1/14/15

Not one, not two.

"आता मी प्रमुख पाहुण्यांना चार शब्द बोलायची विनंती करते!" असं निवेदिकेने म्हटलं, की प्रेक्षक आळोखेपिळोखे द्यायला लागतात. पाहुण्यांचे "चार शब्द" मात्र चांगले दोन तास चालतात!
मात्र झेन कोअनचे चार शब्द? "Not one, not two."

माझं मन आणि मी. आम्ही एकच आहोत, की दोन? ह्या प्रश्नानेच द्विधा झालेलं मन: ते एकच आहे कि दोन? माझं मन नसेल, तर मी असेन का? Descartes नावाच्या तत्वज्ञाने म्हटलंय, "I think, therefore I am." पण हा विचार करणाऱ्या, "स्व" ची जाणीव असलेल्या मनापलिकडे माझं अस्त्तित्व आहे की नाही, हेच कळत नसतांना तेच चार शब्द समर्पक वाटतात: ना एक, ना दोन......

"एक ना दोन, भाराभर चिंध्या!" माझे वडिल नेहमी सांगतात. माळेत एक-एक हव्यासाचा मणी जोडत गेले, आणि आता हे आयुष्यच तसं झालंय का? एकाने समाधान होत नाही, मग एकामागे दोन, दोनामागे तीन, ह्या हव्यासाला अंत नाही, असं असेल काय? 

काही दिवसांपासून बौद्ध धर्माबद्द्ल वाचन चाललं होतं, आणि त्यातल्या मूलतत्त्वांनी भारावून जाऊन एकदोन झेन मासिकंही जवळच्या लायब्ररीतून उचलून आणली होती. मग थोडंफार दु:खांना सामोरं जाण्याचा मार्ग, वगैरे वाचतांना, "हे आपल्याला लागू पडतंय, आणि ह्यातलं थोडं थोडं जरी रोजच्या जीवनात उतरवता आलं तर चांगलं होईल..." इतपत माझी प्रगती झाली होती.

त्यातला मला खूप आवडलेला एक प्रकार म्हणजे zen koan. थोडक्यात, ध्यान करतांना मन भटकू नये, म्हणून एक छोटसं कोडं घ्यायचं. ह्या कोड्याच्या माध्यमातून आध्यात्मिक, किंवा आत्मिक, किंवा अंतिम सत्यावर चिंतन करावं, आणि ते करतांना आपल्याला नवीन काहीतरी उमजत जावं, अशी अपेक्षा असते. ह्या कोड्याला ठरलेलं असं काही उत्तर नसतं. आपल्याला अभिप्रेत असलेल्या, किंवा जाणवलेल्या अर्थावर आपण गुरूशी चर्चा करावी, आणि त्यांच्याकडून नवीन दिशा/उपदेश घ्यावा अशी पद्धत.

तर असे चारदोन koan इकडच्या तिकडच्या वाचनात आले, पण मनात घर केलं, ते ह्या साध्या शब्दांनी:
Not one, not two. शरीर आणि मनाच्या द्वैत/अद्वैताबद्दल इथे सांगितलंय, की ब्रह्म आणि आत्म्याच्या? अद्वैतवादी म्हणतात की आत्मा आणि परमात्मा हे एकरूपच आहेत. मग आत्म्याला परमात्म्याचा शोध घ्यायला इतके कष्ट का पडतात? स्वत:चं खरं रूप ओळखू न शकलेला आत्माच द्वैत निर्माण करतो, असं असेल काय? 

 एकदा वाटतं, लग्न केल्यावर दोन व्यक्ती असल्या, तरी त्यांचं जीवन एक होतं. ते हे असेल काय? 
बरेचदा भांडण दोघांचंच असलं, तरी त्यात बरेच इतर लोक होरपळतात, गोवले जातात. मग भांडण सुरू कोणी केलं, ह्याला अर्थ नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. क्रीया-प्रतिक्रीया, ह्या दोन दिशांमधेच आपल्या मनाचा लंबक येरझाऱ्या घालत राहतो. असणं-नसणं/पॉझिटिव-निगेटिव हे बायनरीज (binaries) पण असेच, कारण त्यांची व्याख्याच मुळात परस्परावलंबी आहे. संकल्पना एकच असली तरी ती व्यक्त द्वैतातून होते, हे किती अतर्क्य!

