3/25/09

सावली

"अथर्वशीर्ष येतं?" - हो.
"रांगोळी काढता येते?" - बऱ्यापैकी छान.
"सवाई गंधर्व ला जाणारेस का?" - अर्थात! शास्त्रिय शिकतेय गेली ६ वर्ष- कानसेन झाले तरी मिळवली.
"अरूणा ढेरे"? - त्यांची नवीन कविता दिवाळी अंकात वाचली. खूप सडेतोड तरी सुंदर वाटली.
"ज्ञानेश्वरीवर प्रवचन आहे." - हो का? मला खूप आवडतात त्यांच्या विराण्या.
====================
- "पासओव्हर (passover) कधी आहे?" - चेहरा कोरा.
- "कालचं आमचं डिनर म्हणजे three-can-cooking होतं." - ह्म्म- मला का सुचत नाहीत असले भन्नाट शब्दप्रयोग? three-can-cooking!!!!!!!
- "मी ४ वर्षाची असतांना द्राक्षाचा रस म्हणून चुकून वाईन प्यायले होते म्हणे" - तू मला काही चांगल्या वाईनची नावं सांगशील का? मला try करून बघायच्यायत...
- "Kind of like P-Diddy... :) " - हा कोण गायक बुवा?

कधी जाणवलं नव्हतं भारतात असतांना, की एक "सांस्कृतिक सत्ता" असते. तुम्ही तिचे सभासद असाल, तर तुमच्याकडे देण्यासारखं खूप असतं. "गृहस्थ" चा लिंगबदल केला, की "गृहिणी" होतं, हे तुम्हाला माहिती असतं. दृष्टद्युम्न द्रौपदीचा भाऊ होता, हे ही. "साबण लावली" म्हणणाऱ्यांपेक्षा तुम्ही खुशाल स्वत:ला श्रेष्ठ समजू शकता.
पण वेगळ्या देशात ज्या क्षणी पाऊल ठेवलं, त्या क्षणी तुम्ही अक्षरश: होत्याचे नव्हते होता. तुमचं सांस्कृतिक भांडवल, घसरणाऱ्या रूपयासारखं क्षणार्धात कचरा-कचरा होऊन जातं. किंवा अगदीच कचरा नसेल कदाचित, पण शोभेच्या काचेच्या बाहुलीसारखं, कधीमधी काढून पुसायचं, पुन्हा कपाटावर ठेवून द्यायचं, असं होऊन जातं.

कालपर्यंत मी अखंड, सुसंबद्ध होते, आणि आज?
आज मी सदा मूक, पण ऊन कुठल्याही दिशेला गेलं तरी पायाला घट्ट धरून राहणारी, ती सावली झाले आहे.
ह्या देशाला देण्यासारखं असेल माझ्याकडे बरचसं, पण इथून खूपसं घेतल्याशिवाय मला जे द्यायचं ते देता ही येणार नाहिये, ही अस्वस्थ करणारी भावना आज मला छळत राहिली.

काल कोणी मला म्हटलं असतं, की तुमच्या उच्चभ्रू संस्कृतीने आमची गळेचेपी झाली, तर मी खूप समजूतदारपणे त्यांच्याकडे बघून म्हटलं असतं, "पण आम्ही ती मुद्दामहून करत नव्हतो!"
आज "खालच्या पायरीवर" असण्याचा अनुभव घेतेय. त्यात कमीपणा वाटण्यापेक्षा निराशा वाटतेय.

