12/15/18

हैरतों के सिलसिले

लग्न झालं तेव्हा मी डोक्याने बरी पण व्यवहारात माठ होते. सासरी गेल्यावर एखाद आठवड्याने सासूबाईंनी "आज तुझ्या हातचं जेवायचं आहे" असं फर्मान सोडल्यावर "पण मी जे करू शकते ते तुम्ही खाऊ शकाल का?" असं मी अत्यंत निर्मळ मानाने विचारलं होतं! वर अजून स्वाभिमानाची फोडणी घालून "मला कोकणस्थी गोड च भाज्या आवडतात!", असं सांगून फ्लॉवरच्या रश्यात आलं लसूण सोडा, साखर घालून सगळ्यांची तोंडं गोड केली होती. आपल्या स्वयंपाकाच्या अज्ञानाबद्दल लाज किंवा वैषम्य वाटून घ्यायचं असतं, हे हि माझ्या गावीही नव्हतं. जे शिकायला हवंय, ते आपण कधी ना कधी शिकू, त्यात काय मोठं? असा निरागस आशावाद नव्हता, तर स्वतःवरचा (कदाचित थोडा अवास्तव) विश्वास होता. अभ्यासातली हुशारी साधारण बाकी ठिकाणीपण वापरता येते, ह्याचा थोडा अनुभवपण गाठीशी होता.  :)

पण मुलगी म्हणून जन्माला आल्यावर आईबापांनी ज्या धक्क्यांपासून दूर ठेवलं होतं, तेच आश्चर्याचे धक्क्यावर धक्के  मला पुढे जगाने जे दिलेयत,त्यांना तोड नाही! लग्न थोडं उशिरा झालं (त्यांच्या मते), म्हणून "लवकर मुलं होऊ द्या!" असा सल्लाही वरातीच्या साडीबरोबरच मिळालेला, पण नवरा जास्त प्रॅक्टिकल निघाला. एका चाकाच्या गाडीपेक्षा दोन चाकाची चांगली, म्हणून त्यानं तरी लग्नानंतर शिकायचं माझं "खूळ" उचलून धरलं.

पण साधी शाळेची म्हंटली तरी पहिली नोकरीच होती ती. मी नवीन होते, देश नवीन, आणि वातावरण तर कधी न पाहिलेलं! १२ तास काम करणाऱ्या मुलींच्या डोक्यात, संध्याकाळी ६ वाजता घरी जातांना आपोआप, अंत:प्रेरणेने, "आज जेवायला काय बनवायचं?" असे विचार येत असतील तर त्या मुलींना "देवीपद" बहाल करायला माझी अजिबात हरकत नाही, पण ती मुलगी मी नव्हते. पहिली नोकरी लागल्यावर थोडी उधळपट्टी करायचा माझा पण प्लॅन होता...
पण... पुढचा धक्का वाट बघत होता. नोकरीच्या पहिल्या वर्षातून बाहेर पडते न पडते तर "आता कशाची वाट? मुलं होऊ देत!" असा घोर मागे लागला. शिवाय, आजूबाजूच्या सगळ्यांनी नंबर लावले होते, मग त्या स्पर्धेत आम्ही उरापोटी धावायला लागलो, त्या मनस्थितीत कसली होतायत पोरं?? इथवर येता येता तिशी आली, नंतर मूल झाल्यावर जरा त्यातल्या आनंदात सैलावले, तर "आता काय आयुष्यभर घरीच बसणारेस का?" -हा धक्का मात्र नवऱ्यानेच दिला (किंवा धक्का मारला, असंही असेल त्याच्या दृष्टीने!)

एकीकडे, ज्या कामाचे पैसे मिळत नाहीत, त्या कामाची कदर केली जात नाही, पण दुसरीकडे, पैशासाठी घराची गैरसोय होऊ न देण्याची शिकवण मिळालेल्या माझ्यासारख्या बायका! " लग्न झाल्यावर हळूहळू धडे मिळत गेले- कि आपलं आयुष्य हे आपल्यासाठी नसतंच मुळी...! घरासाठी, नवऱ्यासाठी, पोरांसाठी- हे झालंच तर मग उरलेलं जमेल तर आपलं म्हणायचं! संसाराच्या वाटेतले एक एक खड्डे बुजवत राहिली ती नदी, मग तिचं केवळ डबकं होऊन राहिलं. ती वाहणार कशी?

फक्त ह्यावेळी आश्चर्य नाही वाटलं, कारण जखम खोल होत होत स्वत्वाला पोखरून पार पोचलेली होती...
हैरतों के सिलसिले सोज़े निहां तक आ गाये!

एकदा वाटलं, आपली गणितंच मुळात चुकली होती... लठ्ठ पगाराच्या घरी बसून करायच्या नोकऱ्या मिळतात, ते क्षेत्र निवडायला हवं होतं. मग वाटलं, क्षेत्राचं काय? यश कधी पाहिलंच नाही, असंही नाही. आणि शेवटी ह्या निष्कर्षाला पोचले, कि थोडं थोडं सगळंच मिळवायचा हट्ट धरून बसलीस बाई, मग थोडं जे हातात आलं, त्याच बरोबर थोडं थोडं सगळंच हातातून सुटणारच ना!

परवा मात्र एका घटस्फोटाची कथा जवळून बघायचं दुर्भाग्य आलं. लठ्ठ पगाराच्या दोन नोकऱ्या, दोन पोरं, मोठं घर, सगळं असणाऱ्या दोन व्यक्तींच्या हातून प्रेम मात्र निसटलं. जगाच्या डोळ्यात आधी खुपलं काय? बाईचा नोकरीचा माज, घराकडे दुर्लक्ष, नवऱ्यावर सत्ता गाजवणं. ते बघून मात्र जाणवलं. गणित चुकलेलं नाहीये, चुकीचंच गणित आहे.

ख़ुद तुम्हे चाके गरेबाँका शऊर आ जाएगा
तुम वहां तक आ तो जाओ, हम जहांतक आ गए!

उठण्या बसण्यापासून बोलण्या घालण्यापर्यंत, मुलींच्या प्रत्येक आचार विचाराची चिरफाड करायला बसलेलं जग. त्याच चौकटींमधून उपजलेल्या माझ्या सासूबाई, आणि माझी घटस्फोटित मैत्रीण, आणि मी. तिचं संपलेलं लग्न म्हणजे स्त्रीवादाचा सर्वात मोठा पराभव आहे. "आपल्याला नक्की काय हवंय? पुरोगामी तर व्हायचं आहे, पण ते कसं व्हायचं, आणि किती झेपेल" हे न कळलेल्या पुरुषाने तो पराभव घडवून आणला आहे. पण मोलाची साथ मात्र बायकांनी स्वतःच दिली, कसल्या कसल्या चौकटींमधून स्वतःचं प्रतिबिंब बघत अस्मिता शोधत बसल्या! माझा माठपणा माझ्या चांगलाच उपयोगी पडला. नाहीतर जितपत भान आज आलंय, तितकंही आलं नसतं.


3 comments:

प्राची said...

छान लिहिलंय, पटलं एकदम.

Unknown said...

आहे तर सगळंच खरं,पण सुरुवातीचा नर्मविनोदी सूर एकदम वेगळ्याच दिशेने गेला अस मात्र
वाटलं

विशाखा said...

Unknown: शेवट जरा "सोज़े निहां" कडे गेला, असं म्हणायचं आहे का? :) :) :)