1/6/15

पोळपाटाचे एर्गोनॉमिक्स आणि इतर "पकाऊ गोष्टी"

लग्नाआधी आई-आजींनी भरपूर मागे लागून पाहिले, कि बये, आता तरी थोडा स्वयंपाक शिकून घे. पण मुळातली नावड, आणि नावडीतून निर्माण झालेली भीती, ह्या दोन गोष्टींमुळे माझी स्वयंपाकाची "भट्टी" कधी जमत नव्हती. तरीही, एक दिवस मारून मुटकून मला "पोळ्यांच्या" कामाला जुंपण्यात आले. तुळशी बागेतून मावशांसह खरेदी (हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल) करतांना, आईने त्याकाळी नवीन निघालेला प्लॅस्टिकचा पोळपाट (अय्या काय छान आहे!, धुवायला सोप्पा, हलका, दिसतोही स्वच्छ पांढरा! वगैरे वगैरे कारणमिमांसा देऊन) घरी आणला होता. त्यावर काय जमतंय बघू, असं म्हणून मी लाटणे हातात घ्यायची खोटी, कि मला पोळ्या चक्क जमूच लागल्या!

आजी म्हणाली, "पत्रावळी आधी द्रोणा, तो जावई शहाणा!" (ह्या म्हणीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, सानेगुरूजींचे श्यामची आई वाचणे. माहिती नको असल्यासही, श्यामची आई  जरूरच वाचणे.)
एरवीपण शाळेत असतांना, बहुतांश पोरांना न जमणाऱ्या/आवडणाऱ्या गोष्टींकडेच माझं जास्त लक्ष असायचं. उदा: विज्ञान किंवा गणित हे माझे scoring subjects नसून, इंग्रजी/मराठी हे होते! बहुतांश लोकांना नावडणाऱ्या कामाची, भाज्या चिरायची पण मला फाSSSर आवड, पण फोडणीला घालणे, त्यात वेगवेगळी मसाल्यांची कॉम्बिनेशन्स, शिजवण्याची कसरत, हे येवढे डोकेखाऊ काम कोण करेल? कोथिंबीर, पालक, मेथी तर मी अश्शी बारीक चिरायची, की काड्या घेतल्या असतील तरी कळणार नाही. कलिंगडाच्या एकसारख्या चौकोनी फोडी, पावभाजीवर घ्यायचे लोणी- अगदी कशा-कशाचीही कापाकापी मला आवडते.

मग काय, माझ्या पोळ्यांचंही, माझ्या कवितांइतकच कौतुक होऊ लागलं! "काय सुरेख हलक्या हाताने लाटते! अजून एकसारखे आकार येत नाहीत, पण प्रत्येक पोळी पातळ आहे, गोलच आहे, आणि फुगतेही आहे! मुख्य म्हणजे, त्या प्लॅस्टिकच्या पोळपाटावर घरातल्या इतर कोणाचाच हात (आणि जीव) बसला नव्हता, तरी मला तो आवडू लागला. लग्नानंतर आई म्हणाली, "तसंही प्लॅस्टिकचा पोळपाट मी वापरणार नाहिये, तुला न्यायचा असेल, तर तोच ने. २३किलो वजनातही बसेल सहज."

अमेरिकेत आल्याआल्या, चांगल्या पोळपाटाखेरिजही, पोळ्या नीट व्हायला काहितरी आवश्यक असतं, हे ताबडतोब लक्षात आलं, "कणीक"! गोल्डन टेंपल, सुजाता, नेचर्स बेस्ट, वाट्टेल ते पुडे आणले, तरी सकाळची पोळी संध्याकाळी खायच्या लायकीची उरत नाही, म्हटल्यावर मास्टर्ससाठी युनिव्हर्सिटीज शोधायच्या सोडून, आधी त्याच संशोधनाकडे मोर्चा वळवला. मग लक्षात आलं, पोळी तव्यावर फार पटकन कोरडी पडत्येय. अर्ध्या मिनिटाच्या वर एकीकडे ठेवली, कि गेलीच वाया. सासू-सासरे प्रथम आले, तेंव्हा, सासूबाईंनी उत्साहाने, "मी पोळ्या करते", म्हटल्यावर माझा चेहरा बघण्यासारखा झाला! दाखवण्यासारखा एक गुण, तोही दाखवायची संधी मिळणार नाही का काय? पण कणकेने वाचवले. पहिले काही दिवस तरी, त्यांनाच पोळ्या जमेनात, मग माझं फावलं.

तर नव्याची नवलाई संपली, पोळ्या करायची हौसही भागली, तरी, त्यात एक तंद्री लागली की मला बऱ्यापैकी मन:शांती मिळते, म्हणून मी रोज पोळ्या करतेच. तर नवरा एकदा म्हणाला, "तुलाच पोळ्यांची हौस आहे. रोज दोन दोन तास (अर्थातच हे त्याचं exaggeration!) त्यात घालवतेस, त्यापेक्षा पोळ्या विकत आणूया. मला काही फरक पडत नाही." ऑ????
माझा मोठ्ठा ऑ झाला, कारण हे म्हणजे, मी त्याला, "तू नोकरी कशाला करतोस?" म्हणण्यासारखं होतं.
तरीपण मी पोराचं, पैशाचं, पोटाचं, अशी कारणं काढत दहा वर्ष पोळ्या करतच राहिले. ("बदडणे" हा शब्दप्रयोग मला लागू होत नाही, ह्याचा मला किती अभिमान!) नवीन लग्न झालेल्या कोणीही बहिणी/मैत्रिणींनी पोळ्या-प्रताप ऐकवले, कि तो आणखीनच वाढतो, हे ही सांगूनच टाकते. "मला बाई आधीपासूनच............." मी लगेच पुराण लावते.