कबीराचं एक "अद्वितीय" सुंदर भजन, लताच्या आवाजातलं, "तेरा मेरा मनवा कैसे एक होई रे?" आठवलं. ते इथे ऐकता येईल.
मै कहता तू जागत रहियो, तू जाता है सोई रे ।
जुगन जुगन समझावत हारा, कही न मानत मोई रे ॥
(मनाच्या विकारांवर विजय मिळवणं फार कठीण!  नवीन वर्षाच्या सुरवातीला कितीतरी प्रतिज्ञा स्वत:शीच करणारं हे मन. दोन दिवस झाले, की लगेच घसरू लागतं. त्याला समजवावे तरी समजत नाही, कळले, तरी वळत नाही.)

मै कहता आँखी न देखी, तू कहता कागज की लेखी ।
मै कहता सुरझावन हारी, तू राख्यो उरझाई रे ॥
(जे डोळ्यांनी बघितले नाही, ते केवळ कागदावर लिहले म्हणून, किंवा फक्त एक संकल्पना म्हणून, त्यावर विश्वास ठेवावा का? देवाच्या अस्तित्त्वाबद्दलच हा चरण असू शकेल, की देवाला कोणी बघितले नाही तरी त्यावर विश्वास कसा ठेवावा? हे कोडं मी उलगडू पाहतो, पण "तू" (देवाला/ईश्वराला संबोधिले असावे) त्यातला गोंधळ माझ्यासाठी अधिकच का वाढवून ठेवलायस? जो विश्वास ठेवतो, त्यालाच देव भेटतो म्हणतात, पण जोवर पुरावा नाही, तोवर मी विश्वास ठेवणार नाही, हा हट्ट मनाला सोडायला सांगताहेत का? 

ते गाणं, ते विचार अनेक दिवस मनात घोळत राहिले, आणि एके दिवशी, एका डोहाळेजेवणाला गेलो, तेव्हा त्या "दोन जीवांच्या" "आई" ला बघून एकदम प्रकाश पडला, कि ही दोन जीवांची असूनही, डोळ्यांना एकच दिसते! त्याला भूक लागली, तर तिच्या पोटात कालवाकालव होते. त्याने उड्या मारल्या, तर तिला गुदगुल्या! नऊ महिन्यातिल तिच्या आचार-विचारांचा बाळावर नकळत परिणाम होत असतो. 
म्हणावे तर तो छोटा जीव तिच्यापासून वेगळा नाही, तिचाच अंश आहे, तरी थोड्या दिवसांनी त्याचं स्वत:चं असं वेगळं अस्तित्त्व निर्माण होईल. तरीही, आपलं मूल कितीही, अगदी कितीही मोठं झालं, तरी आईची माया त्यावर अशीच असते, जणू काही ते अजूनही तिच्याच नाळेशी जोडलेलं आहे. ह्यालाच म्हणत असतील, "Not one, not two." एक स्त्री म्हणून, माझं आत्मज्ञान शेवटी इथे येऊन थांबलं, की स्त्री ही अनंतकाळची माता! 
तुम्हाला काय वाटतं? Not one, not two मधून तुम्हाला कुठले अर्थ प्रतीत होतात? 







1/11/15

तीळ गूळ

मागच्या आठवड्यापासून माझं "पोष्टिक" जीवन सुरू झालं- म्हणजे असं, की मी नुकतीच लायब्ररीच्या "shipping dept." मधे नोकरी धरली. विद्यार्थीदशेत इथे सगळेच लोक छोट्यामोठ्या नोकरया करतात, त्यामुळे असल्या फडतूस नोकरीची लाज न वाटता उलट मला अप्रूपच वाटलं! एक नवीन अनुभव मिळेल, शिवाय इथल्या भरमसाठ फी चा थोडा का होइना, भार हलका होईल, म्हणून ही नोकरी मला अगदीच आवश्यक आहे. आधी थोडे दिवस मी एका प्रोफेसरांसाठी data collection/survey असे काम शाळांमधे जाऊन करत होते, पण त्यासाठी घरातून सकाळी ६.३०- ७ ला निघा, मग बसने Graduate School of Education गाठा, मग तिथून car-pool करून शाळेत जा, आणि परत येतांना पुन्हा तीच कसरत करतांना माझा जीव थकून जात होता. त्यामुळे मी जरा शोधायला सुरूवात केली, तर लगेच ही पोस्टातली संधी चालून आली.

