12/20/10

मनातलं गाव

प्रत्येकाच्या मनातलं एक गाव असतं.
एक छोटंसं घर, त्यातली बाल्कनी आणि खिडकीतुन दिसणारं आकाश, आणि त्यापुढच्या वळणावर पत्र्याची पोस्टाची पेटी- लहानपणी बहुतेक मनातलं गाव बस्स एवढंसंच असतं.
थोड्या वर्षांनी त्यात भर पडत जाते - कॉलेजकट्टा, चार-दोन सिनेमा थिएटर्स, उसाच्या रसाची टपरी, नाहितर ठरलेला उडपी/समोसेवाला...
मग खूप दिवस एक नशा चढते- त्याच त्या वळणांना फाटे देऊन नवीन नवीन जागा हुड्कायच्या, नवे अनुभव अनुभवायची नशा...
आपण पंख पसरले, की सगळं जगच आपल्या अवाक्यात येऊ शकेल की काय, हे आजमावून बघायची नशा...

अजून काही वर्षांची पानगळ होऊन जाते, तेव्हा आपण इटालियन, मेक्सिकन, टर्किश काय वाट्टेल ते खाऊ लागलेलो असतो. शब्दकोषात "ब्लॅक फ्रायडे", "स्प्रिंग क्लीनिंग" अशी भर पडलेली असते. आता जग बघण्यातही काही थ्रिल राहिलेलं नसतं, कारण दोन पैसे गाठीशी बांधले, तर कोणीही ते करू शकतं की!!!

तरीपण ते मनातलं छोटं गाव काही पुसट होत नाही. उलट अजून रंगीत, अजूनच स्पष्ट होत जातं. तीच बाल्कनी, खिडकीतून दिसणारं आकाश, आणि वळणावरची पोस्टाची पेटी - येवढंच काय ते खऱ्या अर्थाने आपलं होतं- बाकीचं सगळं ते फांद्यामधून पसरणं, आकाशाकडे झेपावणं, जगाला मिठी घालणं - ते फक्त धूसर स्वप्न होतं असं वाटायला लागतं. स्वप्नात कदाचित आपण वाटच चुकलो होतो... आता जाग येतेय, ही जाणीव.

आपल्या मनातल्या गावात- लोकांकडे रंगीत टीव्ही असतांना, आपला मात्र १०x१० चा श्वेत-श्याम होता. मोठ्या शहरातल्या मुली फाडफाड इंग्रजी बोलत, उंच टाचांचे सॅण्डल आणि जीन्स सर्रास घालत होत्या, तेव्हा आपण बावळटासारखे "मृत्यूंजय" वाचत, कुंकू पंजाबी ड्रेसमधे हौस करत होतो. कॅन्टीनचे समोसे खातांना २-२ रूपयांचाही हिशोब चोख ठेवत होतो. तो पीळ काही केल्या सुटत नाही.

न्यू यॉर्कातल्या बड्या ब्रॅण्डच्या दुकानांमधे "आपल्याला घालण्यासारखं काही नसतं" असं वरवर म्हणतांना, खरं तर तिथले सेल्समनही आपल्यापेक्षा जास्त सोफिस्टिकेटेड असल्याची लाज वाटत असते. मारे इटालियन खातांना, अजूनही गोऱ्यांपुढे आपले काटे-चमचे धड चालताहेत की नाही हे सारखं चाचपून बघण्यात जेवणाची मजाच निघून जाते... देसींची नवीन पिढी कशी, अर्ध्या बर्गरने अमेरिकन होऊन सहज ४-५ हजार डॉलरची खरेदी, दर उन्हाळ्यात व्हेकेशन करत असते...तसे बेफिकीर आपण कधीच होऊ शकत नाही, ह्याचं मनातून एकीकडे फार वाईटही वाटत असतं.

आताशा तर जगात कुठेही गेलं, तरी मनातल्या त्याच गावाचा नकाशा सगळ्या रस्त्यांवरून अंथरल्याचा भास... नवीन काही नकोच वाटतं आताशा!

ज्या स्मृतींनी झाडाच्या मुळांसारखी "बांधिलकी" द्यायची, त्यांनीच आपण "बांधून" घ्यायचं? मनातल्या त्या सुरक्षित कोपऱ्यातून धडपडल्यावर पुन्हा उठायची शक्ती घ्यायची, की पडायची भीती?
तुम्हीच ठरवा!

4 comments:

श्रद्धा said...

कधी नव्हे तो मी 'तुमच्या' पोस्टशी अजिबात सहमत नाही. म्हणजे पहिले ३ परिच्छेद खूपच बरोबर आहेत. पण तुम्ही म्हणता तसे पीळ किंवा नव्या जगाशी जुळवून न आल्याचा सल कधीच नसावा... निदान माझ्या मते तरी! किंवा तो असला तरी त्याला दूर करावा... उलट अशा वेळी मला तरी याचा अभिमान वाटेल की इतक्या विरुद्ध टोकाच्या जगातून येउनही मी या नवीन जगात पोचले आहे.

चांदीचा चमचा तोंडात घेऊन आलेल्याने त्याच चमच्याने आयुष्यभर खाल्ले तर त्यात काय विशेष? विशेष तेव्हा असतं जेव्हा चमच्याने खायचंच माहित नसणारा चांदीच्या चमच्याने खाऊ लागतो... हो की नाही? मग त्याने यावर रडावं की मला चांदीचा चमचा वापरता येत नाही की हसून त्याची सवय करावी? मी तरी दुसरा पर्याय निवडेन... अर्थात ते व्यक्तिश: बदलू शकतं. :)

राहाता राहिला आठवणींनी बांधण्याचा प्रश्न - मला या सगळ्या "भूतकाळातून" खरंच काही मिळतं तर जगण्याचं समाधान... इतकं सुंदर आणि फार कमी लोकांच्या वाट्याला आलेलं बालपण मी अनुभवलंय याचा निखळ आनंद - अगदी तेव्हासारखं ठेंगा दाखवून सगळ्यांसमोर मिरवण्यासारखा! ;)

काय वाटतं?

अपर्णा said...

तसे बेफिकीर आपण कधीच होऊ शकत नाही...kharay...agdi मनातलं

विशाखा said...

श्रद्धा: अगदी खरंय तू म्हणतेस ते. मी स्वत:च माझ्या पोस्टशी सहमत नाहिये- म्हणूनच शेवट प्रश्नार्थक ठेवलाय. पण ज्यांच्या साठी पोस्ट टाकली,
त्यांना ते जाणवलं तर मिळवली :)

अपर्णा: प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!
कधीकधी असं नाही का वाटत, की आपण जितके नवीन किल्ले सर करतो, तितके उलट जु्न्याच identity मधे गुंतत जातो? म्हणजे थोडक्यात, expansive identity पासून आपलीच मुळं आपल्याला दूर ठेवत असतील, तर काय उपयोग?
"बेफिकीरी" असो, किंवा "मुळातली चिंधीगिरी"- ही दोन्ही टोकं सोडून काही मधलं साध्य करता येईल का? असा प्रश्न मला पडलाय...

अपर्णा said...

>>>आपण जितके नवीन किल्ले सर करतो, तितके उलट जु्न्याच identity मधे गुंतत जातो?

बरोबर ग...मी माझ्या ब्लॉगवर मागच लिहिलेलं वाचते तेव्हा मला माझा मनातली अशा प्रकारची आंदोलनच दिसतात बघ....