9/24/08

सखूबाई

शाळेतली कामं आवरता आवरता खूपच उशीर झाला. एका जागी खुर्चीला चिकटून २ तास काम करत होते, तर खोलीतले motion sensor lights हि विझून गेले, म्हणून पुन्हा उठून हालचाल करायला गेले, तेवढ्यात ती आली. हातात रबराचे हातमोजे, गडद निळा ओव्हरॉल, एका हातात मॉप आणि दुसऱ्या हातात पेपरनॅपकिनचा रोल घेऊन. अमेरिकेत "बाबू" हा प्रकारच नाहिये, त्यामुळे, तिला बघून मला जरा बरंच वाटलं. शाळेत उशीरा काम करायला कोणीतरी सोबत तरी आहे म्हटलं!
रोज संध्याकाळपर्यंत शाळेत झालेला केरकचरा, रंगलेले फळे, हॉलमधे मुलांनी सांडलेलं पाणी किंवा डबा, च्युईंगगमचे चिकट गोळे, बाथरूम मधली ओसंडून वाहणारी कचरापेटी- दुसऱ्या दिवशी सकाळी आलं की ह्यातलं काहीच दिसत नाही, तेव्हा वाटतं, की त्या परीकथेतल्या ७ बुटक्यांसारखं इथेही कोणी रात्री येऊन जादूची कांडी फिरवून जातंय का काय? त्यामागचं रहस्य आज ह्या सखूच्या रूपाने उलगडलं!

ती हसली. मी ही हसले.
"You Spanish?" - इति ती.
" You English?" - इति मी.

मग दोघीही हसलो. "तू उशीरा काम करतेस?" तिने तोडक्या मोडक्या इंग्रजीत विचारलं, "शिक्षकांची कामं कधीच संपत नाहीत नं? माझं कसं, मी आता हे झाडून पुसून गेले की मोकळी. पण तुला मात्र पेपर तपासा, उद्याच्या वर्गाची तयारी करा---! त्यामुळे घरी गेल्यावरही तुझ्या डोक्याला घोर असणार!" चला, कोणाला तरी कदर आहे म्हटलं आपली. नाहीतर शिक्षक आणि पाट्या टाकण्याचा जो "गुळतुपाचा" संबंध एकदा जोडला गेलाय, तो काही केल्या मनातून जात नाही.

मग मी पण तिला जरा खुष करायला म्हटलं, "पण उद्या रोष-हशाना ची सुट्टी! त्यामुळे आज उशीरा थांबायला मला काही वाटत नाहिये."
तर ती म्हणाली, "मला कुठे बाई सुट्टी? आम्हाला फक्त वर्षातून ६ सुट्ट्या आहेत- वीकेंड व्यतिरिक्त."
"पण उद्या शाळेला सुट्टी म्हणजे कचरा करायला कोणीच येणार नाहिये- मग तुला काय काम?"
" इतर कामं करवून घेतात ना आमचे सुपर! बाथरूमच्या टाईल घासा, कार्पेट धुवा, भिंती धुवा... असलं काय काय चालूच असतं! मुलं असली नं, की माझे कामाचे ८ तास किती पटकन जातात बघा. पण सुट्टीच्या दिवशी ह्या ओसाड बिल्डिंगमधे इतका कंटाळा येतो!"

तिच्या वाक्याचं मला कौतुक वाटलं. मुलांनी कचरा केला, की हिला काढावा लागतो, त्याचा रागराग न करता उलट पडद्यामागून त्यांच्यावर माया करणारी सखूबाई मला मनापासून आवडली. तशी ती गोरीगोमटी आहे. कचरा काढणारी असेल, पण रोज छानसा मेकअप करून येते बरं का! केस व्यवस्थीत बांधलेले, थोडंसं लिपस्टिक आणि ब्लश- तिचा गोल चेहरा त्यामुळे थकलेला असेल तरी ताजातवाना दिसतो. तिच्याकडे बघून मला माझीच लाज वाटली. कधीकाळची खाकी आणि एक निळा शर्ट, पिनेत कोंबलेले केस, असा माझा अवतार. आणि म्हणे मी टीचर- आणि ती झाडूवाली!!!

