12/9/09

ध्येय, प्रेम आशा यांची...

युद्धात माणसांचं काय हरवतं? असं विचारण्यापेक्षा, युद्धात मरण बघितल्यावर माणसांना जगून बघायचं काय उरतं? ह्याचा शोध घ्यायला गेलो, तर कदाचित हेमिंग्वेच्या (Hemingway) The Sun Also Rises चं उत्तर सापडेल.

Bullfighting च्या रिंगणातही एक वेगळंच युद्ध माजलेलं असतं. मॅटॅडोर (Matador) आणि पिकॅडोर (Picador) यांचा माजलेल्या सांडाभोवती झिम्मा. निसर्गातल्या सगळ्याच घटकांप्रमाणे सांडाची प्रवृती सरळधोट, निर्भिड आणि पवित्र असते. माणूसपणातून जन्माला आलेल्या क्षुद्रतेचा त्यात लवलेशही नसतो. शिंगांना रक्ताची चटक लागलेले हे सांड, अंगावरच्या असंख्य जखमांनी रक्तबंबाळ होऊनही आपला माज न सोडता, मृत्यूला धडका देतात, ती केवळ त्यांची क्षमताच नव्हे, तर एकप्रकारे त्यांच्या जन्माची पूर्तता असते. त्यांचा जन्मच मुळी मरणाशी झुंज द्यायला झालेला असतो!

तर जातिवंत मॅटॅडोर मात्र, सांडापुढे, त्याच्याच येवढा "माज" घेऊन उभे ठाकतात. त्यांच्याकडे तलवारी, सुरे असतात, आणि सांडाला चिथवण्यासाठी लाल कापडी पंखा. ही लढाई एकतर्फी असते, कारण सांड एकटा, आणि हे टोळकं. पण विजयाची खात्री असतांनाही, अंगावर धावून येणाऱ्या सांडापुढे स्वत:ला स्वच्छ प्रकट करण्यात मॅटॅडोरची खरी "माणुसकी" दिसते. आपला मर्मभेद करू शकेल, अशी आशा त्याला दाखवून, हुलकावण्या देत देत त्याला मारतांनाही त्याचा मान राखणं ज्या मॅटॅडोरला जमतं, त्याला खरा "मर्द" समजतात.

पाठीचा ताठ कणा घेऊन, आपलं पौरूष दाखवत ते लाखो लोकांसमोर मृत्यूचं हे महानाट्य उभं करतात, तेव्हा त्यांना लाखो लोकांची टाळी मिळते.

हेमिंग्वेचा जेक बार्न्स (Jake Barnes) हा bullfighting चा रसिक श्रोता आणि चाहता आहे. त्याने युद्धात स्वत:च्या प्राणांहूनही मूल्यवान असं काहीतरी - त्याचं पौरूष- गमावलंय. आता युद्धानंतर ब्रेट (Brett) च्या प्रेमात पडल्यावर तिला जे हवं ते तो देऊ शकत नाही. त्याच्यावर आतोनात प्रेम असूनही, मनासारख्या पुरूषाच्या शोधात अनेकांबरोबर संग करणारी ब्रेट सुद्धा स्वत:ला माफ करू शकत नाही. त्या दोघांच्या मित्रांचं टोळक्यातला प्रत्येक जण Brett कडे आकर्षित होतो, पण त्यांना जेकची सर येत नाही.

जेकचं दु:खच असं अपरिहार्य- त्याचं ओझं जातिवंत सहजतेने वागवत, आणि ब्रेटला तशातही आधार देत तो उभा आहे- Bullfighting च्या रिंगणात. युद्धात अनेकांनी गमावलेली माणुसकी आणि सौजन्य अजूनही त्याच्यात शिल्ल्क आहेत.

पण युद्धा आधीचा तो भोळा विश्वास? ती ध्येयासक्ती, ते राष्ट्रप्रेम - जगातल्या कुठल्याही दोघांनी एकमेकांवर करायचं असतं, तसं निस्वार्थ प्रेम- जेकचं हे हरवलेलं धन त्याला कुठून परत मिळणार?
ध्येय, प्रेम आशा यांची/ होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजितो या/ आम्ही भंगणाऱ्या मूर्ती!
काढ सखे गळ्यातील/ चांदण्याचे तुझे हात
क्षितिजाच्या पलिकडे उभे/दिवसाचे दूत.
-कुसुमाग्रज

हेमिंग्वेच्या पुस्तकातली सगळीच पात्र - कधी जीवावर उदार होऊन रिंगणात उभे राहणारे मॅटॅडोर असतात, तर कधी जीवनाच्या निरर्थकतेने रक्तबंबाळ झालेले, तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची आत्मवृत्ती असणारे सांड.

गर्ट्र्ड श्टाईन (Gertrud Stein), ह्या हेमिंग्वेच्या मैत्रिणीने त्यांना दिलेले नाव--------- The Lost Generation.


9 comments:

Anonymous said...

"मॅटॅडोर (Matador) आणि पिकॅडोर (Picador) यांचा माजलेल्या सांडाभोवती झिम्मा."

तुम्ही तुमच्या लेखात बव्हंशी सगळे अमराठी शब्द (उदा. 'Hemingway') हे रोमन लिपीत का लिहिले आहेत? ही सवय मी ठळकपणे पाहिली ती जी ए कुलकर्णींच्या लेखनात. त्याची काय गरज़ आहे, काही कळत नाही. एक तर तशी आपल्या भाषेची परंपरा नाही. टिळकांनी 'केसरी'त रॅण्ड, कर्झन, लॉइड जॉर्ज ही नावं रोमनमधे लिहिली असती तर त्या काळी अनेक लोकांना ती वाचता देखील आली नसती. जर्‌ट्रूड की गर्ट्‌रूड असा घोटाळा असेल (ज़ो की माझा स्वत:चा आहे) तर कुठलं तरी एक निवडून एकदा त्याचं स्पेलिंग दिलं की पुरेसं आहे. इंग्रजी नावं रोमनमधे लिहिल्यास त्याची देवनागरीत सोय नाही की काय, असं वाटत राहून भाषेला (लिपीला) एक प्रकारचा कमीपणा येतो.

HAREKRISHNAJI said...

खुप सुरेख लिहिले आहेत

कोहम said...

avarun ek VAPU kalyanchi katha athawali. ti thodi vegalya angane jaNari hoti pan jakham tich

विशाखा said...
This comment has been removed by the author.
विशाखा said...

ऍनॉनिमस आणि हरेकृष्णजी, प्रतिक्रियांबद्दल अनेक धन्यवाद!

ऍनॉनिमस, माझा उद्देश भाषेचा कमीपणा दाखवण्याचा नसून, जर कोणाला मूळ कलाकृतीबद्दल माहिती हवी असेल, तर इंग्रजी स्पेलिंग उपलब्ध असावे, असा होता. केवळ इंग्रजी स्पेलिंग दिले, तर फक्त उच्चारणाचा गोंधळ होऊ शकतो, पण फक्त मराठी उच्चारण दिले, तर त्यावरून आपण खात्रीलायक इंग्रजी स्पेलिंग काढू शकू का नाही, असा प्रश्न मनात येतो, म्हणून दोन्ही प्रयोग स्पष्ट करण्याचा अट्टहास!

दुसरे असे, की परंपरागत भाषेत स्मायली :) चिन्हे देण्याचीही उपलब्धता/ गरज नव्हती. आता ती आहे, आणि अनेक लोक त्याचा उपयोग करतांनाही दिसतात. पूर्वी मुद्रणाच्या किचकटपणामुळे इंग्रजी शब्द मराठीत लिहिण्याचा प्रघात पडला असावा, पण आता एका भाषेतून दुस़या भाषेत आपण अधिक सहजतेने प्रवास/ट्रान्झिशन करू शकतो असं मला वाटतं.

तिसरं असं, की व्यक्तिश: मला, इंग्रजीतले शब्द मराठीत ट्रान्स्क्राईब केलेले असले, तर वाचायला फार जड जातात. उदा: ट्रान्स्क्राईब (transcribe)

असो, तुमच्या सूचनेप्रमाणे मी काही बदल केले आहेत, आणि प्रथम कंसात इंग्रजी स्पेलिंग दिल्यावर पुढे केवळ मराठी प्रयोग केले आहेत. पुन्हा नजर फिरवून बघा- वाचतांना जास्त चांगला फ्लो येईल कदाचित.....

