4/24/18

शैक्षणिक तंत्रज्ञान ३

शैक्षणिक तंत्रज्ञानाचे असे अनेक फायदे लक्षात घेऊन मी उत्साहाने वर्गात सांगितलं, "आता तुमचं पुस्तक तुमच्या खिशात! ई-पुस्तकाचं ॲप मोबाईलवर उपलब्ध आहे, ते उतरवून घ्या फक्त."
तर एक मुलगी म्हणाली, "पण मला हाताने मुद्दे अधोरेखित करायला आवडतं."
"अगं ई-पुस्तकात अधोरेखनाची पण सोय आहे!"
"पण एक एक पान लोड व्हायला इतका वेळ लागतोय की गेल्या पानावर काय अधोरेखित केलं होतं, ते ही पटकन दिसत नाही!"
तिचं म्हणणं बरोबर होतं. तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असले, तरी पुस्तकाचा सरळ थेट साधेपणा त्यात कसा येणार?

मला आधी वाटलं होतं, की मीच एकटी जुन्याला जळमटांना चिकटून बसलेय, पण पुढच्या पिढीला हे तंत्रज्ञान आवडत असणार, सोपं वाटत असणार. पण नंतर लक्षात आलं, की, हे विद्यार्थी, शाळेपासून तंत्रज्ञान कोळून प्याले, पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र कोरडे पाषाणच राहिले होते! शिवाय, अति-परिचयाने तंत्रज्ञानाचा कंटाळा आलेलेसुद्धा खूपसे होते. एखाद्या विशिष्ट विषयासाठी, विशिष्ट कौशल्य शिकवायसाठी तंत्रज्ञान वापरणं वेगळं, आणि विद्यालयीन जीवनाचा समग्र अनुभवच शैक्षणिक तंत्रज्ञानाने व्यापून टाकणं वेगळं.

ई-पुस्तकांव्यतिरिक्त, आमच्या विद्यालयाने प्रत्येक विषयाची वाचनसामग्री ग्रंथालयाच्या वेबसाईटवर टाकलीये. तर गृहपाठाची 'सूचना' विद्यालयाच्या LMSवर, वाचन ग्रंथालयाच्या पानावर, पण गृहपाठ/चाचणी ई-पुस्तकावर, ही तिहेरी कसरत करतांना मुलांनी 'अभ्यास' नेमका कधी करायचा, हे मला कळत नाही. 

विद्यालयाच्या LMS शी ई-पुस्तकाचा ताळमेळ घालण्यासाठी आधी मुलांनी ई-पुस्तक विकत घेऊन त्याचा कोड वापरणे आवश्यक होते. एकदा कोड घेतला, की ३-४ विषयांसाठी तो वापरता येत असतो, पण कोडशी जोडलेला ईमेल पत्ता आणि पासवर्ड माहिती हवा. काही मुलांना कोड घेतल्याचे आठवत होते, पण ईमेल पत्ता आठवत नव्हता. मग त्यांना ग्राहक-सेवेचा फोन नंबर देणे, त्यांचा ईमेल पत्ता मिळाला, की पुन्हा एकदा "विद्यालयाच्या LMS शी ई-पुस्तकाचा ताळमेळ घालण्याचा धडा" शिकवणे आले. 
अशाप्रकारे, सुरुवातीचा एक महिना, वर्गातली पहिली १० मिनिटं माझं Troubleshooting चालायचं. लेखन वाचनापर्यंत अजून गाडी सरकलीच नव्हती...

एकदा ही शिक्षणयंत्रणा कार्यरत झाली, तरी पुढे तंत्रज्ञानाची सबब सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचा ससेमिरा मागे लागला.

