Showing posts with label कवितेबद्दल. Show all posts
Showing posts with label कवितेबद्दल. Show all posts

7/6/18

अजून थोडे आहे बाकी

शांताबाई शेळके माझे दैवत _/\_ . त्यांची एक 'चारोळी'? मनात घर करून बसली होती.
“अजून थोडे आहे बाकी
या रक्ताचे करणे पाणी
अजून थोडे, आणिक नंतर
सरेल तेव्हा सरो कहाणी”

त्यांची क्षमा मागून:

अजून थोडे आहे तनुवर
मांस मखमली देण्याजोगे
ते सरल्यावर राखेमधुनी
पुन्हा भरारी घेईन म्हणते

भूक शमविण्या कशा-कशाची
कुणा कुणाची होऊनही मी
समर्पणाची आग गिळूनि
लाव्हा ओकत फुटेन म्हणते

भयाण रात्री परिकथेची
स्वप्ने जरी पहिली होती
सोशिक सिंड्रेला का होऊ?
बाबा यागा होईन म्हणते

संस्कारित होऊन बोहल्यावरी
चढवली बाहुली, तिला
"सुखी ठेव" म्हणणारे सारे
"सुखी रहा" का कोणी म्हणते?

आईने ज्या अस्तित्वाचे 
डोळे गाळून केले सिंचन 
चिणून मातीमधे तयाचे 
बीज ऐकले पेरीन म्हणते.

हाक अनावर अंतर्मनिची
वादळापुढे ऐकू यावी
पोटातून तुटून येवढा
टाहो आता फोडीन म्हणते.

9/25/16

खेळ खलास!

गेल्यात जमा करावे आता क्षणिक श्वास आणि उच्छवास 
कितीक काळ टिकणार, जीवना सखया! तुझ्यावरचा विश्वास? 

कोसळो वेड्यागत पाऊस, फुटोत हिरवे कोंब कुठे 
दगडातही पाझरेल का हर्षभारितसा श्रावणमास?

ढगात काळी स्वप्ने ती का गतजन्मीचे प्रेम अवनीचे 
गोड दुःख मुरलेल्या वाटे कवळु ओलसर मृदगंधास

देव मानुनी फसली सीता, देव शोधता हरली मीरा
देव नको मज प्रेम हवे पण, तू पुससी हा हट्ट कशास!

दिले मन तुला भान हरपुनी, प्राण मागसी वर पुन्हा?
घेऊन जा जे उरले काहूर, राख उडवुया! खेळ खलास!











8/22/16

Syriaतले घर थकलेले संन्यासी

"घर थकलेले... संन्यासी" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं! इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर "टांगणीला" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे!

Syria देशातून गेली अनेक वर्ष ते चालताहेत. त्यांच्या मागे बॉम्बने विदीर्ण झालेल्या त्यांच्या गावांचा आक्रोश कानापर्यंत येऊ नये म्हणून कान आवळून बंद करून. त्यांची घरं जणू "थकलेली". कुणाची "थकबाकी" असते, कर्ज थकलेलं असतं तसं, घरासाठी वाट पाहणं त्यांच्या नशीबी आलेलं. आणि जीवाच्या भीतीने पायपीट करून करून ते ही थकलेले.  त्यांना "गृहस्थ" कसं म्हणावं? जे घरदाराच्या पाशांमधून निकराने स्वतःला सोडवून निघालेले- ते संन्यासीच म्हंटले पाहिजेत.

आडोशाची "भिंतही खचते" तेव्हा आईच्या डोळ्यातलं नक्षत्र त्यांना आठवतं आहे.
५ वर्षांच्या ओमरान च्या शून्य नजरेमध्ये असेल का तेच नक्षत्र?
आई, जिच्या उबदार पंखांमागे निर्धास्त डोळे मिटून लपून जावं, आणि सगळी चिंता आपोआप विरून जावी, त्या आईचं घरटं, हे प्रत्येकाच्या मनात खोल रुतून बसलेलं एक सुरक्षित स्थान असतं. पाय कितीही भरकटले, तरी तिच्या डोळ्यातल्या नक्षत्राने वाट दाखवावी, आणि फिरून आपण आयुष्याच्या शेवटी का होईना, तिच्या कुशीत निजावं, अशी उर्मी दाटून येते.
पिलं चालू लागतात, पण त्यांची आईसुद्धा देशोधडीलाच लागलेली असते! सिरियन निर्वासितांबरोबर प्रवास करणार्‍या पत्रकरांनी त्याबद्द्ल कितीहि भरभरुन लिहिलं, तरी कमीच...

जवळजवळ २५०,००० नागरिकांचं घर हिरावून घेणारं हे कसलं जीवघेणं युद्ध? गेली ५ वर्ष सतत जाळणारं हे कुठलं "रखरखते ऊन"!
"पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळीमागे असतेच झऱ्याचे पाणी"
आयुष्य पाण्यासारखं पुढेपुढे वाहत जाताना, आपण ओंजळीत त्यातले दोन क्षणही सुखाने धरून ठेवू शकत नाही. प्रेमाची माणसं कालाधीन, तर कधी दुरावलेली... हातातून निसटून जातात. प्रत्येकवेळी ओंजळ भरून घेतांना त्यांना त्यातून निसटलेला झराच आठवत असेल का?
उलट प्रवाहाविरुद्ध पोहणारे जिगीषू निर्वासित, त्यांच्यातले किती पल्याड पोचू शकतात? एका बापाला मृत पोरासाठी अश्रू ढाळत न बसता, तसंच पुढेपुढे प्रवाहपतीत होऊन जावं लागतं. एक पिलू वाहून गेलेलं, त्याला आठवलीच असेल ना आपली आई, त्या अंतिम क्षणांमध्ये?

"मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई" जर कधीकाळी ह्या वाटसरूंना आश्रय मिळाला, तरी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला "अंधार", ते अत्याचार, रक्तपात, बलात्कार, चिंधड्या - त्यांना विसरता येतील का कधी? घरासाठी रानोमाळ फिरणाऱ्या भटक्यांना जर घर कधीकाळी मिळालंच, तर ते हि पुन्हा नव्याने तिथे रुजतील. घरातल्या "अडगळीत" त्यांना सुरक्षित वाटूही लागेल. तो सवयीचा पसारा, "माझ्या" असणाऱ्या वस्तू, हौशीने जमवलेली भांडीकुंडी....... रोज रोज डोळ्यांना दिसल्या, कि जीवनाच्या सुरळितपणाचा क्षणिक दिलासाही मिळेल.

पण एकदा ज्यांनी आपलं घर उद्ध्वस्त होणं अनुभवलं आहे, त्यांना कायमच त्या "दरीतल्या वनराईचा" धसका लागून राहणार. ती भयाण वनराई, ते भटकेपण, कधी येऊन पुन्हा घर गिळंकृत करील? करील का? सगळीकडून ती आपल्या घरावर "हलके हलके" पुन्हा अतिक्रमणकरू लागलं आहे हा भास.... त्यातून त्यांची सुटका नाही.

तोवर घरात राहूनसुद्धा "घरपण" मात्र थकलेलं च राहील!

8/8/16

कवितेचा लोचा

आमच्या जीउनात कवितेनेच सगळा लोचा केलाय. हे पक्कंच कळलंय. आदिमानवांच्या काळात भाषा अशी असावी :
आ.ई (म्हणजे आदि.आई). : झाड (झाडाकडे बोट दाखवून)
आ.बा. (आदि.बाळ): दाल
आ.ई.: झा................ड....
आ.बा.: झा.....लं, जालं, जाड, झा.......................ड!

