2/5/10

शिक्षकी आणि डीटॉक्स

आजकाल शाळेत शुक्रवारीच वीकेंड झाल्यासारखी मुलं वागतात. वैताग आला अगदी. चीड आली मनातून, एका श्रीमंत देशात लाखो सोईसुविधा असूनही शिक्षणाचं महत्त्व न कळलेल्या मुलांची. ह्या माझ्या अमेरिकन विद्यार्थ्यांना, "मी तुमच्या साठी किती "रक्त आटवलं" किंवा "घसाफोड" केली, असले वाक्प्रचारही कळू शकत नाहीत. त्यामुळे मी आणि माझा संताप! जातोय कुठे?

मी तेव्हा खरंच विचार करायला लागले. कशाला मी हौसेने शिक्षिका झाले? मी शाळेत असतांना ज्या एकमार्गी अभ्यासाला लागले, ती अगदी कालपर्यंत शिकत होते. विद्यार्थिनी म्हणून जे यश मिळत गेलं, तेच शिक्षिका म्हणूनही मिळेल असं माझंच गृहितक माझ्याच अंगाशी आलं कि काय? असा ही एक वाटून गेलं.

खरं म्हणजे शिकवतांना, "मुलांचं भलं व्हावं, त्यांना ४ गोष्टी कळाव्या" हा असला खोटा नि:स्वार्थ हेतू घेऊन काही मी ह्यात पडले नव्हते. उलटं, मला शिकवायला आवडतं, त्यात माझी हुशारी दिसते, असला सरळसरळ स्वार्थ कुठेतरी डोक्यात होता. तेव्हा तो जाणवला नव्हता, येवढंच. पण माझं साहित्यावर प्रेम आहे हे ही तेवढंच खरं. शिकवतांना आवडत्या विषयावर चर्चा करायला मिळेल, हा पण एक उद्देश त्यात होता.
त्यात शिक्षिका म्हणून माझी पात्रता किती, हातोटी कशी असेल, ह्या गोष्टी तेंव्हा दुय्यमच नव्हे, तर अगदी क्षुल्लकच वाटल्या होत्या.

मी शाळेत असतांना माझा एक साधा विश्वास होता, कि हे ज्ञान आयुष्यात महत्त्वाचं आहे. हे पुढे कुठेतरी आपल्याला लागणार आहे, म्हणूनच आपण हे शिकतोय, आणि आपल्याला हे शिकायला हवंय. तसला विश्वास घेऊन माझे विद्यार्थी काही माझ्या वर्गात आले नाहीत. तुम्हाला लाख साहित्याची चाड असेल, पण आम्ही हे "boring" पुस्तक का म्हणून वाचावं? असले प्रश्न घेऊन ती मुलं आली. मी ही दुधखुळी नाहिये, आणि वर्गातल्या सगळ्या मुलांपैकी ४-५ च जर हे विचारत असती, तर ठीक होतं, असं मला वाटायचं. पण आज सगळीच मुलं ते विचारताहेत.

बरं, शिक्षक-प्रशिक्षणात ज्या युक्त्या, क्लुप्त्या शिकले होते, त्या सगळ्या वापरूनही मुलांमधे काहीच बदल होत नाहिये, हे मी आज पाहिलं, आणि हात टेकले. त्या एका वर्गाच्या आणि माझ्या तारा कधीच जुळणार नाहीत असं आता मला स्पष्ट दिसतंय, पण त्यामुळे आता काळजी वाटते. कशी ही मुलं परीक्षा पास होणार? पुस्तकांबद्दल काडीचा इन्टरेस्ट किंवा साधं कुतुहलही नसतांना, केवळ मार्कांच्या मागे लागलेली ही मुलं! ह्यांचं मन मी कसं बदलू शकणार?

शिक्षक नेहमी आशावादी असतात असं म्हणतात. पण तो आशावाद शिकू इच्छिणाऱ्यांना लागू होतो! घोड्याला पाण्याजवळ नेलं खरं, पण त्याला तहान लागावी असं शिकवायचं! जे हे करू शकतात, ते खरे महान शिक्षक!

सगळ्या विचारांची पुन्हा पुन्हा उजळणी करूनही उत्तर का चुकत राहतं? माझा सुपरव्हायझर म्हणाला, " ह्या अनुभवातून आपण विनय शिकायचा असतो, येवढंच. तुझी चिडचिड होणं स्वाभाविक आहे, पण जाऊदे. डीटॉक्स (detox) करायचं. "

खूप विचार करून मग मला उमजलं.

सगळे उत्तम पदार्थ असूनही कधीकधी शंकरपाळे का फसतात? चकली का हसते? हे तसंच आहे. चकलीवर राग काढून काय साधणारे? हे येवढं पथ्य पाळायचं जरी जमलं, तर शिक्षकी जमो वा न जमो, काहीतरी मिळवलं असं समजेन.





No comments: