरचं पुस्तक सापडलं. सापडलं, कि तिच्या डोक्यात अनेक दिवसांपासून घोळत असलेलं स्वप्न मूर्त स्वरूपात पुढे आलं कोणजाणे? "माझ्या आईच्या डोळ्यात जशी मी मला दिसत होते, तशी पुन्हा होण्यासाठी मी हा प्रवास करणार!" तिच्या डोक्याने घेतलं. काडीचा अनुभव नसताना, गाठीशी असलेले जेमतेम पुरतील इतके पैसे सगळे पणाला लावून ती एकटी, हा प्रवास करायला निघाली. 

पहिल्या दिवशी तर बॅकपॅक उचलता सुद्धा येईना, इतकी दारुण अवस्था असताना, फक्त वेड्या ध्यासापायी एक एक पाय पुढे टाकत, ही बारकीशी पोर, दक्षिणेला मोहावे च्या वाळवंटातून उत्तरेच्या 'Bridge of Gods'  पर्यंत मजल मारते, त्याची थरारक कहाणी तिने आपल्या Wild: From Lost to Found on the Pacific Crest Trail या पुस्तकांत लिहिली आहे. कथानकात येणारे चढ-उतार आणि वेगवेगळ्या हवामानातले, परिसरातले चढउतार, ह्यांचा सुरेख मेळ घालत शेरिलची लेखन-शैली आपल्यालाही त्या थरारक अनुभवातून घेऊन जाते. भावनिक सत्य सांगणं एकवेळ सोपं असेल, पण त्यातल्या सूक्ष्म छटा पकडत वाचकाला त्या सत्याचा अनुभव करवून देणं कितीक लेखकांना जमतं? शेरिलच्या तीव्र जाणिवांनी ते साध्य केलंय हे या पुस्तकाचं मोठं यश आहे!

ह्या प्रवासात डोक्यात कसले कसले विभ्रम निर्माण होतात! मनुष्यवस्तीपासून दूर, सर्व गोष्टींची आबाळ असतांना साधा गरम चहा सुद्धा स्वर्गसुखासारखा वाटू शकतो! कित्येक वर्ष न आठवलेली बडबडगीतं डोक्यात रुंजी घालायला लागतात, आणि त्यांच्या अर्धवटच येणाऱ्या शब्दांनी वेड लागतं. पाठीवर घट्टे पडतात, पण मन मात्र जास्त जास्त हळवं होऊन तिथे दोन क्षणांसाठी भेटलेल्या मुसाफ़िरांवर फिदा होऊन जातं. तर कधी असंही होतं, की रोजच्या 'जगण्याच्या' आदिम स्फूर्तीपुढे डोंगराएवढी दुःख पण छोटी वाटू लागतात. 

जेव्हा बुटात पाय मावत नसतो- तेव्हा प्रत्येक पावलागणिक यातना होतात. आत्म्याचं कवचही तसंच जुनं झालेलं असतं, म्हणून तेही तसंच असह्य होतं, पण नखं गळून पडली तरी या प्रवासात थांबायचं नसतं हेच खरं. सोबतीला खारुताईपासून अजस्त्र अस्वलापर्यंत काहीही, आणि कोणीही भेटू शकतं, पण शेवटी वाट एकटीचीच असते. निसर्गाच्या सानिध्यात, इतक्या नीरव एकांतात, दुःखावर फुंकर घालायची प्रचंड ताकद असते. कदाचित त्या खडतर वाटेवरची फुलं, जवळ भासणारी पण डोळ्यात न मावणारी बर्फाच्छादित शिखरं,किंवा पुरुषभर उंचीचं झेपावणारं गवत होऊन तिच्या आईनेच तिची पाठराखण केलेली असते! 
ऐहिक स्वरूपात हरवलेली आई आता झाडं, पानं नितळ डोहातच नव्हे, तर तिच्याच अंतर्मनात सामावलेली असते, आणि तिला सांगत असते, "स्वतःच्याच डोळ्यांत बघ- तुला मी ही दिसेन, आणि माझ्या डोळ्यातली तू ही." 