भाषेचा विकास, हा इथेच थांबायला हवा होता. "त" वरून "ताकभात" ओळखता येण्याइतकी बुद्धी (सुदैवाने/दुर्दैवाने) माणसाला मिळालेली आहेच की. पण नाही. थांबायचं कुठे, हे ज्याला कळत नाही, तो प्राणी म्हणजे माणूस. आपली भाषा, आणि त्यायोगे आपलं जीवन, अधिकाधिक कॉम्प्लिकेटेड करायला ज्याला आवडतं, आणि मग त्या गुंतागुंती बद्द्ल रडतांनाही नवनवीन सुरात कसं रडून दाखवता येईल, ह्याचा विचार जो करतो, तो प्राणी म्हणजे माणूस. आणि म्हणूनच, माणूस = कवी. आणि म्हणूनच, काव्य-भावनेनेच सगळा लोचा केलाय, हे पक्कं.

नुसतं "झाड" म्हणून थांबायच्या ऐवजी, मग झाड हिरवं असतं, हिरव्या झाडाला खूप पानं असतात, झाडाची पानं वाऱ्यावर डुलतात, झाड सुंदर असतं, ही असली निरूपयोगी निरीक्षणे करणं, हे कवीचं काम असतं. इथे कवी= शिकार, झाडे तोडणे, एकमेकांवर स्फटिके आपटून आग लागते का बघणे, ती स्फटिके विकून चार कोंबड्या विकत घेता येतील का ते पाहणे, असले कुठलेही "अर्थपूर्ण" उद्योग करायचे सोडून, झाडाची हिरवी पानं बघत बसलेलं खुळं, हा एकच अर्थ अभिप्रेत आहे.

हे खूळ म्हणजे एक खूळच असल्यामुळे, कवीमंडळींना आत्मविश्वासाचा जबरदस्त विंचू चावलेला असावा (अगदी आदिकाळापासून), कारण, तुम्ही हे जे (इतरांना) उपयुक्त पण स्वत:ला निरूपयोगी जीवन जगताय, ते काही खरं नाही, असं सांगून त्यांनी आम जनतेलाच वेड्यात काढलं. उलट कवींना सरळ बुद्धी दे रे बाबा, म्हणून "आदि"माते ला विनवण्यापेक्षा, कवींची निरीक्षणं स्मरणात ठेवून चघळणे, एकमेकांना ऐकवणे, असल्या प्रशस्तीमुळे कवी मंडळी लई डोक्यावर चढत गेली ती गेलीच.

शिवाय, रोज रोज खाल्यावर जसे स्वयंपाकातले बारकावे कळू लागून "रसिक" जन्माला येतात, स्वत:ला गाण्यात गती नसूनही जसे "कानसेन" तयार होतात, तसेच रोज रोज हा खुळ्या शब्दखेळाचा रतीब ऐकून-वाचून वाचकही प्रगल्भ (किंवा बोअर) झाले, की त्यांनाही वर्णनात्मक कवितांनी किक बसेनाशी झाली, आणि कवींना उपमा-उत्प्रेक्षांच्या फोडण्या घालून घालून शब्द खपवायची वेळ आली.  हे मीच नव्हे, लेव्ही स्ट्राऊसनेही म्हटलंय बरंका. आणि काय म्हटलं, यापेक्षा कुणी म्हटलं, ह्याला जास्त महत्त्व आहे, असं पुलंनीही म्हटलंय, जे स्वत: पु.ल. असल्यामुळे, त्यांच्या म्हणण्याला तरी मान असणारच किनई!  इथवर ठीक होतं. खरा लोचा झाला, तो पुढेच आहे.

आता तुम्ही म्हणाल कि कवितेत मला काय प्रॉब्लेम! मी काय कवी/कवयित्री नाही. असते तर लेख लिहिण्या ऐवजी कविताच केली असती ना हो. कविता करण्या/ वाचण्याचा छंद तसा निरूपद्रवी आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कवी मंडळींंचा प्रक्षोभ सक्रीयतेकडे क्वचितच पोचत असल्याने, तसाही काही धोका नाही. "आदि"कवी वाल्मिकींनाच बघा, हरणाला बाण मारणारा शिकारी बघून एखाद्याने त्याचा हात धरला असता, किंवा किमानपक्षी नंतर त्या विद्ध हरणाला मलमपट्टी केली असती, पण हे फक्त "मा निषाद!" म्हणून काव्यच करत बसले, आणि संस्कृतात वगैरे लिहिल्यामुळे त्यांचा आदिकवी म्हणून गौरव झाला, तो वेगळाच. काय नशीब असतं एकेकाचं. आम्ही जन्मल्यापासून पांढऱ्यावर काळं खरडतोय, खरडतोय, तरी ब्लॉगवर कॉमेंटाही येणं दुरापास्त. आणि इथे, दोन शब्द म्हटले, की झाले कवी!

पण ते ही मान्य. खरा लोचा झाला, तो पुढेच आहे.

सुरुवातीला कवींना राजाश्रय असे. म्हणजे खाऊन पिऊन (कदाचित जास्त पिऊन सुद्धा), कविमंडळी खूष असत. पण स्वतःला विकणं इतकं सोपं नसतं! त्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व तसं घडवावं लागतं, मी, माझे विचार, माझ्या भावना, माझे अनुभव, सगळंच किती मनोरंजक आहे, हे दाखवावं लागतं. आणि दाखवता येण्यासाठी तसा तेवढा स्वतःवर विश्वासही असावा लागतो. किंबहुना, स्वतः सोडून दुसरा तिसरा कोणाचाही विचार करून चालतच नाही.
किंवा, दुसऱ्यांचं निरीक्षण केलंच, तरी ते "आपल्याच" रचनेतून मांडायचं, त्यासाठी त्यांच्या गोष्टी वापरायच्या.

हे असं आत्ममग्न जगणं कवींनी सुरु केलं, तिथेच देकार्त सारख्याला, "I think, therefore I am" चा साक्षात्कार झाला असावा. मी म्हणजेच माझं मन. माझं मन, माझे विचार म्हणजेच मी.
म्हणजे काय, की एकवेळ स्वत:ची मुलं नसली, तरी मी आई हे बिरूद लेऊ शकते, घर सांभाळत असले, तर "होममेकर" हे "पद" भूषवू शकते, पण मी विचारच करत नसले, तर मी अस्तित्वात आहे की नाही, हाच प्रश्न पडावा!

आणि लोचा असा, कि फक्त कवी लोक असले "विचार" करत असत, तोवर ठीक होतं. विचार करणं, हि त्यांची व्यावसायिक गरज म्हणा ना! पण इतर लोहार, कुंभार, भाजीवाले, सैनिक नि गिरणीवाले... सगळ्यांनाच हे एकदम हॉट म्हणजे एकदम हॉट प्रोफेशन वाटू लागलं ना! दुकान टाकायला एक पेन नि कागद, आणि कामाच्या नावावर नवनवीन प्रेमप्रकरणे, देशाटने, लोकसंग्रह....... शिवाय प्रसिद्धी, आब आणि किताब, कोणाला आवडणार नाही???

आणि सगळेच कवी, तिथे वाचक विरळा! लेखन, प्रकाशन आधीच इतकं सोपं होतं, ते ब्लॉगद्वारे किंवा जालावर आणखीनच सोपं झालं, आणि काही वेबसाईटतर, हजारो लोकांनी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर, हरप्रकारे चर्चा करावी, ह्यासाठीच बनलेल्या आहेत. स्वत:च्या विचारांना, आणि मतांना, एवढं महत्व येऊ शकतं, हे फक्त आताच्याच पिढीने पाहिलंय.

