ह्या रविवारी नवीन अपार्टमेंटमधे शिफ्ट व्हायचं होतं. १५ दिवसांपासून तयारी सुरू केली, तरी शेवटच्या ३ दिवसांतल्या युद्धपातळीवरच्या आवरा-आवरीला तोंड फुटलं, आणि गत-जन्मी केलेल्या पापांसारखे प्रत्येक कपाटातून कचरे आणि सामानं निघू लागली. गेल्या जन्मीची जशी मानवाला आठवण नसते, तसंच, हे पहिल्यांदा अमेरिकेत आलेल्या boarding pass चं चिठोरं आपण आजवर जपून ठेवलं होतं, ह्याचीही मला आठवण नव्हती. पण आता ते पुढे आलं म्हटल्यावर, “फेकू की ठेवू?”चा यक्षप्रश्नही आलाच!
अशी मी अनेक घरं बदललीयेत. आणि असे अनावश्यक पसारे जमवून जमवून दरवेळी मूळ सामानात २ तरी नवीन खोक्यांची भर घातलीये. एकीकडे, प्रत्येक क्षणाचा नकाशा आपल्याबरोबर रहावा असा अट्टहास करणारी मी, आणि दुसरीकडे बॅगा भरभरून वस्तू फेकायला निघालेला माझा, “minimalist” नवरा!
पण वस्तू फेकल्या, तरी मनात अक्षरश: “घर.” करून राहिलेल्या, “वास्तू.” कशा फेकाव्या?? माझ्या मनातलं प्रत्येक घर वेगळं, आणि प्रत्येक घरातली मी ही वेगळीच की! माझ्या माहेरच्या बैठ्या बंगल्याच्या गच्चीवरून समोर पसरलेल्या मैदानावर उत्तरायण/दक्षिणायण होतांना खरंच सूर्य north-east/south-east कडे जातोय का, हे निरखून पाहिल्याचं आठवतंय. अंगणातला पारिजाताचा सडा, आणि जिन्याच्या कोनाड्यातून दिवाळीत ठेवलेल्या पणत्या दिसतायत. हिवाळ्यातल्या स्वच्छ आकाशासारखं ते बालपण, आणि ते घर!
तशा प्रत्येक घरात माझ्या काही खास जागा असतात- सहसा दिवसभरातल्या उन्हाच्या विविध छटा जिथून जाणवतील, अशा. त्यातून जर डायनिंग टेबलवर सकाळी कॉफी पितांना उन्हं आत आली, पानांमधली किलबिल, सळसळ ऐकून मनात नव्या दिवसाची नवी पालवी फुटली, तर इतकं मस्त वाटतं!!! तेव्हा लिहायला बसले, की टवटवीत फुलंच पानावर सांडतील असं वाटतं...पण सूज्ञ गृहिणींनी न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सांगते, की अशा टवटवीत सकाळी लेखनासारखा निरूपयोगी उद्योग घेऊन बसण्याचं भाग्य फक्त, “पेशाने कलाकार.” असणाऱ्यांनाच मिळतं. बाकी तुम्हा-आम्हासारख्यांना, “जागा.” आणि, “लेखन.” ह्यांची सांगड घालणं कठीण. आता बघा तरी, एवढं मूव्हींग करून चहूकडे खोकी, पिशव्या, अर्धवट जोडलेलं फर्निचर इकडे टेप तिकडे कात्री, अशा गोतावळ्यात बसून मी लिहिते आहे...
पण कारणच तसं झालं- जुनं घर सोडतांना स्वच्छ करून ठेवायचं, ही इथली पद्धत. आज गेले होते, “त्या.” घरी. कागद, कपटे, फेकायच्या चिंध्या हळूहळू बाजूला सारून, स्वयंपाकघराच्या ओट्यापासून दाराच्या पायरीपर्यंत सगळीकडे घासपूस केली. तिथे राहत असतांना एवढ्या मायेने कधी लक्ष दिलं नसेल, ते आज अगदी जीव तोडून साफसफाई केली. मग ना सामान उरलं, ना धूळ, ना कचरा. घराचा पुनर्जन्म जणू! आणि मी माझ्याच जुन्या घराच्या प्रेमात पडले पुन्हा... किल्ल्या घ्यायला मॅनेजमेंटचा माणूस येईल, त्याने कौतुक केलं पाहिजे, की तुम्ही कित्ती छान वापरलंय घर- अशी विचित्र जिद्दच होती म्हणा ना! एरवी पाहुणे येतांना, “आपलं घर स्वच्छच आहे. कोणी येणार म्हणून मुद्दाम अगदी unnaturally झाडपूस करून ठेवलेल्या शोभेच्या बाहुल्यांसारखं नकोय दिसायला.” असं ठणकावून नवऱ्याला सांगणारी मी....आणि आता चक्क security deposit ही गहाण नसतांना मन लावून घरातला एक-एक डाग काढायला लावणारं माझं मन.
आजवर कोंडणाऱ्या त्या घराच्या भिंतीबद्दल एकाएकी आता आपलेपणा वाटायला लागला. तिथे डिशवाशर नव्हतं, ही २ वर्ष उगाळलेली तक्रार आता फालतूच वाटायला लागली. ती रोजची हिरवळ, ती सवयीची पायवाट, त्यांचं माझं, (आजवर गृहितच धरलेललं) नातं तुटणार, ह्या विचाराने उगीच कासावीस व्हायला झालं. आणि कालपर्यंत अप्रूप वाटायचं, त्याच नवीन घरातले तुटलेले कोयंडे दिसायला लागले.
झालोच कशाला मेलं शिफ्ट? जुन्या घराची किल्ली सूपूर्त करतांना वाटून गेलं... स्वच्छ आंघोळ घालून तयार करून आपल्या बाळाला देवळाच्या पायरीवर ठेवावं, तसं झालं. रविवारपासून नवीन घरी राहत असलो, तरी मन मात्र जुन्या घरीच होतं, आहे...
त्या घरातली काय बरं होती माझी खास जागा? कोणास ठाऊक! थोडे दिवसांनी तिथून विलग झाल्यावर कळेल, तेव्हा सांगीन. तोवर नव्या घरी खोक्यांच्या गराड्यात एखादी, “आपली,” अशी जागा शोधायच्या कामास लागते... :-) :-)