Libraries मधे आपापसांत पुस्तकांची देवाण-घेवाण होत असते. कधी कोणी विद्यार्थी, किंवा कोणी प्रोफेसर, युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत नसलेल्या पुस्तकाची मागणी दुसया एखाद्या लायब्ररीकडून करतात. मग ती लायब्ररी पोस्टाने ते पुस्तक आमच्या लायब्ररीत पाठवणार. किंवा कधी Rutgers Alexander Library मधून इथे न्यू जर्सीतल्या Public Libraries मधे पुस्तकं पाठवली जाणार- हा सगळा कारभार आमच्या Shipping Dept. मधून होतो. लायब्ररीसारख्या ठिकाणी वातावरण चांगलं असतं, शांतपणे कामं होतात, पुस्तकांशी संपर्क येतो, त्यामुळे मला हा जॉब निदान जाहिरात वाचून तरी चांगला वाटला.

Interview द्यायला गेले, तेंव्हा जरा नीटनेटके दिसावे, म्हणून नेहमीची जीन्स आणि टी-शर्ट न घालता चांगल्या trousers आणि शर्ट, formal shoes वगैरे परिधान केले. लायब्ररी माझ्या चांगलीच परिचयाची- कुठे कुठली पुस्तकं असतात, पाणी प्यायला नळ कुठे, ह्या गोष्टी मला पाठच आहेत. पण हे Shipping Dept. कोणतं त्याचा काही पत्ता लागत नव्हता. फोनवर विचारून कळलं, की हे Dept. लायब्ररीच्या मागच्या बाजूला आहे. मी शोधत शोधत तिथे पोचले, तर माझा विश्वास बसेना- समोरून अगदी भव्य, आधुनिक, elegant दिसणाया लायब्ररीला मागून अशी घाणेरडी शेपूट असेल ह्याची कोणी कल्पनाही केली नसेल. खरं म्हणजे येता जाता दिसणारा हा भाग लायब्ररीचा नसेलच, दुसर्याच कुठल्या इमारतीचा असेल, अशी माझी ठाम समजूत होती, ती अगदी चुकीची निघाली!!! त्या गचाळ खोलीचं दार ज्या बोळकांडीत उघडतं, तो बोळ थेट लायब्ररीच्या Main Lounge खाली उघडतो, हे मला परत येतांना जाणवलं!

आत जाऊन बघते, तो माझा interview घेणारा चार्ल्स, मळका टी शर्ट आणि फाटकी जीन्स ह्या अवतारात! तो धड दाढीही करत नाही रोज, हे मला आता दोन तीन दिवसांच्या अनुभवावरून कळून चुकलं आहे, पण त्या दिवशी मला वाटलं, "माझा टीचर सारखा कडक पोशाख पाहून बहुतेक माझ्याऐवजी हाच मला घाबरणार!" :) त्याने प्रथमच मला विचारून टाकलं- "तू आधी कुठे कुठे नोकरी केली आहेस?" आता माझा भारतातला जेम्तेम ३ महिन्याचा शिकवायचा अनुभव ह्याला सांगावा की नाही, ह्या विचारात मी असतांनाच तो म्हणाला, "तुझा resume इतका उत्तम आहे की मी जास्त काही विचारायलाच नको, आणि तू शिक्षिका होणार म्हणजे तु तशी जबाबदार आणि कामसू असशीलसं वाटतं !" आता त्याला मी पुढे जास्त बोलायची संधीच न देता विचारलं, " कामाच्या वेळा कायकाय? कोणत्या प्रकारची कामं माझ्याकडे येतील? मला पुढे दुसरी ह्यापेक्षाही चांगली नोकरी मिळाली तर तुम्हाला किती दिवसांची मुदत द्यावी लागेल? काही contract आहे का?" आता तो जरा गांगरला. खरं म्हणजे मी ह्या नोकरीसाठी overqualified आहे, ह्याची जाणीव त्याला असावी... "कधीकधी एखादा मुलगा एक-दोन दिवसांतच इथून पळ काढतो! पण ह्यावेळी मला इतके अर्ज आलेत की खरंच युनिव्हर्सिटीत नोकयांची मारामार असावी! त्यातून मी काही सगळ्यांना interview ला बोलवत नाहिये, त्यामुळे तुला हे काम बरं वाटत असेल तर तू मला लगेच कळव! "
एकूण, पहिल्याच भेटीत त्याने मला नोकरी जवळजवळ देऊनच टाकली होती, पण मीच त्याला म्हटले, "तुम्ही अजून कोणाला भेटायचे ते भेटून मला email करा. " मी तोंडदेखलं म्हटलं खरं, पण त्याच्याकडे बघून मला साधारण कल्पना आली होती की मला ही नोकरी मिळणार :)