त्यामुळे किनई, ऐकून घेण्याची कला मागेच पडलीये, आणि समंजसपणा किंवा सगळ्यांशी जुळवून घेणे हे काय असतं? आजकाल ह्या कलेला कुणी विचारतच नाही, तिची उपासना करणे तर दूरच. बघावे तिथे मी मी मी चा घोष! आत्मकेंद्रितेची फ़ॅशन.

हेच बघा ना, मी तरी दुसरं काय करतेय? घेतला लॅपटॉप कि लागले बडवायला :) म्हणूनच..... आता स्वतःलाच सल्ले द्यायची वेळ आलीये. प्रत्येकाने स्वतःला (आणि केवळ स्वतःलाच) सल्ले द्यावे, ही काळाची खरी गरज आहे. आणि अगदी कविता वगैरे लेखनाचं मनावर घेतलंच असेल, तर आधी सहृदयतेचं वाचनपुण्य गोळा करायला हवंय.

पोकीमॉन शोधतात, तसे मीरा,सूर, कबिरा शोधायला हवे आहेत. त्यांच्या मागे वेडं व्हायला हवंय. तसं वेड लागल्याशिवाय......कवीपण अंगी येत नसतं महाराजा.










3/16/15

चारोळी, ग्राफीटी

परक्या देशातले अनोळखी लोक
"आपल्यांपेक्षा" बरेच वाटतात
त्यांचे खोटे जिव्हाळे नि उमाळे
खोटेपणात तरी खरेच वाटतात!
===========================

ज्या प्रेमाने सगळे प्रश्न
सोप्पे झाले
ते प्रेम तुझं होतं की माझं?
की ...
हा विचार
न केल्यामुळेच
प्रश्न सोप्पे झाले ?

मनावेगळी लाट

कुठेतरी एकदा वाचलं होतं, की कविता म्हणजे फक्त शब्द. त्यातून अर्थ, आशय, प्रतीक आणि प्रतिमा उपसून काढण्याचा आपण वृथा प्रयत्न करत राहतो. पण कविता म्हणजे फक्त शब्द. शब्दांच्या प्रेमात पडायला लावते, ती कविता. शब्दांची कधी न पाहिलेली, न चिंतलेली रूपं दाखवते, ती कविता. ती कविता मला ओढून नेते एका नवख्या प्रदेशात...

तुला पहिले मी...
कवीचं प्राक्तन- बघणे. काही बघतात, काही जगतात, पण कवी ते दोन्ही ही करतो. त्याला करावंच लागतं- लेखनातून. लिहण्यासाठी जगणं, आणि जगण्यासाठी लिहणं, स्वत:च्याच अनुभवांकडे तटस्थपणे बघणं.

“तुला पाहिले मी, नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
ह्या वृक्षमाळेतले सावळे"
ती, मूर्त आणि अमूर्त स्वरूपांच्या सीमारेषेवर उभी. तिच्या मोकळ्या केसांची मोहिनी,की दाट छायांतून गळणाऱ्या रंगांची? की ते दोन्ही रंग एकमेकांत मिसळेत नकळत?

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन् तुला सावली
इतक्या अलगदपणे, पावलांचा आवाज न करता ती आली,कवीची प्रेरणा झाली. पण त्या उदास अनामिकेला खरी स्त्री म्हणावे, की नित्य अनुभवलेली सुंदर संध्या?
नभाचा किनारा! दोन अनोळखी शब्द. (किनारा सागराचा असतो, नभाचा नव्हे!) पण मूर्त आणि अमूर्ताशी खेळता खेळता ते दोन अनोळखी शब्द एकमेकांसमोर आले, तर अर्थाचा निळागर्द रंग डोळ्यांसमोर मांडून गेले.

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दु:ख झरते
जसे संचिताचे ऋतू कोवळे
“मनावेगळी लाट"... कवीच्या मनाचं सतत दुभंग होणं. मनावेगळ्या लाटेने व्यापून जाणं. ते टाळता न येऊन खूप व्याकुळतेने विचारणं, “पुढे का उभी तू? तुझे दु:ख झरते!” पुढे उभ्या "तिच्या" दु:खाशी एकरूप होतांनाही, कुठेही सावली नाही,ना त्याला, ना तिला, ह्याची वेदना समजून घेणं.

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुरा
तिचं झरणारं दु:ख आपलंसं करतांना, कवीच्या उरात एक आकांत. आणि तरीही, त्या एकरूपतेच्या क्षणातच कवीच्या अस्तित्वाचं सार्थक असतं. त्या एकरूपतेला कोणी प्रियकर-प्रेमिकेचा एकपणा म्हणतं, कोणी सं-वेदना, कोणी कवीमनाचं स्पंदन. त्या क्षणातच दु:खाला लखलखीत ताऱ्यात परिवर्तीत करण्याची क्षमता असते.
“दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुरा...” दिसणे, बघणे.
जगण्यातून, असण्यातून काहीशा नाईलाजाने, काहीशा अपरिहार्यतेने, कवी बाहेर पडतो. मी ही बाहेर पडते.

मागे वळून बघतांना शोधत राहते,
ही प्रेमिकांची भेट होती?
की एका संध्याकाळच्या आर्ततेचं वर्णन,
की कविता जन्म घेते,त्या एका क्षणाचं?

3/31/13

गाणाऱ्या कविता

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, ह्या झोपडीत माझ्या॥
भूमीवरी निजावे, तारयांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे ह्या झोपडीत माझ्या॥

ही संत तुकडोजी महाराजांची ओवी. ओवी म्हणावी की कविता? पण आमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती, म्हणून कविता म्हणते. त्याच वर्षीच्या हिंदीच्या पुस्तकात हे-

हर ग्राम हर नगर के हर राह हर डगर पर
कूचे गली मुहल्ले, बाजार हाट घर घर
हर ओर ही हजारों दीपक जले हुए हैं
जैसे कि रौशनी के अनगिन सुमन खिले हैं
जैसे कि हस उठी है, तारों की आज रानी
या चांद ने हजारों बनने की आज ठानी!

आज इतक्या वर्षांनतरही मला ह्या कविता आठवतायत, त्या खरं म्हणजे ह्या गाण्यामुळे, "ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है? वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है!"
परवा फिरायला जातांना सहज मी गुणगुणायला लागले, तर गाणं मला आठवेच ना. आठवली ती कविता! मौखिक ग्रंथपरंपरा आणि पाठांतरातला दुवा तेव्हा जाणवला. पाठांतर करायला आवडायचं, आणि त्यातून कविता व्हायच्या ही पटापट पाठ, म्हणून मजा यायची. कवितांना चाली लावून त्या वर्गात म्हणून दाखवायची हौसही खूप :) आता ऐ दिल मुझे बता दे वर सगळ्याच कविता कशा बसायच्या? मग दुसरं गाणं-

आओ बच्चो तुम्हे दिखाऍं झांकी हिन्दुस्तान की
इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की॥

थोडं ठाकून ठोकून त्यावर कुसुमाग्रजांना बसवलं की झालं-

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफेत शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे.
मऊमऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणा़ऱ्या वाऱ्याच्या संगती
उंच पांढरी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते...

आणि हिन्दीत तर त्या चालीवर वाट्टेल ते म्हणता येऊ शकतं असा भाबडा विश्वासच बसला होता-

लहरोंसे डरकर नौका पार नही होती
कोशिश करने वालोंकी हार नही होती
नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है
चढती दिवारोंपर सौ बार फिसलती है
मनका विश्वास रगों में साहस भरता है
गिरकर चढना चढकर गिरना न अखरता है
मेहनत उसकी खाली हर बार नही होती
कोशिश करने वालों की हार नही होती!

