Showing posts with label आत्मधून. Show all posts
Showing posts with label आत्मधून. Show all posts

6/20/19

ग्रँड कॅनियन



ती कापत गेली अष्मयुगातून खडक दांडगे
ही चीर भूवरी पहा आज सुंदर दिसते
उकलून फाटले जिथे कडे हे क्षणोक्षणी
ती घळ केशरी रंगाची मनभर भरते

लहरीलहरीने पदरावरती पदर पडे
तिने वाहिल्या सुपीक मऊ मातीचा
संततधारेने तिच्या कोरले जे इमले,
त्यातून वाहतो प्रवाह हा काळाचा

उगवली कपारित कडे फोडुनी झाडे
खाचेत खाण चमचमे गडद पाचूची
तळपते उन्हाने पेटुनिया, वैराण 
उभी पुढे रांग ही रांगड्याच शिखरांची

कधी झळके वैभव तीक्ष्ण लाल कड्यांचे
कधी काळोखे कोपरे, सावली दाटे
घनघोर शांतता कधी अथांग दरीत
घुमती गरुडांचे कधी चित्कार पहाटे

मानवी जीवापलिकडली
भव्यता भरे हृदयात
मद-लोभ-मोह विरघळले
कृतार्थ, नम्र नमनात!
कोसळून मनाचे असे पुन्हा उसळणे -
मारून सूर ही भरारी उत्तुंगात!










3/11/19

विजले निखारे

जीवघेण्या फक्क वेळी आज खायला उठले,
शुभ्र बर्फाच्या उन्हाने लखलखणारे सुरे,
भरल्या डोळ्यात पाणी गोठले- हे काव्य नव्हे!
हेच सांगाया मांडले आज शब्दांचे पसारे!

थंडीच्या उदास देहातून येई रोज प्रश्न
निष्प्रभ रश्मीत तरी कुठे तू आहेस का रे?

झाडांची आखडलेली बोटे स्पर्शातुर वेडी
त्यांना लागले जिव्हारी, बोचणारे सर्द वारे

मात्र बर्फही खट्याळ, त्याने भरले नेमके
झाडा, घरा, खाच खळग्यांचे भकास निवारे

निकराने धुगधुगी, झगडली अहोरात्र
तरी उरले शेवटी फक्त विजले निखारे  

रात्र दिवसास गिळे, असे रोजचे आवर्त
सभोवारचे मळभ, कधीही न फिटणारे  

मृत्यूदूत शुभ्रवर्णी, त्यांचे येणे अलवार
जसे हलके प्रेमाने, हिम सर्वत्र पाझरे

आता थकून टाकला, उसासा जन्मभराचा
मिटूनिया ताणलेल्या पापण्यांची दोन दारे

---

आता देशी का चाहूल गर्भरेशमी उन्हाची ?
झाडा आळत्याची बोटे- नवे कायसे तरारे?

फांद्या नृत्यमुद्रांनी मज लगडून आल्या
फिरून कुठून आणू मी गेल्या वसंता रे?











11/11/18

शिशिर

हवेत आता लख्ख गारवा
स्वच्छ निळाई, केशरी थवा
पानांचा हा लालस मोहर
जाईल गळून, जरी मज हवा

आठवणी देठात उबेच्या
धग पानांची डोळ्यांमध्ये
जाणवते पण, पोचत नाही
आक्रसलेल्या गाभ्यामध्ये

झाडांनी कोठून आणला
विखार इतक्या सौंदर्याचा
अट्टहास होता का केवळ
बहरानंतरही बहराचा?