अशी ही शेरिलची कहाणी वाचून वाटलं- परिक्रमा, वारी, यात्रा करणं, ह्या धार्मिक गोष्टींमागे आत्म्याला शुद्ध करण्याचाच हेतू असावा, आणि "धर्माच्या राजकारणा" पलीकडे पाहता आलं, तर तो सहज दिसतोही, पटतोही. आज जगभर पसरलेल्या करोनामुळे दोन महिने घरबसल्या मी हीच वारी केली. त्यातून मला पण काय काय शोध लागले! पण ते सांगेन, नंतर कधीतरी.  

6/20/19

ग्रँड कॅनियन



ती कापत गेली अष्मयुगातून खडक दांडगे
ही चीर भूवरी पहा आज सुंदर दिसते
उकलून फाटले जिथे कडे हे क्षणोक्षणी
ती घळ केशरी रंगाची मनभर भरते

लहरीलहरीने पदरावरती पदर पडे
तिने वाहिल्या सुपीक मऊ मातीचा
संततधारेने तिच्या कोरले जे इमले,
त्यातून वाहतो प्रवाह हा काळाचा

उगवली कपारित कडे फोडुनी झाडे
खाचेत खाण चमचमे गडद पाचूची
तळपते उन्हाने पेटुनिया, वैराण 
उभी पुढे रांग ही रांगड्याच शिखरांची

कधी झळके वैभव तीक्ष्ण लाल कड्यांचे
कधी काळोखे कोपरे, सावली दाटे
घनघोर शांतता कधी अथांग दरीत
घुमती गरुडांचे कधी चित्कार पहाटे

मानवी जीवापलिकडली
भव्यता भरे हृदयात
मद-लोभ-मोह विरघळले
कृतार्थ, नम्र नमनात!
कोसळून मनाचे असे पुन्हा उसळणे -
मारून सूर ही भरारी उत्तुंगात!










5/10/17

सोबत

दुपारी ४. ३० -५ ची वेळ
टेकडीवर ढग जमू लागलेले असतील.
गाड्यांचे लाल दिवे, तूर्तास मंद
रस्त्यावर फुलू लागलेले असतील

मी पण आत्ताच ७८ ला लागले पण
पुढे अजस्त्र हत्तींचा तांडा असावा
तसा १८ चाकी ट्रकांचा ताफा
ताशी २० मैलाच्या गतीने झुलतो आहे

हायवेच्या दोन्हीकडे हिरवळ बघून
का कोण जाणे- टेकडीवरची सुकट झाडंच आठवली!
ढगांच्या गडद रेषा मी डोळ्यात साठवते
आशाच्या आर्त सुरांना, दुरूनच परत पाठवते

दुपारी साडेचार पाच ची वेळ
अनेक शक्यतांची  हुरहूर -
टेकडीवर ढग जमू लागलेले असतांना
धो धो पाऊस येईल?
का हे दुखावलेले लाल-केशरी ढग
मिटून जातील रात्रीच्या गडद दुलईत?

पण आत्ता शक्यतांचा विचारच नाही!
गाडी आपोआप पुढे सरकते आहे
उद्याची काळजी आणि कालचे हिशोब
आत्ता डोक्यात काहीही नाही
म्हणूनच फक्त तू - मनातलं बोलायला -
आत्ता इथे हवा आहेस

हा सगळा मोकळा वेळ
हा अनंत वाहणारा संथ रस्ता
डाव्या बाजूने सर्र्कन कापून
मला पुढे जायचं नाहीये

तुझ्या मागे
किंवा कधी तुझ्या शेजारी बसले होते त्या
सुंदर क्षणांची
परतफेड?
नव्हे
केवळ सोबत
मला करायची आहे 

