3/13/06

साड्यांची गोष्ट

साड्यांची गोष्ट

बनारसी शालूची जर लग्नाला
जिजामाता चा बघावा थाट
ओरिसा ईक्कत आल्या धावत
कांजीवरम ने घातला घाट.

संक्रांतीला चंद्रकळा काळी
चैत्रात कैरी इरकलची,
साधीच धारवाड घालावी पावसात
इंदुरी खास मंगळागौरीची

दिवाळी झगमगते पैठणी काठांनी
भाऊबीज ओवाळते पुसायला
पुढच्या वेळी देशील का मला
चंदनी कोसा नेसायला?

डोहाळेजेवणाचा मरवा लपला
तलम म्हैसूरी पदरात
कलकत्ता माखली छोट्या पावलांनी
चिमणी झोपली पाळण्यात.

रेशमी साड्यांचा संपला मौसम
नेसावं नायलॊन कॊटन
भीशीची कोरा शाळेची कोटा
एखादी मधूनच चिकन.

साड्यांची नव्हे गोष्ट ही माझी
उभ्या आडव्या धाग्यांचं जीवन
जीन्सच्या क्रांतीत जपून नेस पोरी
माझी आवडती शांतीनिकेतन.
- प्राजक्ता

3 comments:

Manjiri said...

वा प्राजक्ता, ठेवणीतल्या साड्या आणि त्यांच्यात गुंतलेल्या आठवणी ही माझीही मर्मबंधातली ठेव आहे. मस्तच आहे कविता. आगदी तलम पैठणी

hemant_surat said...

प्राजक्ता,
साड्यांवर एवढी चांगली कविता मी प्रथमच वाचली. blog उशिरा बघितला पण comment ताजी आहे. जरूर लिही.
हेमंत_सूरत

chetan fadnis said...

खुपचं छान