5/16/13

पुस्तक वाचतांनाचा तू

पांढऱ्या शुभ्र मोकळ्या फुसफुशीत भातावर दाणेदार मुगाच्या दालफ्रायचा पिवळा रंग, आणि त्यावर खपून केलेली कुर्कुरीत हिरवी भेंडी वाढली, तरी तुझं लक्षच गेलेलं नव्हतं.
ते बघून माझा थोडा विरस झाला, पण छान जेवण काय मी अन्नपूर्णा द्रौपदीप्रमाणे फक्त दुसऱ्यांसाठीच केलेलं नव्हतं, म्हणून मी त्या चवींमधे गुंग झाले.

हल्ली हे असंच होतंय पण. बोलायला काही फारसं नसतंच. त्यामुळे तू तुझ्या विश्वात नि मी माझ्या. पण तरीही, हे लक्ष नसणं वेगळंच होतं. खाण्याच्या आवडीपलिकडे काहीतरी तुझ्या डोक्यात शिजत असलेलं तुझ्या हातातल्या पुस्तकातून मला दिसत होतं. एरवी जेवतांना आपण ए.आर रहमान ऐकतो, किंवा कधी पावसाळी हवा असेल तर किशोरकुमार, तर आज हे कोण पियानोवर सूर नाचवतंय?

"Keith Jarret." फक्त येवढंच बोलून तू पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलंस.
आता मला जरा वैतागच यायला लागलेला होता. तो अगस्त्य सेन तुझ्या ऑलरेडी तिरकस डोक्यात थैमान घालतोय म्हणजे साध्या गोष्टींवर तुझे विचार भन्नाट वेगाने वळत-वळत पळत असणार आणि त्या वेगात माझ्या शुद्ध मराठी भाषेचा आणि त्या क्षणी मला पडलेल्या प्रश्नांचा भोंगा तुला अजिबात ऐकू येत नसणार म्हणजे मला एकदम तुझ्यामागून त्या पुस्तकात शिरावं आणि तुला हात धरून खेचून बाहेर काढावंस वाटायला लागलं होतं. किंवा त्या पुस्तकात तुझ्याच चाललेल्या पानात उडी मारावंसं.

मग मी आशाळभूतपणे, "मी तुला read aloud करून सांगू?" असं विचारलं, पण तुला तो मानसिक बदलही तेव्हा नकोसा होता, मग मी पुन्हा तुझ्या वाचणाऱ्या मख्ख चेहऱ्याकडे बघत बघत आपली दालफ्राय चमच्याने संपवून टाकली. त्या पुस्तकापायी मला जेवणाची चवही आली नाही. शी - stupid.

पण हे असं आजच नाही झालंय. ते पुस्तक तिथे टेबलवर धूळ खात असो वा पोराच्या खेळाच्या बादलीत वेडवाकडं मुडपून पडलं असो, मला काही त्याला हात लावायला फुरसत नव्हती, आणि फुरसत मिळेल तेव्हा त्या येड्या अगस्त्य सेनच्या डोक्यात शिरण्याची काहीएक गरजही वाटत नव्हती.
पण परवा पुन्हा, आपल्याकडे आलेल्या पाहुण्याच्या देखत, जेवता जेवता, गप्पांतूनही तुझी त्या पुस्तकावर थबकणारी नजर बघितली आणि मला कळलं....

कोणे एके काळी मीपण ते अनुभवलं होतं. जरी त्याला आता काळ लोटला तरी, ते विसरता येणं मला शक्य नव्हतं. ते महिनोन्महिने एकाच  पुस्तकात राहणं. त्याच्या जगात वावरणं. त्यातली माणसं खऱ्या पुढे बसलेल्या माणसांपेक्षासुद्धा खरी वाटणं. त्या जगाच्या नजरेने आपल्या जगातल्या विसंगती दिसणं.

हे सगळं सगळं मी अनुभवलं होतं. खूप पूर्वी.
पण आता नाही.
उद्या त्रिकोणी पापुद्रे सुटणाऱ्या खरपूस पराठ्यावर लाल-हिरवा टोमॅटो-मिरचीचा साल्सा आणि वर किसून चीज घालून व्हेज फ्रॅन्की करायचा माझा बेत होत.

कोणी म्हणतं, ह्या फेसबूक-इमेलच्या जमान्यातला माणूस अधिक एकटा आहे. पण आता मी विचार करते- पुस्तकांच्या जगातला माणूस? तो ही तितकाच एकटा नव्हता का?





3 comments:

Mahendra Kulkarni said...

मला पण अनुभव आहे ह्याचा.. :)

Unknown said...

हा अनुभव बहुदा सर्वच पुस्तक वेड्यांनी घेतलेला असणार...फक्त आशाळभूत पणे "रीड अलाउड करून सांगू का" ह्या प्रश्न विचारणाऱ्या चेहऱ्याच्या जागी कुणाच्या आयुष्यात आ वासून बसलेलं करियर (मातेरं होत जाणाऱ्या आयुष्याला गुलाबी टोपण नाव), कुणाकडे आर्थिक भ्रांत तर कुणाच्या जीवनात आणखी कसल्या तरी अडचणी समोर असणारच आहेत..चालायचंच ..आयुष्याचा प्रवास आहे, इथे सुधीर फडके आठवतात "दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ...क्षणिकतेवी आहे बाळा मेळ माणसांचा...." म्हणून कदाचित जास्त दुखच देणाऱ्या जीवनापेक्षा खोटं पण तरीही सुख दाखवणाऱ्या पुस्तकांची दुनिया भावत असावी...

विशाखा said...

Thank you for the comments. Yes, reading is an escape for many.