बोच पांढरी वाऱ्यामधून
हाक नव्हे ती - घंटा कानी
आभास तो पेटलेपणाचा
गाळण्यापूर्वीच्या निकरानी

5/10/17

सोबत

दुपारी ४. ३० -५ ची वेळ
टेकडीवर ढग जमू लागलेले असतील.
गाड्यांचे लाल दिवे, तूर्तास मंद
रस्त्यावर फुलू लागलेले असतील

मी पण आत्ताच ७८ ला लागले पण
पुढे अजस्त्र हत्तींचा तांडा असावा
तसा १८ चाकी ट्रकांचा ताफा
ताशी २० मैलाच्या गतीने झुलतो आहे

हायवेच्या दोन्हीकडे हिरवळ बघून
का कोण जाणे- टेकडीवरची सुकट झाडंच आठवली!
ढगांच्या गडद रेषा मी डोळ्यात साठवते
आशाच्या आर्त सुरांना, दुरूनच परत पाठवते

दुपारी साडेचार पाच ची वेळ
अनेक शक्यतांची  हुरहूर -
टेकडीवर ढग जमू लागलेले असतांना
धो धो पाऊस येईल?
का हे दुखावलेले लाल-केशरी ढग
मिटून जातील रात्रीच्या गडद दुलईत?

पण आत्ता शक्यतांचा विचारच नाही!
गाडी आपोआप पुढे सरकते आहे
उद्याची काळजी आणि कालचे हिशोब
आत्ता डोक्यात काहीही नाही
म्हणूनच फक्त तू - मनातलं बोलायला -
आत्ता इथे हवा आहेस

हा सगळा मोकळा वेळ
हा अनंत वाहणारा संथ रस्ता
डाव्या बाजूने सर्र्कन कापून
मला पुढे जायचं नाहीये

तुझ्या मागे
किंवा कधी तुझ्या शेजारी बसले होते त्या
सुंदर क्षणांची
परतफेड?
नव्हे
केवळ सोबत
मला करायची आहे 

4/1/17

अनाम सर्व दु:खांचे एकच हो नाव तू

अनाम सर्व दु:खांचे एकच हो नाव तू
नेमका कातरवेळी अस्त होऊन 'पाव' तू!

बोचरे डोळ्यात पाणी, करावया वाहते
वाळूकण शिंपल्यात कर तसा शिरकाव तू 

जे असेल सत्य ऐसे मी मनात मानिले
घ्यायला लावू नकोस मज त्याचा ठाव तू

रुजला असेल खोल स्नेह विश्वासामधे
विचारून घालू नको अर्थांचे घाव तू

लहरींतून आठवेन गाणे अंधूकसे
सूर स्पष्ट लावण्यास कर परी मज्जाव तू 

दाही दिशा पसरल्यात एकट्या माझ्यापुढे
निर्वात अस्तित्वाचे ओसाडसे गाव तू


1/31/17

शॅम्पू ने डोक्यात गळू होईल!

शॅम्पू ने डोक्यात गळू होईल!
आकलनाच्याही आधी एक निमिष होता
मी तिथेच थांबायला हवे होते
पण तोवर डोळ्यात घुसून
संवेदना मेंदू पर्यंत पोचली होती.

षट्कोनी भोकांमधून
आळ्यांचे डोळे
केसांच्या खाली, सपाट गोऱ्या मानेवरून
माझ्याकडे बघत होते.

मी गप्पकन डोळे मिटून घेतले
तरी पटलावर कोरलेली ती भोकं
त्यातून वळवळणारे लक्ष डोळे
तोंडात अचानक दाटून आलेले दर्प
हातापायांना सुटलेला कंप

एक असहाय चीड उठून मग जुळवली बोटं
एक एक चौकोनावर आघात करत,
"शोधा" त लिहिलं: "शॅम्पूचं गळू खरं आहे काय?"
कमळ- कंदाच्या षट्कोनी पोवळ्यातून
गुलाबी पाकळ्या फुटतांना पहिल्या
त्याच डोळ्यांनी.

"खरं आहे काय?" काय खरं आहे?
'माझ्या' शोधाच्या 'चौकटीतून' कापून
त्याला शंबर ठिकाणी चिकटवलं
सीमेवर परत पाठवलं
आणि सांगितलं, "आता कर आक्रोश!"
निवायला हवे आहेत मला माझे डोळे - स्वच्छ प्रकाशाने.

डोळ्यांवर अत्याचार केला होता
ती मैत्रीण आता मला फुलं पाठवते
रोज सकाळी - गुड मॉर्निंग!
कळवळा आहे तिला माझा
आणि मी पण रोज डोळे मिटून 
कमळ-कंदातुन उमलणाऱ्या पाकळ्या आठवते. 



टीप: खोटी प्रतिमा इथे देऊ इच्छित नाही, त्यामुळे कुतूहल असल्यास Shampoo Hoax शोधावे. कमळाच्या बिया बाहेर पडत असतांनाचा फोटो मानेवर चिकटवून भयानक रोग भासवला गेला आहे.

सध्या अमेरिकन निवडणुकी संदर्भात जालावर फिरणाऱ्या बातम्या (बहुतांशी खोट्या) असूनही जनमत बदलून गेल्या. निवडून आल्यावर राष्ट्राध्यक्षानी केलेली विधाने, दोन्ही बाजूंची वृत्तपत्रे, यांनी नि:पक्षपाती पत्रकारितेचा परिहास केला आहे! त्या पार्श्वभूमी वर माझा एक व्यक्तिगत अनुभव म्हणून वरील कविता लिहिली आहे.






10/28/16

पटेल कॅश अँड कॅरी

"पटेल कॅश अँड कॅरी"
मी स्वतःशीच हसले, हे वाचून. 
आत गेल्यावर
बचकभर गवार कोंबली  
हातातल्या पारदर्शक प्लॅस्टिकमधे 

इथले व्यवहारही असेच. 
पारदर्शक पिशवीत दिसतात हिरव्या तजेलदार भाज्या 
पण आतून बेचव, कधी राठ.
बघा, पटेल, तर यू कॅन कॅश इन 
अँड कॅरी ऑन
समहाऊ.

आधी आधी चीजचॉकलेटं
खाल्ली ओ येईस्तोवर 
पण मूळचा कांद्या-मुळ्याचा, आलं-लसुणाच्या वाटण्याच्याही वास 
(का सहवास!) जाता जात नाही घरातून 
कितीही कॅण्डल लावल्या तरीही.
लोकही विचारतातच आवर्जून, "तुम्ही वडाभात कसा करता?"
आणि वडीलमाणसं तर सदा कानामागे 
"मेरा भरीत महान" गुणगुणतच असतात. 
फक्त पुढे हे पालुपद जोडून, की "आम्ही म्हातारी माणसं,
तेव्हा बघा...
पटेल तर!"

देशातून परत येतांना मात्र 
काय भरू काय नको होत राहतं
पापडासारखे मनाचे पीळ तिकडून आणायचे सहज  
इथे येऊन कडक कोरडे वाळवून घ्यायचे 
कारण ज्यादिवशी सगळी शक्ती संपलेली असते 
त्यादिवशी खिचडीला 
त्यांचाच आधार होतो 
पण नाहीच आणता आले, तर आहेच 
पटेल - कॅश अँड कॅरी 
पटेल - तुम्हालाही हळूहळू, पटेल 

रोजचीच त्रेधातिरपीट: कधी ही कणीक, कधी ती 
तरीही 
कॉइलवर, कितीही रक्त आटवलं 
तरीही 
क्षणात वातड वातड होणाऱ्या 
त्या वैतागवाण्या पोळ्या!

त्यावर उपाय म्हणून की काय 
मसाल्यात गच्चं भरलेला
गंधास्वादाचा संस्कार
आजकाल सढळ हातानेच करू लागले आहे 
कधीकधी तर भसकन पडतोच! 
मग शेजारीच नव्हे, तर पोरंही नाकं वाकडी करत विचारतात 
"मॉमी, इट सीम्स यू मेड युअर मंथली ट्रिप टू दॅट...
व्हॉचामा कॉल इट...पटेल?"


पण विसरू देत नसतो इथला बर्फ 
तुम्हाला तुमचं गोठलेलं वास्तव 
रस्तेच बंद होतात तेव्हा, ब्रेड ऑम्लेट, पास्ता, सूप 
भगवावंच लागतं 
पण शनी-रवी त्या पटेल मधली गर्दी बघून 
कधी असंही वाटतं: 
की वी शूड बी एबल टू कॅरी ऑन
विदाउट धिस........पटेल!

