Showing posts with label तुमचे आवडते. Show all posts
Showing posts with label तुमचे आवडते. Show all posts

3/11/11

कॉपी

गेले कित्येक दिवस हातांना पेन लागला नव्हता. ईमेल, फेसबूक अपडेट, ट्वीट्स मधून भरपूर व्यक्त झालं, खूप काहिसं बोलतं झालं, पण "लेखणी" च हातात नसतांना त्याला "लेखन" म्हणवेना. मग खूप चुकल्या चुकल्यासारखंही वाटायला लागलं. बाहेर पावसाचं थैमान चालू असतांना बटाटेवडे आणि चहा पेक्षा "लिहायची" तल्लफ यावी, पण खूप दिवस अंथरूणात आजारी पडून राहिल्यावर एकाएकी चालायला उभं राहिले, तरी स्वत:च्या पायांवरच भरवसा वाटू नये, तसा हाताच्या त्या लिहणाऱ्या स्नायूंवर भरवसा वाटेना.

कागदावर प्रत्येक शब्दावरच्या रेघेसरशी जाणवणारी सूक्ष्म खरखर हातातून थेट मनापर्यंत पोचून एक हलकीशी शिरशिरी जाणवावी... वेलांटी फिरवतांना पेनाचा आणि हाताचा कोन बदलून अक्षराची जाडी बदलतेय असं दिसल्यावर निबची एकच दिशा कायम ठेवण्याची खटपट करावी... दुसऱ्यांनी वापरलेल्या पेनावर कमी-अधिक दाबामुळे थोड्या खिळखिळ्या झालेल्या स्प्रिंगशी जुळवून घेत पुन्हा कागदावर आपलाच ठसा उमटावा असं अक्षर काढायची एकाग्र तपस्या करता करता शरीर-मन-विचारांची एकतानता अनुभवावी.....त्या कल्पनेनेच हरखायला झालं.

शेवटी तडमडत साहित्य शोधायला उठले. पिवळी नोटपॅड्स घ्यावी, की काळ्या-पांढऱ्या टाईल्सच्या कव्हरांची इथल्या शाळेत सर्रास दिसणारी कॉम्पोझिशनची वही? बरं, दोन-चार वाक्यांचाच एक छोटासा विचार लिहायचा असेल, तर सरळ पोस्टिटच घ्यावं का? नको... त्यापेक्षा फ्रीजवर किराण्याची यादी करते ते लांबट कागदच हाताशी पटकन सापडतील, तर तेच घेते... कागदाचा इतका विचार केल्यावर पुन्हा पेनाच्या असंख्य प्रकारांतून कुठला निवडायचा?

शाळेत असतांना वर्षाच्या सुरूवातीला कॅमलचा शाईपेन, रेनॉल्ड्सचा बॉलपेन, आणि नटराजच्या पेन्सिलींचा डबा आई-बाबा घेऊन द्यायचे, तो वर्षभर चालवण्यासाठी खूप उद्योग करायचे. ह्या पेनातल्या रिफील त्या पेनात बसवायला, ब्लेडने कापायच्या. ह्या कारभाराने त्या जरा जास्तच आखूड झाल्या, की वर याव्यात म्हणून कागदाचे अगदी साबूदाण्यायेवढे छोटे गोळे पेनाच्या मागच्या बाजूला ढोसायचे!
शाईपेनाच्या निब तर लिहण्यापेक्षा, खरखरत वहीची पानं फाडायला बनवलेल्या असाव्यात अशा! मग ब्लेडने त्यांच्यावरचा गंज काढून, किंवा निबच्या मध्ये असलेली भेग कर्कटकाने मोकळी करून, शाई पुन्हा वाहती करायची खटपट चालायची.

तुमची गरीबी-श्रीमंती शाळेत तुमच्या वहीची पानं किती गुळगुळीत आहेत, त्यावरून ठरायची. शाई फुटणाऱ्या वहीची लाज वाटली, तरी मागच्य वर्षी जर ती संपली नसेल, तर नवीन वर्षी, आधीची भरलेली पानं फाडून पुन्हा तीच घेणे भाग होते! पण खूपशी सुटी पानं उरली, तर जवळच्या "बुक बाईंडिंग" च्या दुकानातून त्यांची एक नवीन " मिसळ-वही" करून आणायचो. त्यात पांढऱ्याच पानांच्या, पण वेगवेगळ्या छटा दिसायच्या, आणि एका छटेतून दुसऱ्या छटेत गेल्यावर नवीन वहीच मिळाल्यासारखी गंमत वाटायची!

हायलायटर तर लोक कशाला वापरतात, तेच मला कित्येक दिवस माहिती नव्हतं. आम्ही आपले महत्त्वाची वाक्य सरळ पेन्सिलीने अधोरेखित करणाऱ्यातले होतो! समासात व्याख्या-शब्दार्थांपासून डूडलपर्यंत काहीही काढून भरवलेलं ते पुस्तक किती "आपलं" वाटायचं! इथे मुलांना पाठ्यपुस्तकं शाळेतून वर्षभरासाठी वापरायला देतात, त्यामुळे त्यावर पेन्सिलीने लिहिणं वगैरे चालत नाही, ही कल्पनाच मला पटायला जड गेली.

अमेरिका नवीन होती, तेव्हा सगळ्यात जास्त अप्रूप इथल्या सुपरमार्केटमधल्या "स्टेशनरी" सेक्शनचं वाटलं होतं. वेगवेगळ्या रंगांचे कार्डपेपर, साध्या फाईल, अकॉर्डियन फाईल, जेल-पेन, नाहीतर बॉलपेनचे शेकडो प्रकार, कुठल्याही कॉन्फरन्सला गेलं, तर तिथल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या, बॅंकेच्या, अगदी nonprofit संस्थांच्या टेबलवरही, बूथवर खेळणी आणि खाऊ ठेवावा, तसे पेन/हायलायटर/की-चेन असले प्रकार मुक्तहस्ते लुटले जातायत आणि आपल्याला आता फारसं लिहावं लागतच नाही, हे विसरून आपण त्यांच्या मोहात पडतोय, असं माझं कित्येकदा झालंय.

असल्या हव्यासापायी घरी केवढा कचरा वाढलाय, म्हणून आवरायला गेले, तर नवीनच चमत्कार! त्या फुकटातल्या चांदीपैकी एकूण-एक पेन चालत होता........! शाई सुकली नव्हती, की टोपण हरवलं नव्हतं. स्प्रिंग व्यवस्थित "टकटकटक" वाजत उघडमीटही होत होती!

साहित्य जुळवता जुळवताच मन किती वर्ष प्रवास करून आलं होतं! पण लिहायला बसले, तर शंभरदा वेगवेगळे कागद-पेन बदलूनही, हवं तितकं भराभर लिहिता येईना. माझं परिश्रमाने घडवलेलं, एकेकाळी मोत्यांसारखं असलेलं अक्षर, आता सवईच्या वळणा-वेलांट्यांवरूनसुद्धा अडखळत अडखळत पुढे सरकत होतं... "अ" आणि "म" चे पाय पुरेसे लांब येत नव्हते, की T आणि J ची उंची... अक्षरांतला जीवनोत्साह संपल्यासारखा, strokes मधला बुटकेपणा, कि विचारांच्या वेगाने हात धावत नव्हते म्हणून थोडासा "टाकणं टाकल्याचा" भाव सगळ्या परिच्छेदभर पसरल्यावरती, शेवटी नाइलाजाने टाईप करायला लागावं, त्यावर हसू का रडू हे ही कळेना..

पण आज कष्टाने लिहायचीच भूक भागवायची होती. म्हणून जे हाताला लागेल ते पुस्तक उघडून, पहिल्या पानापासून, सरळ समोरच्या वहीमधे उतरवून घ्यायला लागले...

4/30/10

नादान हैं जो...

परवा कामावरून परत घरी येतांना रेडियो सुरू केला, तर अचानक तलतचा आवाज- मला एकदम माहेरचं माणूस भेटावं तसं झालं. लहान असतांना आमच्या घरी पं. जीतेंद्र अभिषेकी, पं वसंतराव देशपांडे, हे देव होते. फक्त शांतपणे देवघरात बसून नैवेद्य खाणारे देव नव्हे, तर सुरांची शिडी करून, त्यांच्या बरोबर आपल्यालाही स्वर्गात बरोबर घेऊन जाणारे देव...
तलत आणि लता मात्र घरचेच होते. दुपारी चहा पितांना किंवा रात्री आईस्क्रीम खातांना गप्पा रंगवणारे family friends! आमच्या बाबांची सवय होती, एक गाणं आवडलं, की ते टेप घासेतोवर वाजवायचं, आणि वाजवतांना स्वत:ही आळवायचं... तेव्हा पाठ झालेला तलत......तो काल परत......अचानक!

हैं सबसे मधुर वो गीत जिन्हे
हम दर्द के सुर मे गाते हैं...........हम दर्द के सुर मे गाते हैं ।

माझा अतर्क्यावर विश्वास आहे. हे गाणं होतं, की माझी मनस्थिती समजून घेणारी अज्ञात शक्ती? कॉलेजात असतांना Percy Bysshe Shelley ची "To a Skylark" शिकतांना, त्यावर आधारित हे गाणं ऐकून एकदम ती कविता पण उमजल्यासारखी झाली होती.

Skylarkच्या स्वर्गीय आवाजाची अमूर्तता शेली ला दु:खांच्या पलिकडच्या जगातून आल्याचा भास होत होता. "तू कवी आहेस, आपल्याच भावविश्वाच्या किरणांत लपलेला, जगाला आशा-निराशेच्या द्वंद्वाची जाणीव करून देणारा?" "की तू बागेतला काजवा आहेस, फुलापानांआड दडून स्वैर गुणगुणणारा?"


लाख उपमा देऊनही न सुटलेलं कोडं असं, की तुझ्या गाण्यामागची स्फूर्ती कुठली आहे? दु:खाचा लवलेशही नसलेला शुद्ध परिपूर्ण स्वर- पृथ्वीवरच्या अर्ध्या-अधूऱ्या जगण्यातून तो स्वर आम्ही आणावा कुठून?

We look before and after,
And pine for what is not:
Our sincerest laughter with some pain is fraught;
Our sweetest songs are those that tell of saddest thought.

काँटों मे खिले हैं फूल हमारे
रंगभरे अरमानोंके......रंगभरे अरमानोंके ।
नादान हैं जो, इन कांटोसे
दामन को बचाए जातें हैं ॥

दु:खातून मुक्ती नव्हे, तर दु:खापासून पळवाट काढणाऱ्या skylark च्या स्वर्गीय, अमर्त्य गाण्यापेक्षा, दु:ख पचवून पुढे जाणा़या माणसाचा चा शेलीने पुरस्कार केला. दु:ख सोसल्याशिवाय सुखाची व्याख्या करता येत नसते, हे शेलीच्या कवितेचं सार आहे.

पण शैलेंद्र सिंग ह्यांचे बोल तिथेच न थांबता, उत्तुंग आशावादाकडे आपल्याला घेऊन जातात.
जब गम का अंधेरा घिर आए,
समझो के सवेरा दूर नही..........दूर नही ।
हर रात का है पैगाम यही
तारे भी यही दोहराते हैं.......... तारे भी यही दोहराते हैं॥

दुसऱ्यांच्या दु:खात समरस होऊ शकण्यात माणसाच्या अश्रूंची खरी पवित्रता दिसते.

पहलू में पराये दर्द बसाके,
हँसना हँसाना सीख ज़रा..... तू हॅंसना हॅंसाना सीख ज़रा
तूफान से कहदो घिर आए,
हम प्यार के दीप जलाते हैं....... हम प्यार के दीप जलाते हैं ॥

जब हदसे गुज़र जाती है खुशी
आँसू भी छलकते आते हैं........ आँसू भी छलकते आते हैं॥

4/23/10

Life is a two way street.

आज हा ही अनुभव घेतला. काय असतं "नोकरी जाणं"? जेव्हा हातातून काहीतरी निसटत असतं, तेव्हा आपल्याला काय काय मिळालंय, ह्याची जाणीव होणं?

लाखो लोक येतात आपापली स्वप्न घेऊन, अमेरिकेत. The American Dream.

१० खोल्यांचा महाल, त्यात संगमरवरी स्विमिंगपूल, दारात ४ गाड्या, घरात ४ मुलं..... सगळं मिळालंच पाहिजे, आणि ते ही भरभरून मिळालं पाहिजे हा अट्टहास म्हणजे खरं अमेरिकन स्वप्न नव्हे. आज जगात अमेरिकेची image काही ही असो, पण स्वत:च्या निष्ठेने आणि कष्टांनी, स्वतंत्रपणे जे हवं ते मिळवता येण्यासाठी जी सामाजिक घडण लागते, ती सगळ्यांना उपलब्ध असणं, हे खरं अमेरिकन स्वप्न आहे.

ह्याचा अर्थ असा नव्हे, की ह्या समाजात असमता नाही. पण जेव्हा अमेरिकेत पहिल्या वसाहती निर्माण झाल्या, तेव्हा जुन्या पश्चिमी राजवटीला पर्याय शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कुणाच्या धर्म, जात, सामाजिक स्तरावरून त्यांच्या कर्तृत्वाची झेप ठरू नये, ह्या विचारातून capitalism आणि individualism चा उदय झाला.

गेली ५ वर्ष मी थोड्या अंशी ते अमेरिकन स्वप्न जगते आहे. आणि आज त्याचं झालेलं दु: स्वप्न ही अनुभवायला मिळालं. इतर कुठल्या देशातल्या विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी, मला इतकं सहज समजून घेतलं असतं? इतर कुठल्या देशात माझा रंग नाही, तर केवळ माझे विचार आणि गुणवत्ता हे निकष ठरले असते?

अर्थात, अमेरिकेतही वेगवेगळ्या राज्यांमधे खूप तफावत आहे, व्यक्तिसापेक्षही खूप तफावत आहे. पण माझ्यापुरतं, माझ्या छोट्या कुटुंबापुरतं तरी ते स्वप्न आजवर खरं होतं.

माझी नोकरी गेली. चूक कोणाची? कोण बरोबर? हे विचार आधी मनात आले ही होते. वेगवेगळ्या लोकांना (स्वत:सकट) दोष देऊन झाले ही होते. Rather, सगळंच एकट्या माणसाच्या खांद्यावर टाकून वर मानभावी पणे, "हे अमेरिका आहे- इथे कोणीही नशीब काढू शकतं, आणि तुम्ही नशीब काढलं नाही तर तुमच्यातच काहीतरी कमी आहे!" हे सांगणाऱ्या अमेरिकन स्वप्नाच्या विचारसरणीलाही निकालात काढून झालं.

पण आज जेव्हा ती वेळ आली, तेंव्हा मिटिंगरूम मधे गंभीर चेहऱ्याने मला "वाईट बातमी" सांगणारे लोकच मला स्वत:पेक्षाही जास्त ओशाळलेले वाटले. तेंव्हा मला पुन्हा आरशात लख्ख माझा चेहरा दिसला. कधी माझा वृथा अभिमान दिसला, कधी वैयक्तिक कारणांमुळे हरवलेल्या दिशा दिसल्या, कधी निव्वळ कामाने थकून गेलेला जीवही दिसला.

आणि मला कळलं- Life is a two way street. मनातून जी साद निघते, त्याचे अगदी तस्सेच पडसाद नियतीत/जगात/आसमंतात उठत असतात. आता थांबून पुन्हा मनन करायला हवे...

12/9/09

ध्येय, प्रेम आशा यांची...

युद्धात माणसांचं काय हरवतं? असं विचारण्यापेक्षा, युद्धात मरण बघितल्यावर माणसांना जगून बघायचं काय उरतं? ह्याचा शोध घ्यायला गेलो, तर कदाचित हेमिंग्वेच्या (Hemingway) The Sun Also Rises चं उत्तर सापडेल.

