एक होता पाए. (मराठीत "पाय" आणि "पाए" च्या उच्चारात फारसा फरक नाही, पण आशयदृष्ट्या पाय म्हटला की आपला पायच डोक्यात प्रथम येतो, म्हणून "पाए" असा वापर करते आहे.) त्याचं नाव खरंतर "पिसीन मॉलिटोर पटेल" (Piscine Molitor Patel) होतं, पण शाळेतलं चिडवणं थांबावं, म्हणून त्याने "पाए" धारण केलं, ते कायमचं. नावात काय असतं? असं शेक्स्पियर ने लाख म्हणून ठेवलं असलं, तरी "पाए" (Pi) इतकं "भारी" (भारी= मस्त असा पुणेरी अर्थ अभिप्रेत नसून भारी= loaded/आशयघन असा आहे) नाव शोधूनही सापडलं नसतं!
ह्या पाए चे वडील एक प्राणीसंग्रहालय चालवत असतात. तिथे "रिचर्ड पार्कर" नावाचा एक वाघ दाखल होतो. त्या वाघाचं नाव रिचर्ड पार्कर कसं पडलं, ह्याची पण पाएच्या नावाइतकीच मजेदार कहाणी आहे,
Yann Martel लिखित, Life of Pi. 'कहाणी' वरून आठवलं, पुराणातल्या कथा/कहाण्यांप्रमाणेच ही कादंबरी खऱ्या-खोट्याच्या सीमारेषेवर सहज प्रवास करते. म्हटले तर अकल्पनीय/अतर्क्य अशा घटनांना पाएच्या अतिशय वस्तुनिष्ठ वर्णनामुळे वास्तवाची किनार येते, म्हणूनच वाचकांनाही ती कहाणी multidimensional (बहुआयामी) आणि विचारप्रवर्तक वाटू लागते.
तर रिचर्ड पार्कर आल्यावर छोट्या पाएला त्याचे आकर्षण वाटले, आणि तो पिंजऱ्याजवळ जाऊन आला, हे कळल्यावर त्याच्या वडिलांनी, काहीशा अघोरी पद्धतीनेच, पाएला श्वापदांचा हिंस्त्रपणा दाखवून कायमचा "धडा" दिला. पण दुसरीकडे, पॉण्डिचेरीच्या बहुढंगी वातावरणात पाए वेगवेगळ्या धर्मांचेही धडे घेत होता, आणि सगळ्याच धर्मांमधे भरपूर साम्यस्थळं असूनही लोक आपापल्या जन्मजात धर्माला चिकटून का बसतात, हे कोडं उलगडायच्या आतच, वडिलांनी बोटीवरून कॅनडाला प्रयाण करायचं ठरवलं, अगदी पोरं-बाळं-प्राणी-पक्षी ह्या सगळ्या गोतावळ्यासकट. त्या जहाजाचं, रिचर्ड पार्करचं, नि पाएचं पुढे काय झालं, हीच कथावास्तू आहे.
बोटीवरचे प्राणी म्हटल्यावर नोआहच्या गोष्टीची आठवण झाली? पाएला त्याच्या मामाने उत्तम पोहणे शिकवले, आणि त्याचे नावही एका तरणतलावावरून ठेवले, पुढे पोहता येत होते, म्हणूनच तो वाचला, त्यावरून, "भवसागर तरण्याची" आठवण झाली? अशी एक दोनच नव्हे, तर शेकडो उदाहरणं पुस्तकात सापडतील, कि परस्परसंबंधांच्या उभ्या-आडव्या जाळ्यातून, वरकरणी साध्या उदाहरणातून लेखकाने जीवनाचे तत्वज्ञानच सांगितले आहे.