  • "गृहपाठ जिथे 'टाकायचा होता, तो डबा बंद झाला." म्हणजे, उशिराने गृहपाठ आणणाऱ्या प्रत्येक मुलासाठी मी (शिक्षिकेने) विशेषत्वाने सेटिंग बदलायचं. 
  • "ई-पुस्तक उघडायला फ्लॅश अपडेट करावा लागतोय, तो घरच्या संगणकावर होत नाहीये."
  • "माझा गृहपाठ गूगल डॉक्स मध्ये आहे, पण इथे फक्त वर्ड ची परवानगी आहे, तर काय करू? 
  • "निबंध USB वर आहे, पण आज आणायला विसरले, उद्या आणते."
  • "गृहपाठाची तारीख २०, पण तो २७ पर्यंत 'उघडा' आहे, म्हणजे मला वाटलं की २७ पर्यंत दिलेला चालेल.  
  • Turnitin वर माझा निबंध 'चोरलेला' दिसतोय, कारण मीच तो गेल्या वर्षी वेगळ्या प्राध्यापकांसाठी लिहिला होता, पण तो कोर्स मला तेव्हा पूर्ण करता आला नाही, म्हणून पुन्हा आता घेतोय.  

सध्या 'हायब्रीड' किंवा 'मिश्र' कोर्सेसचं अतिशय फॅड आहे. आठवड्यातले २ दिवसच वर्गात बसून प्रत्यक्ष शिकायचं, आणि उरलेले २ दिवस ऑनलाईन स्वाध्याय, वाचन करायचं, आणि चाचण्या द्यायच्या. ह्या मुलांची 'तयारी' तपासण्यासाठी मग ऑनलाइन चर्चासत्र शिक्षकाने घ्यायचं, विद्यार्थ्यांनी त्यात जमतील तेव्हा प्रतिसाद लिहायचे, आणि शिक्षकाने ते तपासायचे! २५ मुलांच्या 'छोट्या' वर्गातही, चर्चेचे १०० प्रतिसाद झाले, तर ते शिक्षकांसाठी किती गधेमजूरीचं काम होऊन बसतं! काही मुलं जर केवळ 'सहमत/असहमत' असे प्रतिसाद देत असतील, तर त्यांना चालना देण्यासाठी पण शिक्षकांना दिवसरात्र त्या वर्गाच्या वेबसाईट वर राबावं लागतं. हा वेळ कदाचित शिक्षकाने मुलांचे निबंध/इतर लेखन वाचण्यात घालवला असता, तर?

ह्यात अनेक समस्या आहेत:
१. शैक्षणिक तंत्रज्ञान बनवणाऱ्या अनेक कंपन्या आपलं घोडं पुढे दामटतात, पण कुठलंही एक ऍप किंवा सॉफ्टवेअर  'सर्वसमावेशक' नसतं, त्यामुळे शिक्षकांना आणि मुलांना, तीन ठिकाणी तीन गोष्टींसाठी फिरावं लागतं.

२. कुठलीही गोष्ट अंगिकारण्यापूर्वी प्रत्येकाला, ती गोष्ट स्वत:साठी 'चालवून' बघता येण्याचं स्वातंत्र्य ही तंत्रद्न्यानाची टूम शिक्षकांना देत नाही, असं वाटतं. आणि त्यातुन आलेले अनुभवांचं 'सरसकटीकरण' केलं जातं, जसं की, "ह्या शिक्षकांना नवीन गोष्टींशी जुळवून घ्यायला नको!"

३. शैक्षणिक तन्त्रद्न्यानाचा प्रयोग अधिकाधिक 'व्यक्तिसापेक्ष' शिक्षण देण्यासाठी करणे योग्यच आहे. फक्त, ह्या मुलांचं 'वर्गीकरण' करुन एकीकडे व्यक्तीसापेक्षतेचा डंका बडवायचा, आणि दुसरीकडे, त्याच ॲपमधील 'डेटा' गोळा करून, मुलांच्या 'स्कोअर वरून' शिक्षकांची "प्रगतीपुस्तकं" लिहायची, पण शिक्षक-विद्यार्थ्यांच्या 'व्यक्तीसापेक्ष-रसायनाला' गृहित धरायचे नाही, हा मला दांभिकपणा वाटतो. (विशेषकरून भाषा-शिक्षणासारख्या सापेक्ष विषयात.)