3/13/15

बाल्कनी


पोर्तोरीकोच्या आमच्या घराला एक मस्त मोठ्ठी बाल्कनी होती. "बाल्कनीतून काय काय दिसतं?" म्हटलं, की झालीच पोराची लिस्ट सुरू..."बाल्कनीतून समुद्र दिसतो, नारळाची झाडं दिसतात, बिल्डिंग दिसतात, मोठ्ठी क्रूज शिप दिसते, दिवे दिसतात, रस्ता दिसतो, आणि रस्त्याच्या पलिकडे Luis Munoz Rivera पार्कपण दिसतो! खरंच तो फ्लॅट इतका समुद्राकाठी होता, की सॅन हुआनला क्रूजशिप आलेली दिसायची. मग आम्ही ठरवायचो, "आज गावात गर्दी असणार. आज डिनरला दुसरीकडे जाऊया!" रस्त्यापलिकडचा पार्क इतका ***पाशी होता, तरी बाहेर पडायची आमची अर्धी भूक त्या बाल्कनीतच भागायची, इतके आम्ही तिथे पडीक असायचो. तिला दारं होती, पण रात्रीशिवाय, ६ महिन्यात ६ वेळाही कधी ती कधी बंद राहिली नाहीत. असह्य उन्हातही बेडरूम किंवा टीव्हीच्या खोलीत ए.सी लावला, तरी बाल्कनीला रजा नसे.



पारदर्शी काचांच्या भिंती असलेल्या बाल्कन्या फक्त अब्जाधींशांच्या, जुहूच्या फ्लॅटच्या असतात, असंच ऐकलं होतं. पाहिल्यावर तर वेडेच झालो. एक महिनाभर मस्त वाटलं, पण भर रस्त्याच्या रहदारीमुळे, समुद्रावरच्या वाऱ्यामुळे, बाल्कनीत फार घाण व्हायची, नि तिथली धूळ माती सगळ्या घरभर पसरायची. म्हणून एकदा सरळ बादलीत पाणी घेऊन, पाईप लावून ती धुवायला घेतली, तर आमच्या पिटक्याला काय चेव आलाय विचारता! तो दिवसभर "little helper" होऊन बाल्कनी धूत बसला, आणि शेवटी "किती पाणी वाया घालवलंस बघ, नळातलं सगळं पाणीच संपून गेलं" असं सांगून त्याला उचलून बाथरूममधे न्यायला लागलं. खोटं कशाला सांगू, बाहेरही पडता येत नाही इतकं ऊन झालं, की "बाल्कनी धुणे" हा आमचा आवडता प्रोग्रॅम झाला :)

उन्हाळी प्रदेशात रहायचे सुख त्या बाल्कनीत बसलं, की जाणवे. वीकेंडला सकाळी उठल्याउठल्या नवरा शास्त्रीय संगीत लावतो, ते भरदार, भारलेले, भारावणारे सूर, आणि संगतीला पूर्वेकडून उगवणारा "दिनमणी व्योमराज"! मग दिवस चढत जातो तशी रहदारी वाढायची. सकाळी मी कानोसा घेतच असायचे, की  "कचरू" कधी येेतो, कारण माझ्या छोट्याच्या जीवनातला तो एक मोठ्ठा आनंददायी प्रसंग होऊन बसला होता! (म्हणजे, कचऱ्याची गाडी. माझ्या भाच्याचा शब्दच मी माझ्या मुलाला शिकवला, पण कचरूचं वेड मात्र शिकवावं लागलंच नाही, कारण ते दोघांत अनुवांशिकच असावं :).  न्यू जर्सीत बंगलेवजा घरांच्या कचरागाडीतून दोन कामकरी उतरतात, आणि एकेका घरासमोरची कचराकुंडी गाडीत ओतत पुढे जातात. हा "कचरू" मात्र वेगळा होता.

आम्ही आमचे कचरे खालच्या मोठ्या डंपस्टरात जाऊन टाकायचो, तो डंपस्टर उचलायला ह्या कचरूला दोन यांत्रिक हात होते. एवढा भला थोरला डंपस्टर कचरूच्या वर उचलून त्यात उलटा होतो, आणि कचरा आत पडतो, हा चमत्कार माझ्या पोराने प्रथमच पाहिला. ते ही ६ व्या मजल्याच्या बाल्कनीतून बघतांना अगदी नीट दिसतं. मग कचरूचं खेळणं घरी आलं. त्याच्यावर Tonka हे नाव छापलेलं होतं म्हणून कचरूचं पुन्हा बारसं होऊन "टोंका" झालं. जेवतांना टोंकाची गोष्ट. टोंकाच्या गोष्टीला डिस्ने कार्स ची फोडणी. हे सSSSगळं त्या एका बाल्कनी पासून सुरू झालं.

