9/23/08

Holden Caulfied आणि माझा अडॉलसंट- अडल्ट जीव

होल्डेनला मी खूप उशीरा भेटले, असं आता वाटतं. आधी भेटायला हवा होतास रे! तेव्हा आपली खरंच खूप छान मैत्री झाली असती. आता तुला देण्यासाठी माझ्याकडे एका हुरहुरीव्यतिरिक्त काहीच नाही... संवेदनशीलता, आदर्शवाद, झोकून देण्याचा आत्मविश्वास आणि तुटत नाही तोवर ताणून बघण्याची उत्सुकता होती माझ्यातही अगदी काल-कालपर्यंत. तेव्हा तुझे शब्दांचा खूप आधार वाटला असता मला.
पण असो. आता भेटलायस तरी तुझी गोष्ट बदलली नाहिये की! शाळेतून काढून टाकलं त्यांनी तुला, पण त्याआधी तूच त्या शाळेला लाथ मारलीस- अशी तुझी फित्रत. मी पहिल्या पाचातली, तरी मला पटलं ते. स्वत:ची गोष्ट सांगतांनाही किती बिनधास्त वापरलेस तू भिकार शब्द- शिवीगाळीला अगदी अपवित्र मानणारी मी, पण मला ते ही पटलं. कारण तुझ्या भोवती पसरलाय जसा दांभिकांचा समुदाय, तो मीही अनुभवला आहे!
पण कधीकधी हसूच येतं- खोटं वागणारे स्वत:लाच फसवतात त्याचं. तो तुझा रूममेट Stradlater! पात्र आहे एक. स्वत:ला मदनाचा पुतळा काय समजतो- आणि बाहेर जातांना इतकी शान मारातो, की जणू ह्याचे बूट पुसणारे ४ सेवक आहेत. पण दाढीच्या ब्रशमधे अडकलेले केस तसेच, आणि कपाटात कोंबलेला पसारा बघवत नाही! पण त्याचं काही नाही. चीड येते जेव्हा ह्या Stradlater सारख्या फडतूस माणसाला, जेन सारखी स्वच्छ मनाची मुलगी मिळते!
काही करता येत नाही. त्यांनी तुला शाळेतून काढलं ह्याचं खरं दु:ख नाही, पण हळव्या मनाचे लोक हळव्या मनानेच खचतात- तसं आपलं होतं.
एक साधा प्रसंग काय घडला- धाकट्या भावाशी भांडतांना "मर मेल्या" असं सहज तोंडातून निघून गेलं नं तुझ्या? आणि त्यानंतर छोटा Allie आजारी काय पडला, आणि खरंच मरून गेला.............. तू का स्वत:ला दोष लावून घेतोस?
बघ- तुझ्या गोष्टीत समरस होतांना मी आज कितीही म्हट्लं, तरी मी काही पुन्हा Adolescent होऊ शकत नाही. माझ्यातली मोठी- ताई म्हण, की आई- तिला गप्प बसवतच नाही. Holden- get a life, dude!
लोकांच्या खोट्या वागण्याचं नको मनाला लावून घेऊ. आत्ता तुला काही नाही करता येत- कारण तू पडलास एक ११वी नापास अडनिड्या वयातला मुलगा- तर त्याचंही नको वाटून घेऊ...
तुला जसं लहान मुलांना मोठेपणाच्या आजारापासून वाचवायला Catcher in the Rye व्हायचंय ना, तसं मलाही व्हायचंय तुझ्यासाठी- Catcher in the Rye. तू फक्त मोठा हो! असंही मी म्हणू शकत नाही, कारण नेमकी तुझ्यात जी संवेदनशीलता आहे, तीच नसते मोठ्यांमधे- आणि कधीकधी- स्वत:ला mature म्हणवणाऱ्या छोट्यांमधेही.
फक्त एकच सांगते- मी ऐकतेय तुझा आवाज. मला कळतेय तुझी वेदना. सांगायचा थांबू नकोस. पेन्सीनंतरच्या तुझ्या उगवण्याचाही वृत्तांत ऐकायचाय मला!

5 comments:

Anand Sarolkar said...

Nice post. Hey konta pustak ahe? intresting vatata ahe.

विशाखा said...

Thank you Anand!

It's "Catcher in the Rye" by JD Salinger. Kind of an American Classic. The first time I read it, I thought Holden had nothing better to do in life than crib, but then thinking again, it is an amazing narrative of adolescent angst.

Silence said...

शेवटचे दोन लेख पटकन समजले नाही आणि पुन्हा वाचले नाही. थोडे abstract करण्याचा प्रयत्न आहे का? एक प्रश्न - दर वेळी ह्या ब्लॉगवर आल्यावर पॉप-अप्स का येत आहेत?

विशाखा said...

सायलेन्स,

ऍबस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न तर काय, उलट तसे वाटू नये असा प्रयत्न करते आहे. पण सध्या विषयच असे सुचतायत की काय करू?

पण सहा शब्दांच्या कवितेवरचा फारसा "धूसर" नाहिये असं मला वाटतंय- want to give it another shot?

अलिकडच्या लेखात Catcher in the Rye मधल्या होल्डेन ह्या मुख्य पात्राला पत्र लिहायचा प्रयत्न केलाय. :)

श्रद्धा said...

Very good post.
मुख्य म्हणजे जेव्हा मला गरज होती तेव्हाच वाचायला मिळाली.
किती छान वाटतं जेव्हा आपल्यासारखाच विचार करणारा कुणी तरी आहे, हे कळल्यावर.
मनापासून धन्यवाद.