४. आत्ता 'आई म्हणून' लहान मुलांना तंत्रद्न्यानातुन शिकवणं हे बरोबर वाटत असलं, तरी प्राध्यापिका म्हणून तंत्रद्न्यानात वाढलेली मोठ्या मुलांची पीढी बघून भीती वाटते. हे माझे विद्यार्थी शैक्षणिक तंत्रद्न्यानाचे पहिले 'बकरे' / 'भोक्ते' आहेत. त्यांच्यावेळी हे सगळं नवीन होतं. त्यामुळे शिक्षकांनीपण तेव्हा फार डोळसपणे नवीन गोष्टी न वापरता, सगळीकडे नवीनतेचा उदोउदो होत असल्यामुळे, तोच पंथ आपोआप धरला, किंवा, बहुधा 'सोय' बघून, 'वाहत्या पाण्यात हात धुतले'.

शिक्षणाचं 'तंत्रज्ञान' समजावून न घेता, केवळ शैक्षणिक तंत्रज्ञान पाजळणाऱ्या लोकांना पुढे हेच विद्यार्थी कर्मचारी म्हणून मिळणार आहेत, तेव्हा तरी कदाचित त्यांना जाणवेल, की पुढे पाहून धावताना मागे काय हरवत चाललं होतं... 

4/23/18

शैक्षणिक तंत्रज्ञान २

माझ्या मुलाचं हे पहिलीचं वर्ष, त्यामुळे नोंदणीची शंभर कागदपत्रं भरल्यावर जरा श्वास घेतला. 'मोठ्या' शाळेच्या पहिल्या दिवसात चिटुक काय काय नवीन शिकला ते माहिती नाही, पण मी मात्र शाळेकडून येणाऱ्या अक्षरशः रोज एक इमेलने भांबावून गेले!
१. शिक्षकांचे प्रत्येकी वेगळे वेबपेज, पालक-संगठनेचा वेगळा 'दुवा'.
२. मुलगा आजारी/अनुपस्थित असेल तर शाळेला कळवण्यात यावं, त्यासाठी वेगळा ईमेल-पत्ता!
३. शिवाय, मुलाचं 'प्रगतीपुस्तक' बघण्यासाठी वेगळ्या ठिकाणी आपलं 'पालक-खातं' बनवणे.
४. फावल्या वेळात मुलांना गणिताची गोडी लागावी म्हणून वेगळं 'app', ज्यावर आपल्या पाल्याशी आपलं खातं जोडणे, म्हणजे त्याची प्रगती आपल्याला कळेल.
५. वाचनाच्या गोडीचं तसलंच, पण वेगळं app!
६. मुलांना शाळेतुन 'डबा'/ जेवण विकत घ्यायचं असेल, तरमुलांच्या हाती पैसे सोपवावे लागू नयेत म्हणून एक पालक खातं, त्याचा फक्त 'कोड नंबर' मुलांनी शाळेत वापरायचा आहे. त्यात दर महिन्याला १०-२० डॉ. भरून ठेवता येतात.
७. जेवणाचा मेन्यू शाळेच्या वेब-पत्त्यावर उपलब्ध, तो दर महिन्याला आपण 'उतरवून' घेऊ शकतो.

हे इतके 'मायाजाल' लक्षात ठेवता ठेवता माझी सुरुवातीला तारांबळ उडाली, मग सरळ वहीत 'सदस्यनाम' + परवलीचा शब्द लिहून ठेवू लागले. मुलगा मात्र दोन दिवसात जेवणाच्या नंबरपासून अभ्यासाच्या खात्यापर्यंत सगळी नावं/पासवर्ड शिकून तरबेज झाला. मी मनाशी म्हटलं, "आपण जुन्या खोडा प्रमाणे नवीन तंत्रज्ञानाबद्दल उगीचच साशंक झालो आहोत. नवीन पिढीसाठी हे काही कठीण नाही!"

