9/24/08

सखूबाई

शाळेतली कामं आवरता आवरता खूपच उशीर झाला. एका जागी खुर्चीला चिकटून २ तास काम करत होते, तर खोलीतले motion sensor lights हि विझून गेले, म्हणून पुन्हा उठून हालचाल करायला गेले, तेवढ्यात ती आली. हातात रबराचे हातमोजे, गडद निळा ओव्हरॉल, एका हातात मॉप आणि दुसऱ्या हातात पेपरनॅपकिनचा रोल घेऊन. अमेरिकेत "बाबू" हा प्रकारच नाहिये, त्यामुळे, तिला बघून मला जरा बरंच वाटलं. शाळेत उशीरा काम करायला कोणीतरी सोबत तरी आहे म्हटलं!
रोज संध्याकाळपर्यंत शाळेत झालेला केरकचरा, रंगलेले फळे, हॉलमधे मुलांनी सांडलेलं पाणी किंवा डबा, च्युईंगगमचे चिकट गोळे, बाथरूम मधली ओसंडून वाहणारी कचरापेटी- दुसऱ्या दिवशी सकाळी आलं की ह्यातलं काहीच दिसत नाही, तेव्हा वाटतं, की त्या परीकथेतल्या ७ बुटक्यांसारखं इथेही कोणी रात्री येऊन जादूची कांडी फिरवून जातंय का काय? त्यामागचं रहस्य आज ह्या सखूच्या रूपाने उलगडलं!

ती हसली. मी ही हसले.
"You Spanish?" - इति ती.
" You English?" - इति मी.

मग दोघीही हसलो. "तू उशीरा काम करतेस?" तिने तोडक्या मोडक्या इंग्रजीत विचारलं, "शिक्षकांची कामं कधीच संपत नाहीत नं? माझं कसं, मी आता हे झाडून पुसून गेले की मोकळी. पण तुला मात्र पेपर तपासा, उद्याच्या वर्गाची तयारी करा---! त्यामुळे घरी गेल्यावरही तुझ्या डोक्याला घोर असणार!" चला, कोणाला तरी कदर आहे म्हटलं आपली. नाहीतर शिक्षक आणि पाट्या टाकण्याचा जो "गुळतुपाचा" संबंध एकदा जोडला गेलाय, तो काही केल्या मनातून जात नाही.

मग मी पण तिला जरा खुष करायला म्हटलं, "पण उद्या रोष-हशाना ची सुट्टी! त्यामुळे आज उशीरा थांबायला मला काही वाटत नाहिये."
तर ती म्हणाली, "मला कुठे बाई सुट्टी? आम्हाला फक्त वर्षातून ६ सुट्ट्या आहेत- वीकेंड व्यतिरिक्त."
"पण उद्या शाळेला सुट्टी म्हणजे कचरा करायला कोणीच येणार नाहिये- मग तुला काय काम?"
" इतर कामं करवून घेतात ना आमचे सुपर! बाथरूमच्या टाईल घासा, कार्पेट धुवा, भिंती धुवा... असलं काय काय चालूच असतं! मुलं असली नं, की माझे कामाचे ८ तास किती पटकन जातात बघा. पण सुट्टीच्या दिवशी ह्या ओसाड बिल्डिंगमधे इतका कंटाळा येतो!"

तिच्या वाक्याचं मला कौतुक वाटलं. मुलांनी कचरा केला, की हिला काढावा लागतो, त्याचा रागराग न करता उलट पडद्यामागून त्यांच्यावर माया करणारी सखूबाई मला मनापासून आवडली. तशी ती गोरीगोमटी आहे. कचरा काढणारी असेल, पण रोज छानसा मेकअप करून येते बरं का! केस व्यवस्थीत बांधलेले, थोडंसं लिपस्टिक आणि ब्लश- तिचा गोल चेहरा त्यामुळे थकलेला असेल तरी ताजातवाना दिसतो. तिच्याकडे बघून मला माझीच लाज वाटली. कधीकाळची खाकी आणि एक निळा शर्ट, पिनेत कोंबलेले केस, असा माझा अवतार. आणि म्हणे मी टीचर- आणि ती झाडूवाली!!!