खूपशी स्वप्नंही मग पडून राहतात 
महिनोंमहिने फ्रीजरमध्ये 
दामटून, वा दयेपोटी, पोरं झोपलीच लवकर 
तर दोघांनी पिक्चर बघत 
एकमेकांना चमच्या-चमच्याने भरवायची.
जस्ट हीट अॅंड सर्व्ह!

अळणीच रुटीनवर, रोज भांडणांच्या फोडण्या 
घालायच्याही...दोघांनीच मिळून 
पण धुराने वाजणाऱ्या भोंग्याने 
ओशाळंही व्हायचं लागेचच! कारण पटेल, न पटेल 
तरी शेवटी हीच कॅश कॅरी करायची आहे 
जन्माची पूंजी- म्हातारपणी!

पहिल्यांदा पाऊल टाकलं होतं 
देसी ग्रोसरीत, तो क्षण...
अजूनही आठवतो 
विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हंटलं होतं
"अय्या! खरंच इथे सगळंच मिळतं की!"
आता वाटतं, खरंही आहे ते......
पटेल, हळूहळू पटेल.
कॅश अँड कॅरी. 
ऑन.  





10/17/16

दिल है, महफ़िलमें भी तनहा हो सकता है

दिल है, महफ़िलमें भी तनहा हो सकता है 
जो पाया था, वो ही अक्सर खो सकता है 

जाँ से जाते जाते हमने ये समझा 
बारिश में पत्थर को देखो, रो सकता है 

जज़्बातों के ढ़लते मौसम जाते रहें 
यादें तो फिर हर कोई पिरो सकता है 

अपनी ख़ताएँ गिनने वाले कम न हुए 
हम जो कर गुजरे वो किससे हो सकता है!

दर्द को सुननेवाले अबके कहाँ मिले 
ख़ुशियों का बाज़ार लगा है, वो सस्ता है 

तुमसे उम्मीदें तो थीं पर फिर सोचा 
उम्मीदों से हारे कच्चा वो रिश्ता है 

शहर था खाली, दोस्त नही थे, पर खुश थे 
राह उजड़ने की देखे, दिल वो कब बसता है 

हमसे पूछो मत हाल-ए-दिल अपनी कहो
प्यारा लगता है वो बच्चा जो हँसता है 

काश के हम भी होते सूखे पात की तरह 
कागज़ के पन्नो में सिमटा सो सकता है

9/25/16

खेळ खलास!

गेल्यात जमा करावे आता क्षणिक श्वास आणि उच्छवास 
कितीक काळ टिकणार, जीवना सखया! तुझ्यावरचा विश्वास? 

कोसळो वेड्यागत पाऊस, फुटोत हिरवे कोंब कुठे 
दगडातही पाझरेल का हर्षभारितसा श्रावणमास?

ढगात काळी स्वप्ने ती का गतजन्मीचे प्रेम अवनीचे 
गोड दुःख मुरलेल्या वाटे कवळु ओलसर मृदगंधास

देव मानुनी फसली सीता, देव शोधता हरली मीरा
देव नको मज प्रेम हवे पण, तू पुससी हा हट्ट कशास!

दिले मन तुला भान हरपुनी, प्राण मागसी वर पुन्हा?
घेऊन जा जे उरले काहूर, राख उडवुया! खेळ खलास!











8/6/16

तुझी आठवण

तुझी आठवण क्षणाक्षणाला 
बरसत गेली पानांवरती 
पागोळ्यांतून रेषेवरती 
शब्द सावळे अविरत झरती 

मेघाच्याही मनात तेव्हा 
दाटून आला एक हुंदका 
सागराच्या मनातल्या 
हिंदोळ्यांना आली भरती 

कुंद गारवा लेऊन बसले 
तरी विसावा नाही क्षणभर 
गर्द काजळी आभाळासम 
तुझी आठवण माथ्यावरती. 