पण त्याच वर्षी, आमच्या विद्यालयानेसुद्धा नवीन Learning Management System (शिक्षण-संस्थापन तंत्रज्ञानाचं) अवलंबन करायचं ठरवलं. फर्मानं सुटली, कार्यशाळा झाल्या. वर्ष सुरु झालं. तेवढ्यातच पुन्हा नवीन फर्मानं निघाली, की इंग्रजी साठी पूर्वीचं साधं पाठ्यपुस्तक बाद करून त्या ऐवजी एक वेगळी LMS पद्धत वापरायची आहे. ह्या दोन्ही पद्धतींचा एकमेकींशी ताळमेळ घालून देण्याची अजून एक नवीन कार्यशाळा झाली!

मी स्वतःला 'जुने खोड' म्हंटले तरी खरं म्हणजे माझं तंत्रज्ञानाशी अजिबातच वाकडं नाहीये, त्यामुळे मी ह्या नवीन पद्धती बऱ्यापैकी लवकर आत्मसात केल्या. खरंतर ह्या नवीन माध्यमातल्या क्षमतांचा विद्यार्थी, तसेच शिक्षकांना खूप उपयोग होऊ शकतो: 

१. पुस्तकातले प्रश्न सोडवतांना बरेचदा पाठ करून/ दुसऱ्यांची बघून लिहिलेली उत्तरं दिसतात, पण त्यातून मुलं खरी संकल्पना (concept) शिकलीयेत की नाही, ते कळत नाही. ह्या ई-पुस्तकात प्रत्येक व्यक्ती आपल्या खात्यातूनच लॉगिन करणार, त्यामुळे उत्तरं चोरायचा प्रश्न येत नाही. शिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याला, त्याच संकल्पनेबद्दल, पण वेगळे प्रश्न दिसतात! इतकंच नव्हे, तर शिक्षकांनी परवानगी दिली, तर एक 'चाचणी परीक्षा' २-३ वेळा देता येते, आणि त्यातून सर्वात चांगले गुण 'धरले' जातात.
२. अमेरिकाभर वापरली जाणारी अजून एक वेबसाईट म्हणजे 'Turnitin'.  ह्यावर विद्यार्थ्यांचे शेकडो/हजारो निबंध आधीपासून साठवलेले आहेत, त्यामुळे माझ्या विद्यार्थ्याने जर दुसऱ्या कुठूनही वाक्ये/उतारे 'चिकटवली' असतील, तर ते मला, शिक्षिकेला दिसून येतं. प्रत्येक शिक्षकाने ही व्यवस्था वापरली, तर निबंधाची संख्या वाढत जाते, व दुसऱ्याच्या कल्पना चोरून वापरणं अधिकाधिक कठीण होत जातं.
३. विद्यार्थ्यांना तर चक्क 'धडा वाचून दाखवणे' ही पण सोय ह्या नवीन ई-पुस्तकात आहे, म्हणजे अगदी जिम मध्ये व्यायाम करता करता कानाला हेडफोन लावून धडा 'ऐकता' येतोय!

इतक्या सगळ्या सोयी सुविधा असूनही माझ्या अनुभवात, मुलांना हे तंत्रज्ञान आत्मसात करणं, स्वीकारणं, खूप कठीण जात होतं. जोवर एखाद-दुसऱ्या वेबसाईटशी जुळवून घ्यायचं असेल, तोवर ठीक आहे, पण गेल्या १० वर्षात मी शिक्षिका म्हणून अशा ६-७ तरी  वेगवेगळ्या 'पद्धतींशी' जुळवून घेते आहे. नवीन विद्यालयात नवीन तंत्र, नवीन अभ्यासक्रम. 
(माझ्यासारखे 'तात्पुरते प्राध्यापक' (Adjunct Professor) यांची वणवण, हा एक अजून वेगळा घोर लावणारा विषय आहे, ते सोडा च.) 