माणूस आणि पशूत काय फरक असतो? (हल्ली फारसा जाणवत नसला तरी) प्राण्यांना केवळ एक शरीर"धर्म"च ठाऊक असतो. जगण्यासाठी मारणे, खाणे, प्रजोत्पादन आणि संगोपन, एवढंच जीवनाचं श्रेय प्राण्यांना पुरतं. पण माणसाला त्याहून अधिक कशाचीतरी तहान असते. मारणे अथवा मरणे, ह्यापलिकडचा जीवनाचा मतितार्थ शोधायची ओढच माणसाला धर्माकडे, आणि संस्कृतीकडे घेऊन गेली. धर्माच्या प्रयोजनाची चर्चा करतांना Life of Pi सारखी पुस्तकं नक्कीच समाविष्ट करायला हवीत, कारण पाए, आणि रिचर्ड पार्करमधील नात्याचा प्रवास हा माणसातल्या पशुत्वाचा, आणि त्याविरोधात उभ्या ठाकलेल्या माणूसपणाचा प्रवास आहे, असं मला वाटतं.
म्हटलं तर पाए म्हणजे केवळ ३.१४, असे माझ्या वर्षानुवर्षे गणिताचा गंज लागलेल्या बुद्धीला आठवलं. पण विकिपिडीया वर शोधायला गेलात, तर पाए ह्या अंकाचं असाधारण महत्त्व लक्षात येतं. पाए नावाची संकल्पना माणसाने जन्माला घातली, तीच मुळी एक "नातं" स्पष्ट करून सांगण्यासाठी. जीवनातल्या अनेक चढ-उतारांत पाए मात्र "constant" आहे, आणि तरीही, त्याचं खरं मूल्य कळण्याला कितीतरी शतके जावी लागली, किंबहुना त्याचं खरं मूल्य हे अप्राप्यच आहे. Life of Pi हे शीर्षक त्या अर्थाने, "पाए ह्या संकल्पनेचा जीवनपट/विकास" म्हणूनही समर्पकच असेल.
पशूंप्रमाणे निरूद्देश जगण्याला कंटाळलेल्या माणसाला आस होती, नव्हे, त्याचा तो विश्वास होता, कि जगाची निर्मिती, त्यात मानवाची उत्क्रांती हा निव्व्ळ योगायोग नसावाच. म्हणूनच तो भवतालच्या सगळ्या घटनांमधले, वस्तूंमधले परस्परसंबंध शोधू लागतो. हा परस्परसंबंध सांगणाऱ्या दोन गोष्टी: पाए, आणि धर्म. माणसाला जीवनात पशूत्वाच्या पुढे जाणे जो शिकवतो, तो धर्म.
आज धर्माचा व्यापार, त्याची भ्रष्टता, मूळ उद्दिष्टे हरवलेलं स्वरूपच आपल्याला दिसतं, पण त्याचा विकास माणसाच्या जीवनातली एक पोकळी भरून काढण्यासाठी झाला. Karen Armstrong नावाच्या विदुषीचे धर्माच्या विकास, आणि उद्दिष्टांवरचे भाष्य फार आवडले. (तिच्या लेखाचा अनुवाद करायची जबरदस्त इच्छा आहे. ते असो.)
पाएच्या आणि वाघाच्या "कहाणीत" माणसाची आदिकालापासूनची कहाणी कुणाला सापडेल, तर कुणाला "आपण सारे अर्जुन" प्रमाणे जगण्याचे तत्वज्ञान सापडेल. मुळात पाएचा वाघ कुणालाही दिसला नाही. पण तसा तर, देव तरी कुणाला दिसलाय? तरीही, प्रत्येकाच्या अंतर्मनातल्या देवाने (अथवा वाघाने) त्याला/तिला जगण्याचं बळ, जगण्याची उमेद, जगण्याची दिशाच नव्हे, तर जिगीषाही दिलीये, हे मात्र खरं. म्हणूनच ही पाएची कहाणी पण त्या गणिती Pi च्या कहाणी इतकीच महत्वाची आहे.
No comments:
Post a Comment