"पटेल कॅश अँड कॅरी"
मी स्वतःशीच हसले, हे वाचून.
आत गेल्यावर
बचकभर गवार कोंबली
हातातल्या पारदर्शक प्लॅस्टिकमधे
इथले व्यवहारही असेच.
पारदर्शक पिशवीत दिसतात हिरव्या तजेलदार भाज्या
पण आतून बेचव, कधी राठ.
बघा, पटेल, तर यू कॅन कॅश इन
अँड कॅरी ऑन
समहाऊ.
आधी आधी चीजचॉकलेटं
खाल्ली ओ येईस्तोवर
पण मूळचा कांद्या-मुळ्याचा, आलं-लसुणाच्या वाटण्याच्याही वास
(का सहवास!) जाता जात नाही घरातून
कितीही कॅण्डल लावल्या तरीही.
लोकही विचारतातच आवर्जून, "तुम्ही वडाभात कसा करता?"
आणि वडीलमाणसं तर सदा कानामागे
"मेरा भरीत महान" गुणगुणतच असतात.
फक्त पुढे हे पालुपद जोडून, की "आम्ही म्हातारी माणसं,
तेव्हा बघा...
पटेल तर!"
देशातून परत येतांना मात्र
काय भरू काय नको होत राहतं
पापडासारखे मनाचे पीळ तिकडून आणायचे सहज
इथे येऊन कडक कोरडे वाळवून घ्यायचे
कारण ज्यादिवशी सगळी शक्ती संपलेली असते
त्यादिवशी खिचडीला
त्यांचाच आधार होतो
पण नाहीच आणता आले, तर आहेच
पटेल - कॅश अँड कॅरी
पटेल - तुम्हालाही हळूहळू, पटेल
रोजचीच त्रेधातिरपीट: कधी ही कणीक, कधी ती
तरीही
कॉइलवर, कितीही रक्त आटवलं
तरीही
क्षणात वातड वातड होणाऱ्या
त्या वैतागवाण्या पोळ्या!
त्यावर उपाय म्हणून की काय
मसाल्यात गच्चं भरलेला
गंधास्वादाचा संस्कार
गंधास्वादाचा संस्कार
आजकाल सढळ हातानेच करू लागले आहे
कधीकधी तर भसकन पडतोच!
मग शेजारीच नव्हे, तर पोरंही नाकं वाकडी करत विचारतात
"मॉमी, इट सीम्स यू मेड युअर मंथली ट्रिप टू दॅट...
व्हॉचामा कॉल इट...पटेल?"
पण विसरू देत नसतो इथला बर्फ
तुम्हाला तुमचं गोठलेलं वास्तव
रस्तेच बंद होतात तेव्हा, ब्रेड ऑम्लेट, पास्ता, सूप
भगवावंच लागतं
पण शनी-रवी त्या पटेल मधली गर्दी बघून
कधी असंही वाटतं:
की वी शूड बी एबल टू कॅरी ऑन
विदाउट धिस........पटेल!
खूपशी स्वप्नंही मग पडून राहतात
महिनोंमहिने फ्रीजरमध्ये
दामटून, वा दयेपोटी, पोरं झोपलीच लवकर
तर दोघांनी पिक्चर बघत
एकमेकांना चमच्या-चमच्याने भरवायची.
जस्ट हीट अॅंड सर्व्ह!
जस्ट हीट अॅंड सर्व्ह!
अळणीच रुटीनवर, रोज भांडणांच्या फोडण्या
घालायच्याही...दोघांनीच मिळून
पण धुराने वाजणाऱ्या भोंग्याने
ओशाळंही व्हायचं लागेचच! कारण पटेल, न पटेल
तरी शेवटी हीच कॅश कॅरी करायची आहे
जन्माची पूंजी- म्हातारपणी!
पहिल्यांदा पाऊल टाकलं होतं
देसी ग्रोसरीत, तो क्षण...
अजूनही आठवतो
विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हंटलं होतं
"अय्या! खरंच इथे सगळंच मिळतं की!"
आता वाटतं, खरंही आहे ते......
पटेल, हळूहळू पटेल.
कॅश अँड कॅरी.
ऑन.