शिक्षकांची ही कथा, तर मुलांना बहुतेक शालेय-स्तरावर अनेक वेगवेगळ्या विषयांसाठी, १५-२० तरी वेबसाईट/ऍप/सॉफ्टवेअर आत्मसात करावं लागत असणार (असा एक माझा अंदाज आहे). ह्या ओढाताणीत मुलांची स्वयंप्रेरणा मात्र कमी होऊ लागली, तर ह्या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे सर्वस्वी अपयशीच ठरतील, हे त्या अनुभवातून गेल्याशिवाय पालकांना व शासकांनाही कळणार नाही, हे इथे लक्षात आणून द्यायचा माझा उद्देश आहे.  

4/17/18

शैक्षणिक तंत्रज्ञान 1

आम्ही अमेरिकेतले 'मागासलेले' पालक असल्यामुळे आपल्या मुलाला ६ वर्षाचा होई पर्यंत फोन, टॅबलेट वगैरे पासून दूरच ठेवलं होतं. टीव्ही कधी दाखवला, तर त्यावर वेळेचं बंधन असायचं, आणि मनामध्ये प्रचंड अपराधीपणाची भावना, कारण तिकडे स्वयंपाक करतांना मध्ये लुडबुड नको म्हणून टीव्हीचा "बेबीसिटर" लावला जायचा. काही पालक कौतुकाने 'आमचा गोटू किनई, २ वर्षाचा झाल्यापासूनच, किल्ली लावून आपला आपला फोन उघडू शकतो, आणि YouTube चा लाल त्रिकोण ओळखणं, त्याला A B C D च्या ही आधीपासून येतंय!" असे गौरवोद्गार काढू लागले, कि मला रडू यायला लागायचं, कारण, एकीकडे मी स्वयंपाका साठी, लांबच्या प्रवासा साठी, 'सोयीचं तंत्रज्ञान' वापरत च होते, पण दुसरीकडे त्याला हे तंत्रज्ञान 'शिकवणं' किंवा शिकू देणं, हे मात्र मला जमलं नव्हतं! टीव्ही लावून मी देणार, फोन उघडून मी देणार- ह्या किल्ल्या मी मुद्दाम स्वतःच्या हातातच ठेवल्या होत्या, पण त्या काढून घेण्याची 'हुशारी' माझ्या पोराला सुचत का नाही, ही नसती काळजीपण मलाच सतावत होती!!!

आणि अशा ह्या मुलाला, पहिल्या वर्गात, शाळा सुरु झाल्या झाल्याच, शाळेकडूनच Chromebook वापरण्याचा धडा मिळाला. "आई! माझं Username मी तुला सांगेन, पण पासवर्ड नाही सांगणार बरं का?" पोरगं उत्साहाने सांगत आलं, तेव्हाच माझ्या मेंदूतले दोन भाग कोणीतरी दोन वेगळ्या दिशांना खेचतंय असं वाटू लागलं! लहान मुलांचं शिक्षण, आणि त्यात तंत्रज्ञानाचा वापर, ह्या विषयी सध्या दोन, अतिशय परस्परविरोधी प्रवाह रूढ आहेत:

१. मुलांना २ वर्षांपर्यंत फोन, टॅबलेट वगैरे 'स्क्रीन' दाखवू नये. ते त्यांच्या भावनिक विकासाच्या आड येतं. एकलकोंडेपणा वाढतो. लहान मुलं अनुकरणातून, मोठ्यांशी होणाऱ्या संवादातून शिकतात, त्यामुळे टीव्ही किंवा फोनमधून मिळणाऱ्या ज्ञानाच्या एकमार्गी प्रवाहाने त्यांची सर्वांगीण प्रगती खुंटते.

२. आपल्या पालकांनी ज्या नोकऱ्या केल्या, त्या आपण करत नाही, तसेच आपल्या आजोबांच्या वेळी लागणारी कौशल्ये (skills) आपल्या पिढीसाठी अगदी निरुपयोगी ठरली. त्याच प्रमाणे, आपल्या मुलांनी २१व्या शतकात तगून राहावे असे वाटत असेल, तर त्यांना लागणारी कौशल्यं तंत्रज्ञानाशीच जोडलेली असल्यामुळे, त्यांना तंत्रज्ञान शिकवणे गरजेचे आहे.