अशी दहा वर्ष, पोळपाट-लाटण्यासह, कणकेच्या गोळ्यासारखी गोल गोल फिरत, पोळीइतकं नाही, तरी बऱ्यापैकी "फुगत-फुगत", स्वयंपाकाच्या रिंगणात मजेने झिम्मा घालत गेली. आणि एक दिवस, माझ्या पाठीराख्या प्लॅस्टिकच्या पोळपाटावर- मीच- गरम डाव ठेवला. तिथे प्लॅस्टिक वितळून खोक पडली. पुढची पोळी अडली. आणि नवीन पोळपाटाच्या शोधात असतांनाच मला माझ्या पोळपाटाचं वैशिष्ट्य कळलं. पूर्वी, लाकडी पोळपाट सुद्धा, मधे फुगीर असायचे. तसाच हा ही होता. त्यामुळे पोळी कडेकडेने लाटणं जास्त सोपं जायचं. शिवाय, लाकडी पोळपाटाला नव्हता, तसा ह्याला, सूक्ष्म खरखरीतपणा होता (बाथरूममधे घसरून पडायला नको, म्हणून टाईल्सला जसा ठेवतात, तसा) त्यामुळे, पोळी चिकटण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. आणि शेवटचा फरक असा, की हा पोळपाट नेहमीच्या पोळपाटांपेक्षा, निदान २ इंच तरी जास्त उंच होता.

मग मी भारतात, अमेरिकेत किती शोधलं, तरी तसा पोळपाट काही मला सापडला नाही. पण मनात विचार आला, कार, फोन असल्या नित्योपयोगी वस्तूंच्या ergonomics चा भरपूर विचार केला जातो, तसा स्वयंपाकातल्या सुऱ्यांव्यतिरिक्त फार कशाचा होतांना दिसत नाही. विशेषत: पोळपाट, डबे-बरण्या, पाण्याचे ग्लास-वाट्या. नवीन पोळपाटावरही मला पोळ्या करायची सवय झालीच, पण तो पोळपाट "पुन्हा होणे नाही" असं का???

त.टी.: ergonomics = कामातिल कौशल्य/कार्यक्षमतेचा अभ्यास (the study of people's efficiency in their working environment)
त.टी. २: ergonomics चा मी वाक्यात नक्कीच चुकीचा प्रयोग केलेला आहे, पण सूज्ञ वाचकहो, कृपया भा.पो. करून घ्या :)
त.टी. ३: कॉईलवर पोळ्या करायच्या असल्यास एक स्टँड असलेली उंच जाळी सहसा देसी दुकानांत मिळते, ती पोळ्या फुगवायला अनिवार्य आहे. शिवाय, ४-५ पोळ्या आधी लाटून ठेवून मग तवा तापवल्यास, पोळ्या लाटणे, व शेकणे, ह्या दोन्हीची चांगली सांगड घालता येते, कारण कॉईलवर, पोळी शेकायला अगदी कमी वेळ लागतो, पण आपल्या लाटण्याचा वेग त्या मानाने फारच कमी असतो.
त.टी. ४: कणकेचे वेगवेगळे प्रकार वापरून निष्कर्ष असा, की आशिर्वाद/नेचर्स बेस्ट/सुजाता हे प्रकार त्यातल्या त्यात उत्तम आहेत. कणीक जुनी असेल, तर मात्र वाईटच, कारण तिची लवचिकता कमी झालेली असते. शक्यतोवर छोटे पुडे आणल्यास, कणीक फार जुनी होण्याआधी वापरली जाते. अजून एक युक्ती अशी, की २ कप कणकेत १/२ कप Bob's Red Mill ची Whole Wheat Flour मिसळणे. ही महाग आहे, पण अतिशय शुद्ध कणकेप्रमाणे लालसर दिसते, व लवचिक असते, त्यामुळे पोळ्या मऊ राहतात.
त.टी. ५: माझी मावशी उवाच, "बाहेरच्या जगात इतके गड सर करणाऱ्या तुम्हा मुलींना, पोळ्या नाही जमल्या तर काही मोठेसे वाटून घ्यायला नको! Roti Maker घेऊन टाका सरळ, किंवा गुज्जू आंटी शोधा‍ :) :) 



3 comments:

मन कस्तुरी रे.. said...

मला एकदम पटला हा लेख. मस्त. एर्गोनॉमिक्स हा एक अतिशय महत्त्वाचा पण दुर्लक्षित विषय आहे. कायम. खरेच वाट्या, बश्या, डबे-झाकणं, तव्यांची हॅंडल्स, ओट्याची रुंदी, खुर्चीची पाठ...कितीतरी गोष्टींत सुधारणेला वाव आहे!

vids feeling said...

nice i liked it. i am going to buy plastic one from india. also i got interested in this roti making since i need it badly. am in houstong and facing same problem.

विशाखा said...

Thanks for the comments! मी लेख वाढवून तळटीपांत माझी पोळ्यांबद्दलची निरीक्षणे लिहिलियेत. शेवटी प्रयोगाअंती परमेश्वर (मऊ पोळी) :)