Bullfighting च्या रिंगणातही एक वेगळंच युद्ध माजलेलं असतं. मॅटॅडोर (Matador) आणि पिकॅडोर (Picador) यांचा माजलेल्या सांडाभोवती झिम्मा. निसर्गातल्या सगळ्याच घटकांप्रमाणे सांडाची प्रवृती सरळधोट, निर्भिड आणि पवित्र असते. माणूसपणातून जन्माला आलेल्या क्षुद्रतेचा त्यात लवलेशही नसतो. शिंगांना रक्ताची चटक लागलेले हे सांड, अंगावरच्या असंख्य जखमांनी रक्तबंबाळ होऊनही आपला माज न सोडता, मृत्यूला धडका देतात, ती केवळ त्यांची क्षमताच नव्हे, तर एकप्रकारे त्यांच्या जन्माची पूर्तता असते. त्यांचा जन्मच मुळी मरणाशी झुंज द्यायला झालेला असतो!

तर जातिवंत मॅटॅडोर मात्र, सांडापुढे, त्याच्याच येवढा "माज" घेऊन उभे ठाकतात. त्यांच्याकडे तलवारी, सुरे असतात, आणि सांडाला चिथवण्यासाठी लाल कापडी पंखा. ही लढाई एकतर्फी असते, कारण सांड एकटा, आणि हे टोळकं. पण विजयाची खात्री असतांनाही, अंगावर धावून येणाऱ्या सांडापुढे स्वत:ला स्वच्छ प्रकट करण्यात मॅटॅडोरची खरी "माणुसकी" दिसते. आपला मर्मभेद करू शकेल, अशी आशा त्याला दाखवून, हुलकावण्या देत देत त्याला मारतांनाही त्याचा मान राखणं ज्या मॅटॅडोरला जमतं, त्याला खरा "मर्द" समजतात.

पाठीचा ताठ कणा घेऊन, आपलं पौरूष दाखवत ते लाखो लोकांसमोर मृत्यूचं हे महानाट्य उभं करतात, तेव्हा त्यांना लाखो लोकांची टाळी मिळते.

हेमिंग्वेचा जेक बार्न्स (Jake Barnes) हा bullfighting चा रसिक श्रोता आणि चाहता आहे. त्याने युद्धात स्वत:च्या प्राणांहूनही मूल्यवान असं काहीतरी - त्याचं पौरूष- गमावलंय. आता युद्धानंतर ब्रेट (Brett) च्या प्रेमात पडल्यावर तिला जे हवं ते तो देऊ शकत नाही. त्याच्यावर आतोनात प्रेम असूनही, मनासारख्या पुरूषाच्या शोधात अनेकांबरोबर संग करणारी ब्रेट सुद्धा स्वत:ला माफ करू शकत नाही. त्या दोघांच्या मित्रांचं टोळक्यातला प्रत्येक जण Brett कडे आकर्षित होतो, पण त्यांना जेकची सर येत नाही.

जेकचं दु:खच असं अपरिहार्य- त्याचं ओझं जातिवंत सहजतेने वागवत, आणि ब्रेटला तशातही आधार देत तो उभा आहे- Bullfighting च्या रिंगणात. युद्धात अनेकांनी गमावलेली माणुसकी आणि सौजन्य अजूनही त्याच्यात शिल्ल्क आहेत.

पण युद्धा आधीचा तो भोळा विश्वास? ती ध्येयासक्ती, ते राष्ट्रप्रेम - जगातल्या कुठल्याही दोघांनी एकमेकांवर करायचं असतं, तसं निस्वार्थ प्रेम- जेकचं हे हरवलेलं धन त्याला कुठून परत मिळणार?
ध्येय, प्रेम आशा यांची/ होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजितो या/ आम्ही भंगणाऱ्या मूर्ती!
काढ सखे गळ्यातील/ चांदण्याचे तुझे हात
क्षितिजाच्या पलिकडे उभे/दिवसाचे दूत.
-कुसुमाग्रज

हेमिंग्वेच्या पुस्तकातली सगळीच पात्र - कधी जीवावर उदार होऊन रिंगणात उभे राहणारे मॅटॅडोर असतात, तर कधी जीवनाच्या निरर्थकतेने रक्तबंबाळ झालेले, तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची आत्मवृत्ती असणारे सांड.

गर्ट्र्ड श्टाईन (Gertrud Stein), ह्या हेमिंग्वेच्या मैत्रिणीने त्यांना दिलेले नाव--------- The Lost Generation.


9/6/09

मी स्वत:वर प्रेम करते!

कुठून कोणजाणे, आमच्या घरच्या सगळ्यांना आत्मविश्वासाचा विंचू चावलाय. श्यामच्या आईसारखं, "माझा मुलगा पोहायला शिकला नाही, हे सांगायला मला किती लाज वाटेल होSS श्याम!" अशी प्रेमळ, पण नकारात्मक धमकी न देता आमच्या आई-बापांनी आम्हाला कायम, "पोहणं काय? सोप्पं असतं, तुला येईल पटकन् ! आमची मुलगी आहेच मुळात हुश्शार!" अशी पाठीवर थापच देऊन पाठवल्यावर मनात कधी शंकाच आली नाही- की हे आपल्याला जमेल का?


आज मोठेपणी मला पदोपदी त्यांची आठवण येते- आमचे निर्णय, आमचे विचार, आमच्या कल्पनांचं नेहमी स्वागतच करणारे माझे आईवडील सगळ्यांनाच का नाही लाभत ?
"तुला कला-शाखेत जायचं का? जा. तू जिथे जाशील तिथे मन लावून काम करशील आणि त्यात तुला यश मिळेल. पण बेटा, हा निर्णयही तू नीट विचार करून घे." हे विश्वासाने सांगणारे ते भेटले म्हणून आज माझ्या आयुष्यात मला जे करायचं होतं ते मी करू शकले.
तुम्ही पण विचार करा- तुम्ही स्वत:ला आवडता का? मला मी आवडते. ह्याला मी overconfidence समजत नाही, तर आईवडीलांनी दिलेली आत्मविश्वासाची देणगी समजते.


तुमचे केस सरळ तर नाहीतच, पण झिपरे म्हणावेत इतके नाठाळ असतांना, गालांवर थोडं अतिरिक्त मास दिसायला लागलं असतांना, लेटेस्ट फॅशनचा गंध नसतांना, किंवा मेक-अप केलेला नसतांनाही- तुम्हाला स्वत:चं रूप सुंदर नव्हे, पण आनंददायक (pleasant) वाटतं का?
उद्या तुमच्या समोर मॅट डेमन येवो, की हॅली बेरी येवो, त्यांनी तुम्हाला, तुम्ही जसे आहात तसं स्वीकारणं तुम्हाला अपेक्षित आहे का? का नसावं? प्रत्येकालाच पुढच्या माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतंच नं? " रोमन हॉलीडे" सिनेमात खुद्द राजकन्येलाही एका फाटक्या पत्रकाराची मैत्री, प्रेम हवसं वाटतं, ते काय त्याचे कपडे बघून?


मी स्वत:वर प्रेम करते, पण आंधळं प्रेम करत नाही. स्वत:च्या चुका कबूल करायला लाजत ही नाही. पण स्वत:वर प्रेम केल्यामुळे मला इतरांवर प्रेम करायला जमतं. कुणाचं यश बघून असूया वाटणे, पगारांची तुलना करून त्यात कमीपणा वाटणे, हे मला फार विचित्र वाटतं. अरे, झोपडपट्टीत तुम्ही उपाशीपोटी असतांना पुढच्या माणसाकडे वडापाव असेल, त्याची असूया वाटणं सहाजिक आहे, पण तुमचे केस पांढरे, आणि इतरांचे काळे म्हणून असूया वाटावी???


मी खूपदा विचार करते, की नेमकं आपलं स्वत्त्व कशात असतं? कशात असावं? कुणाचं दिसण्यात, कुणाचं पैशात, तर कुणाचं एका आवडत्या ब्रॅन्डच्या सिगरेटीतही स्वत्त्व असतं. मला वाटतं, स्वत्त्व हे असं कुठल्यातरी मूर्त-अमूर्त गोष्टीला चिकटवूच नये. त्याची गरजच नसते. तुम्ही तुम्ही आहात- हेच तुमचं स्वत्त्व असतं.


स्वत:वर प्रेम असेल, तर ते तुमच्या कामात, तुमच्या कपड्यात, आयुष्याच्या प्रत्येक पैलूत सकारात्मक रीतीने प्रकट होतं. मी स्वत:वर प्रेम करते, म्हणून मी स्वत:ला चांगल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून धडपडते. माझं काम चांगलं व्हावं म्हणून धडपडते. त्यातला आनंद मिळवल्यावर मला त्या आत्मविश्वासाच्या विंचूबद्दल फार कृतज्ञता वाटते. आणि मला हा आत्मविश्वास आहे, म्हणूनही मी स्वत:वर प्रेम करते!
तुम्हाला काय वाटतं? स्वत:वर प्रेम करावं का?

7/15/09

माझी भारतात न्यायची सूटकेस

माझी भारतात न्यायची सूटकेस
भरतेय हळूहळू
अपेक्षांनी, लाडिक हट्ट, उंचावलेल्या भुवया, निरागस कुतुहल
क्वचित, ओथंबलेल्या अश्रूंनी.


जुने झालेले कपडे तिथे "देऊन टाकायला" नेतांना
स्वत:च ओशाळी
“शोभेच्या वस्तू गुंडाळायला बरे पडतात
जुने कपडे!” समर्थनासाठी.

सुटकेसचे एक एक पदर रचतांना
कुठून अचानक कुणाची आठवण
घमघमली. पिवळ्याधमक गर्द झेंडूची भेट
आता काय न्यावी त्यांना परतभेट? - पर्फ्यूमची बाटली???

एक एक वस्तू शक्यतोवर
सुट्या सुट्या खोचल्या तरीपण
आपल्या पोत, जाडी, आकारासकट
आदळणार एकमेकींवर- एअरपोर्टवरच्या मिठीगत
ते प्रेम होतं- की परिस्थितीनुसार-
फक्त व्यवहार?

पिकासोच्या चित्रासारखे
चित्रामागून उलगडताहेत
एक एक कोपरे.
कितीही झाकलं तरी बोडकेच राहणारे.

पिकासोने स्त्री पाहिली
आरशातून प्रत्येक अंगाने
स्वत:लाच न्यहाळणारी.

तशी माझी सूटकेस
थोड्या आनंदाने, थोड्या अनिच्छेने
प्रवासाला निघतेय.

6/23/09

तुझं अक्षर...

आज खूप दिवसांनी तुझं अक्षर दिसलं
मी तुला दिलेलं पुस्तक
कव्हर लावून परत करतांना
नाव घालून दिलेलं-
माझं नव्हे- पुस्तकाचं!!!
एक एक काना-मात्रा-वेलांटी
किती जपून जपून काढलेलं

भेटायला येतांना तीन-तीनदा
आरशात पाहिल्या सारखं
ते अक्षर!