पोर्तोरीकोत भाषेच्या प्रश्नामुळे, आणि ६च महिने रहायचे असल्यामुळे, आमचा फारसा गोतावळा नव्हता, तरीही, त्या बाल्कनीने आमचे दिवस अळणी जाऊ दिले नाहीत. कधी त्यावरून सायकल मॅरॅथॉनची गडबड, तर कधी PREPA विरोधी रॅली, सर्कशीचे ट्रक गाणी बजावणी करत, तर पोलिसगाड्या किंवा ॲम्ब्युलन्स सायरनने बोंबलत जातांना बघणे, हे उद्योग मी आणि माझ्या मुलाने सारख्याच हिरीरीने केले.

मधमाशी, मुंगळे किंवा भुंगे जर बाल्कनीत आले, तर मग पुढचे दोन तास पिटक्याला ते पुरत. मुंगळा कुठे चढतो, तो पडेल ना! किंवा "बधमाशी" उडाली, कि ती फुलातून मध आणायला गेलीये" अशी वर्णनं ऐकायला मिळत. पक्ष्यांसाठी खरं दाणे ठेवू शकलो असतो, पण मला ज ब र द स्त पक्षी-फोबिया आहे म्हणून ते राहिलं. (नाही, हिचकॉकचा पिक्चर पाहिल्यामुळे तो झालेला नाही, कारण मी तो पिक्चर पाहिलाच नाहिये आणि कधी पाहणारही नाही.)

पाऊस पडू लागला, की तर  माझ्या पोरापेक्षा मलाच जास्त भरतं यायचं, की "चला बाल्कनीत जाऊन पाऊस पाहू. पावसात भिजू!" पाऊस बघतांना झाडांचे इतके वेगवेगळे हिरवे रंग दिसायचे, की हरखून जायला व्हायचं. एरवी एवढ्या उकाड्यात गरम पेक्षा गार लिंबू सरबतच बरे वाटत असले, तरी केवळ त्या बाल्कनीला न्याय द्यायला कित्येकदा पावसात, किंवा संध्याकाळी मी चहा घेऊन तासंतास तिथे काढायचे." पुस्तकं वाचायला फारसा वेळ मला मिळत नसे, पण नवऱ्याने ४-५ ग्रंथ तिथे सहज संपवले.

आमच्या टिपिकल अमेरिकन घरची बाल्कनी म्हणजे, इमारतीला बाहेरून सजावट करावी तशी, आणि तीही privacy च्या दृष्टीने, घराच्या "उलट्या" बाजूला. गावगप्पा आणि चांभारचौकशा करण्यासाठी अगदीच बिनकामाची. सेक्स ॲण्ड द सिटी मधल्या कॅरी ब्रॅडशॉ "घरायेवढं कपडे-बुटांचं कपाट" असं स्वप्नरंजन करत असते, तशी मी, फक्त एका छोट्या खोलीएवढ्या बाल्कनीचे.
"खुर्चीवरी बसावे, रस्त्याकडे पहावे, चा-बिस्किटे चरावे, त्या बाल्कनीत माझ्या." असं संत तुकडोजी महाराजांनी म्हणूनच ठेवलंय ना :) :)




1/4/15

आले!

भारतात, घरी,
चार मोठ्या-लहान माणसांत,
जाऊन आले. 
घरांचे उडत, उडत जाणारे रंग
पाहून आले. 

आई-बाबांचं नुस्तं असणं
त्यांचे फुटकळसे राग-लोभ
लटक्या कंटाळ्याने हलके झेलित
मजेमजेने सोसून आले. 