विशेषतः भारतात माहिती-तंत्रज्ञानाने आणलेल्या सुबत्तेमुळे, तंत्रज्ञान हे सगळं चांगलंच आहे, आणि तंत्रज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही, तेव्हा तंत्रज्ञानाला पर्याय नाही, हे निर्विवाद सत्यच मानलं जाऊ लागलं आहे. अमेरिका मात्र त्यापुढे जाऊन, काहीशी अलिप्तपणे माहिती-तंत्रज्ञानाकडे बघत, चांगल्या-वाईटाचा शहानिशा करण्याच्या प्रयत्नात आहे. मी एक शिक्षिका, तसेच पालक, ह्या दुहेरी भूमिकांमधून जात असल्यामुळे ह्याविषयी माझी काही निरीक्षणे आज इथे व्यक्त करावीशी वाटताहेत.

१. तंत्रज्ञाच्या वापराने आपल्या मेंदूमध्ये घडणारे बदल आपण अजून पुरते समजून घेऊ शकलेलो नाही. आफ्रिकेत एक आदिवासी जमात, त्यांच्या अचूक 'दिशाज्ञाना' साठी प्रसिद्ध आहे. जंगलातून वाट काढण्यासाठी त्यांच्या मेंदूमध्ये दिशाज्ञान कायम कार्यरत असतं, त्यामुळे अगदी डोळे बांधून त्यांना कुठल्या खोलीत सोडलं, तरी ते घराची दिशा अचूक सांगू शकतात म्हणे! मोबाईल आल्यापासून आपल्याला एकमेकांचे दूरध्वनी क्रमांक लक्षात राहत नाहीत. तसेच ईमेल आल्यापासून 'लिहिणं' बंद झालंय! ह्या बदलांमुळे आपल्या मेंदूतल्या न वापरल्या गेलेल्या जागा 'बंद' पडत चालल्या आहेत.

उलट नवीन कौशल्य, जसे कि इंटरनेट वर कुठली माहिती कुठे मिळाली, हे लक्षात ठेवणं आजच्या पिढीसाठी जास्त महत्वाचं आहे. माझ्या पहिलीतल्या मुलाला लिहिता येणं, चांगलं अक्षर काढता येणं, हे किती महत्वाचं आहे? हे आज कोणीच सांगू शकत नाही, कारण कदाचित १५ वर्षांनी त्याला एकहि पेपर लिहून सोडवावा लागणार नाही. मात्र, हातात पेन्सिल किंवा ब्रश धरून अचूक आकार काढता येणं जर जमलं नाही, तर इतर कुठल्या जीवनोपयोगी कौशल्यांवर त्याचा परिणाम होईल, हे आज आपल्याला कळू शकत नाही, आणि केवळ काहीतरी हरवल्यावरच त्याचं अस्तित्व/महत्व जाणवलं, तर काय करणार? ही भीती उरतेच. प्लेटो म्हणाला की लेखन सुरु झाल्यावर 'स्मरणशक्ती' ची गरज उरणार नाही, तसाच हा प्रकार आहे...

२. माहिती साठवणं हे स्मरणशक्तीचं काम आहे, तर ते सहज कंप्यूटरकडे सोपवलं जाऊ शकतं... मात्र त्या माहितीचं संकलन करून, उपयोग करून नवीन कल्पना काढणं, त्या राबवणं, हे मानवी मेंदूचं काम आहे. मेंदूची शक्ती स्मरणात वाया न घालवता संकलनासाठी/निर्मितीसाठी मोकळी ठेवणं शक्य होऊ लागलंय. तंत्रज्ञानामुळे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत हा मोठा फरक पडलाय, आणि तो स्वीकारणं गरजेचं आहे.