परवा फिरायला जातांना सतरा काळज्या आणि पंधरा गोष्टी डोक्यात भुंगा घालत होत्या, तेव्हा ह्या कविता मला वाचवायला आल्या!

आजीने सकाळी पूजा करतांना म्हटलेलं अथर्वशीर्ष असावं तशा ह्या कविता आहेत.
शेजारी भजन-टाळ-गजराचा नाद खोल अंतर्मनात साठवलेला असावा, तशा ह्या कविता आहेत.
रोज दुपारी चणेफुटाणेवाला आपले खास हेल काढून आरोळी ठोकत यायचा, तशा ह्या कविता आहेत.

त्या गुणगुणतांना मला पुन्हा माझ्या स्वत्त्वाची ओळख पटलीशी वाटली. त्यांचा नाद आश्वासक वाटला. गोळाबेरीज करून शेवटी माझ्या वाट्याला फक्त हे शब्द उरले, तरी ते मला खूप पुरतील, ह्याची साक्ष म्हणून त्या कविता.






12/2/10

भिंतीच्या पलिकडे

माणसा-माणसांत भिंती का असतात? कधी दृष्य, कधी अदृष्य, पण पावलोपावली आपण सतत त्यांच्यावर आपटून ठेचकाळतच असतो, इतक्या कठीण!
किती दिवस/वर्ष लागतात माणसांना एकमेकांशी मोकळं व्हायला? कधी एक भेट पुरते, आणि कधी जन्मही पुरत नाही- अशा भिंती भेदायला... परक्यांचे सोडा- अगदी जुनी मैत्री म्हणावी तर ती पण कधीकधी फक्त सोयीची, तात्पुरती आणि वरवरची वाटायला लागते तेव्हा? तेव्हा मनातले कुठल्या अदीम उर्मी जिवंत होतात ती भिंत तोडायला?
Something there is that doesn't love a wall,
That sends the frozen-ground-swell under it,
And spills the upper boulders in the sun;
And makes gaps even two can pass abreast.

Robert Frost च्या Mending Wall चे पहिले शब्द.

काहीतरी आहे असे, ज्याला भिंती आवडत नाहीत. बर्फाच्या कडक थरातून उरी फुटून निघत ते कोवळे कोंब,वरचे दगड खिळखिळे करून टाकतात. त्या खिंडारातून दोन माणसेही जातील इतकी फट पडते नकळत...

मुद्दाम उकरून भेदरलेल्या सशाला बाहेर काढण्याचे रूपक सार्थपणे वापरत फ्रॉस्ट स्पष्ट सुचवतोय- एकमेकांच्या अंतरंगात शिरून, दुखावलेल्या कोपऱ्यावर फुंकर मारणारी मैत्री वेगळी, आणि उलट दुसऱ्याच्या मनातले काढून घेत त्यावर दुसरीकडे तिखटमीठ लावून चर्चा करणारी "मैत्री" वेगळी.
पण भिंतीतूनही सहज दोन मनांमधे निर्माण झालेली वाट - तिचं कौतुक करण्याची परिस्थिती नसते. शेजारधर्म म्हणून का होईना, खिंडार बुजवण्याची जबाबदारी दोन्ही घरधन्यांवर येऊन पडते.

Good fences make good neighbors!

हे सौजन्यपूर्ण अंतर राखायचं बाळकडू शेजाऱ्याला त्याच्या वडिलांकडून मिळालेलं, आणि त्याने विचारांती मान्य केलेलं. अल्याडचे दगड ह्याने बसवायचे, पल्याडचे त्याने, अशी नेमकी वाटणीही आपसूकच झाली. मग स्वत:ची पाठ थोपटत दोघे कामाला लागले. मागच्या बागांचा एवढा प्रश्न नाही, कारण त्याचे pines काही माझ्या apples मधे मिसळून गोंधळ होणार नाहिये. आणि एकमेकांच्या परसात शिरून नासधूस करायला आम्हा दोघांकडे गाईगुरंही नाहियेत.
झालंच तर मग. ओळख, मैत्री, घरोबापण- अशा सर्वमान्य नियमांतूनच वाढत नसतो का? काल मी नेलेली वाटीभर साखर उद्या परत करणारच, किंवा तुमच्या घरची भांडी आमच्या घरी संक्रमण करायला लागली, तर तुम्ही सहज बोलताबोलता त्याची आठवण करून देणे!

पण ह्या सोप्या कुंपणाचीही वाढत वाढत भिंत कधी होते तेच कळत नाही. आणि मग मनात एक टिटवी किलबिलतेच.

Before I built a wall I'd ask to know
What I was walling in or walling out,
And to whom I was like to give offense.
Something there is that doesn't love a wall...

आपण घराभोवती भिंत घालता घालता, स्वत:लाच कोंडून घातलंय का आत?

पार्टी, हाय-हॅलो, पिक्चर, राजकारण, बाष्कळ विनोद, पुस्तकांच्या चर्चा. बास. इतकीच असते का मैत्री?
इतकीच सौजन्यपूर्ण, अंतर राखून, जबाबदाऱ्या समंजसपणे वाटून, आपले दोन शब्द बोलून झाले, की त्यांच्या दोन शब्दाची वाट बघणारी मैत्री? विषयांच्याही मर्यादा घालून घ्यायच्या असतात कुठल्या कुठल्या "मित्रांच्या" कंपूत बोलतांना?

ते ही एक कुंपण भेदून खरंच आपल्या रोजच्या सुखदु:खांबद्द्ल आपण कधी बोलू शकणार आहोत? काठावर पोहून कधी संपणारे, आणि कधी येईल त्या मैत्रीत एवढी शक्ती, की आपण खरोखरीच एकमेकांच्या अंतरंगात खोल डोकावून पाहू शकू, आणि नुसते बोलून नव्हे, तर कृतीने ते दाखवू शकू?
कधी बोलू शकणार आहोत आपण हक्काने फक्त हे चार शब्द- काय गं? कशी आहेस?



8/19/10

मोल

दोन कवी, दोन्ही ही अलौकिक प्रतिभा घेऊन आलेले. आणि तरीही दोघांनाही सारखेच प्रश्न पडावे!

"एकदा भेटून जा रे, दिव्यतेच्या पांडुरंगा,
हुरहुरे प्राणांत माझ्या वेदनेची चंद्रभागा
तूच ये घेऊन दिंडी, होऊदे माझीच वारी,
ताणली ताणापुढे मी जीवनाची एकतारी."


ह्या काही ओळींची मला सारखी प्रचीति येते. रोज करोडो लेख, रोज नवे पुस्तक, रोज नवा ब्लॉग, रोज नवे लेख, रोज नवी नावे, आणि सगळेच अप्रतीम, अलौकिक लिहिणारे! त्यांना दुरून बघायचं, आणि एकदा तरी त्या दिव्यतेचा स्पर्श आपल्याला व्हावा म्हणून झटायचं!

ह्यांना कुठून धाडस येतं अक्षरश: "झंझावाता" सारखं लिहत सुटायचं? कुठुन शब्द येतात? कुठून कल्पना? कशी जमते इतक्या पारदर्शीतेने भावना मांडतांनाही त्यांचं सौंदर्य टिपण्याची कसरत?