जुन्याच रस्त्यांवर नव्याने हरवले, 
मग नव्याच ओसाड जागा शोधून,
तिथेच तात्पुरते तंबू ठोकून,
वस्ती करून आले. 

प्रवाहातल्या दगडापरी
पाण्यातही अडखळले 
बर्फाचं मन पाण्यात
चिंब भिजवून आले.

माझ्याच रंग-रूप आकाराची
एक कागदी बाहुली म्हणून
कधीकाळी "जमलेली" भूमिका
कशीबशी वठवून, आले.

होतं नव्हतं तेवढं बोलणं 
मनातून संपून गेलं
नीरव रितेपणाचा आहेर
मनात भरून घेऊन आले.

आठवणींचे वर्ख उडायला लागले
आजचे वास्तव भिनायला लागले
हृदयाचे ठोके वाजायला लागले
तशी घाबरून, पळून का आले? 

स्वत:च्या गेले
दूर? 
कि जवळ? 
उत्तरांना प्रश्न
शोधून आले.











12/20/10

मनातलं गाव

प्रत्येकाच्या मनातलं एक गाव असतं.
एक छोटंसं घर, त्यातली बाल्कनी आणि खिडकीतुन दिसणारं आकाश, आणि त्यापुढच्या वळणावर पत्र्याची पोस्टाची पेटी- लहानपणी बहुतेक मनातलं गाव बस्स एवढंसंच असतं.
थोड्या वर्षांनी त्यात भर पडत जाते - कॉलेजकट्टा, चार-दोन सिनेमा थिएटर्स, उसाच्या रसाची टपरी, नाहितर ठरलेला उडपी/समोसेवाला...
मग खूप दिवस एक नशा चढते- त्याच त्या वळणांना फाटे देऊन नवीन नवीन जागा हुड्कायच्या, नवे अनुभव अनुभवायची नशा...
आपण पंख पसरले, की सगळं जगच आपल्या अवाक्यात येऊ शकेल की काय, हे आजमावून बघायची नशा...

अजून काही वर्षांची पानगळ होऊन जाते, तेव्हा आपण इटालियन, मेक्सिकन, टर्किश काय वाट्टेल ते खाऊ लागलेलो असतो. शब्दकोषात "ब्लॅक फ्रायडे", "स्प्रिंग क्लीनिंग" अशी भर पडलेली असते. आता जग बघण्यातही काही थ्रिल राहिलेलं नसतं, कारण दोन पैसे गाठीशी बांधले, तर कोणीही ते करू शकतं की!!!

तरीपण ते मनातलं छोटं गाव काही पुसट होत नाही. उलट अजून रंगीत, अजूनच स्पष्ट होत जातं. तीच बाल्कनी, खिडकीतून दिसणारं आकाश, आणि वळणावरची पोस्टाची पेटी - येवढंच काय ते खऱ्या अर्थाने आपलं होतं- बाकीचं सगळं ते फांद्यामधून पसरणं, आकाशाकडे झेपावणं, जगाला मिठी घालणं - ते फक्त धूसर स्वप्न होतं असं वाटायला लागतं. स्वप्नात कदाचित आपण वाटच चुकलो होतो... आता जाग येतेय, ही जाणीव.

आपल्या मनातल्या गावात- लोकांकडे रंगीत टीव्ही असतांना, आपला मात्र १०x१० चा श्वेत-श्याम होता. मोठ्या शहरातल्या मुली फाडफाड इंग्रजी बोलत, उंच टाचांचे सॅण्डल आणि जीन्स सर्रास घालत होत्या, तेव्हा आपण बावळटासारखे "मृत्यूंजय" वाचत, कुंकू पंजाबी ड्रेसमधे हौस करत होतो. कॅन्टीनचे समोसे खातांना २-२ रूपयांचाही हिशोब चोख ठेवत होतो. तो पीळ काही केल्या सुटत नाही.

न्यू यॉर्कातल्या बड्या ब्रॅण्डच्या दुकानांमधे "आपल्याला घालण्यासारखं काही नसतं" असं वरवर म्हणतांना, खरं तर तिथले सेल्समनही आपल्यापेक्षा जास्त सोफिस्टिकेटेड असल्याची लाज वाटत असते. मारे इटालियन खातांना, अजूनही गोऱ्यांपुढे आपले काटे-चमचे धड चालताहेत की नाही हे सारखं चाचपून बघण्यात जेवणाची मजाच निघून जाते... देसींची नवीन पिढी कशी, अर्ध्या बर्गरने अमेरिकन होऊन सहज ४-५ हजार डॉलरची खरेदी, दर उन्हाळ्यात व्हेकेशन करत असते...तसे बेफिकीर आपण कधीच होऊ शकत नाही, ह्याचं मनातून एकीकडे फार वाईटही वाटत असतं.

आताशा तर जगात कुठेही गेलं, तरी मनातल्या त्याच गावाचा नकाशा सगळ्या रस्त्यांवरून अंथरल्याचा भास... नवीन काही नकोच वाटतं आताशा!

ज्या स्मृतींनी झाडाच्या मुळांसारखी "बांधिलकी" द्यायची, त्यांनीच आपण "बांधून" घ्यायचं? मनातल्या त्या सुरक्षित कोपऱ्यातून धडपडल्यावर पुन्हा उठायची शक्ती घ्यायची, की पडायची भीती?
तुम्हीच ठरवा!

11/6/09

दुसरी बाजू


सरळ समोर सिग्नल. डावीकडे लालकेशरी पानांची किनार, उजवीकडे थोड्या उतारावर, रस्त्याच्या काठाशी दडून बसलेली एक स्कूल-बस.
सरळ पुढे गेले, तर i-78 लागणारे, पण माझी ही छोटीशी रोजची वाट मी पकडणार आणि डावीकडे वळणार. म्हणजे जर पुढून येणा़या गाड्यांची अखंड रांग थोडी रेंगाळली, किंवा डावीकडचा "सुरक्षित सिग्नल" लागला तर. एरवी कधी घाईत घुसखोरी करायसाठी नुस्तं (पाऊल) चाक जरी पुढे टाकलं, तरी लगेच पुढून येणारयांचा हुकुमशाही हॉंक खावा लागेल.

त्याच रस्त्यावरून पुढे गेल्यावर एक पाच-रस्ता-चौक. (त्याला चौक का म्हणायचं मग?). त्यातली वाहती रहदारी स्वयंनियंत्रणाने सुरळीत चाललेली असली, तरी तिथेही आपला हक्क दाखवायचा, किंवा आपली कर्तव्य करायची, हे न टळणारं. पण त्या पाच रस्त्यांपैकी आपला नागमोडी एकदा पकडला, की मग मात्र आपल्याला थांबवायची कोणाची बिशाद नाही.

फक्त् एकच कठीण जातं............त्याच रस्त्याने परत येत, आपलेच दृष्टीकोण वेडावून, उलटून आपल्याला खातात, तेव्हा. ह्यावेळी आपण उजवीकडचे असतो. आपलं घर त्या रस्त्याच्या अलिकडे नसून, पलिकडच्या साध्या वस्तीत असतं.

आपण स्वत:लाच अनोळखी असल्यासारखे भिरभिर शोधतो, ती डावीकडची लालकेशरी पानांची किनार, ती रस्त्याच्या काठाशी दडून बसलेली स्कूलबस. ते आता उलटीकडे असतात. कधीकधी खूप जिवलग मैत्रांनी दुसरी बाजू घ्यावी तसे.

दुसरी बाजू. ह्म्म्म. रस्त्यांची तीच दुखरी जागा असते. त्यांना शक्यतोवर दुसरी बाजू असावी लागते. नाहीतर "one way" म्हणून हिणवले जातात.
दुसरया बाजूने सगळं नवीनच दृष्य दिसतं, आणि सैरभैर होतं मन. नको वाटते ती चिकित्सा- मायक्रोस्कोपच्या डोळ्यातून जीवाणू कडे बघणार्या त्या रस्त्याची दुसरी बाजूही आपणच होतो, तेव्हा सगळेच रस्ते संपल्यासारखे होतात.