3/17/11

घरात...

खोल्यांतून सुबकशा मांडलेल्या कोपऱ्यांना ।
सुखावला जीव बघे रांगोळल्या ओसऱ्यांना ॥

बैठकीस उजळतो स्नेहाचा प्रकाश सोनेरी ।
मैत्रांच्या मैफिलीतून हास्य-विनोदाच्या लहरी ॥

भिंतीच्या भकास भाळी आरसा न दाखविला ।
सौभाग्याचा चित्ररूपी अलंकार चढविला ॥

कोनाड्याच्या जाळीतून ऊन हिरवे पाझरे ।
तसे पडदे शिवले खिडक्यांवरी साजरे ॥

होळी खेळती मसाले काचेच्या बरण्यांतून ।
वाट्या-पातेल्यांचे मनोरे, त्यात दिसती शोभून ॥

शांत निळी झोप येते, ढगांच्या पलंगावरी ।
शुभ्र स्वप्नांचे हिमकण शिंपडलेल्या चादरी ॥

आता मात्र पसाऱ्याचे लागले डोहाळे घराला-
सज्ज झाले चिमुकल्या खेळण्याच्या स्वागताला!

3/11/11

कॉपी

गेले कित्येक दिवस हातांना पेन लागला नव्हता. ईमेल, फेसबूक अपडेट, ट्वीट्स मधून भरपूर व्यक्त झालं, खूप काहिसं बोलतं झालं, पण "लेखणी" च हातात नसतांना त्याला "लेखन" म्हणवेना. मग खूप चुकल्या चुकल्यासारखंही वाटायला लागलं. बाहेर पावसाचं थैमान चालू असतांना बटाटेवडे आणि चहा पेक्षा "लिहायची" तल्लफ यावी, पण खूप दिवस अंथरूणात आजारी पडून राहिल्यावर एकाएकी चालायला उभं राहिले, तरी स्वत:च्या पायांवरच भरवसा वाटू नये, तसा हाताच्या त्या लिहणाऱ्या स्नायूंवर भरवसा वाटेना.

कागदावर प्रत्येक शब्दावरच्या रेघेसरशी जाणवणारी सूक्ष्म खरखर हातातून थेट मनापर्यंत पोचून एक हलकीशी शिरशिरी जाणवावी... वेलांटी फिरवतांना पेनाचा आणि हाताचा कोन बदलून अक्षराची जाडी बदलतेय असं दिसल्यावर निबची एकच दिशा कायम ठेवण्याची खटपट करावी... दुसऱ्यांनी वापरलेल्या पेनावर कमी-अधिक दाबामुळे थोड्या खिळखिळ्या झालेल्या स्प्रिंगशी जुळवून घेत पुन्हा कागदावर आपलाच ठसा उमटावा असं अक्षर काढायची एकाग्र तपस्या करता करता शरीर-मन-विचारांची एकतानता अनुभवावी.....त्या कल्पनेनेच हरखायला झालं.

शेवटी तडमडत साहित्य शोधायला उठले. पिवळी नोटपॅड्स घ्यावी, की काळ्या-पांढऱ्या टाईल्सच्या कव्हरांची इथल्या शाळेत सर्रास दिसणारी कॉम्पोझिशनची वही? बरं, दोन-चार वाक्यांचाच एक छोटासा विचार लिहायचा असेल, तर सरळ पोस्टिटच घ्यावं का? नको... त्यापेक्षा फ्रीजवर किराण्याची यादी करते ते लांबट कागदच हाताशी पटकन सापडतील, तर तेच घेते... कागदाचा इतका विचार केल्यावर पुन्हा पेनाच्या असंख्य प्रकारांतून कुठला निवडायचा?

शाळेत असतांना वर्षाच्या सुरूवातीला कॅमलचा शाईपेन, रेनॉल्ड्सचा बॉलपेन, आणि नटराजच्या पेन्सिलींचा डबा आई-बाबा घेऊन द्यायचे, तो वर्षभर चालवण्यासाठी खूप उद्योग करायचे. ह्या पेनातल्या रिफील त्या पेनात बसवायला, ब्लेडने कापायच्या. ह्या कारभाराने त्या जरा जास्तच आखूड झाल्या, की वर याव्यात म्हणून कागदाचे अगदी साबूदाण्यायेवढे छोटे गोळे पेनाच्या मागच्या बाजूला ढोसायचे!
शाईपेनाच्या निब तर लिहण्यापेक्षा, खरखरत वहीची पानं फाडायला बनवलेल्या असाव्यात अशा! मग ब्लेडने त्यांच्यावरचा गंज काढून, किंवा निबच्या मध्ये असलेली भेग कर्कटकाने मोकळी करून, शाई पुन्हा वाहती करायची खटपट चालायची.

तुमची गरीबी-श्रीमंती शाळेत तुमच्या वहीची पानं किती गुळगुळीत आहेत, त्यावरून ठरायची. शाई फुटणाऱ्या वहीची लाज वाटली, तरी मागच्य वर्षी जर ती संपली नसेल, तर नवीन वर्षी, आधीची भरलेली पानं फाडून पुन्हा तीच घेणे भाग होते! पण खूपशी सुटी पानं उरली, तर जवळच्या "बुक बाईंडिंग" च्या दुकानातून त्यांची एक नवीन " मिसळ-वही" करून आणायचो. त्यात पांढऱ्याच पानांच्या, पण वेगवेगळ्या छटा दिसायच्या, आणि एका छटेतून दुसऱ्या छटेत गेल्यावर नवीन वहीच मिळाल्यासारखी गंमत वाटायची!

हायलायटर तर लोक कशाला वापरतात, तेच मला कित्येक दिवस माहिती नव्हतं. आम्ही आपले महत्त्वाची वाक्य सरळ पेन्सिलीने अधोरेखित करणाऱ्यातले होतो! समासात व्याख्या-शब्दार्थांपासून डूडलपर्यंत काहीही काढून भरवलेलं ते पुस्तक किती "आपलं" वाटायचं! इथे मुलांना पाठ्यपुस्तकं शाळेतून वर्षभरासाठी वापरायला देतात, त्यामुळे त्यावर पेन्सिलीने लिहिणं वगैरे चालत नाही, ही कल्पनाच मला पटायला जड गेली.

अमेरिका नवीन होती, तेव्हा सगळ्यात जास्त अप्रूप इथल्या सुपरमार्केटमधल्या "स्टेशनरी" सेक्शनचं वाटलं होतं. वेगवेगळ्या रंगांचे कार्डपेपर, साध्या फाईल, अकॉर्डियन फाईल, जेल-पेन, नाहीतर बॉलपेनचे शेकडो प्रकार, कुठल्याही कॉन्फरन्सला गेलं, तर तिथल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या, बॅंकेच्या, अगदी nonprofit संस्थांच्या टेबलवरही, बूथवर खेळणी आणि खाऊ ठेवावा, तसे पेन/हायलायटर/की-चेन असले प्रकार मुक्तहस्ते लुटले जातायत आणि आपल्याला आता फारसं लिहावं लागतच नाही, हे विसरून आपण त्यांच्या मोहात पडतोय, असं माझं कित्येकदा झालंय.

असल्या हव्यासापायी घरी केवढा कचरा वाढलाय, म्हणून आवरायला गेले, तर नवीनच चमत्कार! त्या फुकटातल्या चांदीपैकी एकूण-एक पेन चालत होता........! शाई सुकली नव्हती, की टोपण हरवलं नव्हतं. स्प्रिंग व्यवस्थित "टकटकटक" वाजत उघडमीटही होत होती!

साहित्य जुळवता जुळवताच मन किती वर्ष प्रवास करून आलं होतं! पण लिहायला बसले, तर शंभरदा वेगवेगळे कागद-पेन बदलूनही, हवं तितकं भराभर लिहिता येईना. माझं परिश्रमाने घडवलेलं, एकेकाळी मोत्यांसारखं असलेलं अक्षर, आता सवईच्या वळणा-वेलांट्यांवरूनसुद्धा अडखळत अडखळत पुढे सरकत होतं... "अ" आणि "म" चे पाय पुरेसे लांब येत नव्हते, की T आणि J ची उंची... अक्षरांतला जीवनोत्साह संपल्यासारखा, strokes मधला बुटकेपणा, कि विचारांच्या वेगाने हात धावत नव्हते म्हणून थोडासा "टाकणं टाकल्याचा" भाव सगळ्या परिच्छेदभर पसरल्यावरती, शेवटी नाइलाजाने टाईप करायला लागावं, त्यावर हसू का रडू हे ही कळेना..

पण आज कष्टाने लिहायचीच भूक भागवायची होती. म्हणून जे हाताला लागेल ते पुस्तक उघडून, पहिल्या पानापासून, सरळ समोरच्या वहीमधे उतरवून घ्यायला लागले...

3/5/11

उमाळ्याची स्वप्न

धूसर डोंगरावर पलित्यांप्रमाणे
निळ्या आकाशाकडे ज्या आवेगाने
वैशाख वणवा झेपावतो
त्या आवेगाने भस्म होण्याला
जगणं म्हणावं.

कडेकपारी चढून ओरखडलेले हात
रखरखल्या केसांनिशी, रापल्या चेहया
थकल्या डोळ्यांनिशी
वाऱ्यावर झिंगून बेभान पडावं.

अशी उमाळ्याची स्वप्न
मऊ गालिच्यात चिणलियेत
आरस्पानी पातेल्यात उकळलीयेत
इस्त्री फिरवून, समांतर कोपरे नेमके दुमडून
पुस्तकात घडी करून
ठेवलियेत.

अनवधानाने पान उघडतं
जेंव्हा "वेडाला"
लोक "खूळ" म्हणतात
तेंव्हा.