माझा पहिला दिवस म्हणजे - वेगवेगळ्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या लायब्ररी मधे वेगवेगळ्या प्रकारे पुस्तकं कशी पाठवतात, ते शिकणे. Pennsylvania/ Pittsburgh सारख्या राज्यांसाठी PALCI नावाच्या कराराखाली स्वस्त दरात पुस्तकं पाठवता येतात, तर New York मधल्या कॉलेजेससाठी Metro System, असे ठरलेले आहे. New Jersey तल्या अनेक सार्वजनिक वाचनालयांमधेही आमच्या Rutgers University मधून पुस्तकं जात असतात. ते सगळे काम एकदा शिकून घेतले की बाकी सगळी निव्व्ळ "मजूरी" :)

पहिला दिवस म्हटला की सगळ्यांशी ओळखी करून घेणे वगैरे प्रकार आले. Ken (Kenneth) ह्या African American माणसाशी माझी सगळ्यात आधी गट्टी जमली- मुख्य म्हणजे तो बडबडा, साधा, आणि माझ्याच boss च्या हाताखाली काम करणारा. तो ट्रक चालवतो. New Jersey तली पुस्तकं वाटून झाली, की फावल्या वेळात आमच्या dept. मधे थोडे काम करतो. पोस्टाचे मोठे ट्रक आले, की त्यातून खोकी काढून घेणे- अशी कामं तो करतो. मला एकदा गमतीने म्हणाला, "मी आधी जिथे काम करायचो तिथे खूप इंडियन लोक होते. त्यांच्या त्या पदार्थांच्या नुसत्या तिखट वासानेच माझी झोप उडायची- त्या भीतीने मी कधी खाऊनही पाहिले नाहीत!"

माझा बॉस मात्र व्हेजिटेरियन, आणि भारतीय जेवणाचा मोठा फॅन आहे. त्याचे प्रश्न वेगळे- "इथे चांगली भारतीय हॉटेल्स कोणती आहेत?" मी त्याला नावं सांगितली तर म्हणाला, "आपण सगळे जाऊ तिथे एखादे वेळी" !!!
एकदा काय झालं, मी एकीकडे काम करत असतांना त्याचे कोणाशी बोलणे चाललेले मी ऐकले- काहीतरी मांजरींचा विषय़ होता. मी त्याला विचारलं, की तू काही मांजर वगैरे पाळलं आहेस का- तर तो बाजूचा माणूस माझ्याकडे अविश्चासाने बघायला लागला- "तू हिला सांगितलं नाहियेस का?" - हे चार्ल्सला. "अरे सांगितलं असतं तर तिने मला आधीच वेड्यात काढलं असतं ना!" - इति चार्ल्स.
"अगं ह्याच्याकडे एकूण ३५ मांजरी आहेत! -३५च ना रे चार्ल्स? की आता अजून एखादी वाढलीये? "
मला एकदम चक्करच आली- मनात म्हटलं - ह्या माणसाला काय बायका पोरं तरी आहेत का नाही? की नुसता मांजरींचा संसार सांभाळत बसला आहे?
तेवढ्यात तो म्हणाला, "अगं मी अशा काही मुद्दाम ३५ मांजरी पाळल्या नाहियेत! एकीला पिल्लं झाली, अजून एखादी वाट चुकून आमच्याकडे आली, असे करत करत येवढ्या झाल्या! मी तुला हे आधीच सांगितलं असतं तर तू इथे काम करायला आलीच नसतीस, काय? "
मग मी त्याला म्हटलं, " अरे माझ्या माहेरी पण आमच्या लालूची अशीच कहाणी आहे- बिचारा बेवारशी हिंडत होता, त्याला माझ्या बाबांनी, आजीने घरात घेतला, अर्थात, तुझ्याइतके दय़ाळू मात्र आम्ही होऊ शकत नाही....!"