4/18/16

एवढंच.

घराजवळ येताच पावलं जशी सहज होतात
तसं आयुष्य व्हावं - एवढंच
खूप थकून उशीवर निश्चिंतपणे टेकावेत श्वास
तसं मरण यावं - एवढंच.

अविरत फडफडणारे पक्षी आकाशातही
स्थिरावतात - पण क्षणभरच
त्या एका क्षणात पुन्हा तडफडण्यासाठी
बळ मिळावं - एवढंच

हातांना स्वत:चा रंग देऊन
नकळत गळून पडते मेंदी
प्रेमाच्या नक्षीतूनही तितकच अलगद
विलगता यावं - एवढंच

हातावरच्या रेषांमध्ये असूनही तारकांच्या खुणा
मातीमळल्या निखाऱ्यासारखं जळता यावं - एवढंच
प्रकाशरूप अस्तित्वालाही राखेसाठी
ओवाळून टाकता यावं - एवढंच

3/16/15

सोप्पं गणित

लहान असतो आपण तेंव्हा जग अवाढव्य पसरलेलं दिसतं...
आपण लिलिपूट, राक्षसांच्या जगात.
शाळेच्या भिंती इतक्या उंच की उडी मारून जाता येऊ नये
रस्ते लांब इतके, की पाय दुखतात दोन चौक चालून
तरी दिसत नाही, आईसक्रीमचा गुलाबी कोन काढलेली पाटी
सगळ्या गोष्टीची घाई असते, पण वेळ सरकत नाही भरभर पुढे
“आई, बोअर होतंय, आता काय करू???”

खरं म्हणजे ५० वर्ष तेंव्हा वाटत असतात युगांसारखी-
येवढ्या मोठ्या आयुष्याचं काय करतात माणसं?
खरं तर, काही करत का नाहीत? असे बाळबोध प्रश्न!

आणि आता - दिवस घालवायला फारसं काही करावं लागतच नाही
तासचे तास कसे नकळत भरून जातात ते कळतंय
चादरी धुवायच्यात लॉन्ड्रीत, बाथरूम घासायला हवी,
भांडी, तेवढ्यात टी.व्ही बघत बघत स्वयंपाक,
मुलांचे अभ्यास, कपड्यांच्या घड्या,
धूळ झटकायची, न संपणारी आवराआवरी
रात्री डोळे मिटतात तरी वाचायचं असतं
करायचे असलेले फोन, भरायची असलेली बिलं,
जेवायला यावे लागणारे-पाहुणे, जेवायला जावे लागणारे नातेवाईक,
जमलंच तर निसर्ग सौंदर्य, हवाबदल, सुट्ट्या आणि नोकरीचं चक्र...
तेच, तसंच, असंच, थोडसं, कहिसं, काहीतरी...

भरून टाकायचे क्षण, वेगवेगळ्या निरर्थांनी
रंगीबेरंगी खोक्यात लपवून पोकळ्या
मग वाहत जातो, दिवस, अज्ञात प्रवाहाने ढकललेला
वर्ष, गरगरणाऱ्या पृथ्वीसोबत,
शतकं- इतिहासाच्या पुस्तकात......

सोप्पं असतं आयुष्याचं गाणित, लहानपणी न सुटलेलं,
खरं म्हणजे तोवर वाचावंच न लागलेलं...


भैरवी

आद्य स्वर म्हणुनी तुला, झाले तुझी संवादिनी
षडज- पंचम भारल्या तारांत मी "गंधारूनी"।


वेदनेच्या उमटता लहरी कधी तानेतल्या
तेजात क्षणभर नाचले उन्मुक्त नभी सौदामिनी।

आज नाकारू कसे ते दुःख तू मजला दिले
काव्य त्यतील घेतले स्वप्नांतही मी मागुनी।


भाव एकाकार होते, अंतरातिल गूज ही
हृदयी तुझ्या जे उमटले, अश्रूत ते ह्या लोचनी।


भेटते द्वैतास बेदरकार आता रोजही
गायली संपूर्ण मी ही भैरवी द्वैतातुनी.