"न" आणि "व" सारखेच दिसतात तुझे
हे तुझं व्यक्तित्व
थोड्या साशंक अभिमानाने
स्नेहपूर्ण विश्वासाने हात पुढे करावा
तसं ते अक्षर!

मग पुढे आपण खूप पत्र लिहिली.
माझं अक्षर तुझ्या अक्षरासारखं व्हायला लागेपर्यंत.
माझ्या मराठीतला "ल" आणि तुझ्या हिंदी-मिडियमच्या "ल" मधला फरक
डोळ्यांना दिसेनासा होईपर्यंत
माझ्या वाटोळ्या अनुस्वाराचं तू मला भान आणून देईपर्यंत.
लिहिलेला प्रत्येक शब्द मी तुझ्या अक्षरातून वाचायला लागले तोपर्यंत.

त्या दिवसांवरची धूळ आज
अचानक झटकतांना
तुझं अक्षर दिसलं!
आणि डोळ्यांतल्या पाण्याबरोबर वहायला लागलं
धूसर धूसर होईपर्यंत...

3/25/09

सावली

"अथर्वशीर्ष येतं?" - हो.
"रांगोळी काढता येते?" - बऱ्यापैकी छान.
"सवाई गंधर्व ला जाणारेस का?" - अर्थात! शास्त्रिय शिकतेय गेली ६ वर्ष- कानसेन झाले तरी मिळवली.
"अरूणा ढेरे"? - त्यांची नवीन कविता दिवाळी अंकात वाचली. खूप सडेतोड तरी सुंदर वाटली.
"ज्ञानेश्वरीवर प्रवचन आहे." - हो का? मला खूप आवडतात त्यांच्या विराण्या.
====================
- "पासओव्हर (passover) कधी आहे?" - चेहरा कोरा.
- "कालचं आमचं डिनर म्हणजे three-can-cooking होतं." - ह्म्म- मला का सुचत नाहीत असले भन्नाट शब्दप्रयोग? three-can-cooking!!!!!!!
- "मी ४ वर्षाची असतांना द्राक्षाचा रस म्हणून चुकून वाईन प्यायले होते म्हणे" - तू मला काही चांगल्या वाईनची नावं सांगशील का? मला try करून बघायच्यायत...
- "Kind of like P-Diddy... :) " - हा कोण गायक बुवा?

कधी जाणवलं नव्हतं भारतात असतांना, की एक "सांस्कृतिक सत्ता" असते. तुम्ही तिचे सभासद असाल, तर तुमच्याकडे देण्यासारखं खूप असतं. "गृहस्थ" चा लिंगबदल केला, की "गृहिणी" होतं, हे तुम्हाला माहिती असतं. दृष्टद्युम्न द्रौपदीचा भाऊ होता, हे ही. "साबण लावली" म्हणणाऱ्यांपेक्षा तुम्ही खुशाल स्वत:ला श्रेष्ठ समजू शकता.
पण वेगळ्या देशात ज्या क्षणी पाऊल ठेवलं, त्या क्षणी तुम्ही अक्षरश: होत्याचे नव्हते होता. तुमचं सांस्कृतिक भांडवल, घसरणाऱ्या रूपयासारखं क्षणार्धात कचरा-कचरा होऊन जातं. किंवा अगदीच कचरा नसेल कदाचित, पण शोभेच्या काचेच्या बाहुलीसारखं, कधीमधी काढून पुसायचं, पुन्हा कपाटावर ठेवून द्यायचं, असं होऊन जातं.

कालपर्यंत मी अखंड, सुसंबद्ध होते, आणि आज?
आज मी सदा मूक, पण ऊन कुठल्याही दिशेला गेलं तरी पायाला घट्ट धरून राहणारी, ती सावली झाले आहे.
ह्या देशाला देण्यासारखं असेल माझ्याकडे बरचसं, पण इथून खूपसं घेतल्याशिवाय मला जे द्यायचं ते देता ही येणार नाहिये, ही अस्वस्थ करणारी भावना आज मला छळत राहिली.

काल कोणी मला म्हटलं असतं, की तुमच्या उच्चभ्रू संस्कृतीने आमची गळेचेपी झाली, तर मी खूप समजूतदारपणे त्यांच्याकडे बघून म्हटलं असतं, "पण आम्ही ती मुद्दामहून करत नव्हतो!"
आज "खालच्या पायरीवर" असण्याचा अनुभव घेतेय. त्यात कमीपणा वाटण्यापेक्षा निराशा वाटतेय.

जर कोणी मला विचारलं, की अमेरिकन संस्कृतीबद्दल मला काय वाटतं, तर मी म्हणेन, "मला एक दिवस खरी सावली म्हणून इथे जगायचंय. माझ्या अमेरिकन मैत्रिणीच्या घरात तिच्या पाठोपाठ शिरायचंय. ग्रोसरी स्टोअर मधे आम्ही दोघी जातो, पण ती किती वेगळ्या वस्तू उचलते! मग ती घरी जाऊन त्यांचं काय करत्येय ते बघायचंय. माझ्यासारखा तिच्याकडेही असेल पसारा? कोणतं गाणं लावते ती, संध्याकाळी थकून घरी आल्यावर! शनिवारी ती जाते का भक्तीभावाने सिनॅगॉगमधे Hebrew School ला? तिच्या मुलांच्या वाढदिवशी Sprinkler Party म्हणजे नक्की काय करतात???"

