6/26/12

गुळाची चव

तिच्या पुढे गूळ माउंट एव्हरेस्टसारखा अशक्य खडा होता. आता अर्धा तास तरी ती, आणि गूळ, आणि तिच्या विचारांचा पक्का पाक असणार होता. 
तिने रोजचे डोक्यातले सगळेच्या सगळे विषय एका झाडाला उलटे टांगून त्यांना मिरच्यांची आग लावून टाकली आधी. आई, बाळ, घर, संसार, आठवणी असलेच पुचके विषय का म्हणून घ्यायचे सदा न कदा आपण लिहायला? गुळावरचा राग विचारांवर काढत तिने स्वत:लाच खडा सवाल केला.  कुत्रे खांबापाशी मुततात, किंवा स्त्री-पुरूषांचे घामटचिकट संबंध, किंवा कचऱ्यातून अर्धा सडलेला आंबा काढून खाणारी म्हातारी, ह्यांची खरमरीत, सडेतोड वर्णनं घेऊन त्यातून एक कथा लिहायची. विचारच करायचा नाही ह्यापुढे, की कोणाला काय वाटेल. बाई असली म्हणजे काय लिहतांनाही बुरखा घालायचा, की चक्क नावच बदलून George Eliot करून टाकायचं, त्याशिवाय खरं खरं लिहता येत नाही? 

गुळाची ढेप चिरता चिरता सर्र्कन सुरी बोटावरून फिरली, नि क्षणात एक लाल चिरा तिथे टरारून आला. बोट झटकत, हेलपाटत तिने आधी नळाखाली धरलं, तरी हळदीवर-कुंकवासारखे गुळावर पाच थेंब पडून आत झिरपायलाही लागले होते. हा गूळ तरी थोडा मऊ असायला हवा होता ना? फरशी ओटाच काय, ओट्यालगतच्या चटईवरही थोडे थोडे खडे पडून हाता-पायाला चिकट होत होते. त्यात बोटावर बॅण्डेडची चिकट पट्टी घट्ट बसल्यामुळे बोट थोडं बधीर झाल्यासारखं वाटत होतं आणि सुरी अजूनच सटकायला लागली होती. 
लग्न झाल्या झाल्या आपल्या मराठमोळ्या वळणाप्रमाणे तिने आधी मिसळणाचा डबा, नि बाजूला गुळाचा डबा ठेवला होता. गूळपोळ्याही नवऱ्याला आवडत म्हणून लगेच शिकून घेतल्या, नि रोजच्या वरण-भाजीतही चवीला गूळ घालायला ती विसरत नव्हती. पण आज ह्या ढेपीने घाम काढला अगदी. एकतर इथे बत्ता/मुसळ असं काही नाही की दोन दणक्यात ढेकळं मोडतील. शिवाय फरशी पुसायला स्वत:च कंबर कसायला लागणार म्हणून खाली खूप सांडूनही चालणार नाही. 

चिकटला. हाताने मागे सारायला गेले तर केसांनाही चिकटला. नि हाताला एक केस चिकटून तो गुळात मिसळला. झालं, आता हात धुवून, पुसून कोरडे करून आधी तो केस काढा. हे करता करता तिचं टाळकं अजून अजून फिरत चाललं होतं. लेखिका होण्याचं स्वप्नंही खरंतर तिने कधीच पाहिलं नव्हतं, फक्त शाळा कॉलेजात, तर कधी शेजारी पाजारी कविता वगैरे वाचून कौतुक करायचे, तेवढंच. पण आता वाटायला लागलं होतं, की चुकलंच. तेव्हापासूनच ध्यास घ्यायला हवा होता. आपल्या रोजच्या जगाबाहेर जाऊन, तळागाळातलं आयुष्य अनुभवायला हवं होतं. 

गुळात एक मुंगळा, "जुरासिक पार्क" पिक्चरातल्या त्या माशीसारखा, अखंड पुरला गेला होता. घाणेरडा गूळ. आम्ही भारतात नाही, म्हणून आम्हाला काहीही विकतात देसी-ग्रोसरीवाले. आम्ही जाणार कुठे? घाणेरडा तर घाणेरडा, गूळ तर मिळतोय, म्हणत येणार पुन्हा तिथेच. हिम्मतच कमी पडते. स्वत:च टाकायला हवं एक मराठी वस्तूंचं दुकान. दणकून चालेल. चार लोक भेटतील. नाही झोपडपट्टीत जाता आलं तेव्हा, तर आता त्यांच्या अनुभवातून काही मसाला मिळेल. तेव्हाच अशी वेगळी वाट पकडायला हवी होती. एअरहोस्टेस बनायचं, हॉटेल मॅनेजमेंट करून "ताज" मधे काळ्या स्टॉकिंग्जवर काळाच स्कर्ट, टॉप घालून, लाल लिप्स्टिक लावून "व्हाट वूड यू लाईक टू ड्रिंक टुडे?" करायला हवं होतं. किंवा त्या नवीन संगीतकारिणी सारखं बॅकपॅक लावून खेड्यापाड्यात फिरत "ऑथेंटिक इंडियन म्यूझिक" शोधत फिरायला हवं होतं. किंवा एकदा तरी, अपरात्री, एकाट रस्त्यावर, गळ्यातल्या सोन्याच्या चेनने "ते" मिळवून ओढून तरी बघायला हवं होतं. 