मात्र, मूलभूत शिक्षणात, आपल्या स्मरणशक्तीतुन संकलन--> उपयोग कसा करायचा, हे न शिकवताच पुढची पायरी गाठायचा प्रयत्न करणे म्हणजे 'माकडाच्या हाती कोलीत' दिलं जातंय. विशेषतः चार ठिकाणची माहिती मिळवून तीच पुन्हा 'स्वतःच्या' निबंधात चिकटवण्याची कला नवीन पिढीने चटकन आत्मसात केलीये, पण ह्या विचारहीन Content Generation चा परिणाम खोट्या बातम्या पसरणे, मूलभूत संकल्पना स्पष्ट नसणे- अशा अधोगतीत होतो आहे. अमेरिकेत आज ह्या विचारहीन तंत्रज्ञानाचे परिणाम आज दिसतायत, जे भारतात अजून २० वर्षांनी दिसू लागतील. म्हणून नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान आंधळेपणाने स्वीकारलं जायला नको, असं मला कळकळीने वाटतं.

३. मुलांना तांत्रिक 'खेळण्यांची' आवड असते. लिहायचा कंटाळा येतो, पण टाईप करायला मजा येते, तेव्हा कधी प्रोत्साहन म्हणून, तर कधी सोयीचा उपाय म्हणून, Substitution केलं जातं. शिकवतांना, किंवा शिकतांना, एका वेगळ्या माध्यमाचा वापरही वेगळ्या तऱ्हेने व्हायला हवा, हे अजून शिक्षकांनाच कळलेलं नाही, तर पोरांना कसं कळणार? Ruben Puentedura यांनी विकसित केलेल्या SAMR मॉडेल प्रमाणे, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ 'नगास नग' पद्धतीने न करता, त्यातून मुलांना विश्लेषण, प्रकटीकरण, अन्वय काढता येणं हे अपेक्षित आहे.



४. शिक्षणाचा केवळ वेग आणि व्याप्ती वाढवतांना, खोली (depth) मात्र आपण नष्ट करत चाललो आहोत: पुलंच्या "बिगरी ते मॅट्रिक" मधल्या दामले मास्तरांना पहिली ते सहावी सगळे वर्ग शिकवता येत होते, तो काळ कधी च मागे पडला. आजकाल गणित आणि विज्ञानच नव्हे, प्रत्येक क्षेत्राची इतकी जास्त माहिती उपलब्द आहे, आणि ती मुलांच्या गळी उतरवण्याची इतकी घाई आहे, की 'सुसंगत विचार कसा करायचा' हे शिकवायला कोणाकडे वेळ उरला नाहीये. त्यातच, शैक्षणिक क्षेत्रासाठी नवीन सॉफ्टवेअर, नवीन ऍप्स बनवणाऱ्यांचा बाजार सतत त्यांचं promotion व marketing करण्यात पुढे आहे. खुद्द सर्वव्यापी गूगल सुद्धा "शाळेने आमचं सॉफ्टवेअर वापरावं" ह्यासाठी प्रयत्नशील आहे.

खोटं वाटेल, की आजची पिढी आधीच्या सगळ्यांपेक्षा जास्त वाचते-लिहिते आहे, पण ही मुलं जे वाचतात, आणि जे लिहितात- ते मात्र फार वेगळं आहे. २४० अक्षरांत बसतील इतपतच विचार, आणि सहज मिटवता येतील, अशा Snapchat वरील उक्तींमध्ये शब्दसामर्थ्य, किंवा टिळक/आगरकर/अत्र्यांप्रमाणे प्रदीर्घ मुद्देसूद मत-मांडणे शोधायला जाऊ नका, सापडणार नाही.
माहिती, आणि तंत्रज्ञान हे दोन अतिशय महत्वाचे शब्द, पण आपण त्यांच्या आहारी जाऊन शिक्षणपद्धतीची नासाडी न करता ते डोळसपणे स्वीकारले पाहिजेत असं मला वाटतं.