जर कोणी मला विचारलं, की अमेरिकन संस्कृतीबद्दल मला काय वाटतं, तर मी म्हणेन, "मला एक दिवस खरी सावली म्हणून इथे जगायचंय. माझ्या अमेरिकन मैत्रिणीच्या घरात तिच्या पाठोपाठ शिरायचंय. ग्रोसरी स्टोअर मधे आम्ही दोघी जातो, पण ती किती वेगळ्या वस्तू उचलते! मग ती घरी जाऊन त्यांचं काय करत्येय ते बघायचंय. माझ्यासारखा तिच्याकडेही असेल पसारा? कोणतं गाणं लावते ती, संध्याकाळी थकून घरी आल्यावर! शनिवारी ती जाते का भक्तीभावाने सिनॅगॉगमधे Hebrew School ला? तिच्या मुलांच्या वाढदिवशी Sprinkler Party म्हणजे नक्की काय करतात???"

मनातल्या मनात यादी करतांना मी शेवटी थकून जाते. सगळ्या गोष्टी शिकता येतात, पण संस्कृती? अदृश्य भिंतीसारखी ती खुणावते, पण दार सापडत नाही. कधी मला वाटतं ती धबधब्यासारखी आहे, पण माझे फक्त तळवेच टेकलेत कसेबसे पाण्यात. बाकीची मी- अधांतरी! कदाचित सावलीचं प्राक्तनही ह्यापेक्षा बरं असेल!

6 comments:

Tulip said...

खूपच सुंदर पोस्ट आहे विशाखा!

>>> कालपर्यंत मी अखंड, सुसंबद्ध होते, आणि आज?
आज मी सदा मूक, पण ऊन कुठल्याही दिशेला गेलं तरी पायाला घट्ट धरून राहणारी, ती सावली झाले आहे.
ह्या देशाला देण्यासारखं असेल माझ्याकडे बरचसं, पण इथून खूपसं घेतल्याशिवाय मला जे द्यायचं ते देता ही येणार नाहिये, ही अस्वस्थ करणारी भावना आज मला छळत राहिली.

खूप पटलं, खूप जवळचं वाटलं वाक्य. सगळच पोस्ट आवडलं.

कोहम said...

hmm

agadi manatala....deshat cultural dada asalele loka paradeshat ekdam daat kadhalelya vaghasarakhe hotat hech khara....samskruti shikata yet nahi ani shikavatahi yet nahi.....ti nasanasat bhinleli asate...janmapasun ghetalelya ekeka shwasachi funkar asate manavar, ti kashi pusun takaNar? kuch paneke liye kuch khona padata hai hech khara,,,

यशोधरा said...

अतिशय सुरेख पोस्ट विशाखा, खूप आवडलं.

श्रद्धा said...

खूप छान लेख. सध्या मी याच 'अमेरिका-ओळख-कालखंडा'तून जात आहे.
तुमचा लेख पटला, पण जसजशी नवी संस्कृती कळत जाते, तसतशी माणसाचं माणसाशी असलेलं नातं जास्त दृढ़ होतं, असा माझा अनुभव आहे.
शिवाय या नविन संस्कृतीबरोबरच आपल्या स्वत:च्या संस्कृतीकडे जास्त अंतर्मुख होऊन बघायला शिकतो, हा साइड-इफेक्ट मला वाटतं आपल्यालाच समृद्ध करूनजातो.

Rahul Revale said...

खूप प्रांजळ प्रकटीकरण आहे. पण खालच्या पायरीवर बसलं तरच हे भान येतं. संस्क्रुतीच्या खालच्या पायरीवर वावरणार्‍यांना त्यांच्या अशा आक्रोशाला शब्दबध्दही करता येत नाही! हे मुकेपणाने माणसांनीच लादलेले दुय्यमपण सोसणे किती जीवघेणे असेल?

Monsieur K said...

very well written :)

i have always had this feeling.. tht when i get the opportunity to visit a foreign place.. i would ideally love to stay there for a few months.. possibly a year.. learn more about the culture.. experience all the seasons.. get to know the nuances of the everyday life.. rather than being a tourist who stays only for a few days.. fortunately or unfortunately, thts not possible always..

nevertheless, if one indeed has to stay in a foreign land for a considerable amount of time.. u do feel the loss of connection with the foreign culture..

all the best!