असा हा माझा बॉस मला दर दिवशी नवीन धक्के देत होता. आता हळूहळू आमच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायला लागल्या आहेत- भारतातली शिक्षणपद्धती, नागपूरचे हवामान, न्यू जर्सीतला बर्फ़ वगैरे. पोस्ट्मास्तराने किती सुशिक्षित असावं त्याचा कहर म्हणजे माझा बॉस. त्याला इतिहास, पूर्वेकडचे विविध धर्म, भारतीय शास्त्रीय संगीत, अमेरिकेचे राजकारण, आणि जगातली अनेक महायुद्ध, अशा विषयांमधे अत्यंत रस आहे. मात्र computers, technology, cell phone आदि उपकरणांशी अगदी जेमतेमच संबंध. एकदा मला म्हणाला, "हे फोटो मी इमेलने कसे पाठवू? तू सांगितलंस तरी मी दुसया मिनिटाला विसरणार, त्यापेक्षा तूच मला पाठवून दे!"

परवा म्हणाला, "मी एक पुस्तक वाचत होतो- बौद्धधर्माबद्दल. तुमच्याकडे कधी हिंदू आणि बुद्धधर्मात जातीय तणाव कसे होत नाहीत? गौतम बुद्ध, सम्राट अशोक हे आधी हिंदू होते आणि त्यांनीच पुढे बौद्धधर्माचा प्रसार केला, हयावर हिंदूंची काय प्रतिक्रिया आहे? ह्या दोन धर्मांमधे कधी जातीय तणाव होत नाहीत का? " मला एकदम जाणवलं- की ह्या गोष्टीचा इतका विचार मी कधीच केला नव्हता. objective, किंवा नि:पक्षपाती दृष्टिकोन खरा कसा असतो, हे मला त्याच्या विचारांवरून कळायला लागलं. मात्र तो "अशोका" चित्रपटाची सीडी घ्यायला निघाला, तेंव्हा हसू आलं - मी त्याला सरळ सांगितलं- त्या सीडीवर पैसे वाया घालवू नको. बिचारा येवढा भारतीय इतिहासाचा अभ्यास करतो आहे- तर त्या चित्रपटातून त्याला भलत्याच खोट्या गोष्टी खर्या वाटायच्या!!!

केनशी बोलतांना मात्र अमेरिकन जीवनाची वेगळीच बाजू समजली. आपल्याला सगळे अमेरिकन श्रीमंत वाटतात, पण खरंतर त्यांची दशा अनेकदा आपल्यापेक्षाही वाईट असते. भारतातल्यासारख्या सवलती इथल्या गरीबांना शिक्षणाकरता मिळत नाहीत, आणि त्यांना कायम त्याच दलदलीत अडकून पडावं लागतं. हा केन कदाचित व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला असावा- त्याला जास्त कॉफी प्यायची भीती, जास्त साखर खायची भीती, जास्त वजन वाढण्याची भीती........अशा अनेक काळज्या असतात. डिप्रेशन तो कधी दाखवत नाही, पण मला जाणवतं- मी एका गरीब देशातली, आज इथे शिक्षण घेऊन पुढे मानाने जगण्याची स्वप्नं बघते आहे. तो मात्र होता तिथेच राहणार. "मी बॉस झालो असतो, तर मी सगळ्यांवर फार चिडचिड केली असती- म्हणूनच त्यांनी चार्ल्सला निवडलं!" त्याच्या शब्दांमागे निराशा, वाया गेलेलं आयुष्य लपलं आहे. खरी कारण आम्हा दोघांनाही माहिती आहेत, पण कधीकधी जर स्वत:ची फसवणूक करून का होईना, आला क्षण आनंदाने घालवता आला, तर का करू नये? मी त्याला सांगत असते, "अरे, आमच्या आईवडिलांनीपण भारतात खूप कष्टात दिवस काढले. त्यांनी आम्हाला चांगलं शिक्षण, चांगले संस्कार दिले म्हणून आम्ही आज इथे पोचलो. पण बाकी भारतात कितीतरी लोक कसे राहतात ह्याची कल्पनाही तुला येणार नाही. त्यांच्या मानाने आपण किती भाग्यवान- असा विचार करून तर बघ!!!"

