8/11/08

उलटी अमेरिका

आज कित्येक वर्षांनी पुन्हा
आई-बाबांचा हात धरून
उत्साहाने गेले फिरायला.
फक्त,
आज मी गोष्टी सांगतेय,
ते ऐकतात, कौतुहलाने!
मी रस्ते दाखवते,
ते येताहेत मागून
ह्या नव्या जगातली प्रत्येक गोष्ट
लहान मुलांच्या डोळ्यांनी
मनात साठवत....
“अय्या! इथे दारं उलटी, दिव्यांची बटनं उलटी,
गाड्या तर उलट्या धावतातच!”
“छे, इथल्या भाज्यांना चवच नाही मुळी!”
“बाSSSSSपरे! येवढ्या मोठ्या पार्किंग लॉट मधे, गाड्या फक्त तीन?”

------मीच बोलले नव्हते का ही वाक्य,
अमेरिकेतल्या माझ्या पहिल्या वहिल्या दिवशी?

पिढ्यांचं चक्रही, ह्या उलट्या अमेरिकेने उलटंच फिरवलंय की!
“तुम्हाला पोरं झाली की कळेल...” हे त्यांचं टिपिकल वाक्य.
“तुम्हाला इथे राहून थोडे दिवस झाले, की कळेल....” हे माझं.

मॉलमधे कपड्यांवरची लेबलं बघून
त्यांचे भांबावलेले चेहरे बघतांना
दाटून आला गळा-
वाटलं, त्यांनीही करावा माझ्याकडे हट्ट-
स्वेटर, घड्याळ, मोत्याची माळ
पर्स घेऊन देण्याचा.....
पण ३ डॉलरच्या कॉफीतच होतात शेवटी त्यांचे लाड
तेव्हा कळते त्यांची धडपड-
आपल्या बालपणीच्या लाखो मागण्या पूर्ण करायची!

कधीकधी होतातही वाद,
“तुम्हीच अमेरिकन झालात, तर तुमची पोरं कसली मराठी बोलणार?”
-----“पण त्यांनी मराठी बोलावं, हा अट्टहास का तुमचा?”
“आपण नायगराला पराठे घेऊन जाऊ...”
------ “ह्म्म....तुमच्या चवी काही बदलायच्या नाहीत!”
“इथे तुम्हाला माणसांचंच वावडं आहे!”
-------”हो, तिकडे शेजाऱ्यांना चांभार चौकशा असतात, त्यापेक्षा हेच बरं!”

पण आतून कधीतरी आपणही घातलेलेच असतात ना हे वाद स्वत:शी?
बर्गरला आपलं म्हणता येईपर्यंत गेलीच ना ५ वर्ष?
त्यांनीही अशीच समजून घेतली असेल ना- माझी स्वयंपाकाची नावड,
माझी नोकरीची जिद्द, मी उडवून लावलेले उपास-तापास......
साडी नेसून  दाखवण्याच्या कार्यक्रमाबद्द्ल पोटातून चीड!

आणि आज मी सांगतेय त्यांना,
की हे जे इथे असं आहे, ते तसंच स्वीकारावं लागतं.
इथल्या माणसांमधे, मिळून मिसळून रहावं लागतं- नव्हे, रहायला आवडतंही.

पण मग त्यांना विमानात बसवून आलो,
की हेच इथलं रोजचं जग अनोळखी वाटायला लागतं...
वैराण वाळवंटात येऊन पडल्याचा भास!
कसे विसरलो आपण जन्मापासून भारतात घेतलेले श्वास?
जाऊया का परत?

नकोच.
त्यांना मिळू दे आता इथे आपल्याकडे-
पुन्हा एकदा- एक निर्भर निश्चिंत बालपण.
म्हणतात ना, “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...”

12 comments:

Anonymous said...

विशाखा अगदी मनातलं लिहीतेस.
छान आहे तुझा ब्लॊग.

Anonymous said...

हे जे इथे असं आहे, ते तसंच स्वीकारावं लागतं.
इथल्या माणसांमधे, मिळून मिसळून रहावं लागतं-

Not necessary. Tumcha choice asto ikde kasa rahaycha...American tumhala force akrat nahit ki kasa raha mhanoon...
बर्गरला आपलं म्हणता येईपर्यंत गेलीच ना ५ वर्ष?

Burger la apla mi tar kadhich mannar nahi. Tumhi manla asel tar mana.
-----“पण त्यांनी मराठी बोलावं, हा अट्टहास का तुमचा?”
Marathi varchya prema khatar.

विशाखा said...

थॅंक यू ऍनॉनिमस! तुमचा प्रतिसाद बघून खूप बरं वाटलं. मनापासून लिहिण्याचा प्रयत्न तरी करते आहे- खूप दिवसांनतर...

विशाखा said...
This comment has been removed by the author.
विशाखा said...