मनातल्या मनात यादी करतांना मी शेवटी थकून जाते. सगळ्या गोष्टी शिकता येतात, पण संस्कृती? अदृश्य भिंतीसारखी ती खुणावते, पण दार सापडत नाही. कधी मला वाटतं ती धबधब्यासारखी आहे, पण माझे फक्त तळवेच टेकलेत कसेबसे पाण्यात. बाकीची मी- अधांतरी! कदाचित सावलीचं प्राक्तनही ह्यापेक्षा बरं असेल!

10/30/08

ओवाळणी

असं का होतं? जे खरंच, अगदी मनापासून लिहायचं असतं, त्याच्याच साठी शब्द का सापडू नयेत? दु:खाबद्दल लिहणं सोपं असतं म्हणतात, पण दिवाळीच्या प्रकाशाने उजळलेल्या मंगल संध्याकाळच्या आनंदाबद्द्ल कसं लिहावं?

काल पाडवा झाला. घरी दोघंच होतो, आणि इथल्या नियमांमुळे पणत्यांऐवजी टी-लाईट्स लावले, दिव्यांची माळ सोडली, आणि थंडीत कुडकुडत सूप पीत बसलो! ह्यावेळी खरं भारतात जायचं होतं, पण नाहीच जमलं- आणि तेंव्हा वाटून गेलं- आधीची मी असते, तर "घरची" आठवण काढून बादल्या बादल्या रडले असते- पण आता, हे आमच्या दोघांचं विश्व किती सुबक आणि सुरक्षित वाटतंय! लाडू चिवड्याचे बकाणे भरतांना एखादी आठवण ताजी होते, तेवढीच. बाकी हा वर्तमान, त्या दिव्यांच्या मंद ज्योतीसारखा इथल्या कडाक्यातही अखंड तेवतो आहे. त्याचीच ऊब सगळीकडे आमच्या Central Heating सारखी पसरली आहे!

दिवाळी म्हणून ना सुट्टी होती, ना कुठे जाण्याची लगबग. तर मग ikea तून नुकतं आणलेलं फर्निचर जोडत बसलो. काडीकाडी जोडून पक्षी घरट्यात संसार मांडतात म्हणे- आम्ही आपले power screwdriver आणि ikea manual घेऊन सज्ज झालो. माझ्या साठी एक workstation बनवायचं होतं. माझी हौस म्हणून सरळ दोन मोठ्या bookcases न घेता, एक निमुळती, एक रूंद, अशी मांडणी करता करता पाठ तुटायला आली, पण घर जरा लागल्यासारखं झालं.
एरवी कुरकुर करणारा नवरा, आज निमूट घाम गाळत होता, ते पाहून मलाच कसंतरी झालं.

मग मी नवऱ्याला म्हटलं, "चल, तुला ओवाळते, आणि होहोबा (jojoba) तेलाने मसाज करते मस्तपैकी. मग तू आंघोळ करायची तर कर, नाहीतर उद्यापर्यंत मुरू दे...!"
अगदी सोफ्याखाली रांगोळी काढण्यापासून दोघंच होतो तरी कपडे बदलण्यापर्यंत छान तयारी केली. मी ओवाळतांना म्हटलं, "मग काय आहे माझी ओवाळणी?"
"आता येवढं सामान घेतलं, घर तुझ्या मर्जीने सजवलं, तरी पुन्हा ओवाळणी मागतेय बयाबाई!" असं उत्तर ऐकायला कान अगदी सरावले होते, तेवढ्यात...
"मी काहीच जास्ती देऊ शकत नाहिये तुला पाडव्याला, फक्त Dunkin Donuts मधून कॉफीसाठी हे घे!" अगदी चेहरा पाडून त्याने मोजून दोन डॉलर माझ्या ताम्हनात टाकले. बहुतेक स्वारी घरी येतायेता पाडव्याबद्द्ल पार विसरली असावी. करोडोपती झालास तरी कॅश साठी बायकोकडे हात पसरायचे- नेहमीची सवय. त्यामुळे पाकिटात जेवढे होते, त्याने भागवायची वेळ आली होती.

त्या क्षणी त्याचा गोडूला बिच्चारा चेहरा बघून जे माझ्या पोटात कालवलं, ते शब्दात पकडायचा खूप प्रयत्न केला- नाही जमलं. मी सरळ त्याच्या गळ्यात गळाच टाकला, आणि एकच शब्द सुचला, "कृतज्ञता". किती मागतो आपण आयुष्याकडून, आणि मला आजवर ते सगळंच मिळत गेलं. सहजच. कधीकधी, न मागताही! कधीकधी मागायच्याही आधी.

किती गृहित धरतो आपल्या अपेक्षा, आणि त्या अपेक्षांची पूर्तीही! पण कधीच का सांगू शकत नाही येवढ्या आनंदाबद्द्ल, की ज्याने डोळे भरून येतात- अगदी दिवाळीच्या दिवशीही???
तो मिळाला, त्या क्षणीच माझी ओवाळणी तर मला मिळाली होती!

...................................

मग आम्ही जोडीने भेंडीची भाजी आणि फ्रोझन पोळ्या जेवलो, आणि सोफ्यावर बसून जोडीने निवडणूक-विशेष बघायला लागलो :) :) :)

10/19/08

देणाऱ्याने...

तुझ्या प्रेमात सगळे पडले, कारण तूच स्वत:च्या प्रेमात पडलेला!
तू कृष्ण!
गोपींसाठी रास रचला म्हणतांना शतरूपांनी त्यांच्या बरोबर पायांचा ताल धरणारा, "रमण"-
स्वत:तच रमलेला.
मी वेडी राधा. मला कळलं कसं नाही हे?