चारोळी, ग्राफीटी

परक्या देशातले अनोळखी लोक
"आपल्यांपेक्षा" बरेच वाटतात
त्यांचे खोटे जिव्हाळे नि उमाळे
खोटेपणात तरी खरेच वाटतात!
===========================

ज्या प्रेमाने सगळे प्रश्न
सोप्पे झाले
ते प्रेम तुझं होतं की माझं?
की ...
हा विचार
न केल्यामुळेच
प्रश्न सोप्पे झाले ?

चरोळ्या

आकाशाच्या नि:शब्द पोकळीत
नाही संवेदना, वेदना ही नाही.
तरीही वाहतात ढगांसारखे शब्द
सांगायचे काही असो, वा नाही।
कोण मी? ह्या प्रश्नाचं उत्तर
त्या ढगांत शोधणारे
व्यर्थ भरलेल्या आभाळातून
थेँबांचे अश्रू ओघळणारे!
=========================
तुझ्या अबोल्यात दडलेले अर्थ
न शोधताही सापडताहेत सहज
अर्थांचे प्रश्न सार्थ व्हावे,
त्यासाठीच तर भावनांची गरज.

शब्द सवयीचे

शब्द सवयीचे असे का आज घोटाळून बसले
थेंब पानांवर तसे ते आज सांभाळून बसले।

लाट आवेगात आली भेटण्या सागरतिरी
पाऊले भिजली परी ती लाट मी टाळून बसले।

कोसळावे कड्यांवरूनी सत्य निर्मळ जळ जसे
प्रवाही त्या भावनांना आज मी गाळून बसले।

ओळखीच्या प्रदेशाचे आंधळे जे काव्य होते
ठेच त्याला लागली अन स्वत्त्व कुरवाळून बसले।

ये पुन्हा तू पावसा, विखुरल्या मोत्यांपरी
सापडावे मग मला, ते रान तुज माळून बसले।

स्पंदनांना विसरूनी, सोसली मी मुग्धता
पेटवा ते मन आता जे त्यास ओशाळून बसले।

3/15/15

भाग्य

निर्हेतुक नजरांचा कोलाहल
शाळेच्या हॉलमधून झेलत चालतांना
मुलामुलींच्या गुंफलेल्या हातांमधून
वाट काढतांना
मीच अनोळखी होते
स्वत:ला

इंग्रजीतल्या मला मराठीतली मी
भेटेल का कधी?
शब्दार्थांच्या भिंती कोसळतील का कधी?

१०० दप्तरांचं ओझं मानाने वाहतांना
झुकलेले खांदे, पिकलेले केस
फाटलेला आवाज, इस्त्रीचे कपडे
मी होते ती, की निव्वळ माझी जिगीषा?

ह्या भिंतींनी मला आपलं म्हटलं,
अडखळत का होईना
व्हाईटबोर्डावर माझं अक्षर रुळलं.
भारतातल्या गोष्टींचा रंगीबेरंगी मुखवटा चढवला,
पण तरी त्यांचं किती मला,
नि माझं त्यांना कळलं.

ह्या हजारो चेहऱ्यांमधून
शे दोनशे तरी रोज खुणावतात-
मनात इतकी गर्दी?
पुन्हा कधीच नाही.

रोजचे राग-अनुराग
कोवळ्या अपेक्षा नि अर्धवटपणाचे हट्ट
पुन्हा कधीच नाहीत.

पणाला लावलेले दिवस
विसरलेले घर
खाजगी बंध-अनुबंध
हिशोबाला काढायचे नसतात कधीच.

तरीही वाटतं,
ह्या भिंतींना कधीतरी येईल का माझी सय?
लाखो स्वप्नांच्या कोलाहलात
विरून जाईल का माझा आवाज?

कि असं तुटल्यावरही न "सुटता" येण्याचं
भाग्य भेटेल अचानक
हसून विचारणाऱ्या, क्षणात ४ फूट वाढलेल्या
एखाद्या विद्यार्थ्यासारखं?

1/4/15

आले!

भारतात, घरी,
चार मोठ्या-लहान माणसांत,
जाऊन आले. 
घरांचे उडत, उडत जाणारे रंग
पाहून आले. 

आई-बाबांचं नुस्तं असणं
त्यांचे फुटकळसे राग-लोभ
लटक्या कंटाळ्याने हलके झेलित
मजेमजेने सोसून आले. 

जुन्याच रस्त्यांवर नव्याने हरवले, 
मग नव्याच ओसाड जागा शोधून,
तिथेच तात्पुरते तंबू ठोकून,
वस्ती करून आले. 

प्रवाहातल्या दगडापरी
पाण्यातही अडखळले 
बर्फाचं मन पाण्यात
चिंब भिजवून आले.

माझ्याच रंग-रूप आकाराची
एक कागदी बाहुली म्हणून
कधीकाळी "जमलेली" भूमिका
कशीबशी वठवून, आले.

होतं नव्हतं तेवढं बोलणं 
मनातून संपून गेलं
नीरव रितेपणाचा आहेर
मनात भरून घेऊन आले.

आठवणींचे वर्ख उडायला लागले
आजचे वास्तव भिनायला लागले
हृदयाचे ठोके वाजायला लागले
तशी घाबरून, पळून का आले? 

स्वत:च्या गेले
दूर? 
कि जवळ? 
उत्तरांना प्रश्न
शोधून आले.











8/7/14

संध्याकाळ

आज कित्येक वर्षांनी अशी संध्याकाळ झाली.
ढगांच्या किनारीतून सूर्य दिसेनासा झाला, तरी
रेंगाळलेले सोनेरी आकाश
सोडीना "सोळाव्या" हळवेपणाला.

कित्येक वर्षांनी पुन्हा अशी संध्याकाळ झाली
कृत्रिम दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात
ना बंदिस्त, ना पराभूत
ना कर्तव्यांना बांधलेली.

पुन्हा, वर्षांनी, अशी झाली संध्याकाळ:
लाटांच्या गूढ आरोहावरोहात
विरघळले मनोगत
विरघळण्याच्या बोलीवरच, बोललेले.

संध्याकाळ झाली
कि कॉन्क्रीटचे सुबक कट्टे ओस होते,
तरी आठवणींनी गजबजून गेले
ढग अचानक का दाटून आले? 

संध्याकाळ, आज पुन्हा, अशी
भिनत गेली, रात्रीच्या अंधाराला 
पापणीमागच्या सोनेरी प्रकाशात
मिसळत, अधिक गडद होत गेली.






6/11/14

व्दिधा

परक्या देशात,
परक्या भाषेच्या गल्ली बोळांतून
गाडीच्या चाकाला पकडत करकचून
मी निघाले होते.

शोधल्याही खुणा
नाही असं नाही
ओळखीचं झाड-पान,
बघितलेसे वाटलेले दुकानांचे रंग.

पण भिरभिर डोळ्यांना, क्षणोक्षणी विस्फारूनही
कितीसं ह्या जगातलं
खरोखर
येऊन वसेल मनाच्या कोपऱ्यात?

अटळपणे मग बोलावलं
सोयऱ्या सुरांना
शब्दाला लगडून आल्या
नेहमीच्या आकारांना

बाहेर अजूनही बर्फच
 काळ्यावर पांढरा,
माझ्या मनात मात्र शांत सकाळी,
काळ्या फरशीवर, शुभ्र मोगरा!

बाहेर अजूनही रस्त्यांच्या वेलांट्याजवळ
हिरव्या पाट्या उभ्या ताठ
त्यांच्यावरच तरारून आले
पिवळे रान, वारा सुसाट!

थोडावेळ विसरले
मी
ते
तिथले- इथले
असले फरक.

पण मग पुन्हा
संवेदनांच्या चुकल्या तारांतून
बेसूर आवाजात घुमला
एकच शब्द: व्दिधा!