आणि एक Jim- तो ही ट्रक चालवतो, पण शिक्षण वगैरे बरं असल्यामुळे चार्ल्सच्या गैरहाजरीत थोडी clerical कामं पण सांभाळतो. त्याचा आकार खुर्चीत न मावणारा, पण आवाज आणि बोलणं अगदी शांत, सभ्य. मी एकदा त्याला विचारलं, "तू ही Dunkin Donuts ची कॉफी कुठून आणतोस? "(Canteen मधे कॉफी असते, पण मला campus वर कधी हे दुकान दिसलं नव्हतं.) आणि दुसर्या दिवशी बघते, तर माझ्या टेबलवर Dunkin Donuts चा कप ठेवलेला!

मग संक्रांत आली. मी घरी तिळगूळ केला होता, आणि पंकजच्या सहकार्यांसाठी पाठवलाच होता- तर म्हटलं आपणही का नेऊ नये आपल्या ऑफिसमधे? मी तिळ्गूळ नेला, आणि सगळ्यांना द्यायला लागले, तर केन मला म्हणाला, "बघ बरं का- तू आज मला हा खाऊ दिलास, त्यामूळे आता उद्याही मी खाऊ कुठंय असं विचारणार! "

माझ्या वर्गातली मुलं-मुली पण चांगली आहेत, पण मला त्यांना कधी तीळगूळ द्यावासा वाटला नाही. हया लोकांच्या साधेपणाने मात्र मला एकदम आपलंसं करून घेतलं........... त्यांना तीळगूळाचा अर्थ सांगतांना मनात म्हटलं - इथे बर्फ पडतो, गार बोचरे वारे वाहतात त्यात कधीकधी मनंही गोठून जातात. पण तीळाची स्निग्धतेने, गुळाच्या गोडव्याने आणि उष्णतेने ह्या अपरिचित मनांमधूनही मैत्री जुळायला वेळ लागणार नाही!

1/6/15

पोळपाटाचे एर्गोनॉमिक्स आणि इतर "पकाऊ गोष्टी"

लग्नाआधी आई-आजींनी भरपूर मागे लागून पाहिले, कि बये, आता तरी थोडा स्वयंपाक शिकून घे. पण मुळातली नावड, आणि नावडीतून निर्माण झालेली भीती, ह्या दोन गोष्टींमुळे माझी स्वयंपाकाची "भट्टी" कधी जमत नव्हती. तरीही, एक दिवस मारून मुटकून मला "पोळ्यांच्या" कामाला जुंपण्यात आले. तुळशी बागेतून मावशांसह खरेदी (हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल) करतांना, आईने त्याकाळी नवीन निघालेला प्लॅस्टिकचा पोळपाट (अय्या काय छान आहे!, धुवायला सोप्पा, हलका, दिसतोही स्वच्छ पांढरा! वगैरे वगैरे कारणमिमांसा देऊन) घरी आणला होता. त्यावर काय जमतंय बघू, असं म्हणून मी लाटणे हातात घ्यायची खोटी, कि मला पोळ्या चक्क जमूच लागल्या!

आजी म्हणाली, "पत्रावळी आधी द्रोणा, तो जावई शहाणा!" (ह्या म्हणीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, सानेगुरूजींचे श्यामची आई वाचणे. माहिती नको असल्यासही, श्यामची आई  जरूरच वाचणे.)
एरवीपण शाळेत असतांना, बहुतांश पोरांना न जमणाऱ्या/आवडणाऱ्या गोष्टींकडेच माझं जास्त लक्ष असायचं. उदा: विज्ञान किंवा गणित हे माझे scoring subjects नसून, इंग्रजी/मराठी हे होते! बहुतांश लोकांना नावडणाऱ्या कामाची, भाज्या चिरायची पण मला फाSSSर आवड, पण फोडणीला घालणे, त्यात वेगवेगळी मसाल्यांची कॉम्बिनेशन्स, शिजवण्याची कसरत, हे येवढे डोकेखाऊ काम कोण करेल? कोथिंबीर, पालक, मेथी तर मी अश्शी बारीक चिरायची, की काड्या घेतल्या असतील तरी कळणार नाही. कलिंगडाच्या एकसारख्या चौकोनी फोडी, पावभाजीवर घ्यायचे लोणी- अगदी कशा-कशाचीही कापाकापी मला आवडते.

मग काय, माझ्या पोळ्यांचंही, माझ्या कवितांइतकच कौतुक होऊ लागलं! "काय सुरेख हलक्या हाताने लाटते! अजून एकसारखे आकार येत नाहीत, पण प्रत्येक पोळी पातळ आहे, गोलच आहे, आणि फुगतेही आहे! मुख्य म्हणजे, त्या प्लॅस्टिकच्या पोळपाटावर घरातल्या इतर कोणाचाच हात (आणि जीव) बसला नव्हता, तरी मला तो आवडू लागला. लग्नानंतर आई म्हणाली, "तसंही प्लॅस्टिकचा पोळपाट मी वापरणार नाहिये, तुला न्यायचा असेल, तर तोच ने. २३किलो वजनातही बसेल सहज."

अमेरिकेत आल्याआल्या, चांगल्या पोळपाटाखेरिजही, पोळ्या नीट व्हायला काहितरी आवश्यक असतं, हे ताबडतोब लक्षात आलं, "कणीक"! गोल्डन टेंपल, सुजाता, नेचर्स बेस्ट, वाट्टेल ते पुडे आणले, तरी सकाळची पोळी संध्याकाळी खायच्या लायकीची उरत नाही, म्हटल्यावर मास्टर्ससाठी युनिव्हर्सिटीज शोधायच्या सोडून, आधी त्याच संशोधनाकडे मोर्चा वळवला. मग लक्षात आलं, पोळी तव्यावर फार पटकन कोरडी पडत्येय. अर्ध्या मिनिटाच्या वर एकीकडे ठेवली, कि गेलीच वाया. सासू-सासरे प्रथम आले, तेंव्हा, सासूबाईंनी उत्साहाने, "मी पोळ्या करते", म्हटल्यावर माझा चेहरा बघण्यासारखा झाला! दाखवण्यासारखा एक गुण, तोही दाखवायची संधी मिळणार नाही का काय? पण कणकेने वाचवले. पहिले काही दिवस तरी, त्यांनाच पोळ्या जमेनात, मग माझं फावलं.

तर नव्याची नवलाई संपली, पोळ्या करायची हौसही भागली, तरी, त्यात एक तंद्री लागली की मला बऱ्यापैकी मन:शांती मिळते, म्हणून मी रोज पोळ्या करतेच. तर नवरा एकदा म्हणाला, "तुलाच पोळ्यांची हौस आहे. रोज दोन दोन तास (अर्थातच हे त्याचं exaggeration!) त्यात घालवतेस, त्यापेक्षा पोळ्या विकत आणूया. मला काही फरक पडत नाही." ऑ????
माझा मोठ्ठा ऑ झाला, कारण हे म्हणजे, मी त्याला, "तू नोकरी कशाला करतोस?" म्हणण्यासारखं होतं.
तरीपण मी पोराचं, पैशाचं, पोटाचं, अशी कारणं काढत दहा वर्ष पोळ्या करतच राहिले. ("बदडणे" हा शब्दप्रयोग मला लागू होत नाही, ह्याचा मला किती अभिमान!) नवीन लग्न झालेल्या कोणीही बहिणी/मैत्रिणींनी पोळ्या-प्रताप ऐकवले, कि तो आणखीनच वाढतो, हे ही सांगूनच टाकते. "मला बाई आधीपासूनच............." मी लगेच पुराण लावते.

अशी दहा वर्ष, पोळपाट-लाटण्यासह, कणकेच्या गोळ्यासारखी गोल गोल फिरत, पोळीइतकं नाही, तरी बऱ्यापैकी "फुगत-फुगत", स्वयंपाकाच्या रिंगणात मजेने झिम्मा घालत गेली. आणि एक दिवस, माझ्या पाठीराख्या प्लॅस्टिकच्या पोळपाटावर- मीच- गरम डाव ठेवला. तिथे प्लॅस्टिक वितळून खोक पडली. पुढची पोळी अडली. आणि नवीन पोळपाटाच्या शोधात असतांनाच मला माझ्या पोळपाटाचं वैशिष्ट्य कळलं. पूर्वी, लाकडी पोळपाट सुद्धा, मधे फुगीर असायचे. तसाच हा ही होता. त्यामुळे पोळी कडेकडेने लाटणं जास्त सोपं जायचं. शिवाय, लाकडी पोळपाटाला नव्हता, तसा ह्याला, सूक्ष्म खरखरीतपणा होता (बाथरूममधे घसरून पडायला नको, म्हणून टाईल्सला जसा ठेवतात, तसा) त्यामुळे, पोळी चिकटण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. आणि शेवटचा फरक असा, की हा पोळपाट नेहमीच्या पोळपाटांपेक्षा, निदान २ इंच तरी जास्त उंच होता.

मग मी भारतात, अमेरिकेत किती शोधलं, तरी तसा पोळपाट काही मला सापडला नाही. पण मनात विचार आला, कार, फोन असल्या नित्योपयोगी वस्तूंच्या ergonomics चा भरपूर विचार केला जातो, तसा स्वयंपाकातल्या सुऱ्यांव्यतिरिक्त फार कशाचा होतांना दिसत नाही. विशेषत: पोळपाट, डबे-बरण्या, पाण्याचे ग्लास-वाट्या. नवीन पोळपाटावरही मला पोळ्या करायची सवय झालीच, पण तो पोळपाट "पुन्हा होणे नाही" असं का???

त.टी.: ergonomics = कामातिल कौशल्य/कार्यक्षमतेचा अभ्यास (the study of people's efficiency in their working environment)
त.टी. २: ergonomics चा मी वाक्यात नक्कीच चुकीचा प्रयोग केलेला आहे, पण सूज्ञ वाचकहो, कृपया भा.पो. करून घ्या :)
त.टी. ३: कॉईलवर पोळ्या करायच्या असल्यास एक स्टँड असलेली उंच जाळी सहसा देसी दुकानांत मिळते, ती पोळ्या फुगवायला अनिवार्य आहे. शिवाय, ४-५ पोळ्या आधी लाटून ठेवून मग तवा तापवल्यास, पोळ्या लाटणे, व शेकणे, ह्या दोन्हीची चांगली सांगड घालता येते, कारण कॉईलवर, पोळी शेकायला अगदी कमी वेळ लागतो, पण आपल्या लाटण्याचा वेग त्या मानाने फारच कमी असतो.
त.टी. ४: कणकेचे वेगवेगळे प्रकार वापरून निष्कर्ष असा, की आशिर्वाद/नेचर्स बेस्ट/सुजाता हे प्रकार त्यातल्या त्यात उत्तम आहेत. कणीक जुनी असेल, तर मात्र वाईटच, कारण तिची लवचिकता कमी झालेली असते. शक्यतोवर छोटे पुडे आणल्यास, कणीक फार जुनी होण्याआधी वापरली जाते. अजून एक युक्ती अशी, की २ कप कणकेत १/२ कप Bob's Red Mill ची Whole Wheat Flour मिसळणे. ही महाग आहे, पण अतिशय शुद्ध कणकेप्रमाणे लालसर दिसते, व लवचिक असते, त्यामुळे पोळ्या मऊ राहतात.
त.टी. ५: माझी मावशी उवाच, "बाहेरच्या जगात इतके गड सर करणाऱ्या तुम्हा मुलींना, पोळ्या नाही जमल्या तर काही मोठेसे वाटून घ्यायला नको! Roti Maker घेऊन टाका सरळ, किंवा गुज्जू आंटी शोधा‍ :) :) 



1/4/15

आले!

भारतात, घरी,
चार मोठ्या-लहान माणसांत,
जाऊन आले. 
घरांचे उडत, उडत जाणारे रंग
पाहून आले. 

आई-बाबांचं नुस्तं असणं
त्यांचे फुटकळसे राग-लोभ
लटक्या कंटाळ्याने हलके झेलित
मजेमजेने सोसून आले. 

जुन्याच रस्त्यांवर नव्याने हरवले, 
मग नव्याच ओसाड जागा शोधून,
तिथेच तात्पुरते तंबू ठोकून,
वस्ती करून आले. 

प्रवाहातल्या दगडापरी
पाण्यातही अडखळले 
बर्फाचं मन पाण्यात
चिंब भिजवून आले.

माझ्याच रंग-रूप आकाराची
एक कागदी बाहुली म्हणून
कधीकाळी "जमलेली" भूमिका
कशीबशी वठवून, आले.

होतं नव्हतं तेवढं बोलणं 
मनातून संपून गेलं
नीरव रितेपणाचा आहेर
मनात भरून घेऊन आले.

आठवणींचे वर्ख उडायला लागले
आजचे वास्तव भिनायला लागले
हृदयाचे ठोके वाजायला लागले
तशी घाबरून, पळून का आले? 

स्वत:च्या गेले
दूर? 
कि जवळ? 
उत्तरांना प्रश्न
शोधून आले.