मग कधीकधी वाटतं आपलं लिहणं तर काय? खूप सोप्पं आहे- शब्दांचे बुडबुडेच काय ते. दोन क्षण आनंद देऊन गेले तरी पुरेत. लाखो लोक आपापल्या मती/गतीनुसार लिहितच असतात की. "राजहंसाचे चालणे/जगी झालेया शहाणे/म्हणोनी काय कवणे/चालोची नये काय?" - बघा, हे सुद्धा पु. लंनी आणि त्या ही आधी कोणी तुकारामांनी लिहूनच ठेवलंय की महाराजा, आणि ते ही ओवीबद्ध.

हेच ते कधीकधी अशक्य श्वास कोंडल्यासारखं होणं, जेव्हा मीसुरेश भट वाचते, कुसुमाग्रज वाचते.

"असेच काही दुरूनि पाहणे, वा वा म्हणणे,
पिटात जागा अपुली राखुन
अलौकिकाच्या दिव्यात दुसरे, अपुले व्हावे
प्रेक्षागारी व्यतीत जीवन.

तेच सुरक्षित तेच समंजस ते सालसपण
बिकट वाट वहिवाट नसावी
अतर्क्य नियती! अशी मुलाखत आकाशाशी
पंखावाचुन भाळी असावी!"

कुसुमाग्रजांच्या "अतर्क्य" कवितेतल्या ह्या ओळीपण किती सुरेश भटांच्या कवितेशी जुळतात! खरे तर हे दोन्ही कवी अलौकिकाच्या प्रकाशात आकंठ न्हायले, आणि प्रेक्षागारी बसलो आपण. आणि तरीही त्यांच्याच शब्दातून आपल्याच भावनांना इतके सुंदर रूप मिळावे, हाच तर खरा विरोधाभास आहे.

बोलणे सारेच आता फोल जाहले
त्यांचेच आज माझे हे बोल जाहले.

ती लाट अर्णवाची, क्षितिजास हात टेके-
डबक्यात पोहुनीही मी "खोल" जाहले!

काहीतरी लिहावे, सुचते तसे परंतू
शब्दांपुढे कशाचे, ना मोल जाहले.

4/30/10

नादान हैं जो...

परवा कामावरून परत घरी येतांना रेडियो सुरू केला, तर अचानक तलतचा आवाज- मला एकदम माहेरचं माणूस भेटावं तसं झालं. लहान असतांना आमच्या घरी पं. जीतेंद्र अभिषेकी, पं वसंतराव देशपांडे, हे देव होते. फक्त शांतपणे देवघरात बसून नैवेद्य खाणारे देव नव्हे, तर सुरांची शिडी करून, त्यांच्या बरोबर आपल्यालाही स्वर्गात बरोबर घेऊन जाणारे देव...
तलत आणि लता मात्र घरचेच होते. दुपारी चहा पितांना किंवा रात्री आईस्क्रीम खातांना गप्पा रंगवणारे family friends! आमच्या बाबांची सवय होती, एक गाणं आवडलं, की ते टेप घासेतोवर वाजवायचं, आणि वाजवतांना स्वत:ही आळवायचं... तेव्हा पाठ झालेला तलत......तो काल परत......अचानक!

हैं सबसे मधुर वो गीत जिन्हे
हम दर्द के सुर मे गाते हैं...........हम दर्द के सुर मे गाते हैं ।

माझा अतर्क्यावर विश्वास आहे. हे गाणं होतं, की माझी मनस्थिती समजून घेणारी अज्ञात शक्ती? कॉलेजात असतांना Percy Bysshe Shelley ची "To a Skylark" शिकतांना, त्यावर आधारित हे गाणं ऐकून एकदम ती कविता पण उमजल्यासारखी झाली होती.

Skylarkच्या स्वर्गीय आवाजाची अमूर्तता शेली ला दु:खांच्या पलिकडच्या जगातून आल्याचा भास होत होता. "तू कवी आहेस, आपल्याच भावविश्वाच्या किरणांत लपलेला, जगाला आशा-निराशेच्या द्वंद्वाची जाणीव करून देणारा?" "की तू बागेतला काजवा आहेस, फुलापानांआड दडून स्वैर गुणगुणणारा?"


लाख उपमा देऊनही न सुटलेलं कोडं असं, की तुझ्या गाण्यामागची स्फूर्ती कुठली आहे? दु:खाचा लवलेशही नसलेला शुद्ध परिपूर्ण स्वर- पृथ्वीवरच्या अर्ध्या-अधूऱ्या जगण्यातून तो स्वर आम्ही आणावा कुठून?

We look before and after,
And pine for what is not:
Our sincerest laughter with some pain is fraught;
Our sweetest songs are those that tell of saddest thought.

काँटों मे खिले हैं फूल हमारे
रंगभरे अरमानोंके......रंगभरे अरमानोंके ।
नादान हैं जो, इन कांटोसे
दामन को बचाए जातें हैं ॥

दु:खातून मुक्ती नव्हे, तर दु:खापासून पळवाट काढणाऱ्या skylark च्या स्वर्गीय, अमर्त्य गाण्यापेक्षा, दु:ख पचवून पुढे जाणा़या माणसाचा चा शेलीने पुरस्कार केला. दु:ख सोसल्याशिवाय सुखाची व्याख्या करता येत नसते, हे शेलीच्या कवितेचं सार आहे.

पण शैलेंद्र सिंग ह्यांचे बोल तिथेच न थांबता, उत्तुंग आशावादाकडे आपल्याला घेऊन जातात.
जब गम का अंधेरा घिर आए,
समझो के सवेरा दूर नही..........दूर नही ।
हर रात का है पैगाम यही
तारे भी यही दोहराते हैं.......... तारे भी यही दोहराते हैं॥

दुसऱ्यांच्या दु:खात समरस होऊ शकण्यात माणसाच्या अश्रूंची खरी पवित्रता दिसते.

पहलू में पराये दर्द बसाके,
हँसना हँसाना सीख ज़रा..... तू हॅंसना हॅंसाना सीख ज़रा
तूफान से कहदो घिर आए,
हम प्यार के दीप जलाते हैं....... हम प्यार के दीप जलाते हैं ॥

जब हदसे गुज़र जाती है खुशी
आँसू भी छलकते आते हैं........ आँसू भी छलकते आते हैं॥

2/23/10

Sistine Chapel आणि देवाचं बोट

काही दिवसांपूर्वी Frank O'Hara नावाच्या कवीच्या कविता वाचनात आल्या. विसाव्या शतकात दोन महायुद्धांनंतर अतिशय क्लिष्ट होत गेलेल्या जीवनाकडे बघणाऱ्या लेखकांची एक लाट तेंव्हा उदयाला आली, ज्यांना आपण आज "modernists" म्हणून ओळखतो.

"My love is like a red red rose" म्हणणारी Robert Burns ची सोळाव्या शतकातली कविता बाळबोध म्हणा्वी इतकी साधी सरळ होती. समकालीन शेक्सपियरच्या लेखनातली खोली त्या काळच्या इतर कुठल्याही लेखकात आभावानेच आढळते कारण एकूणच तेव्हा आपल्या देव-धर्म, नीतिमत्ता, भावनांच्या संकल्पना मर्यादित स्वरूपाच्या होत्या. माणसाच्या जन्मजात चांगुलपणावरचा भाबडा विश्वास उडवणाऱ्या महायुद्धांनी माणसांमधल्या सगळ्या नीचतम भावनांना वाट करून दिली. अपरिमीत हिंसा, स्वार्थ, लोचटपणा, दुर्बलताच नव्हे तर त्याहुनही भयावह अशी पशुता माणसात असू शकते, ह्याची जाणीव माणसांना स्वत:कडेच नव्याने बघायला शिकवून गेली.