खरंय ऍनॉनिमस तुमचं म्हणणं- बर्गर असो, की अमेरिकन जीवनपद्धती, की अमेरिकन माणसं, की अमेरिकन भाषा- कशाशीच जुळवून घेण्याची सक्ती नसते कोणावर- पण सहसा प्रत्येकालाच आपापल्या सांस्कृतिक धार्मिक वैयक्तिक पातळीवर किती मिसळायचं, आणि किती वेगळं रहायचं, ह्याच्या मर्यादा आखाव्याच लागतात.
“मिळून मिसळून रहावं लागतं- नव्हे, आवडतंही!” ह्या शब्दांकडे तुमचं लक्ष वेधून घ्यावसं वाटतं.
बर्गरचं म्हणाल, तर मी शाकाहारी- पण मग subway मधे veggie pattie खातांना ती कोणत्या तेलात तळलीये, ह्याचा विचार मी करत नाही, कारण मी धार्मिक कारणाने शाकाहार स्वीकारलेला नाही.

जिथे माझ्या आईवडिलांनी त्यांच्या मतांचे भार माझ्यावर टाकले नाही, तिथे मी सुद्धा माझ्या मुलांना समजून घ्यायला पहिजे असं वाटतं. म्हणून, मराठी जपण्याचा अट्टहास माझा आहे, कारण मराठीवर प्रेम माझं आहे- माझ्या मुलांना मी लावूनही ती गोडी लागत नसली, तर तशी जबरदस्ती मी त्यांच्यावर कितीक करावी?

Bhagyashree said...

mala khup avadli hi kavita/he lalit.. itka manatla ahe.. mazehi aai baba yetil year end laa.. mi tyanchi ashich hous pri karnare,jashi tyanni mazya lahanpani keli! :)

विशाखा said...

धन्यवाद भाग्यश्री! तुमच्या मनापासूनच्या प्रतिसादाने तुम्ही मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय बरं का :-)

कोहम said...

पण मग त्यांना विमानात बसवून आलो,
की हेच इथलं रोजचं जग अनोळखी वाटायला लागतं...

so true. everyone suffers through this...or maybe choses to suffer.

विशाखा said...

Thank you "Koham", to tell you the truth, our parents were here last year- and it took me a whole year to sort out my feelings enough to be able to write this!

NIKHIL PUJARI said...

अगदी मन पिळवटुन टाकणारी कविता!!!!

प्रत्येकाच्या मनात अशी द्वंद्वे सुरु असतातच. आपण किती जरी म्हणालो की आम्ही कड़वे देशभक्त आहोत आणि देश, धर्म, संस्कृति सोडणार नाही, तरी लोकांना पटत नाही. ते म्हणतात, अहो सगळेच अशा फुशारक्या मारतात आणि शेवटी green card साठी मर मर मरतात.

माझे एक आपले मत आहे. काहीही झाले तरी आपण आपले राष्ट्रीयत्व, आपला धर्म, आपली संस्कृति, आपली भाषा, आपला वारसा आणि आपल्या घरट्याकडे परत जाण्याची इच्छा सोडली नाही पाहिजे. हा भाग बराचसा मनोनिग्रहावर अवलंबून असतो.
इथे राहून सुद्धा आपली भारतीय जीवनपद्धती पूर्णपणे टिकवून ठेवता येते. त्यात कोणतीही अडचण मला तरी जाणवली नाही.

हे सर्व आपण स्वत:ला कसे program करतो त्याच्यावर अवलंबून आहे. सर्वांनी मनापासून खरीखुरी पडताळणी करावी. आपोआप खात्री पटेल!!!
http://aamhikon.blogspot.com/

Silence said...

ह्या वर जरा उशिराच comment देत आहे. आई बाबांच्या ह्याच प्रश्नांना उत्तर देता येत नाही. त्यांच म्हणन की इकडेच राहायचा हट्ट का? खर तर मला स्वत:च व्यक्तीमत्व इथे आल्यावर मिळाल. ते इतर कुठे गेलो असतो तरी मिळालच असत. भारतात असताना स्वत:च अस अस्तित्व नव्हत. कुणाचा तरी भाऊ किंवा मुलगा अशीच ओळख होती. इकडे आधी शिक्षण मग नोकरी. इथे येउन इकडच्या गोष्टी स्विकारल्या म्हणून आपल्या गोष्टी नाकारल्या तर नाहीना. इथे स्वत:ची एक जागा निर्माण केली. जेंव्हा स्वत: काही निर्माण करतो ते आपले होत नाही का? मग माझे काय आणि काय नाही हे ठरवणारे इतर कोण? माझे काही इथेही आहे आणि तिथेही. पण जास्त इथे.

क्रांति said...

sorry for Latest comment!kavita agdi surekh ani blog pan mastach!