देण्याचा धर्म माझ्यासाठीच होता, आहे.
घेण्यासाठी तू सगळ्या आसमंतात भरून राहिला आहेस.
ज्या दिवशी फिरून तुझ्या प्रेमात पडणार नाही मी, त्या दिवशी माझ्या जीवनाला अर्थ उरणार नाही-
हे माझ्या कपाळी लिहूनच गेलायस ना तू?

देणाऱ्यानं आनंदानं द्यावं. कारण त्यांना देण्याचं "भाग्य" लाभलं!
मी खूप दिवस गृहितच धरून चालले होते- माझं भाग्य!

पण मग मला राग आला एकेदिवशी.
मी ही केला हट्ट! का म्हणून मी द्यावं दरवेळी? तू का नाही देऊ शकत कधी?
तु मनधरणी करशील म्हटलं, तर वर तूच रूसून बसलास!
स्वत:हून देण्याचं सोड- निदान परत तरी कर म्हटलं.

तर ते ही नाही?

दिवस गेले, महिने, वर्ष गेली. मी रागावलेली, तू रूसलेला.
मग मला उमगलं-
देणाऱ्यानं "द्यावं लागलं" असं सांगण्यापेक्षा, "देण्याचं भाग्य मिरवावं", त्यातच देवाचं देवपण, आणि माणसाची माणूसकी.

गोकूळ सोडल्यावरही वेगवेगळ्या रूपात तू राधेला शोधतोयस, त्यातच नाही का मला माझं उत्तर मिळालं?

8/11/08

उलटी अमेरिका

आज कित्येक वर्षांनी पुन्हा
आई-बाबांचा हात धरून
उत्साहाने गेले फिरायला.
फक्त,
आज मी गोष्टी सांगतेय,
ते ऐकतात, कौतुहलाने!
मी रस्ते दाखवते,
ते येताहेत मागून
ह्या नव्या जगातली प्रत्येक गोष्ट
लहान मुलांच्या डोळ्यांनी
मनात साठवत....
“अय्या! इथे दारं उलटी, दिव्यांची बटनं उलटी,
गाड्या तर उलट्या धावतातच!”
“छे, इथल्या भाज्यांना चवच नाही मुळी!”
“बाSSSSSपरे! येवढ्या मोठ्या पार्किंग लॉट मधे, गाड्या फक्त तीन?”

------मीच बोलले नव्हते का ही वाक्य,
अमेरिकेतल्या माझ्या पहिल्या वहिल्या दिवशी?

पिढ्यांचं चक्रही, ह्या उलट्या अमेरिकेने उलटंच फिरवलंय की!
“तुम्हाला पोरं झाली की कळेल...” हे त्यांचं टिपिकल वाक्य.
“तुम्हाला इथे राहून थोडे दिवस झाले, की कळेल....” हे माझं.

मॉलमधे कपड्यांवरची लेबलं बघून
त्यांचे भांबावलेले चेहरे बघतांना
दाटून आला गळा-
वाटलं, त्यांनीही करावा माझ्याकडे हट्ट-
स्वेटर, घड्याळ, मोत्याची माळ
पर्स घेऊन देण्याचा.....
पण ३ डॉलरच्या कॉफीतच होतात शेवटी त्यांचे लाड
तेव्हा कळते त्यांची धडपड-
आपल्या बालपणीच्या लाखो मागण्या पूर्ण करायची!

कधीकधी होतातही वाद,
“तुम्हीच अमेरिकन झालात, तर तुमची पोरं कसली मराठी बोलणार?”
-----“पण त्यांनी मराठी बोलावं, हा अट्टहास का तुमचा?”
“आपण नायगराला पराठे घेऊन जाऊ...”
------ “ह्म्म....तुमच्या चवी काही बदलायच्या नाहीत!”
“इथे तुम्हाला माणसांचंच वावडं आहे!”
-------”हो, तिकडे शेजाऱ्यांना चांभार चौकशा असतात, त्यापेक्षा हेच बरं!”

पण आतून कधीतरी आपणही घातलेलेच असतात ना हे वाद स्वत:शी?
बर्गरला आपलं म्हणता येईपर्यंत गेलीच ना ५ वर्ष?
त्यांनीही अशीच समजून घेतली असेल ना- माझी स्वयंपाकाची नावड,
माझी नोकरीची जिद्द, मी उडवून लावलेले उपास-तापास......
साडी नेसून  दाखवण्याच्या कार्यक्रमाबद्द्ल पोटातून चीड!

आणि आज मी सांगतेय त्यांना,
की हे जे इथे असं आहे, ते तसंच स्वीकारावं लागतं.
इथल्या माणसांमधे, मिळून मिसळून रहावं लागतं- नव्हे, रहायला आवडतंही.

पण मग त्यांना विमानात बसवून आलो,
की हेच इथलं रोजचं जग अनोळखी वाटायला लागतं...
वैराण वाळवंटात येऊन पडल्याचा भास!
कसे विसरलो आपण जन्मापासून भारतात घेतलेले श्वास?
जाऊया का परत?

नकोच.
त्यांना मिळू दे आता इथे आपल्याकडे-
पुन्हा एकदा- एक निर्भर निश्चिंत बालपण.
म्हणतात ना, “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...”

7/21/08

एक तक्ता:

मोठ्या दृश्यासाठी तक्त्यावर क्लिक करा: