कुठून कोणजाणे, आमच्या घरच्या सगळ्यांना आत्मविश्वासाचा विंचू चावलाय. श्यामच्या आईसारखं, "माझा मुलगा पोहायला शिकला नाही, हे सांगायला मला किती लाज वाटेल होSS श्याम!" अशी प्रेमळ, पण नकारात्मक धमकी न देता आमच्या आई-बापांनी आम्हाला कायम, "पोहणं काय? सोप्पं असतं, तुला येईल पटकन् ! आमची मुलगी आहेच मुळात हुश्शार!" अशी पाठीवर थापच देऊन पाठवल्यावर मनात कधी शंकाच आली नाही- की हे आपल्याला जमेल का?
आज मोठेपणी मला पदोपदी त्यांची आठवण येते- आमचे निर्णय, आमचे विचार, आमच्या कल्पनांचं नेहमी स्वागतच करणारे माझे आईवडील सगळ्यांनाच का नाही लाभत ?
"तुला कला-शाखेत जायचं का? जा. तू जिथे जाशील तिथे मन लावून काम करशील आणि त्यात तुला यश मिळेल. पण बेटा, हा निर्णयही तू नीट विचार करून घे." हे विश्वासाने सांगणारे ते भेटले म्हणून आज माझ्या आयुष्यात मला जे करायचं होतं ते मी करू शकले.
तुम्ही पण विचार करा- तुम्ही स्वत:ला आवडता का? मला मी आवडते. ह्याला मी overconfidence समजत नाही, तर आईवडीलांनी दिलेली आत्मविश्वासाची देणगी समजते.
तुमचे केस सरळ तर नाहीतच, पण झिपरे म्हणावेत इतके नाठाळ असतांना, गालांवर थोडं अतिरिक्त मास दिसायला लागलं असतांना, लेटेस्ट फॅशनचा गंध नसतांना, किंवा मेक-अप केलेला नसतांनाही- तुम्हाला स्वत:चं रूप सुंदर नव्हे, पण आनंददायक (pleasant) वाटतं का?
उद्या तुमच्या समोर मॅट डेमन येवो, की हॅली बेरी येवो, त्यांनी तुम्हाला, तुम्ही जसे आहात तसं स्वीकारणं तुम्हाला अपेक्षित आहे का? का नसावं? प्रत्येकालाच पुढच्या माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतंच नं? " रोमन हॉलीडे" सिनेमात खुद्द राजकन्येलाही एका फाटक्या पत्रकाराची मैत्री, प्रेम हवसं वाटतं, ते काय त्याचे कपडे बघून?
मी स्वत:वर प्रेम करते, पण आंधळं प्रेम करत नाही. स्वत:च्या चुका कबूल करायला लाजत ही नाही. पण स्वत:वर प्रेम केल्यामुळे मला इतरांवर प्रेम करायला जमतं. कुणाचं यश बघून असूया वाटणे, पगारांची तुलना करून त्यात कमीपणा वाटणे, हे मला फार विचित्र वाटतं. अरे, झोपडपट्टीत तुम्ही उपाशीपोटी असतांना पुढच्या माणसाकडे वडापाव असेल, त्याची असूया वाटणं सहाजिक आहे, पण तुमचे केस पांढरे, आणि इतरांचे काळे म्हणून असूया वाटावी???
मी खूपदा विचार करते, की नेमकं आपलं स्वत्त्व कशात असतं? कशात असावं? कुणाचं दिसण्यात, कुणाचं पैशात, तर कुणाचं एका आवडत्या ब्रॅन्डच्या सिगरेटीतही स्वत्त्व असतं. मला वाटतं, स्वत्त्व हे असं कुठल्यातरी मूर्त-अमूर्त गोष्टीला चिकटवूच नये. त्याची गरजच नसते. तुम्ही तुम्ही आहात- हेच तुमचं स्वत्त्व असतं.
स्वत:वर प्रेम असेल, तर ते तुमच्या कामात, तुमच्या कपड्यात, आयुष्याच्या प्रत्येक पैलूत सकारात्मक रीतीने प्रकट होतं. मी स्वत:वर प्रेम करते, म्हणून मी स्वत:ला चांगल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून धडपडते. माझं काम चांगलं व्हावं म्हणून धडपडते. त्यातला आनंद मिळवल्यावर मला त्या आत्मविश्वासाच्या विंचूबद्दल फार कृतज्ञता वाटते. आणि मला हा आत्मविश्वास आहे, म्हणूनही मी स्वत:वर प्रेम करते!
तुम्हाला काय वाटतं? स्वत:वर प्रेम करावं का?
6 comments:
Perfectly said! माझ्यासारखाच विचार करणारी माणसं आहेत म्हणायची तर! :)
मी तुमच्या प्रत्येक वाक्याशी सहमत आहे. स्वत:वर प्रेम केल्याशिवाय "निस्वार्थी प्रेम करणं" माणूस शिकूच शकत नाही, असं मला वाटतं.
बाकी, शुद्ध लेखनाच्या चुका टाळता आल्या तर बघा. वाचताना उगाच खटकतात, म्हणून म्हटलं. राग मानु नये. शिवाय "माझे आईवडील सगळ्यांनाच का लाभत ...?" ... च्या जागी "नाहित" विसरलात असे वाटते.
Thanks for the wonderful post!
Ekadam Zakas, Apalyala avadale....
श्रद्धा, सविस्तर अभिप्राय दिलास त्याबद्दल अनेक धन्यवाद!
तुझ्या सूचनेप्रमाणे "नाहीत" घातलंय.
मला माझ्या शुद्धलेखनाबद्दल चांगलाच आत्मविश्वास होता ;)पण काय की... अजूनही काही चुका राहून गेल्या असतील तर नक्की सांग, म्हणजे त्या सुधारता येतील. ;)
थॉट आवडला!
Vishakha, Tumchi hi post tar mi print karun roj vachavi ashi ahe. Mast!
Thank you :)
Post a Comment