पण मानवलं नसतंच ते आपल्याला. बाबांनी "सातच्या आत घरात" पद्धतीने वाढवलं, आणि आईने सानेगुरूजी वगैरे "सकस" वाचनाची सवय लावली, तर एकदम चिंचगूळाच्या वरणाऐवजी तंगडी कबाब खाणार होतीस काय? आज त्या सुरक्षित जगाची किंमत नाही वाटत आहे आपल्याला. परिघाबाहेरचे अनुभव घ्यायला निघालीस, एवढाही विचार केला नाही, की जे तुला सहज मिळालं त्यासाठी रस्त्यावरच्या शेंबड्या पोरीने काय वाटेल ते केलं असतं. अगदी कृतघ्न वाटायला लागलं अगदी, तशी फोर्कने टोचून खसकन तिने गुळातून मुंगळा बाहेर काढला. 

कशाला घुसलास बाबा त्या गुळात? गोडच असतं असं सगळं, मऊपण लागतं आधीआधी. म्हणून काय कुठेही शिरायचं नि कशाचीही हाव धरायची, अशी विचार न करता? किती महीने बसलास त्यात रुतून, की मरूनसुद्धा सुटका होईना!  किती तडफडला असशील, पण त्याने पायच तुटले असतील आधी. मग वाट बघण्यावाचून हाती काय उरलं असेल?
तिला आता त्या गुळाकडे बघवेना. मुंगळ्याचा हात धुवून, पुन्हा पुसून पुन्हा गुळाशी दोन हात करायचं त्राण तिच्यात राहिलं नव्हतं. फेकून देण्याइतकाही काही तो वाईट नव्हता. म्हणजे, गूळ. गूळ वाईट नव्हता. मुंगळाही वाईट नव्हताच. पण मुंगळ्याच्या जन्माला आला ना तो. मग गुळात घुसण्यावाचून दुसरं इतिकर्तव्य तरी काय होतं त्याचं? आपणही अगदीच "हे" होत चाललोय.

तिला एकदम आठवलं, एकदा टीव्हीवर चॅनेल बदलतांना चुकून बलात्काराचा सीन डोळ्यांवर आदळला होता. ती  तशा अवस्थेतही, कण्हत कुथत हातपाय झाडणारी बाई.  दोन सेकंदही झाले नसतील तो पोटात ढवळायला लागलं होतं. दिवाळी अंकातल्या "त्या तशा" कथा, किंवा रेल्वे बॉम्बस्फोटात चिंध्याचिंध्या झालेल्या शरीरांचं एकदाच पाहिलेलं फुटेज, किंवा एका रस्त्यावर मरून पडलेलं हरीण. विसरू म्हटलं तरी विसरता न येणारं असं बरंच काही. 
कुठेकुठे मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांतून वाचलेलं, पाहिलेलं वर वर यायला लागलं. हातपाय थरथरायला लागले. डोळे उघडले तरी, नि बंद केले तर नक्कीच नक्कीच, हे गरळ सारखं भोवती फिरायला लागलं. ती खाली बसली. पटकन गुळाचा एक खडा तोंडात कोंबला. नि घटाघटा पाणी प्यायली. 

दोन्ही डोळ्यांवर सपासप पाणी मारून तिने पुन्हा डोळे उघडले. जगातली घाण, मनातली घाण ओकून ओकून पुन्हा वाढवायची नाही. खूणगाठ बांधली, नि पुढ्यातला गूळ नव्या जोमाने चिरायला लागली. 

3 comments:

Nandan said...

लेख आवडला. काहीसा स्ट्रीम-ऑफ-कॉन्शसनेस शैलीतला.

विशाखा said...

धन्यवाद नंदन! तसा मुद्दाम प्रयत्न केला नव्हता खरं म्हणजे 'स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस' करायचा, पण जे लिहायचं ते कसं लिहायचं ते कळत नव्हतं. 

विशाखा said...
This comment has been removed by the author.