"तुमच्याकडे शिक्षण स्वस्त आहे का?" एकदा मला विचारत होती. मी हो म्हटलं. "ह्म्म... मी इक्वाडोरची आहे. तिथे शिक्षण फारसं स्वस्त नाही, पण अमेरिकेपेक्षा स्वस्तच म्हणायचं. तिथे मी शाळा शिकले होते, नोकरीही करत होते. आता इथे माझ्याकडे "कागद" नाहीत. नवरा मला त्याच्या कार्डावर (म्हणजे ग्रीनकार्डावर) ऍड करून घेणार आहे, पण ते भिजत घोंगडं- अजून काही खरं नाही..."

टीव्हीवर शेकडो वेळा बघितल्यात अशा कथा, पण तिच्याकडून प्रत्यक्ष ऐकतांना मनावर मळभ आलं. तिच्यासारख्या न्यूनतम पगारावर काम करणाऱ्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केलाय Barbara Ehrenreich ने, "Nickel and Dimed: On (not) getting by in America" ह्या पुस्तकात. ही एक पत्रकार बाई, आपली खरी ओळख लपवून ३ महिने छोट्या मोठ्या नोकऱ्या करून राहिली. वॉलमार्टमधे सेल्सगर्ल, कुठे वेट्रेस तर कुठे झाडूवाली "मेड", अशी कामं करून मिळणाऱ्या पैशांचा पै-पैचा हिशोब तिने आपल्या पुस्तकात मांडलाय.

निष्कर्श?? - न्यूनतम पगारावर जगणं (मग ते अमेरिकेसारख्या आजवर समृद्ध देशात का असेना) अशक्य आहे! दोन वेळचं जेवण, आणि घरभाडं काढण्यायेवढाही तो पगार पुरेसा नाही. अमेरिकेत नोकऱ्या आहेत, असा आपला समज. आणि तो बहुतांशी खरा ही आहे. पण त्यातल्या न्यूनतम पगाराच्या नोकऱ्यांवर जगणाऱ्यांची ही कथा आहे.

त्यांच्याकडे ना शिक्षणाचं पाठबळ आहे, ना एक साधी कार, की जी घेऊन त्यांना निदान नोकरीच्या ईंटर्व्ह्यूला तरी जाता येईल. त्यांच्या कडे ना घर आहे, ना घर भाड्याने घेण्यासाठी लागणारं सिक्यूरिटी डिपॉझिट. आणि तरीही, त्यांच्या भरोशावर अमेरिकेतले मैलोंगणतीची हिरवळ फुलते आहे. त्यांच्या भरोशावर ५० बाथरूम्स मधे प्रत्येकी २ टॉयलेटपेपरचे रोल अडकवलेले आहेत. त्यांच्या भरोशावर घरांची रंगरंगोटी, त्यांच्या भरोशावर हॉटेलातली तत्पर सेवा...

एहरेनराइशच्या मते, "ही खरी जगातली परोपकारी मंडळी!" पण आमच्या सखूबाईला ह्या गहन चर्चेशी काही देणं घेणं नाही. हसतमुखाने आपली कामं आटपून घरी लेकरांचा स्वयंपाक करायला ती गेली सुद्धा!


आणि मी मात्र इथे बसून अजूनही विचार करते आहे...

1 comment:

Varsha said...

मला तुमचा हा लेख खुपच आवडला. त्या सखुबाईचे अगदी सुरेख व्यक्तिचित्रण झाले आहे, तीचे चित्र अगदी डोळ्यासमोर उभे रहाते. मी पण परदेशात रहाते, इकडे पण workers, maids, part time कामे करणारी माणसे ह्यांची परिस्थीती same च आहे.
खरंतर तुमची कविता वाचुन मि तुमचे इतर लिखाण वाचायला उत्सुक झाले.