7/19/08

चंद्रकिरणांचे क्षण

ह्या आठवड्यात आम्हाला दुसऱ्या नवीन घरी बस्तान हलवायचं म्हणून "ह्या"ने जुनी खोकी उघडली. खूपसा कचरा, आणि खूपशा आठवणी निघाल्या. पण त्यात मी कुठेच नव्हते. आमचं लग्न होऊन तीन वर्ष झाली, पण त्या खोक्यातल्या गोष्टी मला ऐकूनच माहिती होत्या. काही माझेही फोटो होते, माझीही पत्रं होती. पण मी रस घेऊन त्याच्या आठवणींमधे सहभागी झाले, तसा तो माझ्या स्मृतींमधे समरस झाला नाही. काय की...
एखाद्या व्यक्तिच्या स्वभावाची इतकी सवय होते, की त्याचंही मला फारसं काही वाटलं नाही. पण आम्हा दोघांमधे लग्नाआधी झालेल्या इ-संवादांची सी-डी करून ठेवली होती त्याने, तीच्यातही त्याला काही फारसा रस दिसला नाही. एकतर ती सीडी अशी काही लॉक झालीये, की एका विशिष्ट प्रोग्रॅमशिवाय ती उघडणार नाहीये. तर ह्याने थोडा तरी प्रयत्न करावा की नाही? अशा विचारांनी चिडचिड होऊन बाहेर फिरायला जावं म्हटलं, तर त्यातही फारसा उत्साह त्याला नसतोच, म्हणून एकटीच बाहेर पडले.
आम्हा दोघांमधे प्रेम, जिव्हाळा, काळजी कितीक असली, तरी कविता शेअर करता याव्या असे मित्र-मैत्रिणी फार फार दूर राहिलेत...सगळ्याच अपेक्षांचं ओझं एकट्या "त्या" च्या खांद्यावर टाकावं, असंही मला वाटत नाही. त्यामुळे चंद्रकिरणांनी चमचमणारी झाडं, गाड्या, रस्ते, गवत बघत निघाले, आणि एक अनाम पोकळीची जाणीव मनात दाटून आली. कोणाला द्यावे हे क्षण- जे सक्तीने फक्त माझेच होऊन राहिलेत? देऊ म्हटलं, तरी कसे द्यावे ते क्षण कोणाला, की जे माझ्या मनातून बाहेर पडता पडताच धुक्यासारखे विरून तरी जाताहेत, नाहीतर दगडासारखे घन होऊन त्यातले काव्य हरवून बसतात???

निराकार भावनांच्या त्या क्षणांना मी जपून घरी आणलं. पारदर्शक, नितळ काचेच्या डबीत हळुवारपणे भरून ठेवले, आणि मी पोळ्या-भाजीच्या कामाला निर्धास्तपणे वाहून घेतलं. मग रात्री जेवणं, आवरणी झाल्यावर हळुच काढली ती डबी. उघडून बसले कवाडं आणि हरवून गेले त्या मुक्ततेत. लिहतांना येते तशी धुंदी आली डोळ्यांवर. पुन्हा दिसले चंद्रकिरण, झाडं आणि गवत. आणि मग मी एकटी राहिले नाही...

नभाचा किनारा

"तुला पाहिले मी, नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे..."

सुरेश वाडकरांचा नितळ स्वर आणि कवी ग्रेस यांची अथांग कविता- ऐकता ऐकता मी एका वेगळ्याच विश्वात जाऊन पोचले, जिथे माझ्या पृथ्वीशी निगडीत रंगरूप, वेळकाळ, स्थिती/स्मृतींच्या पलिकडचं एक अस्तित्त्व मला मिळालं. रात्री एकाकी हिंडतांना अचानक चांदण्याची सोबत मिळाली. काव्याचं नवं परिमाण मिळालं.
त्या चंद्रने अधिकच गर्द झालेल्या रात्रीतले कधी निरर्थक, कधी हळवे, कधी काव्यात्म विचार इथे लिहिते...