"तुमच्याकडे शिक्षण स्वस्त आहे का?" एकदा मला विचारत होती. मी हो म्हटलं. "ह्म्म... मी इक्वाडोरची आहे. तिथे शिक्षण फारसं स्वस्त नाही, पण अमेरिकेपेक्षा स्वस्तच म्हणायचं. तिथे मी शाळा शिकले होते, नोकरीही करत होते. आता इथे माझ्याकडे "कागद" नाहीत. नवरा मला त्याच्या कार्डावर (म्हणजे ग्रीनकार्डावर) ऍड करून घेणार आहे, पण ते भिजत घोंगडं- अजून काही खरं नाही..."

टीव्हीवर शेकडो वेळा बघितल्यात अशा कथा, पण तिच्याकडून प्रत्यक्ष ऐकतांना मनावर मळभ आलं. तिच्यासारख्या न्यूनतम पगारावर काम करणाऱ्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केलाय Barbara Ehrenreich ने, "Nickel and Dimed: On (not) getting by in America" ह्या पुस्तकात. ही एक पत्रकार बाई, आपली खरी ओळख लपवून ३ महिने छोट्या मोठ्या नोकऱ्या करून राहिली. वॉलमार्टमधे सेल्सगर्ल, कुठे वेट्रेस तर कुठे झाडूवाली "मेड", अशी कामं करून मिळणाऱ्या पैशांचा पै-पैचा हिशोब तिने आपल्या पुस्तकात मांडलाय.

निष्कर्श?? - न्यूनतम पगारावर जगणं (मग ते अमेरिकेसारख्या आजवर समृद्ध देशात का असेना) अशक्य आहे! दोन वेळचं जेवण, आणि घरभाडं काढण्यायेवढाही तो पगार पुरेसा नाही. अमेरिकेत नोकऱ्या आहेत, असा आपला समज. आणि तो बहुतांशी खरा ही आहे. पण त्यातल्या न्यूनतम पगाराच्या नोकऱ्यांवर जगणाऱ्यांची ही कथा आहे.

त्यांच्याकडे ना शिक्षणाचं पाठबळ आहे, ना एक साधी कार, की जी घेऊन त्यांना निदान नोकरीच्या ईंटर्व्ह्यूला तरी जाता येईल. त्यांच्या कडे ना घर आहे, ना घर भाड्याने घेण्यासाठी लागणारं सिक्यूरिटी डिपॉझिट. आणि तरीही, त्यांच्या भरोशावर अमेरिकेतले मैलोंगणतीची हिरवळ फुलते आहे. त्यांच्या भरोशावर ५० बाथरूम्स मधे प्रत्येकी २ टॉयलेटपेपरचे रोल अडकवलेले आहेत. त्यांच्या भरोशावर घरांची रंगरंगोटी, त्यांच्या भरोशावर हॉटेलातली तत्पर सेवा...

एहरेनराइशच्या मते, "ही खरी जगातली परोपकारी मंडळी!" पण आमच्या सखूबाईला ह्या गहन चर्चेशी काही देणं घेणं नाही. हसतमुखाने आपली कामं आटपून घरी लेकरांचा स्वयंपाक करायला ती गेली सुद्धा!


आणि मी मात्र इथे बसून अजूनही विचार करते आहे...