ह्या जीवनाचा, स्वत्त्वाचा आणि नीतिधर्माचा जर सरळ अर्थ लावता येत नाही, तर कवितांचा तरी कसा सरळ अर्थ लावता येईल? काही लेखकांना ही गुंतागुंत जीवघेणी वाटली, तर काहिंनी मात्र त्या क्लिष्टतेचाच पुरस्कार करत कला-लेखन-विज्ञानालाही एक नवीनच परिमाण प्राप्त करून दिलं.

त्या लाटेतलाच फ्रॅंक ओहारा जेव्हा सापडला, तेव्हा त्याच्या कवितांमधली क्लिष्ट विषयांची सोपी मांडणी खूप आवडून गेली.

Wouldn't it be funny
if The Finger had designed us
to shit just once a week?

all week long we'd get fatter
and fatter and then on Sunday morning
when everyone's in church


ploop!

शेक्सपियरच्या "Let me not to the marriage of true minds" पुढे अगदी थिल्लर वाटणा़ऱ्या ह्या ओळींमधे काय बरं अर्थ दडला असेल? आधी फक्त कविता वाचतांना कुठल्या गोष्टी तुमच्या डोळ्यात भरल्या? The Finger मधे कॅपिटल अक्षरं? कि शेवटचं कडवं आणि ploop! मधली मोकळी जागा? साधारणत: इंग्रजीत God ह्या शब्दाला कॅपिटल अक्षरं वापरण्याचा प्रघात आहे. मग ओहाराने देवाला "The Finger" का म्हणावं? कदाचित हे पेंटिंग तुम्हाला थोडं परिचयाचं वाटेल.
Michaelangelo च्या "Adam and God" ह्या पेंटिंगमधला हा एक तुकडा आहे. Sistine Chapel च्या छतावरती संपूर्ण पेंटिंग आहे. अर्थात, देवाच्या स्वरूपाची कल्पना केवळ एक बोट अशी आहे असाही ह्याचा अर्थ होत नाही. पण मग पुन्हा विचार करून बघुया की finger शी काय काय निगडीत असू शकेल? पुढील वाक्यात लोकांच्या लठ्ठपणावरून "finger fries" असाही एक अर्थ निघू शकतो.

पण मग लोकांनी ६ दिवस खा खा खाऊन सातव्या दिवशी चर्चमधे जाऊन का विधी उरकावे? तर मग आपण चर्चच्या अर्थाचा विचार करुया. चर्चमधे सहसा पापं केल्यावर लोक त्यांची कबुली देऊन पुन्हा शुद्ध होतात अशी संकल्पना आहे. त्याची तुलना देहधर्माशी करून फ्रँक ओहाराने धर्मावर टीका केलिये, कि धर्मांध लोकांवर? माझ्या मते ही टीका लोकांच्या "सोईस्कर धार्मिकतेवर" असावी. दर रविवारी पापांची कबुली दिली, म्हणजे आपण पुन्हा पापं करायला मोकळे, अशा उथळ विचारसरणीवर ही टीका आहे.

येवढंच नव्हे, तर कदाचित अति भोगवादी फ़ास्ट-फूड नेशन वर सुद्धा हे एक भाष्य असू शकेल. खा खा खाऊन मग detox diet करणाऱ्या संस्कृतीची इथे खिल्ली उडवलीये असं मला वाटतं. शिवाय एरवी चांगल्या कवितांमधे असणारी imagery (दृष्यात्मकता) ही इथे आहेच हे सांगायला नको. मी ही कविता बरेचदा शिकवलिये, आणि बाकी काही लक्षात राहो, न राहो, "ploop" हा शब्दच एक तिला अविस्मरणीयतेचा दर्जा द्यायला पुरेसा आहे :)

त्याच कवीची ही अजून एक कविता- निव्वळ शब्दांचे अर्थ, नाद आणि दृष्यात्मकतेवर उभी असलेली. तुम्हाला तीत काय अर्थ जाणवतोय? नक्की कळवा.................

Oh! kangaroos, sequins, chocolate sodas!
You really are beautiful! Pearls,
harmonicas, jujubes, aspirins! all
the stuff they've always talked about

still makes a poem a surprise!
These things are with us every day
even on beachheads and biers. They
do have meaning. They're strong as rocks.

9/16/09

पैठणी- शांता शेळके

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, तोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.

ही कविता मी प्रथम वाचली, तेव्हा "फडताळ", "नारळी पदर" असले शब्द कळतही नव्हते. आईबाबांची कागद-पत्रे ज्या कपाटात होती, तिथे त्यांची काही पुस्तकं अगोचरपणे वाचायला गेले, तर शांताबाई शेळक्यांचं "गोंदण" हाती आलं. एक कविता वाचली, कळेना. पान पुढे. दुसरी. त्यात "आवर्त" असले शब्द म्हणता म्हणता बोबडी वळते म्हणून पुस्तक ठेवून द्यावं, तोच "पैठणी" वर नजर गेली. ह्म्म्म ही कळू शकेल बुवा! बघू तरी...

माझी आजी लग्नामधे ही पैठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची...अनोळखीची...जाणीव गूढ आहे त्यास.

(काय बरं ह्या वाक्यात अर्थ प्रतीत होतो? तेव्हा कळण्याचं वय नव्हतं, पण अजूनही ते गूढ मनात रेंगाळलंय.)

धूप-कापूर-उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले एक तन...एक मन...
खस-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
(ह्या वाक्याशी मी दरवेळी थांबते. खस-हिन्याचा एकत्रित दरवळ! नुसतं खस-हिना म्हटलं तरी अंगावरून झुळूक गेल्यासारखी वाटली.)
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली.

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला.
(माझ्या आजीची साडी इतकी मऊ कशी लागते? ह्याचं उत्तर मिळाल्यासारखं वाटलं.)
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले.
(त्यावेळी आजीच्या मरणाच्या कल्पनेनेही रडू आलं होतं!)

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा.


देवाच्या कृपेने माझ्या दोन्ही आज्या अजून खुशाल आहेत, तरीपण, अमेरिकेतल्या माझ्याशी, भारतातल्या आज्यांचा, कालपटाचा धागा जुळतो, तेव्हा गहिवरून येतं. ह्या कवितेबद्द्ल लिहितांना, "कवयित्रीने सर्व संवेदना- स्पर्श, गंध, दृष्टीला खुणावणारं काव्य केलंय" असं काहीबाही लिहायला गेलेही असते कदाचित

पण एवढंच म्हणते- शांताबाई! तुमच्या कवितेने जागवलेल्या माझ्यातल्या निर्मळ मनाला, मनातल्या निरागस आठवणींना, आणि त्या आठवणींनी वाहणाऱ्या झऱ्यांना सलाम!!!

3/12/09

ते मी असावं

खूप दिवसांपासून ह्या कवितेतलं एक वाक्य डोक्यात घोळत होतं-
Let the more loving one be me!
W. H. Auden च्या एका सुंदर कवितेचा भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय.

ताऱ्यांकडे बघतांना मी उमजून आहे
माझ्या अस्तित्त्वाशी, त्यांना कर्तव्य नाही
जिवाच्या भीतीशी झुंजणाऱ्या मला
त्यांच्या निर्लेपपणाची पर्वा ही नाही.

ताऱ्यांनी प्रेमाने माझ्यासाठी पेटून उठावं
असल्या अफाट प्रेमाचं ओझं नको व्हावं
अशक्य परतफेडीच्या बरोबरीपेक्षा
अधिक प्रेम करणारं- ते मी असावं

नाहीच पण मला जमलं-
असं तुटून प्रेम करणं
कौतुक असेल किती, पण एका ताऱ्याच्या
आठवणीत झुरणं.
प्रत्येक ताऱ्याचा होवो अस्त
आभाळाची काळोखी अंगवळणी पडेल
हळूहळू का होईना त्यातली
गर्द उदात्तताही मिळेल.

- W. H. Auden

9/22/08

सहा शब्दांची कविता

तर मग मी मुलांना कविता कशी करायची ते शिकवायला लागले. कविता कशी करावी ह्याचे हॅण्डाऊटस दिले:
  1. कवितेसाठी विषय निवडणं, हे सर्वात मोठ्ठं काम आहे, त्यामुळे विषयांची यादी करा. उदाहरणार्थ, मला कोणत्या कोणत्या विषयांबद्दल लिहायला आवडेल??? समुद्रकिनारा, माझा ipod, मी, आमचा टॉमी इ. इ. (अर्थात, अमेरिकेत कुत्र्यांना टॉमी म्हणायची फॅशन आहे की नाही मला माहिती नाही. ) पण तुमच्या आवडीनुरूप तुम्ही ज्या कुत्र्याबद्दल लिहणार आहात, त्याचे/तिचे (लिंगसमभाव) नाव निवडू शकता.
  2. आता यादी तर झाली. मग आपलं काव्यक्षेत्र निवडा, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची कविता करणार? रोमॅण्टिक की पोस्टमॉडर्न? छंदबद्ध की अनिर्बंध? ते ठरवा.
  3. आता डिक्शनरी काढून तुमच्या विषयाला लागू होणारे सगळे शब्द एकत्र करा.
  4. त्या शब्दांचे प्रिंटाऊट काढून ते वेगवेगळे कापून ठेवा.
  5. एका टेबलावर त्यांची जुळणी करतांना काही "प्रेरणा" मिळते का बघा.
  6. One poem, minimum 20 lines long, will be due at the end of class. It will be graded for- originality, deep thought, word choice and grammar. (It will count as Classwork Assignment, which is 20% of your grade.
परिणाम: हॅण्डाऊटसवर Due Date न लिहिल्यामुळे कविता लिहिली नाही. - इति मुलं. कविता म्हणजे काय, ह्या विषयावर प्रत्येकाची वेगळी मतं आणि वेगळे आविष्कार असल्यामुळे, "आपण म्हणू ती कविता" असा निश्कर्ष. तू माझ्या कवितेचं कौतुक कर, मी तुझं करतो, अशा प्रकारे आपण दोघंही किती पोचलेले कलावंत आहोत, असा १० वी फ तल्या मुलांचा गोड गैरसमज.
=============================================
ही झाली कविता शिकवण्याची अमेरिकन पद्धत. आता कविता शिकवण्याची शुद्ध तुपातली देशी पद्धत:
  1. पुस्तक उघडा. ज्ञानेश्वरांची विराणी वाचायची असल्यामुळे ज्ञानेश्वर किती साली जन्मले व समाधिस्त झाले त्या तारखा पाठ करा. ("समाधी म्हणजे काय हो गुरुजी??" "रे मूर्खा, शिवाजीने अफजुलखानाची समाधी बांधली ती बघायला लाश्ट इयरला ट्रीप गेली तेव्हा तू काय चणे खात होतास?" )
  2. कवितेतले कठिण शब्द फळ्यावरून उतरवून घ्या.
  3. ज्ञानेश्वरांनी "घनू वाजे घुणघुणा" ह्या विराणीत घनाच्या रूपकाचा वापर कसा केलाय त्याचं तयार उत्तर गाईडमधून ५ वेळा लिहून काढा.
  4. उद्यासाठी गृहपाठ: घनू वाजे ह्या गाण्याला दुसरी, सोपी चाल लावून आणा. शक्यतोवर अलिकडच्या चांगल्या हिंदी सिनेमातली गाणी घ्या.
परिणाम: ज्ञानेश्वरांचं काहितरी होतं बुवा १० वी च्या पुस्तकात, काय ते आठवत नाही. विराणी ही कविता होऊच शकत नाही, कारण मास्तरांनी कवितेची व्याख्या घोकवून घेतली, त्यात विराणी हा शब्द कुठे आला नाही. "तुम्ही कविता करता का?" "छे! कविता करणं म्हणजे मेलेल्या थोर लोकांनी पुढील पीढीच्या लक्षात राहण्यासाठी साईडला चालू केलेला धंदा." किंवा सरळ, "ते तसलं काही नाही बुवा आपल्याला जमत."
कविता काय असते? नुकते NPR वर Six Word Memoirs वाचायला मिळाले. सहा शब्दात तुमच्या जीवनाची कथा लिहायला सांगितली, तर ती काय असेल? असा प्रश्न अनेक मान्यवर, तसंच सामान्य लोकांपुढे टाकून Smith Magazine ने ती सगळी उत्तरं गोळा केली, आणि त्याचं पुस्तक छापलं.
लिहावा का आपणही एक छोsssटासा जीवनालेख?
"Teacher's shoes, student-life, learning counts."
खरं तर अशा काही वाक्यांना Memoir न म्हणता कविताच म्हणायला हवं, असं मला वाटतं. जेवढं सांगणारी, तेवढंच अव्यक्तही ठेवणारी. मनाला खूप दूर नेता नेताच मनाला आंतर्मनातही डोकावून बघायला लावणारी. कधी हळव्या भावनांना प्रखर विषादाची धार देणारी, तर कधी विखारी पत्रकारितेतही माणुसकीचा ओलावा शिंपून जाणारी.
" सुचेल तशी लिहिली, तीच कविता झाली!" हे कवितेचं नाही मी म्हणत............

8/18/08

मी कोणी नाही

कसं नाही काही लोकांना जमतं- बोलणं, बोलतांना दुसऱ्यांचं लक्ष वेधून घेणं, मुद्दे लढवणं, आणि हजरजबाबीपणाने विनोद करणं! परवा एका पार्टीला गेलो होतो- नेहमीचे हास्य विनोद चाललेले, ग्रीनकार्ड, व्हीसा,इथले डॉक्टर आणि दवाखाने, देशी-विदेशी पिक्चर, रेसीपी, अशा एक ना अनेक गोष्टींची खरपूस चर्चा चाललेली होती, आणि संभाषण आपसूक एका गोलात फिरल्यासारखं, एकेकाची खबरबात घेऊन पुढे सरकत होतं.

देसी पिक्चरवरून हास्याचे फवारे फुटत असतांना, “आमची ही- सावरीया आणि देवदासला ढसढसा रडून एक अख्खा टिश्यूचा डबा संपवते!” अशी कौतुकमिश्रित थट्टाही करून झाली. मग तुफान पेटलेल्या मुलं v/s मुली ह्या सामन्यात मुलांनी तितक्याच पटकन शरणागतीही पत्करली :) ह्या सगळ्या गदारोळात एक ना दोन व्यक्ती तरी असतातच, की त्यांची शांतता आपण गृहितच धरतो. मला एकदा व्हायचंय ती व्यक्ती-

कारण त्यांच्याकडे बघून मला नेहमीच प्रश्न पडतो, की मी जरा जास्तच बोलतेय का? माझी टोकाची मतं नोंदवायची पार्टी ही जागा नव्हे! किंवा कोणाची गंमत आपण बिनधास्त करतो, ते त्यांना टोचत तर नसेल? पण कधीकधी मीही असते की Nobody! बोलण्यातून आणि भाषेतून काय दिसणार, किंवा दाखवणार स्वत:चं व्यक्तिमत्त्व, जर स्वत:लाच कळलेलं नसेल? कधीकधी नसतातही मतं, विचार, माहिती- सांगण्यासारखी...

आणि कधीकधी किती असतं, जे सांगता येत नसतं, पण सांगितल्याशिवाय त्याचं अस्तित्त्व निर्माणही न होण्यासारखं...!

माझी एक आवडती एमिली डिकिन्सनची कविता:
I'm Nobody! Who are you?
Are you—Nobody—Too?
Then there's a pair of us?
Don't tell! they'd advertise--you know!

आणि कधीकधी भेटतात असे लोक, जे Nobody असतात इतरांसाठी, पण आपल्याला कळते त्यांच्या अबोलपणात दडलेली भाषा.....म्हणतात ना, कित्येकवेळा आपण आयुष्यभर बोलूनही ज्यांना कळायचं त्यांना ते कळणार नसेल, तर खऱ्या, “ओळखी..” साठी बोलण्याची गरजच नसावी! तेंव्हा, त्या स्तब्धतेत, एका चिरंतन आंतरिक शांततेचं प्रतिबिंब पडतं, आणि बोलणारं तमाम जग जरा, “अतीच करतंय..” असं वाटू शकतं!

How dreary--to be--Somebody!
How public--like a Frog--
To tell one's name--the livelong June--
To an admiring Bog!
-- Emily Dickinson

आणि हा स्वैर अनुवाद.........
“मी कोणी नाही- तू कोण आहेस?
तूही का कोणी नाहीस?
मग आपली जोडी- सांगू नकोस हं,
जाहिरातच होईल त्याची...

काय रटाळवाणं- असं - “कोणीतरी असणं-”
सार्वजनिक- बेडकापरी--
स्वत:चं नाव ओरडणं सतत
कौतुकाच्या डबक्यावरी!

7/25/08

हेलन, सीता आणि हिलरी

आज कवितेबद्दल लिहावं. मराठीत कविता स्त्रीलिंगी आहे हे कित्ती बरं- अगदी समर्पक वाटतं. त्याऊलट, “निबंध.” पुल्लिंगी, ह्यावरून सुज्ञांनी काय समजायचं ते समजावं. असो, तर कवितेशी माझं फार जवळचं नातं. कादंबऱ्या खूप वाचल्या, पण कायम लक्षात राहिल्या त्या कविता!

परवा एका interview मधे सुपरव्हायझर ने विचारलं, “तुम्हाला कोणतं असं एक नॉव्हेल आहे, जे शिकवायला आवडेल? आणि त्या नॉव्हेलच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या संकल्पना मुलांना शिकवाल?” एक मिनिट शांतता. अजून ३० सेकंद, तरी शांतता. सुपरव्हायझरचा चेहरा काळजीयुक्त. आणि मग माझं हळुच उत्तर, “खरं म्हणजे नॉव्हेल माझं आवडतं genre नाहिये. मला कविता आवडतात.” त्याने मनातल्या मनात सोडलेला सुटकेचा निश्वास मला स्वच्छ ऐकू आला. “तर मग कोणती कविता आहे, जी तुला शिकवायला आवडेल?” आता माझ्या मनात शेकडो कवितांची गर्दी. एकीकडून Wordsworth/Keats/Shelley ची Romantic त्रयी, आणि दुसरीकडून Plath, Frost, Eliot, Wallace Stevens सारख्या modernist लोकांचे शब्द शब्द कानावर आदळायला लागले. शेवटी मी, “Plath. Sylvia Plath.” मुलांना तिच्या अभिव्यक्तीतली intensity (तीव्रता?) आवडते. आणि शेवटी फेमिनिस्ट कविता असली, तरी त्यातून आज आपल्या समाजातल्या विषमतेकडे लक्ष वेधून मुलांना त्याबद्दल विचार करायला शिकवता येईल.”

तिकडे माझ्या उत्तराने त्याच्या मनात उमटलेल्या सकारात्मक विचारांमुळे मला चांगले vibes येऊ लागले. काहीतरी होऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली. मग थोड्या दिवसांनी ह्याच माणसाने मला शाळेत Demo Lesson द्यायला बोलावलं. विषय अर्थातच, “इंग्रजी कविता!” मला फारसा विचार करावा लागला नाही. थोड्या दिवसांपूर्वी poets.org ह्या साईटवर वाचलेली Margaret Atwood ची कविता लगेच डोळ्यांपुढे आली. “Helen of Troy Does Countertop Dancing”. नाव ऐकून नवरा बेशुद्ध झालेलाच, तो कविता वाचल्यावर ओरडायलाच लागला: अगं काय ती कविता! कसले ते शब्द! तुला जगातल्या लाखो करोडो कवितांमधुन हीच एक का दिसतेय? आणि एकदा नोकरी लागल्यावर तू वाट्टेल ते घोळ घाल, पण नेमका तुझा सुपरव्हायझर खडूस निघाला तर कवितेच्या सिलेक्शन वरूनच तुझा पत्ता कट होईल नं??

पुन्हा मनात १०० विचार. खरंच जगात लाखो कविता आहेत. पण ह्या कवितेत मला भावलेल्या layers of meaning, शिवाय हेलन ऑफ ट्रॉय सारखी पुराणकालीन व्यक्तीरेखा घेऊन तिला आपल्या युगातील संदर्भ जोडून कवयित्रीने खरं म्हणजे आपल्याच जीवनशैलीवर एक टीका केलिये. पूर्वी बायकांना एक वस्तू म्हणून वागवतांना केवळ त्यांचं सौंदर्य महत्त्वाचं होतं. आपल्या पुराणातल्या सीता, द्रौपदी असोत, किंवा ग्रीक पुराणातल्या हेलन सारख्या रूपवती. त्यांचं प्राक्तन सारखंच होतं. “Is this the face that launched a thousand ships?” अशा शब्दात मार्लोवने आपल्या नाटकात हेलनला रूपवती म्हणतांनाच तिच्यामुळे ट्रोजन वॉर (ट्रॉय मधील महायुद्ध) झाली, ती युद्ध-संहाराला कारणीभूत झाली, असाही अर्थ प्रतिध्वनित केला.

आणि आज, विशेषत: अमेरिकन संस्कृतीतल्या सौंदर्याच्या अचाट कल्पनांमुळे किती स्रीयांचं आयुष्य त्यांच्या रूपाभोवती फिरत राहतं! शरीरविक्रय आजही होतो, फक्त वेगळ्या तऱ्हेचा! टीव्हीवर बघा, तर डोळ्यांच्या सुरकुत्यांपासून पायाच्या नखापर्यंत सौंदर्यप्रसाधनांचा सुळसुळाट......

अगदी राजकीय बातम्यांतही हिलरी क्लिंटनचा मेक अप आणि ती कॅम्पेनमधे एकदा रडल्यामुळे कितीकांना तिच्या स्रीसुलभ भावनांचं हृद्य दर्शन झालं ह्याची वीट येईतो चर्चा!

आणि ही सगळी चर्चा मला त्या कवितेत दिसली. खऱ्या अर्थाने साहित्य सर्वव्यापी, स्थलकालबाधित नसतं ह्याचा अनुभव देणारी ती कविता. तुम्हाला वाचून बघायची असेल तर जा ह्या लिंकवर, आणि सांगा मला तुम्हाला कोणते अर्थ दिसले त्यात:

Helen of Troy Does Countertop Dancing- Margaret Atwood.

अशा कवितांमधून लिहावसं वाटतं....

PS: आणि हो, तो जॉब मला मिळाला बरं का!