विशाखा said...

कोहम, कथेचे नाव आठवलं तर कळवा- वाचायला मजा येईल...

Naniwadekar said...

दामले बाई : तुम्ही मुद्दाम भाषेला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करणार नाहीत, याची मला आधीपासूनच खात्री होती. 'व्यक्तिश: मला, इंग्रजीतले शब्द मराठीत ट्रान्स्क्राईब केलेले असले, तर वाचायला फार जड जातात.' आय सी. मला त्याचा त्रास होत नाही. तरीही 'The Son Also Rises' सारखे प्रयोग तुम्ही रोमनमधे लिहिल्यास ते मी समज़ू शकतो. व्यक्तींची नावं मात्र तशी दिली तर मला विचित्र वाटतं. तुम्ही महाराष्ट्र टाइम्स मधे हे वाचताहात अशी कल्पना करा. 'पुढचा Lindwall चा चेंडू लाला अमरनाथ यांनी Bradman च्या दिशेनी टोलवला.' आणि लोक रोमन लिपीत ज़र लांबच्या लांब मराठी लिहू शकतात (ज्याचा मला त्रास होतो) तर आपण भाषाभिमानाखातर उलट का करू नये? मी स्वत: एकदा इंग्रजी स्पेलिंग नोंदवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वाचकाला नेव्हिल कार्डसची पुस्तकं Cardus, Cards, Kardas यांतल्या नक्की कशावर शोधावीत याची माहिती मिळते.

'परंपरागत भाषेत स्मायली :) चिन्हे देण्याचीही उपलब्धता/ गरज नव्हती. आता ती आहे.' हा एक अत्यंत भंपक प्रकार रूढ झाला आहे, आणि तो समाज़ाच्या बुद्‌धीभ्रंशाचं लक्षण आहे, असं मला वाटतं. पु लं ना कधी कागदावर आपले :) दात :) दाखवायची गरज़ पडली नाही. ती आपल्याला का गरज़ वाटते? (किंवा, 'वाटते :(' .) मी एकदा स्मायली न वापरल्यामुळे भयानक अडचणीत पडलो. म्हणून मी ती कधीकधी मुकाटपणे वापरतो, इतकंच. 'स्मायली घे पण कुत्रं आवर' यातला तो प्रकार आहे.

तुम्हाला बैलांच्या झुंजीत रस असल्यास 'Oh, Calcutta!' वाल्या केनेथ टायनन-च्या (Kenneth Tynan) 'The Sound of Two Hands Clapping' पुस्तकातल्या एका प्रसिद्‌ध मॅटॅडोर की पिकॅडोर वरचा लेख बघा. त्यातली व्यक्तिचित्रं खूपच छान आहेत. पुस्तक अ‍ॅमेझॉन किंवा alibris.com वर स्वस्तात मिळावं. त्या लेखाची ३-४ पानं वाचल्यावर मला मी आयुष्यभर त्या खेळाचा चाहता असल्याचा भास होऊ लागला.

> क्षितिजाच्या पलिकडे उभे/दिवसाचे दूत.
>
ही अष्टाक्षरी आहे, तेव्हा '/' खूण 'उभे' च्या आधी पाहिजे.

> पण युद्धा आधीचा तो भोळा विश्वास? ती ध्येयासक्ती, ते राष्ट्रप्रेम ...
>

युद्‌धाआधीचा विश्वास भोळा का होता, त्यानंतर राष्ट्रप्रेम का नाहीसं किंवा कमी झालं, हे काही कळलं नाही. पण त्यात आश्चर्य नाही, कारण मला हेमिंग्वे अपवादानीच कळतो. माझ्या अनुभवात, जर्मनीसारखे अपवाद सोडल्यास, युद्‌धानंतर राष्ट्रप्रेम वाढतं. आणि जर्मनीही पुढेमागे चक्रवाढ व्याज़ानी ते कधीतरी वाढवेल असा माझा अंदाज़ आहे.

- डी एन

Naniwadekar said...

केनेथ टायननच्या पुस्तकात लॉरेन्स ऑलिव्हिए वर खूप चांगला लेख आहे.

अवधूत डोंगरे said...

chanal ahe.