9/23/08

Holden Caulfied आणि माझा अडॉलसंट- अडल्ट जीव

होल्डेनला मी खूप उशीरा भेटले, असं आता वाटतं. आधी भेटायला हवा होतास रे! तेव्हा आपली खरंच खूप छान मैत्री झाली असती. आता तुला देण्यासाठी माझ्याकडे एका हुरहुरीव्यतिरिक्त काहीच नाही... संवेदनशीलता, आदर्शवाद, झोकून देण्याचा आत्मविश्वास आणि तुटत नाही तोवर ताणून बघण्याची उत्सुकता होती माझ्यातही अगदी काल-कालपर्यंत. तेव्हा तुझे शब्दांचा खूप आधार वाटला असता मला.
पण असो. आता भेटलायस तरी तुझी गोष्ट बदलली नाहिये की! शाळेतून काढून टाकलं त्यांनी तुला, पण त्याआधी तूच त्या शाळेला लाथ मारलीस- अशी तुझी फित्रत. मी पहिल्या पाचातली, तरी मला पटलं ते. स्वत:ची गोष्ट सांगतांनाही किती बिनधास्त वापरलेस तू भिकार शब्द- शिवीगाळीला अगदी अपवित्र मानणारी मी, पण मला ते ही पटलं. कारण तुझ्या भोवती पसरलाय जसा दांभिकांचा समुदाय, तो मीही अनुभवला आहे!
पण कधीकधी हसूच येतं- खोटं वागणारे स्वत:लाच फसवतात त्याचं. तो तुझा रूममेट Stradlater! पात्र आहे एक. स्वत:ला मदनाचा पुतळा काय समजतो- आणि बाहेर जातांना इतकी शान मारातो, की जणू ह्याचे बूट पुसणारे ४ सेवक आहेत. पण दाढीच्या ब्रशमधे अडकलेले केस तसेच, आणि कपाटात कोंबलेला पसारा बघवत नाही! पण त्याचं काही नाही. चीड येते जेव्हा ह्या Stradlater सारख्या फडतूस माणसाला, जेन सारखी स्वच्छ मनाची मुलगी मिळते!
काही करता येत नाही. त्यांनी तुला शाळेतून काढलं ह्याचं खरं दु:ख नाही, पण हळव्या मनाचे लोक हळव्या मनानेच खचतात- तसं आपलं होतं.
एक साधा प्रसंग काय घडला- धाकट्या भावाशी भांडतांना "मर मेल्या" असं सहज तोंडातून निघून गेलं नं तुझ्या? आणि त्यानंतर छोटा Allie आजारी काय पडला, आणि खरंच मरून गेला.............. तू का स्वत:ला दोष लावून घेतोस?
बघ- तुझ्या गोष्टीत समरस होतांना मी आज कितीही म्हट्लं, तरी मी काही पुन्हा Adolescent होऊ शकत नाही. माझ्यातली मोठी- ताई म्हण, की आई- तिला गप्प बसवतच नाही. Holden- get a life, dude!
लोकांच्या खोट्या वागण्याचं नको मनाला लावून घेऊ. आत्ता तुला काही नाही करता येत- कारण तू पडलास एक ११वी नापास अडनिड्या वयातला मुलगा- तर त्याचंही नको वाटून घेऊ...
तुला जसं लहान मुलांना मोठेपणाच्या आजारापासून वाचवायला Catcher in the Rye व्हायचंय ना, तसं मलाही व्हायचंय तुझ्यासाठी- Catcher in the Rye. तू फक्त मोठा हो! असंही मी म्हणू शकत नाही, कारण नेमकी तुझ्यात जी संवेदनशीलता आहे, तीच नसते मोठ्यांमधे- आणि कधीकधी- स्वत:ला mature म्हणवणाऱ्या छोट्यांमधेही.
फक्त एकच सांगते- मी ऐकतेय तुझा आवाज. मला कळतेय तुझी वेदना. सांगायचा थांबू नकोस. पेन्सीनंतरच्या तुझ्या उगवण्याचाही वृत्तांत ऐकायचाय मला!

9/22/08

सहा शब्दांची कविता

तर मग मी मुलांना कविता कशी करायची ते शिकवायला लागले. कविता कशी करावी ह्याचे हॅण्डाऊटस दिले:
  1. कवितेसाठी विषय निवडणं, हे सर्वात मोठ्ठं काम आहे, त्यामुळे विषयांची यादी करा. उदाहरणार्थ, मला कोणत्या कोणत्या विषयांबद्दल लिहायला आवडेल??? समुद्रकिनारा, माझा ipod, मी, आमचा टॉमी इ. इ. (अर्थात, अमेरिकेत कुत्र्यांना टॉमी म्हणायची फॅशन आहे की नाही मला माहिती नाही. ) पण तुमच्या आवडीनुरूप तुम्ही ज्या कुत्र्याबद्दल लिहणार आहात, त्याचे/तिचे (लिंगसमभाव) नाव निवडू शकता.
  2. आता यादी तर झाली. मग आपलं काव्यक्षेत्र निवडा, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची कविता करणार? रोमॅण्टिक की पोस्टमॉडर्न? छंदबद्ध की अनिर्बंध? ते ठरवा.
  3. आता डिक्शनरी काढून तुमच्या विषयाला लागू होणारे सगळे शब्द एकत्र करा.
  4. त्या शब्दांचे प्रिंटाऊट काढून ते वेगवेगळे कापून ठेवा.
  5. एका टेबलावर त्यांची जुळणी करतांना काही "प्रेरणा" मिळते का बघा.
  6. One poem, minimum 20 lines long, will be due at the end of class. It will be graded for- originality, deep thought, word choice and grammar. (It will count as Classwork Assignment, which is 20% of your grade.
परिणाम: हॅण्डाऊटसवर Due Date न लिहिल्यामुळे कविता लिहिली नाही. - इति मुलं. कविता म्हणजे काय, ह्या विषयावर प्रत्येकाची वेगळी मतं आणि वेगळे आविष्कार असल्यामुळे, "आपण म्हणू ती कविता" असा निश्कर्ष. तू माझ्या कवितेचं कौतुक कर, मी तुझं करतो, अशा प्रकारे आपण दोघंही किती पोचलेले कलावंत आहोत, असा १० वी फ तल्या मुलांचा गोड गैरसमज.
=============================================
ही झाली कविता शिकवण्याची अमेरिकन पद्धत. आता कविता शिकवण्याची शुद्ध तुपातली देशी पद्धत:
  1. पुस्तक उघडा. ज्ञानेश्वरांची विराणी वाचायची असल्यामुळे ज्ञानेश्वर किती साली जन्मले व समाधिस्त झाले त्या तारखा पाठ करा. ("समाधी म्हणजे काय हो गुरुजी??" "रे मूर्खा, शिवाजीने अफजुलखानाची समाधी बांधली ती बघायला लाश्ट इयरला ट्रीप गेली तेव्हा तू काय चणे खात होतास?" )
  2. कवितेतले कठिण शब्द फळ्यावरून उतरवून घ्या.
  3. ज्ञानेश्वरांनी "घनू वाजे घुणघुणा" ह्या विराणीत घनाच्या रूपकाचा वापर कसा केलाय त्याचं तयार उत्तर गाईडमधून ५ वेळा लिहून काढा.
  4. उद्यासाठी गृहपाठ: घनू वाजे ह्या गाण्याला दुसरी, सोपी चाल लावून आणा. शक्यतोवर अलिकडच्या चांगल्या हिंदी सिनेमातली गाणी घ्या.
परिणाम: ज्ञानेश्वरांचं काहितरी होतं बुवा १० वी च्या पुस्तकात, काय ते आठवत नाही. विराणी ही कविता होऊच शकत नाही, कारण मास्तरांनी कवितेची व्याख्या घोकवून घेतली, त्यात विराणी हा शब्द कुठे आला नाही. "तुम्ही कविता करता का?" "छे! कविता करणं म्हणजे मेलेल्या थोर लोकांनी पुढील पीढीच्या लक्षात राहण्यासाठी साईडला चालू केलेला धंदा." किंवा सरळ, "ते तसलं काही नाही बुवा आपल्याला जमत."
कविता काय असते? नुकते NPR वर Six Word Memoirs वाचायला मिळाले. सहा शब्दात तुमच्या जीवनाची कथा लिहायला सांगितली, तर ती काय असेल? असा प्रश्न अनेक मान्यवर, तसंच सामान्य लोकांपुढे टाकून Smith Magazine ने ती सगळी उत्तरं गोळा केली, आणि त्याचं पुस्तक छापलं.
लिहावा का आपणही एक छोsssटासा जीवनालेख?
"Teacher's shoes, student-life, learning counts."
खरं तर अशा काही वाक्यांना Memoir न म्हणता कविताच म्हणायला हवं, असं मला वाटतं. जेवढं सांगणारी, तेवढंच अव्यक्तही ठेवणारी. मनाला खूप दूर नेता नेताच मनाला आंतर्मनातही डोकावून बघायला लावणारी. कधी हळव्या भावनांना प्रखर विषादाची धार देणारी, तर कधी विखारी पत्रकारितेतही माणुसकीचा ओलावा शिंपून जाणारी.
" सुचेल तशी लिहिली, तीच कविता झाली!" हे कवितेचं नाही मी म्हणत............